शेवटची भेट

शेवटची भेट 

   ✍️ प्रतिभा परांजपे 

    सोमेश आपल्या मायला गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसवून घरी आला. घर एकदम सुनेसुने वाटत होते.'

 माय आली काय आणि एक रात्र राहिली, नी परत ही गेली. हे सगळं त्याच्यासाठी स्वप्नवत होते.

        सोमू बरेच महिन्यांपासून 'माय' ला मुंबईला त्याचा संसार एकदा तरी पाहून घे म्हणत होता मायची ही खूप इच्छा होती, पण-- बापूच्या परवानगीशिवाय मायला येणे शक्य नव्हते.

   "तू अशी अचानक, न कळवता एकटी कशी आली"? आईला आलेले पाहून सोमूने काळजीपोटी विचारले.

बापू नाय आला?

तो कसचा येतो,

मंग तू एकली कशी आली?

   "अरे गजानन भाऊ हाय ना, त्यांचा दिनू, तो येणार होता, त्याच्या संग मी आले" 

  "पण तुला घर कसे उमजले"?

     "अरं, दिनूने रिक्षात बसवून दिले, मी खाली इचारले. तू एवढा मोठा मानूस, तुला समदी वळखतात." मायच्या स्वर  कौतुकाचा होता. केवढं मोठ्ठ हाय रे घर तुज".

'अगं तुज तुज काय म्हनते?'

रैनाला बी खूप छान वाटलं तिला बी आईचे प्रेम मिळेल आणि तुला बी सुनेच्या हातचं जेवण. तिला आई न्हाय.

   पण तरीही, सोमेशला हे सर्वच आश्चर्यजनक होते.

     "अगं रैना माहेरी गेली आहे, तिचा बा खूप आजारी आहे. तिला सकाळी बोलवून घेतो. आल्यासारखी रहा चार दिवस."

   "नग  रे बाबा--तुझ्या बापूला ठाव नाय मी इथे आलेली..."

     "मग ?"

     "दोन दिवस लगीनघरी कामाला जाते असे सांगून निघाले. तवा उद्या रातच्या आधी पोचायला हवे......"

    "सगळाच चोरीचा मामला  हाय.."

सोमूला बापूचा स्वभाव , महा हेकेखोर लहानपणापासूनच ठाऊक होता .माय जर खंबीर नसती तर----

चार भावंडांमध्ये तो एकटाच उरला होता बाकी सर्व कसल्या कसल्या आजाराने अकालीच गेले. त्यामुळे मायच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सोमेशवर होत्या. 

प्राथमिक शिक्षण झाले तशी माय नी मामाकडे मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी पाठवण्याचा मनसुबा केला. सोमेशला  वाईट वाटत होते, पण माय म्हणाली, "इथं राहशील तर वाईट संगतीत पडशील, शिकून मोठा हो ".

     बापाच्या वाईट सवयींचा त्याच्यावर परिणाम नको, हा तिचा विचार होता त्यामुळे मनावर दगड ठेवून तिने सोमेशला शहरात पाठविले .

सोमेशच्या जाण्याने माय खूप उदास राहू लागली, पण सोमेशच्या बापू त्याला काहीच  घेण देण नव्हतं.

सुरुवातीला मधून मधून सुट्टीत तो गावात येत असे.

    बापूचे दारू पिणे, जुगार खेळून पैसे हरणे या सर्वांपायी माय कसेबसे घर रेटत होती.

पुढे पुढे गावी येणे त्याने कमी केले. मामा-मामी भली माणसं होती, सोमेशच शिक्षण पूर्ण झालं तशी त्याने पुढच्या शिक्षणाबरोबर पार्ट टाईम काम  केले. नशिबाने साथ दिली व तो मोठ्या हुद्यावर पोचला.

         नौकरी करीत असतानाच रैनाशी भेट घडली . जातीची सिंधी मुलगी, पण साधी ,सरळ. मुख्य म्हणजे त्याच्याच सारख्या परिस्थितीतून आलेली दोघं हळूहळू जवळ आले.

   मध्यंतरी सुट्टी काढून सोमेश गावाला गेला, तेव्हा त्याच्या लग्नाविषयी गांवात चर्चा सुरू झाली. मुलगा मोठ्या  हुद्द्यावर पाहून बापूची  हाव आणि भाव वाढला. बापूने बडी बडी स्थळं, खूप हुंडा घेऊन येणाऱ्या  मुलींच्या याद्या करायला सुरुवात केली.

   मग मात्र सोमेश मायजवळ रैनाबाबत बोलला. 

     "तुझा बाप हे होऊ देणार नाही. त्याचा तुझा सौदा करायचा ईचार हाय. खूप पैसेवाल्या मुली पाहून ठेवल्या .तुझ्या पसंतीचे काही महत्व त्याला नाही."

     मायचे बोलणे ऐकून सोमेश समजून गेला .काही न बोलता तो मुंबईला रवाना झाला.

     रैनाशी कोर्ट मॅरेज करून त्यांनी घरी कळवले .

