चलो एक बार फिर से

 चलो एक बार फिर से ...

लेखिका - सविता किरनाळे


सुनिधी सोफ्यावरून उठून बेडरूममध्ये गेली. हातपाय धुवून चेहऱ्यावरून पावडरचा पफ फिरवून कपाळावरची टिकली व्यवस्थित केली. मग ती देवघरात गेली. फूटभर ऊंचीच्या शांत तेवणाऱ्या समयांतील वातींची काजळी काढून त्यांच्यात अजून थोडे तेल घातले. दोन अगरबत्त्या पेटवून उदबत्तीच्या घरात खोचल्या. अंगभर फुलांचा साज लेवून बसलेल्या, चकाकणाऱ्या देवांकडे पाहून तिला प्रसन्न वाटले. अगरबत्तीचा सुगंध मनावरील मरगळ कणाकणाने विरघळवू लागला. सुनिधीला उल्हासित वाटू लागले. आपसूक डोळे मिटले जाऊन मुखातून शब्द बाहेर पडू लागले.  


श्री गणेशाय नमः


अस्य श्री रामरक्षा स्त्रोत्र मंत्रस्य


बुधकौशिक ऋषि 


सितारामचंद्र देवता


.


.


.


.


.


मनोभावे रामरक्षा म्हणून झाल्यावर तिने घंटी उचलून वाजवली. सकारात्मकतेची कंपने घरभर पसरली. अजून थोड्या वेळात मावशी येऊन स्वयंपाकाला लागल्या असत्या. घरकामाचा गडी केशव वरच्या मजल्यावरच्या खोल्यांच्या खिडक्या बंद करून आला. सुनिधी अंगाभोवती शाल घट्ट लपेटून बंगल्याच्या पोर्चमध्ये टांगलेल्या झोपाळ्यावर येवून बसली. घरात नोकरमाणसं आपापली ठरलेली काम करत होती. अजून थोड्या वेळात सुहास आला असता. आल्या आल्या त्याला बायको नजरेसमोर दिसायला हवी असायची.  



सुहास आणि सुनिधी मध्यमवयीन जोडपं. सुनिधी सत्तेचाळीस वर्षाची तर सुहास पन्नाशीचा. पंचवीस वर्षांपुर्वी घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केले होते. दोघे एकाच ऑफीसमध्ये काम करायचे. नव्याने रूजू झालेल्या कुरळ्या केसांच्या, गोऱ्या गोमट्या मुलीने पहिल्या दिवशी ऑफीसमध्ये प्रवेश करताच सगळ्यांच्या माना तिच्याकडे वळल्या. अबोली रंगाचा, मनगटापर्यंत बाह्या असलेला सलवार कमीज, त्याची ओढणी एका खांद्यावर पिनअप केलेली. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर अबोली कपड्यांमुळे एक तांबूस छटा आली होती. तिला पाहताच जवळजवळ सगळ्या सिंगल मुलांची अवस्था ती पाहताच बाला अशी झाली होती. सगळे पाहत होते हेडक्लर्क आंब्रे तिला कोणाच्या टेबलजवळ बसवतात. आंब्रे सुनिधीला घेवून सुहासकडे आले.  


“कारंडे, आजपासून या मॅडम तुमच्या बाजूला बसतील. त्यांना काम शिकवा आणि गरज लागल्यास मदतही करा.”


हे तर आंधळा मागतो एक डोळा सारखं झाले. सुहास विचार करत होता. सुहास तिला काम शिकवण्याच्या मिषाने बोलत होता किंवा बोलणं वाढवू पाहत होता पण सुनिधी मात्र कायम एक अंतर राखूनच असायची.  



चार सहा महिने एकत्र काम करूनही सुहासला तिच्या नावाव्यतिरिक्त काहीच माहीत नव्हते. पण त्याच्या मनात मात्र तिच रूतुन बसली होती. मग सुहासने फिल्मी हीरोप्रमाणे तिचा पाठलाग करायला, ऑफीसच्या पत्त्यावर तिच्यासाठी ग्रीटिंग कार्डस, छोट्या छोट्या भेटवस्तू पाठवायला सुरुवात केली. मनातून हसत ती वरकरणी त्या पाठवणाऱ्याच्या नावाने आरडाओरड करे. अशा वेळी सुहास साळसूदपणे बाजूला उभा राहे.  



