वादळवाट

 वादळवाट

लेखिका - सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 


“रजनीश ते बॉक्स गाडीत ठेव. आणि जरा घाई कर प्लीज आपल्याला उशीर होतोय.” हातातील फाईल मिटून बाजूला ठेवत संजयने आवाज दिला. रजनीश आणि तीन चार मुलंमुली लगेच उठून बाजूला रचलेले बॉक्स घेवून बाहेर पडले.  

एका समाजसेवी संस्थेचे ते ऑफीस होते. संस्थेचा मुख्य उद्देश देहविक्रय करणाऱ्या महिलांचे, त्यांच्या मुलांचे पुनर्वसन, उद्बोधन करणे हा होता. आपल्या संस्थेच्या माध्यमातून संजयने अनेक अशा अनेक स्त्रिया आणि मुलांना  त्या व्यवसायाच्या दलदलीतून मुक्त केले होते. त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत केली होती. पण कितीही काम केले तरी कमीच होते. परप्रांतातून फसवून आणलेल्या, चित्रपट किंवा तत्सम मनोरंजन क्षेत्राच्या झगमगाटीला भुलून त्यात करीयर करण्याची आस धरून घर सोडून पळालेल्या पण भ्रमनिरास होवून नाईलाजाने या मार्गाला लागलेल्या कित्येक मुली रोज रेडलाईट एरियामध्ये भरती व्हायच्या. संजय आणि त्याच्या चमूचे काम दिवसेंदिवस वाढतच चालले होते.  

पण एक दिलासा होता, मदतीचे हातही वाढत होते. तरुण मुलेमुली संजयच्या कामात सहभागी होत होते. आताही संजयच्या शब्दानुसार पोरं बाहेर पडली. संजय बाहेर येवून त्याच्या कारमध्ये ड्रायवर सीटवर बसला तोच बाजूचे दार उघडून सुरभी आत बसली. संजय गालात हसला. गेल्या सहा सात महिन्यांपासून सुरभी संजयबरोबर समाजसेवा करत होती. B.A.च्या शेवटच्या वर्षाला असणारी सुरभी एका कार्यक्रमात संजयला भेटली होती. संजय त्याच्या संस्थेसाठी देणगी गोळा करण्यासाठी कलावंतांचे कार्यक्रम आयोजित करायचा. त्यातून संस्थेचे नाव होवून स्वयंसेवकही मिळायचे. सुरभी अशीच समाजसेवेशी जोडली गेली होती. ती हिरीरीने प्रत्येक कामात सहभागी व्हायची. तिच्या वागण्यातून तिची तळमळ दिसून यायची. हळूहळू संजय सुरभीकडे आकर्षित होत होता. सुरभीच्या वागण्यावरून तिलाही संजय आवडत असावा असे वाटत होते. म्हणून तर आता तिचे हक्काने बाजूला येवून बसणे त्याला आवडले.  

गाडी वस्तीत येवून पोहोचली. स्वयंसेवकांनी बॉक्समधून गर्भनिरोधक साधने, संततीप्रतिबंधक गोळ्या, सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे साधने वाटायला सुरुवात केली. हे त्यांचे नेहमीचे काम होते. संजय तिथल्या बायकांशी बोलू लागला. त्यांच्या अडचणी ऐकू लागला, समजूत काढू लागला. तो त्यांना मावशी, ताई वगैरे म्हणत होता, त्याही अगदी हक्काने त्याच्यासोबत मोकळेपणाने बोलत होत्या. कारला टेकून सुरभी ते पाहत होती. तिच्या मनात शेकडो विचार एकाच वेळेस फिरत होते.  

संजय देशमुख, साॅफ्टवेअर इंजीनियर. भक्कम पगाराची नोकरी, रुढार्थाने वेल सेटल्ड म्हणता येईल असा. शनिवार रविवारी जेव्हा इतर तरुण मौजमस्तीमध्ये दंग असतात तिथे संजय वेश्यावस्तीत समाजकार्य करण्यात गुंतलेला असायचा. खूप बायकांना त्याने छोटे गृहउद्योग सुरु करून दिले होते, अनेक मुलांना वस्तीतून बाहेर काढून शाळांमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत याची तो कटाक्षाने दक्षता घेत होता. कारण त्याला हे चांगले माहीत होते, की फक्त शिक्षण आणि संस्कारानेच या मुलांचे भविष्य बनेल. तो स्वतःच त्याचे उदाहरण होता.

