डस्टबिन

डस्टबीन 

✍️ सौ. प्रतिभा परांजपे

अश्विनीने फोन ठेवता ठेवता म्हटलं, "नकोच बाई हे स्थळ वन्स."

"कां ग आशू काय नको? कोणाशी बोलत होतीस"?

 "आई सुमा वन्सचा फोन होता, त्यांच्या नणंदेच्या जावेची मुलगी लग्नाची आहे शिकलेली, नौकरी करणारी आणि दिसायला छान असं वन्स म्हणत होत्या म्हणून तिची चौकशी केली होती आपल्या शेखर करता."

"मग?"

"वन्स नको म्हणतात, तिचे आपल्याकडे नाही जमणार."

"अग ,पाहिली नाही आणि आधीच ठरवून टाकलं? नाही जमणार."

 "अहो वन्स म्हणाल्या ती विचारत होती घरात किती डस्टबिन आहेत??"

      "म्हणजे काय ग--?" 

अश्विनी काही बोलणार तेवढ्यात शेखर आलेला दिसला म्हणून तिने सासूबाईंना मग सांगते असा इशारा केला.

"आई मला एक महिन्याकरता जर्मनीला जावे लागेल आपल्या कंपनीला कॉन्ट्रक्ट मिळाला आहे." शेखरने आल्या आल्या सांगितले.

 अरे वा--- खुपच आनंदाची बातमी! देवासमोर साखर ठेवते म्हणत अश्विनी आत गेली.

रात्री सासूबाईंना औषध द्यायला म्हणून अश्विनी खोलीत गेली. "सुमा काय म्हणत होती?  काय भानगड आहे, तिच्या नात्यातलीच आहे न ?" आजींनी विचारले.

" आई , आज कालच्या मुलींना स्वातंत्र्य म्हणजे नेमक काय  हव हेच  कळत नाही. त्यांना रेडीमेड नवरा हवा पण त्याचे आईबाप , आजी आजोबा जर असले तर ती अडगळ होते. म्हणे किती डस्टबिन आहे घरात,  इतका संताप होतोय माझा. आम्ही काय डस्टबिन आणि हिचे आईबाप ते कोण ??"

"डस्टबिन म्हणजे कचराकुंडी ना??"

 "हो  पण ही काय पद्धत आहे बोलण्याची. नकोच आपल्याला असली सून" दिवा बंद करता करता अश्विनी चिडचिडत बाहेर गेली.

 बाहेर शेखर आपले बोलणे ऐकत आहे हे तिला समजले नाही.

अश्विनी गेल्यावर आजी विचार करत होत्या, पूर्वी त्यांच्या काळात मोठा परिवार म्हणजे भरलेलं घर मुद्दाम  असे पाहून मुलींना सासरी पाठवत, तेव्हा मुली लहान वयाच्या असतं.

सासू  सासरे,  नणंदा-जावांनी भरलेलं घर असायच. त्यांच्यात होणारे रुसवे-फुगवे घरातल्या  लहान मुलींना दिसायचे त्यामुळे त्यांच्या मनात सासरच्या माणसांविषयी एक अनामिक भीती बसायची, अगदी भुलाबाईच्या गाण्यात "असं सासर द्वाड बाई, किंवा कारल्याची भाजी कर ग सुने मग जा आपल्या माहेरा असायचे ,त्यामुळे सासु नणंदा म्हणजे छळवाद, त्या असलेलं घर नको आपल स्वतंत्र घर असावे असे जर या  आजकालच्या मुलींना वाटत असेल तर त्यात त्यांची काय चूक,?

  आता मुली कमावत्या झाल्या ,जरत्यांना सासरची माणसं म्हणजे कटकट वाटू लागते तर ही आमच्या पिढीची चूक आहे आणि त्यात भर घालायला टीव्हीच्या मालिका ही हेच दाखवतात यात. त्यामुळे त्यां आणखिनच बिथरतात.

पण आता काळ बदलला आहे सासरची माणसं हीआपल्या माहेर सारखीच आहे, आजकाल च्या सासवा पण नौकरी करणार्या असतात,त्या मुलिंच्या अडचणी समजून घेतात.

हा विचार बदलायला हवा.

"काय बरं म्हणाली डस्टबीन? म्हणजे घर स्वच्छ ठेवणारा, सर्व कचरा एकत्र करून घरभर पसरू न देणारा , छान विशेषण आहे, या मुलींच्या मनातला हा कुशंकेचा कचरा गोळा करून  डस्टबिन सार्थ केलं पाहिजे हे विशेषण",  आजी मनातल्या मनात पुटपुटल्या.

"पुढच्या रविवारी  बंधनगाठ मेट्रोमोनीयलवाल्यांच  परिचय संमेलन आहे. शेखर तू जाऊन ये तुझ नांव  रजिस्टर आहे." अश्विनी म्हणाली.

"आई तू पण येणार?"

"अरे नाही यांचे मित्र येणार आहेत ना जेवायला, मला नाही जमणार".

शेखर घरी आला तोच आनंदाची बातमी घेऊन . सोनाली खरे आवडली,  दोघांच बोलणं झालं , दोघे एकमेकांना पसंत आहे चट मंगनी पट ब्याह प्रमाणे लग्न ठरलं.

रात्री  सुमाचा आईला फोन, "वहिनीला मी नाही म्हणत होते तरी मग कसं काय ठरवलं लग्नं? आई ही  सोनाली  तीच  मुलगी आहे".

आजी मनाशी म्हणाल्या, येऊ दे एकीचा गैरसमज दूर झाला तरी खूप.

 आजीचे फोन वरच जोरात बोलण शेखरच्या कानांवर आलंच.

