पुसाळकर आणि त्यांचा महत्त्वाचा वेळ

पुसाळकर आणि त्यांचा महत्त्वाचा वेळ

✍️ योगेश साळवी 

      " थांब रे... कुणाचा तरी फोन येतोय मला.. बहुतेक कंपनीतून असणार.. फक्त दोन मिनिटं दे मला.. मी परत फोन करतो लगेच..." पुसाळकर आपलं फोनवरील संभाषण अर्धवट ठेवीत.. समोरच्याची संमति ग्राह्य धरत फोन बंद करत म्हटले.

     पुसाळकरांची ही नेहमीची ट्रिक होती. दोन-तीन मिनिटापेक्षा जास्त वेळ कोणाशी गप्पा.. बोलणं होऊ लागलं की त्यांनी स्वतःहूनच लावून घेतलेली मेंदूतील यंत्रणा.... जी एका चिप च्या स्वरूपात होती.. तिथून एक अलार्म रुपी सूचना त्यांना येई. मग पूसाळकर अत्यंत चलाखीने आपलं बोलणं आवरून घेत.

        आयुष्यातला प्रत्येक क्षण किंमती आहे आणि आयुष्य हे क्षणभंगुर आहे. ते असं मित्रांशी नातेवाईकांची वायफळ गप्पा मारण्यात जाऊ नये म्हणून पुसाळकर नेहमीच सतर्क असत. बुद्धिवादावर या माणसाचा प्रचंड विश्वास होता. भावनांना अवास्तव महत्व देण्यापेक्षा सर्वांनीच आपली तार्किकता वापरून काम करायला हवीत.. याविषयी पुसाळकर नेहमीच आग्रही असत.

        आज रविवार त्यांचा खरे तर सुट्टीचा दिवस होता. बऱ्याच दिवसातून निवांत फोन करणाऱ्या त्यांच्या बालमित्राशी संजय शी त्यांच्या गप्पा फोनवर रंगात आल्या होत्या. पण पुसाळकरांनी ही जी सवय स्वतःला लावून घेतली होती... वेळेचा अपव्यय न होऊ देण्याची त्यामुळे त्यांनी लगेच संभाषण आवरते घेतलं. समोरच्या संगणकावर त्यांचा सुरू असलेला बुद्धिबळाचा डाव ते पुन्हा खेळू लागले.

      पुसाळकर फारतर पस्तीस चे असावेत. लहानपणापासूनच त्यांच्यावर वेळेचा सदुपयोग करण्याचे संस्कार झालेले. पुढे पुढे पुसाळकरांना वेळेचे महत्त्व अजूनच पटत गेले. हातावरचे घड्याळ त्यांना फार जवळकीचं वाटू लागलं. सकाळी लवकर उठल्यापासून ते रात्री पलंगावर निजेपर्यंत काय काय करायचे त्याचे वेळापत्रक ते आदल्या दिवशी तयार करत आणि त्याचं काटेकोरपणे पालन करत. या कार्यक्रमात जरा जरी इकडचे तिकडे झाले की पुसाळकरांना अस्वस्थ वाटे.

      याच त्यांच्या काटेकोरपणामुळे आणि अंगभूत हुषारी मुळे पुसाळकर वयाच्या तिशीतच एका आंतरराष्ट्रीय कंपनीत ...जी कंपनी आयफोन्स, टेबलेट्स आणि तत्सम गोष्टी बनवायची तिचे मुख्य व्यवस्थापक झाले होते. या कंपनीत त्यांनी केली चार वर्षे काम करून स्वतः ला सिद्ध करुन आपल्या वरिष्ठांचे ते लाडके झाले होते.