 

वीस वर्षापूर्वीची गोष्ट ही... दिवसा पेंगाळलेल्या या वस्तीत एक बाई तीन मुलांसोबत कसलासा सर्वे करायला आली. तिथे राहणाऱ्या बायका नुकत्याच झोपेतून उठल्या होत्या. कुणी मंजनने दात घासून पचापच थूंकत होती तर कुणी धुतलेले केस वाळवत उन्हाला बसली होती. कुठेतरी दोघी रात्री पळवलेल्या ग्राहकवरून हमरातुमरीवर आल्या होत्या. भुंकणारी कुत्री, किंचाळणारी पोरं असलं अतिशय डिप्रेसिंग वातावरण होतं ते. अशा वातावरणात काही लहान मूलं तिथेच खेळत होती, अगदी चुणचुणीत वाटत होती. चौकशी करणाऱ्या बाईला पाहून त्यातील एक समोर आला आणि काय हवे ते विचारु लागला. त्याची हुशारी त्यांच्या लक्षात आली. त्या बाई ज्या कामासाठी आल्या होत्या ते सोडून त्याचीच माहिती घेवू लागल्या.  

चार दिवसांनी त्या बाई पुन्हा आल्या. यावेळेस त्यांच्याबरोबर एक तरुणही होता. ते दोघे त्या मुलांच्या आयांना भेटले. मुलांना आमच्यासोबत पाठवा, आम्ही त्यांना शाळेत घालू, त्यांची जबाबदारी घेवू म्हणून पटवू लागले.

“पण आम्ही का पाठवायचे आमच्या मुलांना तुमच्यासोबत? कशावरून तुम्ही त्यांना शाळेत घालाल? तुम्ही मुलांना भीक मागायला लावणाऱ्या टोळीचे तर नाहीत?” नुसरत त्या तरुणाच्या अंगावर धावून गेली. तिने त्याची कॉलर धरली.  

“हो हो... धंदा करतो म्हणून काय झाले, आम्ही आमच्या पोरांना सांभाळायला समर्थ आहोत. बाप नसू पण आई तर आहोत. तसंही वेश्यांची मूलं करणार काय? चोरीमारी नाहीतर दलाली... आजपर्यंत पाहिलाय का कधी यांच्यातला कुणी शिकून हाफीसर झालाय असं?” निशा निराशेने म्हणाली. ही निशाच, (तिचे खरे नाव काय होते कुणास ठाऊक) त्या मुलाची आई होती.  

आता त्या बाई पुढे आल्या. त्यांनी निशाचे हात धरले, “ताई असं नका हो म्हणू. कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा ते आपल्या हाती थोडीच असते. आपल्या पोटी मुलांनी जन्म घेतला म्हणजे ती आपली जबाबदारी आहे. आपणच त्यांचे पुढील जीवन सुखकर बनवण्यासाठी झटायचं असतं मग तुम्ही गृहिणी असा किंवा दुसरं कुणी. आता तुम्हीच सांगा तुमच्या आजुबाजूचे वातावरण या मुलांच्या वाढीसाठी योग्य आहे का? अशा वातावरणात वाढलेली मुलं पुढे जाऊन काही होतील ही अपेक्षा करणे ही किती चुकीचे आहे. म्हणून मी यांना सोबत घेवून जाईन, चांगल्या शाळेत घालेन. कुणास ठाऊक यातील एखादा मोठा होवून ऑफिसरही बनेल.”  

त्यांच्या आवाजातील कळकळ त्या बायकांच्या मनाला स्पर्शून गेली. पण अजूनही त्यांची खात्री पटत नव्हती.

“तुम्ही म्हणता ते बरोबर आहे... आमच्यामुळे आमच्या मुलांचे आयुष्य बरबाद होवू नये असं आम्हालाही वाटतं... पण यांच्या शिक्षणाचा खर्च कोण करेल? चांगल्या शाळांच्या भरमसाठ फीया आम्हाला परवडणार कशा.... आमचा धंदा असा, जोपर्यंत जवानी तोपर्यंत आमची कहाणी... त्यानंतर तर लूतभरल्या कुत्र्यागत अवस्था.... कुणी वाऱ्याला उभं नाही राहत....” एकटी नजर चोरत बोलत होती. आता तो तरुण पुढे सरसावला.