वर्षभराने ऑफिसच्या गॅदरिंगच्या वेळी हिंमत करून सुहासने सुनिधीला एकटं गाठलं. 


“सुनिधी ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायच आहे.”


“हां बोला.” तो काय बोलणार याचा अंदाज येवून सुनिधी हसली.


“ते.... मी.... म्हणजे ... माझं तुझ्यावर .... अरे यार कसं सांगू आता....” सुहासची घाबरगुंडी उडाली होती. जर तिला आवडल नाही तर इतक्या लोकांत आपल्या इज्जतीचा ती फालुदा करेल या विचाराने त्याला कापरे भरले होते. सुनिधी मात्र त्याची अवस्था पाहून हसत होती.


“सांगा ना, की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि लग्न करायचे आहे.” सुनिधी म्हणाली.


“काय तुला ते माहीत आहे?” सुहासला धक्का बसला. 


“मी तुमच्या बाजूला बसते. कित्येकदा तुम्ही कामात मला मदत केली आहे. मग ग्रीटिंग कार्ड, पत्र यावरील तुमचे अक्षर मला ओळखता येणार नाही असं तुम्हाला वाटल? तुम्ही बसमध्ये माझा पाठलाग करता हेही मला माहीत आहे.” सुनिधी म्हणाली.


“अच्छा, ओके... माझ्यासोबत लग्न करशील?” सुहासने विचारून टाकले. 


“हो.” सुनिधीने त्याच सहजतेने उत्तर दिले. 



सुनिधीने होकार दिल्यावर दोघे कधी कधी फिरायला वगैरे जाऊ लागले. एकदा दोनदा दोघांना रेस्टाॅरंटमध्ये, बागेत एकत्र पाहून दोघांच्या घरच्यांनी चौकशी करून गोष्टी हाताबाहेर जायच्या आधीच लग्न लावून दिले.  


अशा प्रकारे कोणतेही संकट न येता अगदी विनासायास सुनिधी सुहास एकमेकांचे झाले होते. 


 एक सर्वसामान्य कुटुंब होते सुहासचे. नऊ ते पाच नोकरी करावी, चुपचाप घरी यावे. मुलांबरोबर थोडा वेळ घालवून बायकोच्या हातच्या गरमागरम पोळ्या भाजी खाऊन उद्याची चिंता न करता गुडूप झोपून जावे अशी साधी विचारसारणी असणारे. पण सुहासला मात्र ते मान्य नव्हते. आपली मध्यमवर्गीय विचार सोडून काही तरी वेगळे करावे अशी त्याची आकांक्षा होती. एकाच रूळलेल्या चाकोरीमधून चालणारे तर अनेक असतात. पण रूढ रस्ता सोडून स्वतःची पायवाट बनवावी, पुढे जाऊन त्या पायवाटेची वहिवाट व्हावी असे त्याचे स्वप्न होते. परंतु सध्या तरी ते शक्य नव्हते. सध्या रूळलेल्या मार्गावरूनच त्यांचा प्रवास चालू होता.  



सुनिधी अजूनही नोकरी करत होती. लग्नाला दोन वर्ष झाली होती. सुनिधीला दिवस गेले. दोघांच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले. यथावकाश सोन्याच्या पावलाने श्रेयाचे त्यांच्या संसारात आगमन झाले. श्रेया सहा महिन्यांची झाल्यावर सुनिधी परत कामावर जायला लागली. सुहासचे आईवडील मोठ्या प्रेमाने नातीला सांभाळत.  



दिवस भराभर जात होते. श्रेया एक वर्षाची होता होता सुहासने त्याने नोकरी सोडल्याची बातमी दिली. हे ऐकून त्याचे बाबा प्रचंड संतापले.