       रोज येत असलेल्या नवनव्या तंत्रज्ञानाने ,गॅजेट्सनी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशल इंटेलिजन्स नी

ु पुसाळकरांच्या उपजत काटेकोर बुद्धिप्रामाण्यवादी वृत्तीला चांगलाच हातभार लावला होता. नव्यानेच प्रचलित झालेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी एक नॅनो चीप पुसाळकारांनी आपल्या मेंदूत कानाच्या जराशी वर लावायची सोय करून घेतली. ही चिप सोयीनुसार काढून ठेवता येत असे. आपल्या सुंदर पत्नीशी प्रणय करताना... ज्यावेळी भावनांचा बुद्धीपेक्षा जास्त वापर करावा लागे.. पुसाळकर ती चिप काही काळ काढून ठेवत. मात्र ही वेळ सुद्धा आपण फार थिल्लर पणे वापरली असं त्यांना वाटायचं आणि लगेचच त्यानंतर ते पुन्हा ती इलेक्ट्रॉनिक चीप मेंदूमध्ये बसवत.

      पुसाळकरांनी आपल्याला कंपनीत मिळणाऱ्या भरघोस पगाराच्या जोरावर  'सरस्वती सदन ' हा बंगला बांधला होता. बुद्धीची देवता सरस्वतीचे नाव त्यानीं मुद्दामच बंगल्याला दिलेलं. आपल्या बुद्धी विषयी.. तर्कशक्ती विषयी त्यांना विलक्षण अभिमानच होता. उगाचच वेळ दवडणाऱ्या टवाळक्या करणाऱ्या... नसती चांभार चौकशी करणाऱ्या माणसांची त्यांना घृणा वाटे. इतका मौल्यवान पण क्षणभंगुर आयुष्य देवाने दिले असताना माणसं वेळेचा अपव्यय का बरं करतात.. असा प्रश्न त्यांना पडे.

    प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीची कसोटी वापरून माणसाने पडताळून घ्यायला हवी असच त्यांना वाटे. पुसाळकर ऐन तारुण्यात असताना एका शिवानी नावाच्या तरुणीवर त्यांचे प्रेम जडलं होतं. शिवानी सुद्धा पुसाळकरांच्या तडफदार ,अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्त्वाला भाळली होती. छानच जोडी जमलेली शिवानी आणि पुसाळकारांची. अगदी दोघांचे स्वभाव ही एकमेकांना पूरक होते. पुढे पुसाळकरांना चांगली नोकरी लागल्यावर शिवानीच्या घरच्यांनी त्यांच्यासाठी शिवानीचा जोडीदार म्हणून प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव पुसाळकरांनी सगळ्या कोनातून तपासून पाहिला. त्यासाठी त्यांनी नव्यानेच मेंदूत बसवलेल्या चीप ची मदत घेतली. शिवानी चा मोकळा स्वभाव, स्वच्छंदीपणा झालंच तर आप्त स्वकीय आणि मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळायची वृत्ती जिच्याकडे पुसाळकरांचे प्रेमाच्या नादात दुर्लक्ष झालं होतं... ते चिप ने लक्षात आणून दिलं. पुसाळकरांनी मग शिवानीला नाकारून... काहीतरी थातूरमातूर कारण पुढे सरकावून आपल्या पुढील करिअरला पोषक ठरेल... स्वतः जी वेळेला.. तार्किकतेला महत्व देईल अशा वर्षा कर्णिक शी लग्न केलं. आपला हा निर्णय अधिक अचूक होता हे पुसाळकरांच्या लक्षात आलं होतं.

