ती मी नव्हेच भाग दोन

 "ती मी नव्हेच" भाग - २

✍️ सौ. उज्वला रहाणे 

 भाग एक

  मागच्या भागात आपण पाहिले शशांक खुपच अस्वस्थ होता. त्याला बाबांना सगळे सांगायचं होते. फक्त संधी शोधत होता. पाहूयात या भागात


    शशांक तिरीमिरीत बाहेर आला  बाबा सोफ्यावर पेपर चाळत होते. "बाबा मला तुमच्याशी बोलायचे आहे."

"अरे बोल शशांक. आज राजकुमार बरेच चिडलेले दिसत आहेत." सुरेश म्हणाला.


  शीलाच्या कानावर शशांक आणि सुरेश म्हणजेच बाबांचे बोलणे पडले.

'बापरे म्हणजे हा शशांक बाबांना काय सांगणार? मी चावले ते? किती विघ्नसंतोषी आहेत ना हे दोघे!

मी परिक्षा जवळ आली. अभ्यासात व्यत्यय म्हणून प्रकर्षांने हा विषय बाजूला ठेवत आहे.पण हे मात्र?


चला जे होईल त्याला सामोरे जावे लागणार. एकादृष्टीने ते ही बरेच आहे म्हणा! पण या शोभाची मात्र मी शोभा करणार.' असे मनात पुटपुटत शीला पण बाहेर आली.


  शशांकने शीलाकडे पाहिले. ते ही एकदाच. एरवी अशाळभूतपणे शीलाच्या सर्वांगावर नजर भिरवणारा शशांक सोफ्यावर बसून बोटाने जमीनीवर उकरत होता.


  शीलाला थोडे आश्चर्यच वाटले. नक्कीच यामागे पण यांचा काही डाव? शशांक बोलायला सुरुवात करणार इतक्यात शोभा आली. "चला जेवायला. ताटं घेतली आहेत." "चला, चला" म्हणत सुरेश ही तिच्या मागे गेला. शशांक परत शांत.    शीला जेवायला गेली. शोभाने शशांकला आवाज दिला. "मला भूक नाही. नंतर जेवेन" म्हणत तो परत त्याच्या खोलीत गेला. हे तिघेच जेवली. नेहमीप्रमाणेच शोभा जेवण करून निघून गेली. शीलाने मागचे सगळे आवरलं. इतक्यात पाणी पिण्यासाठी शशांक स्वयंपाकघरात आला.


  "शीला पाणी देशील?" 

"घे कि, हाताने". शीला बोलली.

 "रागावू नकोस पण खरच मी चुकलो ग दुपारी. माफ करशील? यापुढे कधीच अशी चूक माझ्याकडून कदापिही होणार नाही. मला थोड तुझ्याशी बोलायचं आहे."


    "हे बघ माझी इच्छा नाही. मला अभ्यास आहे. परिक्षा तोंडावर आली आहे. माझे लक्ष विचलित नको करू."


   "हो मला पण अभ्यास करायचा आहे. पण मन शांत असेल तरच अभ्यासात मन लागेल ना!" शशांक परत परत शीलाशी बोलायचा प्रयत्न करत होता. मला काहीही ऐकायचे नाही. शीला आपल्या मताशी ठाम होती.


  "शीला एकदाच मला चान्स दे सुधारण्याची. मी जो तुझ्या मनात आहे तो शशांक नाही. मला खरच एक चान्स दे! खरच मला माफी मागायची आहे. तुझी आणि बाबांची दोघांचीही."


    "शशांक माफी हा शब्द तुझ्या तोंडात शोभत नाही. चल रात्र झाली. उद्या बघूया!" म्हणत शीला अभ्यासाला लागली. शशांक परत आपल्या खोलीत जाऊन. पुस्तकात डोळे घालून बसला. 'खरच आपल्याला हे दोघे माफ करतील का? नाही केले तरी चालेल आपण घर सोडून जाऊ पण शोभाच्या दलदलीतून ह्या दोघांची सुटका मात्र नक्कीच करू. काही नाही करता आलं तरी ऐवढे सत्य तर नक्कीच त्यांच्या कानावर घालू!'


    सतत त्यांच्या  डोक्यात शोभाचे विचार, येत होते. खरच आपण दिलेली शीलाला वागणूक. आठवून आठवून त्याचे डोके भनभनायला लागले. नक्कीच किती विकृत आहोत आपण. चुकीच्या मार्गाने वाहवत चाललो आहोत.


  आज माझ्या सोबत कोणीच नाही. माझी आई कोण? वडील कोण? कसलाच थांगपत्ता नाही. खरच मी अनाथ आहे.त्याचे मन खुप हळवं झाले.आजुबाजुला सोन्यासारखी माणसं आहेत. पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपला किती किळसवाणा आहे. शीलाकडे बघून तर माझी वासना चाळवते. शी ss!