अरे असले टोकाचे पाऊल उचलन्याआधी घरी कल्पना तरी द्यायची. आता तू एकटा नाहीस. मागे बायको आहे, लहान मुलगी आहे. त्यांचा तरी विचार करायचा. जर व्यवसाय चालला नाही तर श्रेयाच्या भविष्याचे काय? खात्री देतोस का तू कशाची?” 


“बाबा अहो आशीर्वाद द्यायचा सोडून तुम्ही असं बोलून मला निराश का करताय? मी का असं केलं? पुढे जाऊन कसली संधी उपलब्ध होईल वगैरे चौकशी न करता सरळ आरोप कसे करू शकता तुम्ही? माहीत आहे मला, माझ्या मागे सुनिधी, श्रेया आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार आहे माझ्या डोक्यात. खात्री तर कुणीच कशाची देऊ शकत नाही. पण मी एक मात्र नक्की सांगतो, त्या कुणाला ओझं होणार नाहीत इतकं जरूर कमवेन.”  


बोलून झाल्यावर चिडून सुहास बेडरूममध्ये निघून गेला. बाबा हताशपणे आरामखुर्चीत टेकले. त्यांना समजावण्याची सासूबाईंना डोळ्याने खुणावून सुनिधी सुहासकडे गेली. 


“तुम्ही बाबांना असं बोलायला नको होतं. तुमच्या काळजीपोटी ते तसं रिॲक्ट झाले. तसं पाहायला गेलं तर ते बरोबरच आहेत. इतका मोठा निर्णय तुम्ही कुटुंबाशी, वडिलधाऱ्यांशी विचारविनिमय केल्याशिवाय कसा घेतला? असा अचानक बाॅंब टाकला तर कुणीही बावचळेल.” सुनिधीने मत मांडले.  


“तुला काय वाटत, जर मी आधी सांगितले असते तर बाबांनी परवानगी असती? कदापि नाही. मग सांगून केलं किंवा न सांगतां काय फरक पडतो?” सुहास म्हणाला.


“इथेच तर तुमची चूक होते आहे. बाबांना तुमच्या व्यवसाय करण्यावर आक्षेप नाही तर चर्चा न करता निर्णय घेण्याला आहे. तुम्ही म्हणता तसं कदाचित त्यांनी परवानगी नाकारली असती पण त्यावर चर्चा होवून निदान त्या गोष्टीचे फायदे तोटे तरी समोर आले असते. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी सल्ला दिला असता, ज्याचा तुम्हाला उपयोग झाला असता. तुम्ही त्यांचा मुलगा आहात. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात कायम सदिच्छाच राहतील मग तुम्ही त्यांना मान द्या किंवा नका. पण निदान त्यांना असे अपमानित तरी करू नका.”  



तिकडे आईंनी बाबांना समजवले होते. त्यामुळे पितापुत्रात आलेला ताण दूर झाला . पण काही दिवसात लक्षात आले, की व्यवसाय वृद्धीसाठी मुंबईला राहणे सोयीचे होईल. म्हणून सुहास, सुनिधी आणि श्रेया मुंबईला शिफ्ट झाले. श्रेयाची आबाळ होऊ नये म्हणून सुनिधीने नोकरी सोडली. सुहासचा व्यवसाय हळूहळू पण निश्चितपणे वाढत होता. महिन्यातून दोन दिवस तिघे पुण्याला घरी जायचे. तो चार तासांचा ट्रेनचा प्रवास सुनिधी आणि सुहासच्या खूप आवडीचा होता. कारण त्यांना तेवढा वेळ एकत्र घालवता यायचा. एरवी दोघे आपापल्या कामात मग्न असायचे. नंतर जसे जसे थोडे स्थैर्य येत गेले तसे वर्ष सहा महिन्यातून एकदा श्रेयाला आजीआजोबांकडे सोडून दोन तीन दिवसांची छोटी ट्रिप करायचे. फक्त एकमेकांसाठी वेचलेले हे दिवस राहिलेल्या दिवसांसाठी ऊर्जा द्यायचे. त्यांच्यातील प्रियकर प्रेयसीचे नाते पुन्हा बहरून यायचे.  