          खरंतर या बंगल्यात राहायला येण्याआधी पुसाळकर फ्लॅटमध्ये राहायचे. पण मग सोसायटीत सर्वांबरोबर राहायचे म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलणं आलं... त्यांच्या सणासमारंभात सामील व्हायला लागणार... म्हणजे पर्यायाने वेळ वाया जाणार. नकोच ते. इथेही आपल्या बंगल्यावर त्यांनी एक वॉचमन ठेवला होता. एकदा दोनदा असाच ऐन कामाच्या वेळी डुलक्या घेताना त्याला पुसाळकरांनी रंगेहात पकडला आणि त्याला ताकीद दिली. मग त्यांनी एके दिवशी रोबो.. यंत्रमानव ऑनलाईन मागवला. 'गॅरी 'असं त्याचं नामांकन केलं. मानवी वॉचमनची आता गरजच राहिली नाही. गॅरी  त्यांची जवळजवळ सगळीच काम करायचा. एकाच वेळी तो बाजारातून आवश्यक गोष्टी आणायचा आणि त्याच्याशी संपर्कात असलेल्या सेन्सॉर्स आणि कॅमेरा मार्फत घरावर लक्ष ठेवायचा. Youtube वरील पदार्थांच्या रेसिपी पाहून हालचाल निर्देशकामार्फत योग्य त्या हालचाली टिपून अचूक मीठ मसाला वापरून छान जेवण बनवायचा. बगीच्याला पाणी वगैरे घालणारे माळी बुवा झाडांना कसे पाणी घालतात इत्यादी त्यांच्या हालचाली आपल्या स्मरणशक्तीत साठवून कॅरीने मग माळी म्हणून असलेल्या माणसाला पण घरी पाठवले. आपल्या अचाट बुद्धिमत्तेचे पुसाळकरांना तेव्हा केवढं कौतुक वाटलं होतं.

        पुसाळकर कर्तव्यनिष्ठ होते आणि आपल्या 

कर्तव्यनिष्ठतेपायी ते तर्काचा कसा उपयोग करत हे जाणून घ्यायचं असेल तर एक घटना सांगितलीच पाहिजे.

        पुसाळकर या आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करायचे त्या कंपनीला मध्यंतरी मलेशियावरून एक मोठी ऑर्डर मिळालेली. ती ऑर्डर पूर्ण करायची तर कामाचे तास वाढवणे गरजेचे होते एवढेच नव्हे तर आठवड्यातील सात दिवस रजा न घेता काम  होणं आवश्यक होतं. जर ही ऑर्डर पूर्ण केली असती तर मग भविष्यात मलेशियातील ती ग्राहक कंपनी पुसाळकरांच्या कंपनीची कायमची ग्राहक झाली असती. त्या कंपनीच्या मग बऱ्याचशा मोठ्या ऑर्डर मिळाल्या असत्या. पुसाळकरांच्या पदावर, मिळणाऱ्या वेतनावर, भत्ते वगैरे गोष्टीवर त्यामुळे खूप मोठी वाढ होण्याची शक्यता होती.

      पुसाळकरांनी ही संधी हेरली. आपली सर्व तर्कशक्ती त्यांनी कामाला लावली. आपल्या उत्पादनाबाबत ते नेहमीच कटाक्ष असत. आपल्या कंपनीतून अतिशय वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर सतत उत्पादन व्हावं असं त्यांच्या व्यवस्थापनाचे धोरण होतं. पण मग त्यासाठी कामगारांचा विचार कितपत करायचा हा एक प्रश्न त्यांनी मेंदूतील चीप ला विचारून पाहिला.

      आर्टिफिशल इंटेलिजन्स वापरणाऱ्या त्या  इलेक्ट्रॉनिक चीप ने भविष्यातील सुवर्णसंधी साधायची असेल तर भावनांना स्थान देऊ नकोस असा निर्णय दिला. कामगार कोणत्याही वेळी उपलब्ध व्हावेत यासाठी त्यांच्या कंपनीच्या साईट्सवर राहण्याची खाण्यापिण्याची सोय त्यांनी केली. अट इतकीच होती अगदी अर्ध्या रात्री तरी बोलावलं तरी कामगारांनी ताबडतोब कामाला लागायचं!!

        पण त्यामुळे कामगारांना प्रचंड मानसिक ताणाचा सामना करावा लागला. दोन-तीन कामगारांनी कंटाळून आत्महत्या केल्याच्या बातम्या सुद्धा आल्या. पण मुळातच हुशार पुसाळकरांनी आपल्या तैलबुद्धीने आणि त्या बुद्धीच्या जोरावर निर्माण केलेल्या ओळखीच्या मदतीने हे प्रकरण दडपलं. याशिवाय कामगारांवर कंपनी करत असलेल्या एकूण खर्चाला पायबंद घालण्यासाठी आणि उत्पादकता कार्यक्षमता वाढवण्यासाठी कामगार कपात करून जर्मनीतून रोबोट्स मागवण्यात येण्याचं कामगारात पसरवलं. नोकर कपात होण्याच्या भीतीने कामगार गप्प झाले.