“ताई तुम्ही त्याची काळजी करू नका. समाजात चांगली आणि वाईट अशा दोन्ही प्रकाराची माणसं असतात. अशा चांगल्या व्यक्तींची एक समाजसेवी संस्था आहे. त्या संस्थेमार्फत यांच्या शिक्षणाचा पुर्ण खर्च उचलला जाईल, यांच्या राहण्याची सोय होईल. अधुनमधून तुम्ही मुलांना भेटूही शकता.”

हे ऐकून बायका विचारात पडल्या. हो नाही करता त्या मुलांना पाठवायला तयार झाल्या. गमावण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नव्हते, उलट झाले असते तर त्यांच्या मुलांचे कल्याणच झाले असते. अशाप्रकारे दहा बारा मुलंमुली त्या संस्थेने शिक्षणासाठी दत्तक घेतली.  

परिस्थितीची जाणीव असलेल्या त्या लेकरांनी आपल्या कुवतीप्रमाणे शिक्षण घेवून त्यांच्या जन्मदात्र्यांना देहविक्रयाच्या दलदलीतून बाहेर काढून चांगले आयुष्य दिले. त्यातील एक मुलगा म्हणजे हा संजय. संजयने आपल्या आईप्रमाणे इतर स्त्रियांचा उद्धार करण्याचा वसा घेतला होता. योग्यवेळी आपल्याला दिशा मिळाली म्हणून आपण इथे आहोत. या उपकाराची फेड म्हणून त्याने हे कार्य अंगिकारले होते.

 त्याच्या राहणीमानामुळे, समाजकार्यामुळे प्रभावित होणाऱ्या माणसांना जेव्हा तोही वेश्येचा मुलगा आहे हे समजे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट दिसे. पैसा, मानमरातब त्याला आणि त्याच्या आईला इज्जत मिळवून देवू शकत नव्हता. त्याच्या सुंदर व्यक्तीमत्वावर भाळणाऱ्या मुली त्याचा भूतकाळ समजताच ओळखही दाखवत नसत. पण कदाचित सुरभी तशी नसावी असा त्याचा अंदाज होता. कारण ती त्याच्याबद्दल सगळं माहीत असूनही जवळीक  साधू पाहत होती.  

‘संधी मिळताच सुरभीला लग्नासाठी विचारायचे,’ असे संजयने ठरवले. त्यालाही ती आवडायची. आतासारखी ती लग्नानंतरही आपल्यासोबत हे कार्य करेल असा त्याला विश्वास होता.  

ठरल्याप्रमाणे एक दिवस संजयने सुरभीला लग्नासाठी मागणी घातली. आजुबाजूला दोन तीन स्वयंसेवक उपस्थित होतेच. त्याचे प्रपोजल ऐकून सुरभी हबकून गेली. तिचा चेहरा क्षणात लाल झाला, त्यावर राग उमटला. तोंडून कठीण शब्द बाहेर पडले, 

“How  dare  you!  हिम्मत  कशी  झाली  तुला  मला  प्रपोज  करायची,  लग्न  म्हणजे  काय  हे  तरी  माहित  आहे  का  तुला,  वेश्येचा  मुलगा  साला!” 

डोळे   फाडून  पाहतच  राहिला  तो. त्याला हे अजिबात अपेक्षित नव्हते.  

बरोबरच  होते  तिचे  नाही  का... जन्माला  आला  तेच  एक  चूक  म्हणून.  काही  समाजसेवकांमुळे  चांगल्या  वाटेला  लागला,  शिकून  साहेब  झाला  आणि  ज्या  दलदलीत  आपण  जन्मलो,  वाढलो  ती  साफ  करायला  NGO  स्थापन  केली.  तिकडे  त्याच्या खांद्याला खांदा लावून काम  करणाऱ्या  तिला  पाहून  त्याला  वाटलं  कामाप्रमाणे  विचारही  उच्च  असतील  तिचे ,  पण  तिचे  कामही  फक्त  fb  स्टेटस साठी  होते. तिच्या या वागण्या बोलण्यालाच तो प्रेम समजून बसला होता. 

आज  सुरभीचे शब्द  ऐकून  संजयच्या लक्षात  आले,  आपल्या  नशिबात  संसारसुख  नाही. पण   समोर  दिसणारी  वस्तीकडे  जाणारी  वाट  जणू त्याला सांगत  होती,  ‘ही  वादळवाटचं  आता  वहिवाट  आपली’. 

समाप्त

©️सविता किरनाळे

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post