सुहासच्या कामाचा व्याप वाढत गेला तसा हा ‘वी टाइम’ ही संपला. श्रेया मोठी होत होती. कालपरत्वे दोघांचे पालक निर्वतले. घरी सुबत्ता आली. पण सुनिधी मनातून विरत चालली. सगळं असूनही काहीतरी हातून सुटतंय ही भावना मनात प्रबळ होत होती. आता तर श्रेयाही शिक्षणासाठी दिल्लीला होस्टेलवर होती. घरी सुनिधी एकटीच असायची. घर खायला उठायचे. ती आपल्याच कोषात राहू लागली. पण दुर्दैव म्हणजे सुहासला याचा थांगपत्ता ही नव्हता. तो आपल्या व्यवसायाच्या वाढत्या डोलाऱ्याकडे लक्ष देण्यात गुंतला होता.  



उभ्या उभ्या सुनिधी भूतकाळात फिरुन आली. गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने ती भानावर आली. सुहासची कार पोर्चमध्ये प्रवेश करत होती. चेहऱ्यावर हसू लेवून तिने त्याचे स्वागत केले. हातातील ब्रीफकेस सुनिधीच्या हातात देवून टाय सैल करत सुहास घरात शिरला.  



तो हातपाय धुवून कपडे बदलून सोफ्यावर विसावला आणि सुनिधीने स्वतः बनवलेला चहा त्याच्या हाती दिला. अनेक वर्षात न बदललेली ही एक गोष्ट.... जेवण कुणीही बनवले असले तरी सुहासला चालायचे पण चहा मात्र सुनिधीच्या हातचाच हवा असायचा त्याला. चहा पित सुहास टीवीवर बातम्या पाहू लागला. सुनिधी बाजूला शांतपणे बसली होती.  



तासभर गेल्यावर स्वयंपाकाच्या मावशी जेवण तयार असल्याचे सांगून गेल्या. दोघे उठून डायनिंग रूममध्ये गेले. नेहमीप्रमाणे सुनिधी सुहासला वाढायला लागली. सगळं काही नि:शब्दपणे चालू होतं. कदाचित ते जाणवून सुहासने सुनिधीला प्रश्न केला.


“श्रेयाचा कॉल आला होता का? कधी येणार आहे ती?” 


“पुढच्या आठवडयात येणार म्हणाली होती. कदाचित बुधवारी येईल.” त्याला भाजी वाढत सुनिधीने उत्तर दिले. त्याचे जेवून झाल्यावर तिने स्वतःला ताट वाढून घेतले.


“घरात दोनच तर माणसं आहेत मग आपण एकत्र का बसत नाही जेवायला?”  


पुन्हा आठवणीचा कप्पा उघडला गेला. श्रेया लहान असताना जेवताना डायनिंग टेबलवरील वस्तू खेचायची, सुनिधीला नीट जेवू देत नव्हती म्हणून सुहास आधी जेवून सुनिधी जेवेपर्यंत श्रेयाला खेळवायचा. ते दिवस तर गेले पण ती सवय मात्र तशीच राहिली.  



म्हटल्याप्रमाणे श्रेया सुट्टीसाठी घरी आली. आल्यावर काही दिवस तीही फक्त कामापुरती खोलीबाहेर यायची. पण चार दिवसात सुनिधीचे  विझलेपण तिच्या लक्षात आले. आधी सर्व गोष्टी उत्साहाने करणारी आई आता घरात शांतपणे का वावरत असते ते तिला समजेना. थोडा विचार केल्यावर तिला जाणवले, हे एका दिवसात नाही झाले. त्याची सुरुवात तर खूप आधी झाली होती पण आता तिच्या लक्षात आले होते.  



