घंटी

 घंटी 

लेखिका - सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

बेडरूममधून येणारा घंटीचा आवाज ऐकून वासंती भाजीखालचा गॅस कमी करून बेडरुममध्ये गेली. निलेशच्या चेहऱ्यावर व्याकुळ भाव होते. 'बहुतेक परत डायपर बदलावा लागणार,' वासंतीच्या मनात आले.


"डायपर बदलून हवा आहे का? एक मिनिट थांब, तेवढा गॅस बंद करून येते," असं म्हणून ती बाहेर आली. नकळत तिचे डोळे भरून आले. स्वतःला सावरत, गॅस बंद करुन ती परत निलेशकडे आली. काही न झाल्यासारखे भासवत त्याच्याशी बोलत तिने त्याला स्वच्छ करून नवीन डायपर लावून दिला. बेडवरून ती उठताना त्याने तिचा हात पकडला. त्यामागील उद्देश तिने न सांगताच ओळखला.


"काही गरज नाही थँक यू म्हणायची. अरे मी बायको आहे तुझी. जर तुझ्या जागी मी असते तर तू सुद्धा नक्की असंच केलं असतं माझं सगळं. त्यामुळे आता जास्त काही विचार न करता आराम कर. मी आवरते, ऑफिसला उशीर होईल." त्याच्या हातावर थोपटून, हळुवारपणे त्याच्या कपाळावर ओठ टेकवून ती उठली. 


'आज याला लूज मोशन्स होत आहेत वाटतं, डॉक्टरांशी बोललं पाहिजे. शिवाय मंगेशलाही कल्पना द्यावी लागेल.' भराभर स्वयंपाक आवरताना तिचे विचार धावत होते. स्वयंपाक उरकून ओटा आवरून तिने मोबाइल हाती घेतला आणि लगेच डॉक्टरांना आणि निलेशसाठी ठेवलेल्या नर्सला म्हणजे मंगेशला निलेशच्या तब्बेतीची माहिती दिली. मंगेश येताना डॉक्टरांकडून औषध आणणार असल्याचे समजल्यावर वासंतीने ऑफिसला जाण्यासाठी घर सोडले. 


आज तिला थोडासा उशीर झाला होता म्हणून स्कूटर वेगात चालवत डोक्यात अनेक विचार घेऊन वासंती ऑफिसच्या दिशेने चालली होती.


दोन वर्षांपूर्वी सगळं कसं सुरळीत चालू होतं. एक दिवस अचानक निलेश ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडला आणि सगळंच बदललं. सहकाऱ्यांनी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नितेशला ब्रेन स्ट्रोक आला होता. महिनाभराच्या उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले पण एका धडधाकट पुरुषाचा लोळागोळा झाला होता. त्याला अपंगत्व आले होते. तेव्हापासून आजतागायत वासंतीची कसोटी सुरु झाली होती. 


  निलेशच्या ऑफिसमधून मिळालेले पैसे त्याच्या उपचारासाठी खर्च झाले. नशिबाने तिला नोकरी होती. त्यामुळे त्याच्यासाठी पुरुष नर्स ठेवणे, इतर औषधोपचार ती करू शकत होती. पण खरं सांगायचं तर वासंती आता मनाने थकली होती. अवघं सत्तावीस वर्षाची होती ती पण सतत घर, ऑफिस, नवरा याचा ताण घेऊन पस्तीशीची वाटत होती. निलेशला एकटं सोडून ऑफिस व्यतिरिक्त इतर कुठेच जाता येत नव्हते. तिचे आई वडील सुरुवातीचे काही दिवस राहिले पण नंतर वडिलांच्या नोकरीमुळे त्यांना जावे लागले. सासू सासऱ्यांनाही जमण्यासारखे नव्हते. शिवाय कोण कधीपर्यंत राहील. कधीतरी तिला एकटीने मॅनेज करावे लागणार होतेच. 


विचाराच्या नादात वासंती ऑफिसला येऊन पोहोचली. बायोमेट्रिक हजेरी लावून ती तिच्या क्युबिकलमध्ये आली. पटापट काम हातावेगळी करताना तिचे आजूबाजूला फारसे लक्ष नव्हते. काम आटोक्यात आल्याचे लक्षात आल्यावर तिने दहा मिनिटाचा ब्रेक घेण्याचे ठरवून हाताचे तळवे डोळ्यांवर दाबून धरले. उठून ती वाॅशरूमकडे निघाली. जाताना तिच्या लक्षात आले, आज लेडीज स्टाफ बऱ्यापैकी ठेवणीतले कपडे घालून आला आहे. 