        तर आज रविवार होता. पण कंपनीमध्ये कामगार काम करत होते. कामकाज व्यवस्थित चालू आहे की कसं हे पाहण्यासाठी एक धावती भेट कंपनीला देणं पुसाळकरांना आवश्यक होतं. रविवार असल्याने जड जेवण झालेलं.पुुसाळकरांचे मेव्हणे साहेब आल्याने बायकोने चार जास्तीचे पदार्थ बनवले होते. दुसरा एखादा असता तर त्यानेही दुपार मस्तपैकी पाहुण्यांबरोबर कदाचित एखादा दुसरा पेग घेऊन मस्तपैकी गप्पा रंगवण्यात घालवली असती. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. पण पुसाळकरांसारख्या कर्तव्यनिष्ठ माणसाला असं पाहुण्यांसोबत गप्पा मारण्यात वेळ दवडणं मंजूर नव्हते. तरीही खास पत्नीच्या आग्रहामुळे

ते मेव्हण्याशी शिळोप्याच्या गप्पा मारत व्हरांड्यात बसले.

        " भाऊजी तुम्ही म्हणे मेंदूमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप बसवून घेतली आहे... काय आहे काय ते नक्की?"  मेव्हण्याने विचारलं.

       " अरे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक उपकरण मार्केटमध्ये आलेत. आमचा गॅरी बघ अगदी जेवणापासून ते माळी काम, बाजारहाट सगळं करतो. ही चीप पण त्यापैकीच एक आहे...."

          "आपण माणसं खर तर भावनांच्या फार आहारी जातो. खरंतर तर्कशुद्ध विचार केला तर माणूस आता करतोय त्याच्यापेक्षा कित्येकपट आणखी प्रगती करेल. ही चीप आपल्याला भावनांवर काबू ठेवून मेंदू अधिकाधिक रॅशनल म्हणजे लॉजिकल विचार कसा करेल ते बघते. शिवाय तुला कधी वाटलं की थोडं जावं भावनेच्या आहारी..फार यांत्रिक होत चाललय जीवन तर ही चिप अशाप्रकारे काढून पण ठेवता येते..."

        असं म्हणून पुसाळकारांनी ती चिप चक्क आपल्या मेंदूतील एक छोटा कप्पा.. खाच म्हणता येईल फारतर ... काढून त्यांच्या मेव्हण्याला दाखवली.

       " बरं.. आता जरा मला कंपनीत जावं लागेल. खरंतर तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या मला. पण यु नो वर्क इज वर्क. काम हीच पूजा. मला जायलाच हवे. सो यंग मॅन तू एन्जॉय कर... आराम कर मी काम आटोपून येतो." असं म्हणून पुसाळकर उठलेच.

         भराभर तयार होऊन ते त्यांच्या किंमती स्वयंचलित कार मध्ये बसले. गाडीने वेग पकडला आणि भरधाव 

गतीने कार शहराकडे कंपनीच्या दिशेने जाऊ लागली.

      एक अर्धा तास झाला न झाला तो रस्त्यावर एक तिशी ची  तरुणी हातात एक बाळ घेतलेली पुसाळकरांना दिसली. पुसाळकरांनी तिला पाहताच गाडीचा वेग कमी केला. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर आर्जवी... दीन भाव होते. ती ठराविक अंतर जाण्यासाठी लिफ्ट मागत होती.

        पुसाळकरांना तिची दया आली. भर पावसात छत्री न घेतलेल्या अवस्थेत भिजत लहान बाळाला हातात घेऊन लिफ्ट मागणाऱ्या तरूणी ला पाहून त्यांचे मन द्रवले. त्यांनी खिडकीची काच खाली केली.

