दृष्टी

 दृष्टी

✍️ प्रतिभा ताराबादकर


अक्षयने डोळे किलकिले केले. कुठे आहे मी? त्याने आजूबाजूला ‌नजर फिरविली. बेडवर झोपलेले पेशंटस्, नीरव शांतता, नर्सेस आणि डॉक्टर्सचा निःशब्द वावर! अक्षयचे लक्ष डोक्याजवळच्या मॉनिटरकडे गेले. हाताला लावलेले सलाईन.... मी तर ऑफिसमध्ये होतो मग हॉस्पिटलमध्ये कसा? अक्षयने उठण्याचा प्रयत्न केला त्याबरोबर एक नर्स धावत आली. तिने डॉक्टरांना हाक मारली.

 

'माझं लेकरु शुद्धीवर आलं, आई जगदंबे, माझ्या अक्षयला बरं कर.मी तुझी खणानारळाने ओटी भरीन', आईचा आवाज दुरुन आल्यासारखा वाटत होता. अक्षयने डोळे उघडले. बेडजवळच्या खुर्चीवर बसून आई देवीची करुणा भाकत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते.

मला झालंय तरी काय?

''अवघा पस्तीस वर्षांचा आहे हो आमचा अक्षय! ऑफिसमध्येच जोरदार हार्टऍटॅक आला. डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं होतं, चोवीस तासात शुद्धीवर आला नाही तर वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत म्हणून." बाबा कोणाला तरी सांगत होते.

"हल्लीच्या मुलांना सतत ऑफिसचा ताण, कामाच्या अनियमित वेळा,अपुरी झोप, अपुरी विश्रांती यामुळे हे प्रकार लहान वयातच मागे लागले आहेत मुलांमध्ये." दुसऱ्या गृहस्थांचे बोलणे ऐकता ऐकता अक्षयला परत गुंगी आली.

स्पेशल रुममध्ये हलविल्यावरही डॉक्टरांची सक्त ताकीद होती की अक्षयच्या मनाला क्लेश होईल असे बोलणे टाळावे. औषधांचा परिणाम म्हणून असेल कदाचित पण अक्षय सतत अर्धनिद्रितावस्थेत असे.
"श्शू, आवाज नाही करायचा बरं का, अगदी शहाण्या सारखे वागायचं", अनुजा लव आणि कुश ला हलक्या आवाजात दटावत होती. अक्षयने डोळे उघडले. तिघांच्या डोळ्यातील आनंद स्पष्ट वाचता येत होता.

'बाबा तुम्ही लवकर बरे व्हा,' लव अक्षयच्या कानात कुजबुजला व त्याने गुलाबाचे फूल पुढे केले. कुशनेही त्याचे अनुकरण केले.
'आता कसं वाटतंय?'अनुजाचा स्वर काळजी, प्रेम याने ओथंबला होता. अक्षयला उठून बसण्यासाठी मदत करत तिने विचारले.

'मच बेटर',अक्षय हसत उद्गारला. अनुजाने डोळे मिटून हात जोडले. परमेश्वराचे आभार मानत असावी.

'बाबा तुम्ही घरी कधी येणार?चला ना आताच,' कुश अक्षयचा हात ओढत म्हणाला.

'अरे अरे, तुम्हाला सांगितलं होतं ना बाबांना त्रास द्यायचा नाही म्हणून!' अनुजा लव आणि कुशला दटावत असतानाच 'गेट वेल सून' म्हणत अक्षयचे कलिग प्रवेश करते झाले. अक्षयच्या हातात भलामोठा पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड ठेवत त्यांनी सदिच्छा दिल्या.

 

इतका वेळ आनंदात असलेल्या अक्षयच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. 'मोठे सदिच्छा देतायत साले! यांनीच राजकारण करुन प्रमोशन हुकवलं. असं वाटतं तुडवावं या सगळ्यांना',अक्षयचा चेहरा ताठरला.अनुजाने प्रसंगावधान राखून नर्सला बोलावलं. नर्सने काहीतरी कारण काढून त्या कलिग्जना बाहेर काढलं.

अक्षयला जाग आली तीच पक्ष्यांच्या किलबिलाटाने.पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व झाडे,वेली सुस्नात, टवटवीत दिसत होती. खिडकीपाशीउभा राहून समोरील बदामाच्या झाडावर चाललेली खारींची पकडापकडी पहाण्यात अक्षय गुंगून गेला होता. 'चहा',अनुजाने चहाचा कप अक्षयच्या हातात दिला. 'इतकं फ्रेश वाटतंय ना मला अनुजा,असा निवांतपणा कितीतरी वर्षांनी अनुभवतोय मी.'

'हो ना, डॉक्टर सुद्धा म्हणालेत काय जादू झालीए कळत नाही, इतकी फास्ट रिकव्हरी?'अनुजा स्मित करीत म्हणाली.'खरं सांगू का अक्षय, तुला विश्रांतीची फारच गरज होती.तुझी अविश्रांत मेहनत आम्हाला बघवत नव्हती.असे निवांत क्षणही आवश्यक असतात अरे!''

अनू, तुला वाईट नाही वाटत माझं प्रमोशन हुकलं म्हणून?'

