तिचे डोहाळजेवण

 तिचे डोहाळजेवण

✍️ सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

"विभा, पोरी जरा पटापट पोळ्या लाटशील का? कॉन्ट्रॅक्टर घाई करतोय. आता पंधरा मिनीटात पंक्ती बसतील बघ." शालिनीकाकू खाली बसून भराभर पोळ्या लाटत असलेल्या विभाला म्हणाल्या.

"हो काकू, करतेय." कपाळावरील घामाचे ओघळ बाजूला ठेवलेल्या रुमालाने टिपत सात महिन्यांची गरोदर खाली बसून अवघडलेली विभा म्हणाली. शालिनीकाकूंना तिला बघून कणव आली. केटरींगच्या ताफ्यामधील स्वयंपाकीण बाई होत्या दोघी. एका डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाची सुपारी घेतली होती केटररने. एप्रिलचे तळपते ऊन... हॉल जरी एसी असला तरी स्वयंपाकाची शेड मात्र पत्र्याचीच होती, नेहमीप्रमाणे. सकाळपासून ढणाढण पेटलेल्या गॅसच्या भल्या मोठ्या शेगडीसमोर बसून विभा अस्वस्थ झाली होती. पण काम तर करावे लागणारच होते. त्याशिवाय अजून दोन महिन्यांनी होणाऱ्या बाळंतपणाच्या खर्चाची तरतूद झाली नसती. तसे तिने माहेरी असलेल्या सरकारी  दवाखान्यात नाव नोंदले होते. वरचेवर तिथे जाऊन फुकटात मिळणाऱ्या कॅल्शियम, लोहाच्या गोळ्या घेऊन यायची. पण वेळ काही सांगून येत नाही म्हणून तिची धडपड सुरू होती. शालिनीकाकूंना हे सगळं माहीत होते. शक्यतो त्या तिला भाज्यांची चिराचिरी करणे, पीठ मळून गोळे करून देणे वगैरे सोपी कामं द्यायच्या. पण चपात्या लाटणाऱ्या रेखाने ऐनवेळेस सुट्टी घेतली आणि तर काम विभाच्या अंगावर आले.

पूर्ण गृप भराभर हात चालवत होता. हॉलमधून गाण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. कुठलासा महिला मंडळाचा गृप 'लागले ग सखे डोहाळे' गात होता. न राहवून विभाने शालिनीकाकूंना पाच मिनिटं पाहून येऊ का कार्यक्रम असे विचारले. तिचा चेहरा पाहून काकू तिला घेऊन स्वतःही हॉलमध्ये गेल्या. सगळ्यात शेवटच्या रांगेतील दोन खुर्च्यांवर बसून पाहू लागल्या. एसीच्या थंडव्याने विभाला बरे वाटले. समोर सजवलेल्या स्टेजवर सजवलेल्या झोपाळ्यावर उत्सवमूर्ती बसली होती. अंगावर गर्भतेज चढले होते. छान हिरवी रेशमी साडी, तसाच कशिदाकारी केलेला ब्लाऊज, खास कार्यक्रमासाठी केलेला मेकअप, फुलांचे दागिने. खूपच छान दिसत होती ती. आपली नजर लागू नये तिला म्हणून विभाने पटकन पायाच्या अंगठ्याकडे नजर वळवली. 


"हम्म, सगळा पैशाचा खेळ, दुसरं काय? पैसा आणि प्रेम करणारी माणसं असतील तर सगळी हौस, नाही का!" कसनुसं हसून विभा म्हणाली.  

"हो ग बाई बरोबर बोललीस... तू बस अजून थोडा वेळ गारव्याला. मी बघेन तिकडे स्वयंपाकाचं," म्हणत काकू उठल्या. 



"काय काकू एकट्याच आलात? विभा कुठे आहे?" त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सगुणाने विचारले. 