   नक्की कोठे पोहचणार हे सगळं. वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. तेही मलाच माझ्या भावना मलाच शाबूत ठेवणे गरजेचे आहे. मला नक्कीच सुधारायचे आहे.


   जो रस्ता कोठेच पोंहचवत नाही त्या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे एक प्रकारे सर्वनाश ओढून घेण्यासारखे आहे.नाही, ऊद्या हे सगळं सांगणार आणि मोकळे होणार. बाबा जो निर्णय घेतील तो घेतील. शशांकने रात्र तळमळतच काढली.


    शीला अभ्यासात मग्न होती. तर सुरेश आणि शोभा बंद खोलीत. स्वतःच्या विश्वात रममाण.


   शशांकने कुस बददली. सकाळचा अलार्म लावून झोपला.उद्या त्याला सकाळीच सगळे सांगायचे होते.शशांक शोभाचे विचित्र वागणे आठवून रात्रभर झोपला नाही.बाबांच्या कानावर हे सगळं घालायचे या निश्चयाने रात्री  कधीतरी त्याला झोप लागली.


    रात्री उशिराच शशांकला झोप लागली. सकाळी उठेपर्यंत चांगलेच उजाडले होते. जो तो आपल्या कामाला लागलेला. बाबा नेहमी प्रमाणे हॉल मध्ये होते.शशांक उठून बाथरूम कडे जात होता. "Good morning शशांक", बाबा म्हणाले. हं! एवढेच म्हणत शशांक बाथरूम मध्ये गेला.


    याचे काहीतरी बिनसले आहे. हे सुरेशच्या नजरेतून सुटले नाही. त्याने शोभाला आवाज दिला. 

"शोभा काय झाले शशांकला?"


    "काही नाही हो आभ्यासाचे टेंशन परिक्षा जवळ आली ना. मग क्लासला जातो ना? काय अडचण आहे. मला काय समजते हो त्यातले?" शोभाने विषय टाळण्याचा प्रयत्न केला.


     इतक्यात शीला आली. "बाबा चला निघते मी उशीर झाला."

 "अग मग मी सोडतो तुला. नको जाईल मी!" म्हणत शीलाने पायात चपला सरकवून काढता पाय घेतला. सुरेशला घरात काही तरी झाले आहे लक्षात आले. कारण जाताना शीलाने रागातच शोभाकडे बघितले हे देखील सुरेशच्या नजरेतून सुटले नाही.    शशांक आवरून बाहेर आला. तयार होऊन कॉलेजला निघाला. "अरे शशांक चहा नाष्टा?" शोभाने विचारले.

 "नको मला. येतो मी."

 "अरे बाईकची किल्ली," सुरेश म्हणाला. 

"नको जाईल मी."

 "काय झाले शशांक? रात्री पण जेवला नाहीस. सकाळी पण चहा सुद्धा घेतला नाहीस. काय झाले. काही मित्रांबरोबर बिनसले का? कोणी काही बोललं का? परिक्षेचे टेंशन का?"


     सुरेशच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

 "बस थोडावेळ", सुरेशने शशांकला थांबवले. शोभा  आता परत कावरीबावरी. डोळ्याने शशांकला खुणावत होती. पण शशांकने तिच्याकडे दुर्लक्ष केले.


    नेहमीप्रमाणेच शोभा मध्ये पडली. 

"काही नाही हो, काल बहिण भावाचे भांडण झाले."

"अरे मग एवढे. शीला काही नाही बोलली मला!. जाऊ दे ती गेली ना विसरून तु ही जा. संध्याकाळी मी आल्यावर मस्त दोघांनाही बाहेर घेऊन जातो आणि बट्टी करवतो. मग तर झालं."


     "बाबा इतके सहज विसरता आले असते तर किती छान झाले असते ना? सगळे विसरण्याचा पलिकडचे आहे हो!" म्हणत शशांक सुरेशच्या मांडीवर डोके ठेवून हमसाहमशी रडू लागला.


    "अरे, शशांक काय झाले. एवढे काय  झाले. शीला तुला काही मनाला काही लागण्यासारखे बोलली का?"

"बाबा ती बोलली असती. तर, अगदी मी मोठा असुनही तीने मारले असते तरीही मला वाईट नसते वाटले.मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली असे वाटले असते.पण आज ज्या एका भयंकर परिस्थितीतून मी जात आहे.त्याला तुमच्या आणि शीलाच्या दृष्टीने नक्कीच क्षमा नसणार बाबा!"


   "अरे शशांक शांत बस ना आता.  त्यांना आॉफीसला जायचे आहे. आधीच आॉफीसचे टेंशन,सकाळी सकाळी कसले क्षमा,माफीनामा  चालू केलास. जा उठ जा कॉलेजला." शोभा विषय मिटवण्याचा प्रयत्न करत होती.