चांगल्या सुमुहुर्तावर थाटामाटात लग्न पार पडले, सत्यनारायण झाला नव जोडपं आठ दिवस हनीमूनला जाऊन आले.

सोनाली दिसायला सुंदर, शिकलेली, नोकरी करत होती.   शेखरच्या  घरच्यांनी  लग्नाचा गिफ्ट म्हणून मुलगा व सून याकरता स्वतंत्र फ्लॅट घेऊन दिला .

लग्नाच्या 10 दिवसानंतरच ठरल्याप्रमाणे शेखरला कंपनीच्या कामाने जर्मनीला जावे लागले.

  सोनालीने थोडे दिवस सासरी आई-बाबां जवळ राहावे असे  शेखरचे म्हणणे  सोनालीला टाळता आले नाही. ती मनातं हिरमुसली.

थोड्या दिवसाचा तर प्रश्न आहे

दिवसभर तर आॅफिस  मधेच जाईल. असा विचार करून ती तयार झाली पण मनात धाकधूक होतीच. 

रात्री झोपताना अश्विनीने सोनालीला सांगितले,
" बघ सोनाली तुला लवकर उठण्याची गरज नाही तू आपली झोप पूर्ण करून मग उठ आणि जे ड्रेस तुला घालायचे असतील ते तू घालू शकते साडी नेसण्याची तुझ्यावर सक्ति नाही," असे हसत म्हणून अश्विनीने दिला गुड नाईट केले.

रात्री सोनाली बऱ्याच वेळ शेखरशी चॅटिंग करत होती. सकाळी जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते. तिला उठल्या उठल्या गरम चहा मिळाला, दिवसाही फारसे काही काम नव्हते. घरात पाहुणे म्हणून आत्या, मावशी होत्या त्या सगळ्यांनी तिला अगदी परकेपण जाणवू दिल नाही.

दोन दिवसांनी आईने माहेरपणाला बोलावल म्हणून सोनाली आईकडे आली.

संध्याकाळी रिचा तिची मैत्रीण भेटायला आली.

"काय म्हणते सासुरवाशिण??

जीजू तुला एकट सोडून गेले दोन सासवांच्या कचाट्यात?"

  "तुझ आपल काहीतरी हं."

"अग तुला नको होती न इतकी माणसं, काय म्हणाली होती तू?डस्टबिन".

सोनाली   काही बोलणार तेवढ्यात आई आली नी विषय तिथेच संपला.

रूचा गेल्या नंतर सोनाली विचार करत होती. तिला खरोखरच नको होती माणसं मग तरी  तिने शेखरला का  हो म्हंटले.

शेखरच्या व्यक्तिमत्वाने जणू पहिल्या भेटीतच तिच्यावर  जादू केला होता.

लग्नानंतर तिला या घरात जे प्रेम आपलेपणा,व स्वातंत्र्य मिळाले त्याने तिची  सासरच्या माणसांविषयी असलेल्या कल्पनेला तडा गेला. 

एक दोन दिवसातच सोनालीला करमेनास व्हायला लागले.

    "आई,शेखरला यायला आठदहा दिवसच उरले मी परत जाते", म्हणत सोनाली सासंरी परतली.

 एक दिवस काॅफी करायला म्हणून सोनाली किचनमध्ये आली . फोनमध्ये पहाता पहाता गरम काॅफी  हातावर सांडली.

सासुबाईनी  तिची किंकाळी ऐकून तिचा हात पटकन नळा खाली धरला व नंतर फ्रीजचे गार पाणी ओतून तिच्या हातावर फूंकर मारु लागल्या.आजींनी तिला बर्नाल लावून दिले व आता हात बरा होईपर्यंत काही करू नको असे प्रेमाने सांगितले.

या महिन्याभरात तिला जाणवले मैत्रिणींकडून ऐकून जी भीती मनात भरली होती ती अनाठाई होती, तिच्यावर कुठलेच बंधन नव्हते ,घरातिल सर्व , अगदी आजी सुद्धा मदत करायला तत्पर होत्या. तिला जे हवं ते करायची मोकळिक होती.

महिनाभराने शेखर परत आला व ते दोघे आपल्या फ्लॅटमध्ये राहावयास आली . 

सर्व जरुरी  वस्तूंनी फ्लॅट सजवलेला होता.

सकाळी मिळालेली बरीचशी गिफ्ट  दोघांनी उघडून पाहिली. त्या सगळ्या कागदांचा बराच कचरा तयार झाला . हे सर्व कुठे टाकावे घरात डस्टबिन कुठेच दिसत नव्हते .

"शेखर अरे कचऱ्यासाठी डस्टबीन??"

 "तुला हव आहे??"

"म्हणजे??"

" एका मुलीला म्हणे डस्टबिन नको असे मी ऐकले ??"

 सोनाली  आपली चूक समजून चुकली.

  शेखर जवळ बसून त्याचा हात हातात घेत म्हणाली, " मी खूप चूक विचार करत होते रे, जे आजूबाजूला ऐकलं पाहिलं त्यावरून एक इमेज बनवली, माझं चुकलं , तुझ्या घरचे सर्व खूप समजूतदार व प्रेमळ आहेत मला आवडेल त्यांच्यासोबत राहायला.

 ते डस्टबीन नाहीत घराला  घरपण देणारी आपली माणसं आहेत.."

✍️ सौ. प्रतिभा परांजपे

----------------------------------------

वरील कथा सौ. प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

1 Comments

  1. पोस्ट छान आहे तरीपण काही वर्षांत सासू ती सासूच असाच समज करून मुली वागत असतात कितीही प्रेम लावा शिक्षणाचा इगो आड येतो..काय करणार बिचाऱ्या मुलांचे आई वडील

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post