"काय ग मंजिरी, आज काही स्पेशल आहे का? नाही म्हणजे तुम्ही सगळ्या खास कपडे घालून आलात म्हणून विचारलं." वॉशरुममधील आरशात पाहून ओठांवर लिपस्टिक फिरवणाऱ्या मंजिरीला वासंतीने विचारले.


"म्हणजे? तुला माहीत नाही? आज आपण मूव्ही बघायला जाणार आहोत ना?" वासंतीचा चेहरा पाहून मंजिरी पुढे म्हणाली, " उम्म वेट... तुला कुणीच सांगितलं नाही? सो यू आर नॉट कमिंग, राईट? सो सॉरी, मला वाटलं, तुला माहीत आहे."


"इट्स ओके, तसंही मला जमलंच नसतं म्हणा." हसून वासंती म्हणाली. मंजिरीला मात्र मनापासून वाईट वाटले. 


"तिला विचारुन काय उपयोग, ती आलीच नसती ना. तुला माहिती आहे ना तिच्या नवऱ्याबद्दल." लंचब्रेकमध्ये रजनी मोठ्याने म्हणाली तसे प्रत्येकाच्या नजरा वासंतीकडे वळल्या. त्या नजरांमधील बिचारी ती असे भाव तिला सहन नाही झाले आणि फटकन आपला डबा बंद करून वासंती वॉशरूमकडे गेली. तिच्या डोळ्यातून अविरत धारा वाहत होत्या. कसंबसं स्वतःला सावरत ती तिच्या जागेवर जाऊन बसली आणि काम करायला लागली. निलेशचे असे झाले तेव्हा सुरुवातीला सगळे खूप को ऑपरेटिव्ह होते. पण आता दोन वर्षे उलटून गेल्यावर कोणाला काही वाटेनासे झाले होते. आपल्याला वेगळी सहानुभूतीची ट्रीटमेंट मिळावी अशी वासंतीची अजिबात इच्छा नव्हती. पण निदान सहकारी म्हणून सगळ्यांनी नॉर्मल वागावे, वाळीत टाकल्यासारखे वागवू नये असं तिला वाटत असे आणि ते गैर नव्हते. म्हणूनच आज ती दुखावली गेली होती. 


वेळ होताच लॉग आऊट करत वासंती उठली आणि कुणाला बाय करायची ही तसदी न घेता सरळ निघून गेली. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. वासंती त्याची पर्वा न करता स्कूटर चालू करून भर पावसात भिजत निघाली. आज तिला खूप रडावेसे वाटत होते. आईची तीव्रतेने आठवण येत होती. 


घरी येईपर्यंत तिचे दुःखाचे कड ओसरले होते. डोकं पुसून तिने स्वतःसाठी चहा बनवून घेतला. रात्रीच्या जेवणासाठी दाल खिचडीची तयारी केली. निलेशला आठ वाजता भरवून मंगेश घरी जायचा म्हणून वासंतीने जेवण बनवून ठेवले. रोजच्याप्रमाणे त्याचे काम झाल्यावर मंगेश निघून गेला. आता घरी फक्त वासंती आणि निलेश उरले. वासंती जरा वेळ निलेशच्या खोलीत जाऊन बसली. मोबाईलवर गाणी लावून त्याच्या बाजूला पहुडली. 


"वासंती, खूप थकलेली दिसतेस आज." तिच्याकडे पाहत अडखळत्या आवाजात त्याने विचारले.


"हो रे, आज जरा जास्तच काम होतं. झोप तू, मीही जाते झोपायला." त्याच्या केसात हात फिरवून ती झोपायला गेली. पण आज निलेशला खरंच त्रास होत असावा. दर तासा दोन तासाने त्याच्या खोलीतून घंटीचा आवाज येत होता. वासंती जाऊन त्याला पाणी पाजत असे, डायपर बदलून देई. रात्र यातच गेल्याने सकाळी तिला अगदी गळून गेल्यासारखे वाटू लागले. बराच विचार करून वासंतीने सुट्टी घेत असल्याचे बॉसला कळवून टाकले. निलेशसाठी तिने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली.


