विधिलिखित

 विधिलिखित 

✍️ नेहा उजाळे 

             ऋचाला जवळ घेऊन तिची आजी मोठमोठ्यांदा आक्रोश करत होती. अवघ्या तीन वर्षांच्या ऋचाला आपली आजी का रडते आहे ते समजत नव्हते पण आता बराच वेळ तिची आई दिसत नसल्याने ऋचाने भोकाड पसरले. ऋचाची आजी थोडी भानावर आली. छोट्या ऋचाला भूक लागली असेल याची तिला जाणीव झाली. लेकीचं दुःख तर आभाळभर होतंचं पण दुधापेक्षा आता दुधावरच्या सायीला जपले पाहिजे या भावनेने ऋचाला तिने दूध - बिस्कीट भरवायला घेतले. ऋचा आजीकडून काही भरवून घेत नव्हती. ह्या आजीची तिला इतकी सवय नव्हती. तिची आई आजीला व्हिडीओ कॉल करत होती तेवढीच तिची ह्या आजीशी ओळख. एकतर आई दिसत नाही त्यात भूक लागलेली ह्यामुळे ऋचा अधिकाधिक मोठ्यांदा रडू लागली होती. 

              इतक्यात समोरून येताना ऋचाचे आजी, आजोबा, आत्या, गंधालीकाकू, वेदांतकाका ऋचाला दिसले. दुडूदुडू धावत ऋचाने आपल्या आजोबांना मिठी मारली. ऋचाच्या आजोबांनी तिला घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. ऋचाच्या आईच्या आईने दुःख बाजूला ठेवून ऋचाच्या बाबांच्या आईला ऋचाला भरवायला सांगितले. ऋचाच्या आजीने तिला दूध - बिस्कीट भरवायला घेतले. ह्या आजीच्या हातून मात्र ऋचाने खाल्ले. 

             तितक्यात एक अँब्युलन्स आली त्यातून ऋचाचे बाबा आणि दीक्षितकाका उतरले. ऋचाच्या आईचे शव ते हॉस्पिटलमधून घेऊन आले होते. आपल्या आईसारखी कोणीतरी दिसते आहे असे वाटून ऋचाने आपल्या आईला उठवायचा प्रयत्न केला. " ए आई ! उत ना. उत ना ग."  आपली आई उठत नाही म्हणून पुन्हा ऋचाने भोकाड पसरले. ह्या प्रसंगाने तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे हृदय पिळवटले. बायकांनी एकचं आकांत केला. 

                ऋचाच्या आईवर म्हणजेच मुक्तावर अंतिम संस्कार करण्यात आले. ज्याला त्याला मुक्ताच्या आठवणींनी भरून येत होते. 

               मुक्ता दळवी आणि गंधाली दीक्षित जिवाभावाच्या मैत्रिणी. कोल्हापूरला दोघींचा बंगला आजूबाजूला होता. त्या दोघी सख्ख्या शेजारणी. गंधालीला एक मोठी बहीण होती आणि मुक्ताला धाकटा भाऊ होता. दोघींमध्ये केवळ सहा महिन्यांचं अंतर त्यामुळे एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये दोघी एकत्र शिकल्या. दोघींची इतकी घट्ट मैत्री होती की, दोघींना एकमेकींशिवाय अजिबात करमत नसे. दोघींच्या घरात काही वेगळा पदार्थ शिजला तर लगेच एकमेकींना देऊन मगच तो पदार्थ खाल्ला जात असे. 

            दोघी ग्रॅज्युएट झाल्यावर लगेच गंधालीचे लग्न ठरले. गंधालीच्या बहिणीने लग्न जमवले होते. मुंबईचे स्थळ होते. मुलगा तसेच घराणे चांगले लाभल्याने कु. गंधाली दीक्षित सौ. गंधाली वेदांत चिटणीस झाली आणि कोल्हापूरवरून मुंबईत आली. मुंबईत आल्यावर गंधाली आणि मुक्ताला एकमेकांशिवाय चैन पडत नव्हते. मुक्ताला मुंबईत कसे आणता येईल असा विचार करताना गंधालीला तिच्या चुलतसासूबाईंनी तिच्या चुलत दिरासाठी चिरागसाठी कोणी मुलगी आहे का तुझ्या बघण्यात असे विचारताच तिला डोळ्यांसमोर मुक्ता आली. चिराग ऑफिसच्या कामासाठी अमेरिकेला एक वर्षांसाठी गेला असल्याने तो वेदांत आणि गंधालीच्या लग्नाला येऊ शकला नव्हता. चिराग भारतात परतणार होता आणि त्याच्या घरच्यांनी लगेच त्याचे शुभमंगल करून देण्याचा घाट घातला होता. गंधालीने लगेचच मुक्ताला आपली चुलतजाऊ बनवण्यासाठी कंबर खोचली. मुक्ता चिटणीसांच्या घरी लगेच पसंत पडली आणि मुक्ता देखील आपल्या प्रिय मैत्रिणीजवळ चिरागची बायको म्हणून मुंबईत आली.

              मुक्ता आणि चिरागचा संसार खूप छान सुरू होता. लग्नानंतर एक वर्षांनी ऋचाचा जन्म झाला. मुक्ता आणि गंधाली प्रेमळ स्वभावाच्या असल्याने सासरी एकदम साखरेसारख्या विरघळल्या होत्या. चिरागची धाकटी बहीण चेतना आणि मुक्ता अगदी खास मैत्रिणी झाल्या होत्या. सणसमारंभांना पूर्ण चिटणीस कुटुंब एकत्र येत असे तेव्हा दोन जिवाभावाच्या मैत्रिणी मुक्ता आणि गंधाली अगदी कडकडून भेटत.