घरी काय घडले असेल त्याला कल्पना होती, पण तरीही माय, बापूच्या पाया पडायला म्हणून तो रैनाला घेऊन गावी पोचला.

       बापूने त्याला घरात पाऊल ही ठेवू दिले नाही. नवी नवरी आईने डोळे भरून पाहिली ही नाही.

    "तुझा आमचा संबंध संपला, चालता हो म्हणून बापाने फर्मान सोडले".......

 माय ने खूप गयावया केली पण तिचे काहीही चालले नाही. 

त्या दिवसानंतर सोमेश कधीच गावी गेला नाही.

      मायला भेटावे बोलावे असे खुप वाटे, मग त्यांने दिनूच्या हाती एक साधा मोबाईल माय साठी गुपचुप पाठवला. कामावर जाशील तिथून फोन कर असा सांगावा पण बरोबर धाडला.  

      

    त्याप्रमाणे माय व तो अधूनमधून बोलत. तुला खूप पहावेसे वाटते, असे माय दरवेळेस  म्हणत असे.

    जवळ जवळ एक वर्ष झालं त्याच्या लग्नाला, तरी बापूचा राग कमी झाला नाही . सोमेश पैसे पाठवत असे ते मात्र बापू दारूत उडवत असे शेवटी माय ने पैसे नग धाडू म्हणून निरोप दिला. सोमेशने दोघांना मुंबईला येण्याची विनंती केली पण बापू तर येणारच नव्हता पण मायला ही त्यांनी शपथ घातली होती. माय ची इच्छा असूनही ती हतबल होती. एकीकडे मुलाला भेटायची इच्छा दुसरीकडे नवऱ्याची आज्ञा.

             

     "कशाचा विचार करतोय रे", सोमू माय ने डोक्यावर हात फिरवत प्रेमाने विचारले..

    "माझा तर विश्वासच नाही बसत की तू आली", सोमेशने मायेच्या कुशीत शिरत म्हंटले . दोघं रात्रभर गप्पा मारतच बसले.

"तुझा सौंसार पाहिला लई छान हाय...... ती इच्छा पूर्ण झाली. सुनबाई पण छान आहे. ठाव हाय..... मला दिनू सांगतो ना,.... तुझी तब्येत पाहूनही दिसतच रे आता मला कशाची काळजी नाही."

पहाटे पहाटे सोमेशला झोप लागली. सकाळी जाग आली तर माय उठून तयार होऊन बसली होती." हे काय तू तयारही झाली"

    "हो रे मला निघायला हवं, पोचेपर्यंत दिवस मावळेल तुझ्या बा ला कळायला नको."

      सोमेशने जड अंतकरणाने माय ला बसमध्ये बसवले.

बस वर सोडून आल्या आल्या त्याला गजानन भाऊचे चार  व दिनूचे तीन मिसकॉल दिसले. काल फोन चार्जिंगला लावला नव्हता गेला .मायशी गप्पा मारताना तो सर्वच विसरला.

      "नमस्कार काका आत्ताच मायला बस मध्ये बसवली"......

     "अरे काय बोलतोय सोम्या ,.... मी तुला कालपासून फोन करतोय आणि तू काय बडबडतो आहे ?"

     "कां --काय झाले बापूला कळले का ??"

   "अरे  --तुझी माय-- गेली रे देवाघरी. अरं, काल मी सहज अस तुझ्या घरावरून निघालो विचार केला, वहिनी कामावर गेली असेल तुझा बाप दारू पिऊन पडला असेल. पहावे जरा त्याला‌. 

कडी वाजवायला ,कडीला ,... तर दार उघडेच होते वहिनी दारात पडलेली,जवळ जाऊन हाका मारल्या पण काहीच हालचाल नाही.......  तिकडं तुझा बाप, तो घोरत पडलेला. त्याला उठवले,.... म्हटले काय घडले, तर तो म्हणाला आमचे काल लई भांडण झाले सारखी मुलाकडे जाऊ जाऊ करत होती. शपथ घातली तेव्हा रडून पडून गप्प बसली. मला वाटले रागात आहे मी झोपून गेलो.

     डॉक्टरला बोलावले, तर ते म्हणाले कालच गेली रातच्या आठ नऊ वाजता......."

     सोमेशला घेरीच  आली, धपकन खाली बसला 

      "काका ,अरे कसे शक्य आहे..... माय तर काल इथे माझ्याजवळ मुंबईला होती."

    "येडा आहेस का तू?.... लवकर ये, तिला मुखाग्नि द्यायला आहे." सोमेशला आता सर्व जाणवायला लागले रात्री आली एकटी माझ्याशी बोलली, जवळ घेतले प्रेमाने हे सर्व भास होते . तिची भेटायची इच्छा तिने शरीर सोडल्यावर पूर्ण केली व बस lमध्ये बसली आणि शेवटच्या प्रवासाला निघून गेली.

    सोमेशला रडू आवरेना..... तो माय ग, का गेली सोडून म्हणत धाय मोकलून रडू लागला..... .

 -------------------------------------

लेखिका सौ प्रतिभा परांजपे

वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफावर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.




1 Comments

  1. आईची माया वेगळीच असते

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post