"मिसेस वर्तक, यांचे इंटर्नल ऑर्गन हळूहळू फेल होत चालले आहेत. मला सांगायला अवघड जातंय पण यापुढे परिस्थिती अजून बिकट होत जाणार आहे."


"अजून किती वेळ आहे हातात?" सगळा धीर एकवटून वासंतीने विचारले.


"काही सांगता येत नाही. म्हणजे सध्यातरी फक्त सुरुवात झाली आहे. आपण ट्रीटमेंट सुरू करू या. पाहू बॉडी कशी रेस्पोंड करते."


थंड विझलेल्या नजरेने वासंती उठून केबिनबाहेर आली. नवऱ्याला घेऊन घरी परतली. 


"काय म्हणाले डॉक्टर?" सासू सासरे, आई वडील सगळ्यांनी उत्सुकतेने, काळजीने विचारले.


"काही नाही, औषध बदलून दिले आहे." तिने जास्त बोलायची संधी दिली नाही. कुणाचा कळवळा, सहानुभूती नकोच होती आता. फक्त त्याचे जितके दिवस उरलेत ते शांततेत जाऊ दे ही एकच प्रार्थना केली तिने सांजवात लावताना. 


मी बरी आणि माझे काम बरे असे ऑफिसमध्ये आणि घरी निलेशची जीवापाड काळजी घेणे इतकंच आयुष्य उरलं तिचे. तिशी ओलांडून पस्तिशी जवळ आली तिची. त्याच्या घंटीचा आवाज यावा म्हणून आताशा रात्री ती त्याच्याच खोलीत जमिनीवर गादी टाकून झोपत असे. निलेशच्या प्रकृतीच्या अपडेट्स घेताना डॉक्टर चकित व्हायचे. शेवटच्या टप्प्यावर उभा असणारा पेशंट अजूनही लढा देतोय याचे त्यांना नवल वाटे. पण ही त्याची पुण्याई नव्हे तर वासंतीच्या कष्टाचे फळ आहे हे ते जाणून होते. 


एक दिवस ऑफिसमधून येताना वासंतीची स्कूटर रस्त्यात बंद पडली. कितीही प्रयत्न केले तरी चालू होत नव्हती. ती आता काय करावे या विचारात असताना एक कार बाजूला थांबली आणि "काही मदत हवी का" म्हणत ड्रायव्हरने डोकं बाहेर काढून विचारले. त्याच्याकडे पाहताच "ललित!" वासंती उद्गारली.


"वासंती... सरक बाजूला मी पाहतो" म्हणत तो खाली उतरला. 


ललित आणि वासंती शेजारी होते. एकाच शाळेत जायचे. कालांतराने दोघांत प्रेम होवून ललितने वासंतीला मागणी घातली होती. पण वासंतीच्या आईने ठाम नकार दिल्याने लग्न नाही होऊ शकले. काही महिन्यांत ललितने दुसऱ्या राज्यात नोकरी शोधली आणि ते कुटुंब घर बदलून निघून गेले. काही महिन्यांत वासंती निलेशचे लग्न झाले. सहवासाने प्रेम निर्माण झाले. ललितचा विषय तिच्या मनातून पुसला गेला. आणि इतक्या वर्षाने आज तो समोर उभा होता. 


"मला नाही वाटत स्कूटर चालू होईल म्हणून." ललित म्हणाला आणि वासंती भानावर आली. तिने नेहमीच्या मेकॅनिकला फोन करून गाडी घेऊन जाण्यास सांगितले. ललित तिच्याकडे पाहत उभा होता.


"तुला कुठे सोडू?" तिने गाडीची व्यवस्था केल्याचे पाहिल्यावर त्याने विचारले. वासंतीने क्षणभर विचार केला. गाडीच्या भानगडीत आधीच उशीर झाला होता. त्यामुळे त्याची लिफ्ट घ्यायला हरकत नव्हती. आपला पत्ता सांगून ती त्याच्यबरोबर निघाली. दोघेही आपापल्या विचारात होते. थोडं अंतर गेल्यावर त्याने विचारले, "चहा घेऊया का? इतक्या वर्षाने भेटलो म्हणून... " वासंतीने होकार दिला. मंगेशला कॉल करून उशीर होत असल्याचे सांगून ती येईपर्यंत थांबण्याची विनंती केली. 