श्रेयाने सुनिधीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसात तिच्या लक्षात आले, सुनिधी बोलता बोलता अचानक भूतकाळात हरवून जाते. तिची नजर शून्यात जाते जणू ती काही आठवत असावी. मनात एक कल्पना येवून श्रेयाने जुने फोटो अल्बम्स आणले. ते पाहताच सुनिधीचा चेहरा उजळला. उत्साहाने ती श्रेयाला एक एक फोटो, त्यामागची आठवण सांगू लागली. ते फोटो पाहताना ती ते क्षण परत जगत होती. 


“ए श्रेया, बरं वाटलं बाई हे फोटो पाहून. माझ्या लक्षातच आले नाही, माणसं दूर असली, आठवणी जुन्या झाल्या तरी फोटोच्या माध्यमातून ती जवळ असल्याचा निदान आभास तरी होतो.” काॅफी ढवळत सुनिधी म्हणाली. श्रेयाच्या डोक्यात प्रकाश पडला. सुनिधीला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम झाला होता.  



साधारणपणे आईचे आयुष्य मुलांभोवती फिरत असते. त्यातून बऱ्याच आया करियर आणि मूल यात अपत्याला निवडतात. मूल लहान असतं तेव्हा दिवस कसे भर्रकन निघून जातात ते समजत नाही. पुर्ण दिवस मूल केंद्रबिंदू मानून आई जेव्हा त्याच्या परिघात फिरत असते तेव्हा तिला अगदी आपल्या जोडीदाराचीही कमतरता जाणवत नाही. कालपरत्वे मूल मोठे होते, त्याचे स्वतःचे वर्तुळ बनते. ज्यात आई फक्त एखादा बिंदू बनुन राहते, अनेकांसारखा एक. यात काही चुकीचे नाही. निसर्ग नियम आहे तो... पिल्लांच्या पंखात ताकद येते तेव्हा ती घरटं सोडून उडणारच. परंतु आई मात्र तिथेच असते, जुन्या घरट्यात... उतारवयामुळे थोडी जास्त भावनिक झालेली... पिल्लू मोठं झालंय हे वास्तव डोळ्याला दिसत असूनही नाकारणारी. यातून मनाला येणाऱ्या उदासिनतेच्या कोषात जाणारी. पुरुषांना मात्र एम्प्टी नेस्ट सिंड्रोमचा फारसा सामना करावा लागत नाही. कारण त्यांचे आयुष्य एकाच आरीभोवती फिरत नाही. मन रिझवायला अनेक पर्याय उपलब्ध असतात.  



सुनिधीला वेळीच सावरायला हवे हे श्रेयाच्या लक्षात आले. ती सुनिधीसोबत जास्तीतजास्त वेळ घालवू लागली. खरेदी, चित्रपट, नाटकाच्या निमित्ताने घराबाहेर घेवून जाऊ लागली. एक दिवस श्रेयाने सुनिधीचे कपाट आवरायला काढले. हाती घेतलेल्या प्रत्येक वस्तूची सुनिधी काही तरी आठवण सांगायची. अशात श्रेयाला कपाटात खालच्या कप्प्यात ठेवलेली एक लाकडी पेटी मिळाली. 


“आई यात काय आहे?” श्रेयाने विचारले.


“त्यात खूप साऱ्या गोड आठवणी आहेत.” पेटीला हळुवारपणे कुरवाळत सुनिधी म्हणाली. तिने पेटी उघडली. पेटीमध्ये अनेक ग्रीटिंग कार्डस, पत्रं, काही छोट्या वस्तू जसं कानातले, एखादी माळ, ब्रेसलेट होत्या.


“या वस्तू तुझ्या पप्पांनी दिल्या होत्या.” सुनिधी प्रेमाने म्हणाली.  


“बघू तरी किती रोमँटिक होते पप्पा”, म्हणत श्रेया पाहायला लागली. सुनिधी मात्र त्यातील एक पत्र वाचण्यात मग्न होती. श्रेयाने हळूच त्यात डोकावून पाहिले. ती एक कविता होती. 



वाटतं पुन्हा एकदा


आपण दोघं परकं व्हावं 


मी तुला अन् तू मला 


चोरून पाहावं... 