             ऋचा एक वर्षांची झाल्यावर मुक्ता, चिराग आणि ऋचा कोल्हापूरला मुक्ताच्या माहेरी गेले होते. आता ऋचा तीन वर्षांची झाली. तब्बल दोन वर्षे मुक्ता माहेरी गेली नव्हती. साहजिकच आता मुक्ताचे आईवडील मुक्ताला माहेरी राहायला बोलवत होते. त्यातून मुक्ताच्या धाकट्या भावाने त्याचे लग्न स्वतःच जमवले होते म्हणून होणाऱ्या भावजयीच्या घरी बोलणी देखील करायची होती. चिरागला ऑफिसमध्ये भरपूर कामे असल्याने तो तिच्याबरोबर जाऊ शकत नव्हता पण दीक्षितकाका आणि काकू चार दिवस गंधालीकडे राहायला गेले होते ते आता पुन्हा कोल्हापूरला त्यांच्या घरी जाणार होते. दीक्षितकाका, काकूंची सोबत आहे म्हटल्यावर चिरागचे टेन्शन कमी झाले होते. मुक्ता एक महिनाभर ऋचाला घेऊन माहेरी जाणार म्हणून चिराग, त्याचे आईवडील आणि चेतना यांना मुक्ताने माहेरी जाऊ नये असे वाटत होते कारण मुक्ता आणि ऋचा  घरातल्यांच्या गळ्यातले ताईत होते. त्या दोघींशिवाय घरात करमणार नव्हतेचं पण दोन वर्षे माहेरी गेलेली नसल्याने मुक्ताला आता माहेरची ओढ लागणे साहजिकच होते. 

              चिराग मुक्ताला बोलला देखील, " मुक्ता तुला आताच गेले पाहिजे का ? पुढच्या महिन्यात मी सुट्टी घेऊ शकतो आणि तुला कोल्हापूरला सोडू शकतो."

            चिरागच्या बोलण्याने थोडे खट्टू होऊन मुक्ता म्हणाली की, " असं काय करता ? जाऊदे ना मला. आता ऋचा लहान आहे तोवर मी जाऊ शकेन. नंतर तिची शाळा, अभ्यास मागे लागला की कुठे जास्त जाणं होणार माझं ? आणि तसंही मिलिंदच्या लग्नाची बोलणी करायची आहे. दीक्षितकाका, काकू नेमके असणार आहेत माझ्यासोबत. म्हणजे एकदम घरापर्यंत. मग कशाला टेन्शन हवे आहे तुम्हाला ? एकदा हसून परवानगी द्या ना मला. नाहीतर उगीच माझं मन देखील नाराज राहील माहेरी." 

            " जा मुक्ता जा ! जी ले अपनी जिंदगी." असे फुल्ल फिल्मी स्टाईलने चिराग बोलल्यावर मुक्ताला हसू आले. कोल्हापूरला जाण्यासाठी एका खाजगी एसी बसचे तिकीट काढले. मुक्ता, ऋचा, दीक्षितकाका, काकू निघाले कोल्हापूरला जाण्यासाठी. रात्री नऊ वाजता बस निघाली. ऋचाच्या बोबड्या बोलण्याने दीक्षितकाका, काकूंना आणि बसमधील इतर प्रवाशांना खूप मज्जा वाटत होती. ऋचाला देखील ते आजी - आजोबा आवडल्याने ती त्या दोघांच्या मांडीवर जाऊन बसली. दीक्षितआजीने अंगाईगीत म्हणून ऋचाला झोपविले. त्या आजीआजोबांच्या मांडीवर ऋचा झोपून गेली. 

              मध्यरात्री तीन वाजता अचानक समोरून येणाऱ्या एका ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि तो ट्रक बसच्या उजव्या बाजूला अगदी घासत घासत गेला. मुक्ता खिडकीला रेलून झोपली होती. नशिबाने ऋचा आजीआजोबांच्या मांडीवर डाव्या बाजूला होती. एका क्षणात प्रचंड किंकाळ्या, रक्ताचे पाट वाहिले गेले. मुक्ताच्या डोक्याला प्रचंड मार बसला होता. अपघातामुळे झालेल्या जखमींना ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दीक्षितकाकांनी त्याही परिस्थितीत काकूंना आणि ऋचाला एका कारमध्ये बसवून कोल्हापूरला पाठवण्याची व्यवस्था केली आणि ते स्वतः मुक्ताबरोबर  हॉस्पिटलमध्ये गेले. मुक्ताच्या हृदयात थोडी धुकधूकी होती पण हॉस्पिटलमध्ये नेल्यावर काही क्षणात तिचा मृत्यू झाला.

              चिराग तर दुःख पचवू शकतचं नव्हता. त्याच्या मनात राहून राहून हेचं येत होतं की, ' जी मुलगी आनंदाने माहेरी जाण्यास निघाली होती तिचा असा दुर्दैवी मृत्यू व्हावा ? ही कुठली वेळ तिच्यासाठी आली होती ? आताशी कुठे तिच्या आयुष्याची सुरुवात झाली होती. किती सुखी संसाराची स्वप्ने तिने आपल्याबरोबर पाहिली होती. मुक्ताचे हे कुठले प्रारब्ध होते ? जी भरल्या संसारातून निघून गेली. एका लहान जीवाला पोरके करून गेली. खरंच आपलं आयुष्य किती क्षणभंगुर आहे. खरोखरंच आपण एक कठपुतली आहोत आणि आपली दोरी विधात्याच्या हातात आहे. विधिलिखितपुढे आपण जाऊच शकत नाही हे तितकंच खरं.'

सौ. नेहा उजाळे
वरील कथा सौ. नेहा उजाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post