'छे रे,तू एव्हढ्या मोठ्या आजारातून बरा झालास याचाच आनंद झाला. प्रमोशन काय रे, थोड्या अवधीने मिळेल पण थोडक्यात सांगू का, शीर सलामत तो पगडी पचास'. अनुजाच्या बोलण्यावर अक्षय विचार करु लागला. 'हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही',   लव कुशचे आनंदी चित्कार, आई बाबांचे अरे अरे करत हाकारणे यांचा आवाज वाढला तशी अक्षयने हातातील पुस्तक ठेवले आणि बेडरुमचे दार उघडले. समोरचे दृष्य पाहून तो खिळून राहिल्यागत बघतच राहिला. नकळत त्याच्या ओठांवर गाणे आले...'मला सांगा,सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घरबसल्या मिळतं!'

  हॉलभर वर्तमानपत्राचे कपटे पसरले होते. लव ते उडवत,खिदळत घरभर पळत होता. आई बाबा कागदाच्या होड्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरत होते अन् अनुजा कुशला रेनकोट चढवित होती.
'मी येऊ पाण्यात बोटी सोडायला?'अक्षयने उत्स्फूर्तपणे विचारले. 'नको', एका सुरात तिघांनी उडवून लावले. अक्षयचा उतरलेला चेहरा पाहून लव पुढे झाला. 'बाबा, आपण नक्की जाऊया हं तुम्ही बरे झालात की'. कुशनेही बाबांना थोपटले. जणू तो अक्षयची समजूत घालत होता.

 हे पाहून सर्वांनाच हसू आले. अनुजा मुलांना घेऊन गेली आणि घरात झालेला पसारा आवरण्यात आई गुंतली. बाबा सोफ्यावर हाताने ताल धरून गाणे गुणगुणू लागले.

'बाबा तुम्हाला खूप ताण आला होता ना माझ्या आजारपणामुळे?'

 'आला होता ना! नक्कीच.अरे हे काय वय आहे असले आजार होण्याचं!'

'बाबा, मला खात्री होती की माझा परफॉर्मन्स, माझं कामाप्रती असलेलं डेडीकेशन बघून नक्की मलाच ही पोस्ट मिळेल म्हणून.''

"पुढच्या वेळी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतर.'

बाबांचे हे गूढ बोलणे अक्षयला कळले नाही.'पूर्ण तयारीनिशी म्हणजे?'

'मी काही तुला आभासी सल्ला देणार नाही की नेहमी सत्याची जीत होते,आपण प्रयत्न केला की यश हमखास मिळतं वगैरे वगैरे... पण हां, इतक्या वर्षांच्या अनुभवावरून एक गोष्ट नक्कीच सांगू शकेन की परफॉर्मन्स बरोबर प्रतिस्पर्ध्यांच्या खेळीचा पण अभ्यास हवा.त्याची पुढची चाल कशी असेल याचा आडाखा बांधता आला पाहिजे तर तू पुढच्या वेळी नक्की यशस्वी होशील.'

बाबा, मी प्रमोशन मिळाल्यावर पगारात घसघशीत वाढ होईल हे गृहीत धरून तुम्हाला कोकणातील फार्म हाऊस बुक करायला सांगितलं होतं.पण आता सगळेच प्लॅन्स फसलेत.आता त्याचा गलेलठ्ठ हप्ता भरणं जड जाईल.'अक्षयचा स्वर कातर झाला.

'हात्तिच्या,एव्हढंच ना! अरे जी गोष्ट घडलीच नाही तिचं टेन्शन घ्यायचं कशाला?'

'म्हणजे?'अक्षयच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले.

'तुला वेळ नाही आणि अनुजाची सुद्धा नोकरीची धावपळ... मग त्या फार्महाऊसवर जाणार कधी? ऐन तारुण्यात कर्जाचे नुसतेच हप्ते फेडत बसायचे हे काही रुचेना म्हणून मी,तुझी आई आणि अनुजाने एकत्र निर्णय घेतला आणि तुझे पैसे योग्य जागी गुंतवले.'

'बाबा, तुम्ही सगळे किती दूरदृष्टीने विचार करता! तुम्हाला कल्पना नाहीए, तुमच्या या निर्णयामुळे मी किती रिलॅक्स झालोय ते! थॅन्क्स.'अक्षयचा चेहरा खुलला होता.

'प्रत्येक गोष्टीची वेळ असते अक्षय.'आई त्याच्याजवळ बसत म्हणाली. 'सगळ्या गोष्टी लवकरात लवकर, आताच्या आता मिळाल्या पाहिजेत असा अट्टाहास कशासाठी?तुझी हुषारी, तुझं कर्तृत्व बघता तुझं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.फक्त थोडा पेशन्स पाहिजे.'

'मग आता मी कशाला प्रायॉरिटी द्यावी?'

'सर्वप्रथम तुझ्या तब्येतीची काळजी घे. मानसिकरित्या सुदृढ हो. आपल्याला लंबी रेस का घोडा बनायचं आहे ही जाणीव ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्तमानकाळात जग'. अक्षय बाबांच्या बोलण्यावर विचार करीत होता तेव्हढ्यात लव कुश घरात शिरले ते पाण्याने निथळणाऱ्या रेनकोट सकटच.

'अरे रेनकोट काढा,फरशी खराब होईल,'अनुजा ओरडत होती तोपर्यंत दोघेही अक्षयला बिलगले आणि आपण पावसात किती मज्जा केली ते सांगू लागले.त्यांचे ते उल्हसित चेहरे, आनंदी भाव बघताना अक्षयला उमजले, बाबा वर्तमानकाळात जगायला सांगत आहेत तो वर्तमान काळ हाच! आणि नवीन दृष्टी मिळालेला अक्षय लव कुशच्या बाललीलात रंगून गेला.

✍️ प्रतिभा ताराबादकर

वरील कथा प्रतिभा ताराबादकर यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post