वाटतं पुन्हा एकदा, मी तुझा पाठलाग करावा


आठवणीत तुझ्या प्रत्येक क्षण जगवावा


तुझं ते मुक्त स्मित मी पुन्हा एकदा न्याहाळावं


वाटतं पुन्हा एकदा आपण दोघं परकं व्हावं...



वाटतं पुन्हा एकदा, तू माझ्यावर रागवावं


हृदयातील सुप्त प्रेम तुझ्या नयनात यावं


मंद श्वासात तुझ्या मी पुन्हा एकदा हरवून जावं


वाटतं पुन्हा एकदा आपण दोघं परकं व्हावं... 



वाटतं पुन्हा एकदा, तू मला नव्याने स्वीकारावं


प्रीतीच्या वर्षावाने तुझ्या मला चिंबचिंब भिजवावं


प्रेमाच्या इंद्रधनूला आपल्या पुन्हा नव्याने रंगवावं


वाटतं पुन्हा एकदा आपण दोघं परकं व्हावं...


(या कवितेचे कवी श्री. जितेंद्रसिंह गिरासे आहेत. ©️Jitendra Girase)



श्रेयाने आईकडे पाहिले.  


“हे तुझ्या पप्पांचे शेवटचे पत्र... पंधरा वर्षांपूर्वी लिहिलेले... वाटतंय आता खरंच परके झालोय आम्ही ... एकाच घरात राहतो पण अनोळखी माणसांसारखे ... प्रेमविवाह आहे आमचा पण हल्ली सुहासला माझ्याकडे पाहायलाही वेळ नसतो... पैसा कमवावा जरूर पण त्याचा उपभोग घ्यायला वेळ नसेल तर काय उपयोग? जर तुम्ही घरातल्या लोकांबरोबर चार प्रेमाचे शब्द बोलू शकत नसाल तर मिळवलेला पैसा काय वर घेवून जाणार आहात का? या घरातला संवाद खुंटलाय ... तू गेलीस आणि असं वाटतंय घर मुकं झालं... “ सुनिधी तुटक तुटक बोलत होती. 


श्रेयाला वाईट वाटत होते. सुनिधीला शांत करून ते पत्र घेवून श्रेया सुहासला भेटायला गेली. 


“पप्पा, तुम्हाला आठवत का आईला घेवून शेवटचं बाहेर फिरायला कधी गेला होतात?” तिने प्रश्न केला.


“नाही आठवत... म्हणजे अलिकडे नाहीच गेलो. बेटा काम इतकं असतं की वेळच नाही मिळत बाहेर जायला वगैरे.” सुहास आठवत होता. 


“पप्पा कुटुंबाला, बायकोला वेळ द्यायला जमू नये इतकं काम का करायचं? मुळात आपण पैसा कशासाठी कमावतो, आपलं कुटुंब आनंदात, सुखात राहावं म्हणून. पण माणसांच्या आनंदापुढे पैसा महत्वाचा नसतो असं माझं तरी मत आहे.” 


“तुम्ही दिवसभर बाहेर असता, मी होस्टेलवर. आई घरी एकटीच. कहर म्हणजे घरी आल्यावरही तुम्ही तुमचे कॉल, टीवी यातच असता. मी आधी नव्हतं नोटीस केलं पण आता समजतंय, इव्हन घरी असतानाही आपल्या दोघांपैकी कुणीच कामाव्यतिरिक्त आईसोबत किंवा कोणासोबत बोलत नाही. हे पत्र आठवतं का तुम्हाला? आज हे वाचून आई काय म्हणाली माहीत आहे?” श्रेयाने सुहासला सुनिधीचे बोलणे, तिच्या संभाव्य आजाराबद्दल सांगितले.  



एम्प्टी नेस्ट सिंड्रोमवर उपाय म्हणजे त्या व्यक्तीचा एकटेपणा दूर करणे, तिला एखाद्या कंस्ट्रक्टिव कामाला जसं छंद जपण्यासाठी प्रवृत्त करणे, समवयस्कांशी ओळख करून देणे, जर नोकरी करण्याची इच्छा असेल तर ती शोधायला मदत करणे इत्यादि. 