          " साहेब मला जरा टाउनला सोडाल का ? खूप उपकार होतील. माझा मुलगा आजारी आहे... जास्त वेळ पावसात राहिला तर अजून आजारी पडेल. मारुती मंदिर पाशी सोडा मला तिथून मी जाईन." ती तरुणी गयावया करत म्हणत होती.

        " या लवकर आत. मागच्या सीटवर बसा. तिथे कपडा असेल ...तुमचे आणि बाळाचे केस कोरडे करा." पुसाळकरांनी तिला गाडीत घेतली आणि गाडी चालू केली.

        " तुम्हाला थंडी वाजत असेल...." पुसाळकरांनी वातानुकूलित यंत्रणा बंद करत म्हटलं. समोरच्या आरशातून त्यांनी मागील सीटवर बसलेल्या तरुणीकडे ओझरते पाहिले. त्यांना अचानक कॉलेजमधली त्यांची प्रेयसी शिवानी आठवली. थोडीफार अशीच दिसायची ती. आज तिला मूल असतं तर....

          मुल... शिवानी च आणि कदाचित आपलं ही. खरंच शिवानीचे स्थळ चालून आलं होतं. तेव्हाच हो म्हणायला पाहिजे होतं. शिवानी आणि आपली जोडी... पुसाळकर विचारात रमून गेले.

           समोरच्या पावसाच्या झाडीत रेनकोट घातलेल्या पोलिसांनी गाडी अडवली तेव्हा पुसाळकर भानावर आले. त्यांनी गाडीचा वेग कमी करून एकदम गाडी थांबवली   .

         

    " साहेब या मागच्या सीटवरच्या मॅडम कोण आहेत? " पोलिसाने त्यांना अदबीने विचारलं. पण त्या अदबी त त्याच्या पेशाला साजेलशी जरब त्या विचारण्यात होती.

      " या.. या बाई मला रस्त्यात भेटल्या... लिफ्ट मागितली त्यांनी... रस्त्यात "  पुसाळकर गडबडून गेले होते. काहीतरी घडलं होतं.. घडणार होतं हे निश्चित.

      " का साहेब ..काय झालं ? माझी काही चूक झाली का ? "पुसाळकर विचारते झाले.

      " हो. या बाईंनी एक मूल पळवले आहे.. दिसते ते त्यांच्या हातात.. फेस  रेकगनिशन ने आम्ही नक्की केले आहे.... मुल आणि बाई तीच आहे म्हणून.. पण तुम्ही तर सभ्य गृहस्थ वाटता.. तुम्ही हिला कशाला मदत करत होता? "  पोलिसाने खडसावून विचारलं.

        पुसाळकरांच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. अरे हे काय होऊन बसलं. कधी नव्हे ती एखाद्याला मदत करावी आणि तो नेमका गुन्हेगार निघावा याचा त्यांना भयानक 

वैषम्य वाटलं.

      " अहो साहेब, विश्वास ठेवा. माझा आणि तीचा काही संबंध नाही. केवळ दयेपोटी........" पुसाळकरांचे बोलणं अर्धवटच राहिलं कारण त्यांच्या हातात आता आभासी बेड्या लावून त्यांना अटक केली गेली होती.

       थोड्याच वेळात पुसाळकर पोलीस लोकअप मध्ये होते. नवीन तंत्रज्ञान वापरल्याने लॉकअप सुद्धा आता पूर्वीसारखं लोखंडी गजांचे वगैरे राहिलं नव्हतं. चांगलं पारदर्शक आरपार दिसू शकेल अशा भिंती होत्या सभोवती त्यांच्या. एकदम अत्याधुनिक. मात्र त्या ओलांडण्याचा प्रयत्न करताच एक छोटा विजेचा धक्का बसत होता. आणि मग अलार्म वाजत होता. घंटा वाजताच आजूबाजूचे सारे हा कोण मूर्ख आलाय...अशा नजरेने त्यांच्याकडे पाहत.