एका चांगल्या रेस्टॉरंट समोर ललितने कार थांबवली. एक रिकामे टेबल पाहून दोघे बसले. काही मिनिट विचित्र शांततेत गेल्यावर ललितने दोन सँडविच आणि चहाची ऑर्डर दिली. 


"मग... हाऊ इज लाईफ?" त्याने बोलणे सुरु करण्यासाठी विचारले. तिनेही नोकरी, घर याबद्दल जुजबी माहिती दिली. त्यानेही तसेच केले. अर्ध्या तासाने एकमेकांच्या फोन नंबरची देवाणघेवाण करून दोघे निघाले. घरापासून थोडं दूर वासंती उतरली. 


पटकन फ्रेश होऊन खिचडी बनवून वासंतीने निलेशला भरवली. उशीर झाल्याने मंगेश ती येताच निघून गेला होता. वासंती यांत्रिकपणे उरलेली काम उरकत होती. ललितची भेट तिच्या मनात खळबळ उडवून गेली होती. 


हल्ली वासंती आणि ललितची सकाळ एकमेकांच्या मेसेजेस व्हायची. अधून मधून भेटही व्हायची. जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. सुख दुःखाची देवाणघेवाण होऊ लागली. पण वासंती निलेशच्या विचाराने वास्तवात यायची.


  निलेशची प्रकृती मात्र खालावत चालली होती. आज परत त्याला रात्रभर त्रास होत होता. पर्यायाने वासंतीही जागत होती. मधूनच थोडा वेळ झोप लागली तर पुन्हा घंटी वाजली. थकलेले शरीर उठायला नकार देत होते पण कर्तव्याने वासंतीला उठायला भाग पाडले. झोपेत चालत असताना दरवाज्याचा कोपरा जोरात पायाचा अंगठा रक्तबंबाळ करून गेला आणि वासंती भानावर आली. निलेश मात्र अविरत घंटी वाजवत होता. 


"थांब रे, जरा उसंत घे. येतेय ना मी. अजून किती जीव खाणार आहेस. वैतागून, थकून गेलीय मी. मलाच कुठेतरी जाऊन जीव द्यावासा वाटतोय." वेदना आणि झोपेच्या भरात ती बोलून गेली. आपल्या तोंडून काय निघाले हे लक्षात येताच लागलीच तिला पश्र्चाताप झाला.


"आय एम सॉरी रे, मला असं म्हणायचं नव्हतं. अंगठ्यातून येणारं रक्त पाहून मी भांबावले आणि चुकून तसं बोलून गेले." निलेशच्या बाजूला बसत ती म्हणाली. त्यावर तो शांतच राहिला. निलेशला पाणी पाजून वासंती पुन्हा हॉलमध्ये आली. पहाटे पहाटे बसल्या जागी तिला झोप लागली. झोपेत तिला घंटी वाजल्याचा भास झाला. ती पटकन उठून पाहून आली पण तो भासच होता. निलेश शांतपणे झोपला होता. त्याची छाती मंदपणे वर खाली होत होती. ती पुन्हा हॉलमध्ये येऊन पहुडली. कसलेसे स्वप्न पडत होते. स्वप्नात ललित काही सांगू पाहत होता. मधूनच घंटीचा आवाज येई. अर्ध जागृत असलेले मन सांगू लागले, हा भास आहे. ललित जे सांगतोय ते जास्त महत्वाचे आहे. यावेळेस तू ऐकलं पाहिजे. पुन्हा पुन्हा तुला संधी मिळणार नाही. थकले भागले मन हळूहळू सुस्तावत होते. किती तरी दिवसांनी वासंतीला स्वप्न ते ही गोड पडले होते. ती त्यात वाहवत जात होती. 


सारलेल्या पडद्यांच्या फटीतून सूर्यकिरणे डोळ्यावर येऊ लागले तेव्हा वासंतीला जाग आली. एकाच कुशीवर झोपल्याने हाताला रग लागली होती. भिंतीवरील घड्याळ आठ वाजल्याचे सांगत होते. कुणाच्या तरी घरी देवपूजेची घंटी वाजली आणि वासंती भानावर आली. धावतच ती बेडरुममध्ये गेली. निलेशचे डोळे सताड उघडे होते आणि हातातून घंटी घरंगळून गादीवर पडली होती. बाजूच्या घरातून घंटी अजूनही वाजत होती. 

समाप्त Post a Comment (0)
Previous Post Next Post