    "शोभा शांत बस बोलू दे त्याला. त्या काहीतरी सांगायचे आहे सांगू दे. मी उशीरा जाईल आफीसला. शशांक पण नाही जाणार कॉलेजला. अश्या मनस्थितीत मी त्याला नाही  जाऊ देणार." सुरेशने विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला.   शशांकला थोडा धीर मिळाला. सुरेशच्या  मांडीवर डोके ठेवून पडलेल्या शशांकला थोपटत म्हणाला. 

"बोल शशांक शांत झालास ना बोल!"


  "बाबा एक विचारू?"


"विचार ना! तुम्ही माझे बाबा अहात का?"

"अहं, हो आहे कि, शीलाचा जितका तितकाच तुझाही! कारे काय झाले? कारे काय झाले अचानक तुला असे का वाटले?"


  "बाबा सगळे सत्य समजल्यावर मला माफ कराल?याचे वचन द्याल मला!"

  "अरे बोल म्हणत सुरेशने शशांकचा हात हातात घेतला.

"बाबा तुम्ही व शीला खुप चांगले अहात पण बाबा मी खुप चुकलो आहे. तुम्ही मला मुलगा मानता जो प्रत्यक्षात मी तुमचा नाही. मी कोण कुठला माझे मलाच माहीत नाही. आज माझी जागा मला शोभाआईने दाखवली. इथे कोण कसे कोठून आले, कोणत्या हेतूने आले याच्याशी माझे त्याच्याशी काही देणेघेणे नाही." शोभाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत शशांक बोलला.


  "पण बाबा मी ज्या मोहजालात अडकलो आहे, जे कधीच माझं नव्हते आणि मला ते समजल्यावर मला नको पण आहे. प्लीज बाबा यातून मला मुक्त कराल बाबा!"


    "अरे काय बोलतो आहेस. मला काहीच उलगडा होत नाही. शीला काही बोलली का? थांब तिला घरी बोलावून विचारतो. ती काही तरी नक्कीच तुला बोलली असणार ते तुझ्या मनाला एवढे लागले आहे." सुरेश बोलला.


   "शशांक हो, राजा तु माझ्या पोटचा नाहीस. पण पोटच्याप्रमाणे आहेस. तु माझा आहेस. शोभाच म्हणजे माझाच ना. अरे शोभा कुठे शीलाला परकं मानते मी बघतो ना शीलाचे ती किती आपलेपणाने करते. असा तुझं माझंचा विचार तु चुकूनही देखील मनात आणू नकोस."


    बाबा शशांक गहिवरला. "बाबा दिसते तसे नसते म्हणुन तर जग फसतं. अगदी बरोबर. बाबा माझ्या हातून खुप चुका झाल्या आहेत त्याचे प्रायश्चित्त मला घ्यायचे आहे. फक्त मनमोकळे मला बोलू द्या. मला दोष कोणालाही द्यायचा नाही."


  "शशांक बस्स झाली तुझी नाटके निघ आता". शोभा शशांकवर खेकसली.

 "शोभा शांत मी बोलतोय ना," सुरेशने शोभाला सांगितले.

  "काय सांगणार तुम्ही त्याला? त्याची हाव काय आहे माहीत आहे का तुम्हाला?" आता आपलं पितळ उघडे पाडणार हा शशांक म्हणून शोभा आकांडतांडव करू लागली.


"काय हवे आहे त्याला?" सुरेशने विचारले.


"बोल शशांक सांग बापाला आता!" शोभा परत शशांकवर ओरडली.


   "आई मला काहीही नको आहे. मी चुकलो त्या शिक्षा हावी आहे. मी मला माझा गुन्हा कबूल करायची परवानगी मागतो आहे फक्त. तू शांत बस!"


   "शशांक आवर स्वतःला आईला उलट नको बोलू."


" बाबा आई? कोण आई? कुठली आई? लायकी आहे का तिची आई म्हणून घ्यायची. स्वतः बरोबर तिघांचे जिवन उद्ध्वस्त करणारी कुलटा आहे ही बाबा, कुलटा!"


  "शशांक sss" सुरेशने जोरदार थप्पड  शशांकच्या गालावर लगावली.

 "ही थप्पड माझ्या गालावर तुम्हीं केंव्हाच मारायला हवी होती.बाबा हाच अधिकार मला हवाय तुमच्या कडून. कायम माझ्या गलिच्छ वागणूकीला ह्या बाईने प्रोत्साहन दिले आणि शीलाने बऱ्याच वेळा तुम्हांला सांगण्याचा प्रयत्न करूनही तुम्ही समजून उमजून तिकडे दुर्लक्ष केले. बाबा!"


पुढे काय पुढील भागात

  क्रमश :

भाग तीन

वरील कथा सौ. उज्वला रहाणे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post