"अग, सकाळपासून गॅससमोर बसून आहे पोर... सातवा महिना लागलाय... जास्त गरम व्हायला लागतं ना सातव्यात म्हणून मीच म्हटलं की बस थोडा वेळ, विश्रांती घे."


"हं, बरं केलंत. तसंही सगळं उरकत आलंय म्हणा. बसू दे तिला. किती गुणाची पोर आहे ती. चांगल्या घरी पडली असती तर गरोदरपणी अशी परवड झाली नसती.  असंच हौसेने डोहाळजेवण झालं असतं. वाईटात चांगलं म्हणावं तर तिचा नवरा निर्व्यसनी, कष्टाळू आहे इतकंच. मागे एकदा म्हणत होती, त्याला फारसं आवडत नाही या अवस्थेत तिचं काम करणं म्हणून. पण हीच हट्टाने येते म्हणे बाळंतपणात कमीजास्तीला हवे पैसे म्हणून."


  सगुणा बोलत होती पण शालिनीकाकूंचे मन तिच्या एका वाक्यावर अडकून पडले होते.  


"ऐक ना सगुणा, माझ्या डोक्यात एक विचार आला आहे, तू आत्ता म्हणालीस म्हणून... आपण विभाचं डोहाळजेवण करायचं का? दाखवत नसली तरी तिलाही वाटत असणारच की आपला ही असा देखणा कार्यक्रम व्हावा म्हणून. पहिलटकरीण आहे ती. कुणी मायेचं जवळ नाही. नाईलाज म्हणून अशा अवस्थेत काम करतेय बिचारी. आपणच तिच्या आई, मावशी, बहीण होऊ. आपल्याला जमेल तेवढं करू सगळ्याजणी मिळून. काय म्हणते?" शालिनीकाकूंचे डोळे चकाकत होते. 


"हो हो, करूच या आपण. आता सातवा महिना लागलाय म्हणजे याच महिन्यात करावं लागेल. सुट्टीच्या दिवशी करुया. तू बरोबरच म्हणतेस, आपण आहोतच तिच्या मावश्या. मिळून सगळं करू. पण तिला सांगायला नकोच. बघू तिच्या चेहऱ्यावरील भाव. मजा येईल. ठरवू आपण सगळं." तिकडेच येणाऱ्या विभाला पाहून बोलणं आवरत घेत सगुणा म्हणाली.


शालिनीकाकू आणि सगुणा विभाच्या नकळत बाकी सख्यांसोबत बोलल्या. या कल्पनेला कुणाचाच विरोध नव्हता. उलट आपण काहीतरी वेगळं अन् छान करतोय या विचाराने सगळ्या उत्साही होत्या. मेनू ठरला, पुरी, बटाट्याची रस्सा भाजी, मसालेभात, मठ्ठा, कोशिंबीर आणि गोडासाठी म्हैसूर पाक. सगळ्यांनी थोडी, थोडी वर्गणी जमा केली. शालिनीकाकू हिरवी साडी आणि ओटीचं सामान वगैरे आणणार होत्या. सगुणाची लेक फुलांचे दागिने बनवणार होती.


  शालिनीकाकूंच्या घराच्या पडवीत कार्यक्रम करायचे ठरले. बायकांनी मागे रंगबिरंगी साड्या टाकून, फुगे, फुलांच्या माळा लावून सजावट केली. ठरवल्याप्रमाणे काकूंनी विभाला फोन केला.

"विभा, जरा घरी येतेस का, आता लगेच?"

"काकू काय झालं? तुमची तब्येत तर बरी आहे ना?" विभाने विचारले.

"अगं अचानक डोकं खूप दुखायला लागलंय. अगदीच बसवेनासे झालंय. येऊन थोडा चहा बनवून देशील?"

"हो काकू येते मी," म्हणत विभा उठली. काकूंचे घर काही फारसे दूर नव्हते, पुढच्या गल्लीत तर होते. केसांवर कंगवा, चेहऱ्यावर पावडरचा हात फिरवून, साडी नीटनेटकी करत विभा घराबाहेर पडली. काकूंच्या घरी पोहचल्यावर तिला पडवीत सजावट दिसली. पण बाहेर कुणाचा वावर दिसत नव्हता. 