        कितीतरी वेळ पुसाळकर त्या आभासी तुरुंगात विचार करत बसलेले कोणास ठाऊक. इतक्यात कोणी पोलिसांनी त्यांच्या हातात एक दूरध्वनी दिला आणि ते भानावर आले. थरथरत्या हाताने त्यांनी रिसिव्हर कानाला लावला.

         " पुसाळकर मी साठे बोलतोय...." साठे बोलत होते.

साठे त्यांच्या कंपनीचे मालक होते. काहीतरी आशादायक घडेल असं पुसाळकरांना त्याही अवस्थेत वाटलं.

          " पुसाळकर तुम्ही आज साइटवर न गेल्याने केवढा गहजब झालाय माहित आहे का तुम्हाला..??" साठेंनी पूसाळकरांना धारेवर धरलं.

        " तुमच्या मागे कामगारांनी बंड केलेय.... घोषणा देतायेत तुमच्या निर्णयाविरुद्ध. वैतागलेत सर्व. शिवाय त्यांच्यातल्या काही जणांनी प्रोडक्शन मशिनरीची मोडतोड केली... ते नुकसान झालं ते वेगळच... आज तुम्ही वेळेवर पोहोचून परिस्थिती योग्य रीत्या हाताळली असती.. त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं असतं तर असं घडलं नसतं." साठेंचा आवाज चिरका झाला होता. चांगलेच भडकलेले दिसत होते.

         " सर... सर मी अडकलो एका प्रकरणात. उगीचच.

माझी काही चुक नव्हती त्यात... मी निघालो होतो कंपनीत यायला." पुसाळकरांच्या पायातून.. डोक्यातून.. पूर्ण शरीरातूनच ऊर्जा नाहीशी होतेय की काय असं त्यांना वाटत होतं बोलताना.

         " मला समजले ते.... मी तुम्हाला काय समजत होतो आणि तुम्ही... माणसाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात हेच खरं. काही असो. झाल्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा मला उद्यापर्यंत पाठवून द्या. तसं पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मॅनेजर मला माझ्या कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर नकोय." साठे बोलले आणि त्यांनी दूरध्वनी बंद केला.

          पुसाळकरांच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. कुठे गेली आपली हुशारी... ती तर्कनिष्ठता आणि ती कुशाग्र बुद्धी. एखाद्या दर्यावर्दी जहाजाच्या कॅप्टनचे महासागरात उत्तुंग लाटांवर स्वार होऊन नवनवे किनारे पादाक्रांत करणारे जहाज कुठल्यातरी सामान्य खाडीत चिखलात अडकून पडावं तशी स्थिती पुसळकरांची झाली.

          आपल्या मेंदूतल्या चीप  ने त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या यंत्रणेनं पण आपल्याला सल्ला का दिला नाही? की बाबा रे ..अनोळखी बाई आहेत. तुझे काम तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे. नको.. नको कोणावर उपकार करायला जाऊ... ती चिप बिघडली की काय... मग आपल्याला तसा ती चिप नादुरुस्त झाल्याचा संदेश मिळाला हवा होता.

        पुसाळकर आपली जन्मजात लाभलेली स्मरणशक्ती वापरून मागच्या घटना क्रमवार आठवू लागले.

        मेहुण्याशी व्हरांड्यात गप्पा मारताना त्याला दाखवायची म्हणून मेंदूच्या त्या काना मागच्या कप्प्यातून काढलेली चिप ... ती मौल्यवान चिप... ज्यामुळे हा समर प्रसंग त्यांच्या जीवनात आला.. आणि सोन्यासारख्या नोकरीला हात धुऊन बसावे लागले ती चिप घरी... बंगल्यावर टेबलावर तशीच राहिली होती. ती परत रोपण करायला.. मेंदूत बसवायला ते विसरले होते.

 ✍️ योगेश साळवी 

वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post