दोन दिवसांनी श्रेया होस्टेलवर परत गेली. सुनिधीचे पुन्हा रूटीन सुरू झाले. पण दोन दिवसांनी जी सकाळ उगवली ती वेगळीच होती. सुनिधीला जाग आली ती काॅफीच्या सुवासाने. तिने डोळे उघडले तर सुहास हसऱ्या मुद्रेने हातात ट्रे धरून उभा होता. त्यात दोन काॅफीचे मग होते.  


“उठा राणीसरकार, गरमागरम बेड काॅफी घेवून बंदा हजर आहे.”


सुनिधीला त्याच्या अविर्भावाने हसू आले.


“अहो हे काय नवीन आता?”


“नवीन नाही काही. जुनंच पुन्हा नव्याने. चल लवकर फ्रेश हो. आपल्याला बाहेर जायचं आहे. बॅग्स मी आधीच कारमध्ये ठेवल्या आहेत. तुझी बॅग श्रेयाने भरली आहे बरं. काळजी नको करूस, हे घेतलं का, ते आहे का म्हणून.”  


मग जास्त काही न बोलता सुनिधीने तयारी केली. सुहास तयार होवून कारमध्ये बसला होता. 


“आपण कुठे चाललोय?” काचेतून समोर पाहत सुनिधीने विचारले.


“महाबळेश्वरला, एक आठवडयासाठी.”


“इतके दिवस? असे अचानक? आणि तुमच्या कामाचं काय?” 


“सुट्टी घेतली आहे... सुनिधी आजपासून येणारा प्रत्येक रविवार मी तुझ्यासोबत घालवणार आहे. आपण उशिरा उठू, एखादा चित्रपट, नाटक पाहू. मस्त कॅंडल लाईट डिनर करू......” 


थोडं थांबून तो म्हणाला, “अजून एक गोष्ट विचरायची आहे, माझ्या ध्यानात एक गोष्ट आली आहे, ऑफीसमध्ये अकाउंटमध्ये काही गडबड होतेय. तू जरा लक्ष देशील का? मीन्स तुला जमत असेल तर रोज थोडा वेळ ऑफीसला येशील का?”  


सुहासचे बोलणे ऐकून सुनिधीला आनंद झाला. 


“हो नक्की येईन मी. नोकरी सोडून किती वर्षे झाली. पुन्हा तो अनुभव घेणे... किती छान वाटेल.”


“निधी...  जीवनप्रवास एकत्र करण्याचे वचन दिले होते आपण एकमेकांना. तू सगळं काही सोडून माझ्या सोबत आलीस. माझे स्वप्न साकारायला मदत केलीस. पण तुला सोडून मी मात्र एकटाच पुढे निघून गेलो. माझ्याकडून ही मोठी चूक झाली. भूतकाळात झालेल्या गोष्टी बदलणे शक्य नाही पण यापुढे ती चूक होणार नाही याची मी तुला खात्री देतो.” सुहास भावुक झाला होता. सुनिधी स्तब्ध होवून ऐकत होती. तो तिला तिच्या खास नावाने बोलवत होता. तिच्या डोळ्यातून आसवं वाहत होती. सुहासने गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. क्षणभर थांबून सुहास बोलू लागला. 



वाटतं पुन्हा एकदा, नव्यानं तुझ्या प्रेमात पडावं


तुझ्या डोळ्याच्या गहिऱ्या डोहात स्वतःला हरवावं


सांजसावल्या समीप असता सखे मिठीत तुझ्या विसावावं


वाटतं पुन्हा एकदा नव्याने तुला ओळखावं.... 



ऐकता ऐकता सुनिधीने डोळे मिटले. तिचा हात सुहासच्या हाती होता, पुन्हा एकदा. आता सर्व काही व्यवस्थित होईल याची तिला खात्री पटली होती.



समाप्त


©️Savita Kirnale 


वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

2 Comments

Post a Comment
Previous Post Next Post