'हा काय प्रकार आहे? आणि काकू कुठे आहेत?' विचारात पडलेली विभा काकूंना हाक मारू लागली.

"काकू, ओ शालिनीकाकू... आहात का घरात?" 

"हो आहे मी इथे विभा, ये ना आत. बघ कोण कोण आलंय!" काकू अगदी हसतमुखाने बाहेर येऊन म्हणाल्या. बाचळलेली विभा पायऱ्या चढून घरात आली. पाहते तर त्यांचा सगळा गृप आत बसला होता. सगळ्याजणी छान तयार होऊन आल्या होत्या. तिला गोंधळलेली पाहून हसत होत्या. 

"या ग सगळ्या बाहेर," काकूंनी हसतच त्यांना बोलावले. पटापट सगळे बाहेर येऊन पडवीत बसले. काकूंनी विभाला हात धरून खुर्चीवर बसवले. दोन जणी उठून लगबगीने हळदकुंकू लावू लागल्या. त्यांनी सगळ्यांना गजरे वाटले. काकूंनी विभाला हळदकुंकू लावून छान अशी हिरवी साडी दिली.

"जा आत, नेसून ये."

  विभा आत जाऊन साडी नेसून आली. पाच सुवासिनींनी तिची ओटी भरली. फुलांचे दागिने घातले. माहितीगार स्त्रिया डोहाळजेवणची गाणी गाऊ लागल्या. हसतखेळत जेवणं झाली. कुणीतरी ताटात दोन वाट्या झाकून घेऊन आली. 

"चल चल, एक वाटी निवड. पाहू काय आहे, पेढा की बर्फी." 


सगळ्यांचा उत्साह, प्रेम पाहून विभाचे डोळे पाणावले. आपल्यासाठी कुणी असे काही करेल अशी तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तिचे डोळे पाहून सगुणाने तिला थोपटले. अलाबला घेऊन विभाच्या कानामागे काळा तीट लावला. 


"शालिनीकाकू, सगुणा मावशी, सगळ्याच काकू आणि मावश्यांनो. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात हा दिवस येईल असं वाटलं नव्हतं. माहेरी फक्त भाऊ आणि वडील आहेत. रघुला तर कुणीच नाही. हे असं पेढा की बर्फी, अशी सजावट, हिरवीगर्द साडी आणि ओटी... किती केलंय तुम्ही माझ्यासाठी. माझं बाळ... खरंच खूप नशीबवान आहे, त्याला इतक्या आज्या मिळतील. शालिनीकाकू, मी म्हटलं होतं तुम्हाला, पैसा आणि प्रेम करणारी माणसं असतील तर सगळी हौस. पण तसं नाहीये. प्रेम करणारी माणसं असतील ना तर पैसा कमी असला तरी चालतं. मी खरंच आनंदी आहे आज, खूप खूप आनंदी." विभाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते.

"ए वेडाबाई रडतेस काय. गप डोळे पूस पाहू. नाहीतर बाळही रडके होईल हां. मागाहून नको म्हणून सांगितलं नाहीस म्हणून." शालिनीकाकू प्रेमाने विभाचे गाल ओढत म्हणाल्या आणि ती रडणं थांबवून हसतच त्यांच्या मिठीत शिरली. सगळ्याजणी तो सुंदर सोहळा डोळ्यात साठवत होत्या. 

समाप्त

✍️ सविता किरनाळे 

 

या लेखिकेच्या अनेक सुंदर कथा आमच्या शब्द चाफा youtube चॅनल वर उपलब्ध आहेत. एकदा जरुर भेट द्या.

खालील फोटोवर क्लिक केल्यावर एक नवी कथा वाचण्यासाठी/ ऐकण्यासाठी उपलब्ध होईल.



वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post