सहवेदना

 सहवेदना 

✍️ सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

रविवारचा दिवस... सकाळचे फक्त आठच वाजले होते पण निशाचे हात पटापट चालत होते. सहालाच उठून तिने घराची पुन्हा एकदा साफ सफाई केली होती. रात्री आणून ठेवलेल्या गुलाब, निशिगंधाच्या फुलांची फ्लॉवरपॉटमध्ये अरेंजमेंट केली होती. शॉवर घेऊन ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळून ती आरशासमोर साडी नेसत उभी राहिली. निळ्या शिफॉन साडीच्या निऱ्या बनवताना सहज आरशावर नजर गेली. स्वतःचे सुस्नात टवटवीत रूप पाहून थोडीशी लाजली. आज तो येणार होता म्हणून तिची लगबग चालू होती. तो म्हणजे सुजित, तिचा सुजित...


साडी नेसून झाल्यावर अंगावर त्याच्या आवडत्या परफ्यूमचा फवारा उडवला. कपाळावर छोटीशी टिकली लावून निशा कीचनकडे वळली. तो येताना गोड काहीतरी घेऊन येणार होता. तिने बनवलेल्या चपात्या, मटकीची उसळ, भात आणि वरण दुसऱ्या भांड्यात काढून खरकटी भांडी पटकन विसळून डिशवॉशरला लावून टाकली. 


निशाने देवपूजा केली. देवावर सुगंधी फुलं वाहिली. दिवा लावताना वात थोडीशी थरथरली आणि ती चमकली. असं कधी होत नाही, आजच का? मनात आलेल्या शंकेला झटकून देवाला हात जोडून ती हॉलमध्ये आली. नेहमीच नीटनेटकं प्रसन्न असणारं तिचं घरकुल आज तिला अजूनच छान वाटत होतं.  पेपर वाचत ती सुजितची वाट पाहू लागली. पेपर नावापुरता डोळ्यासमोर होता पण मनात मात्र अनेक प्रसंग, आठवणी फेर धरून नाचत होत्या.


घटस्फोटानंतर नवी सुरुवात करायची, जुन्या क्लेशदायक आठवणी नको म्हणून तिने या नव्या शहरातील नोकरी स्वीकारली होती. आर्थिकृष्ट्या ती स्वतंत्र तर आधीपासूनच होती, किंबहुना तेच तर मूळ कारण होतं तिच्या घटस्फोटाचे. नवऱ्याला त्याच्याबरोबरीने कमावणारी बायको तर हवी होतीच पण तिचा पुर्ण पगारही त्याच्याच हातात हवा होता. आधी त्याने प्रेमाने सांगून बघितले, भावनिक हवाला देऊन पाहिला पण माझा सगळा पगार तुझ्या खात्यात किंवा हातात मिळणार नाही यावर निशा ठाम होती.

"अगं आता मी आणि तू काय वेगळे आहोत का? काय माझं तुझं करतेस."

"तेच तर म्हणायचं आहे मलाही. आपण दोघे एकच तर आहोत. माझ्या अकाऊंटमध्ये राहिले काय आणि तुझ्या अकाऊंटमध्ये राहिले काय दोन्ही एकच ना? आणि मोहित घरखर्च तर मीसुद्धा करते ना? तुला कुठे मी घरखर्चासाठी पैसे मागते?" मोहित चिडून उठून गेला. 


पुढे पुढे त्याचे हे खूळ वाढतच गेले. एक दिवस झालेल्या भांडणात त्याने निशाचे केस धरले, "काय नाटक लावलंय, मी परमिशन दिली म्हणून तू बाहेर इतक्या उड्या मारू शकतेस. तुझे तर पंख छाटलेच पाहिजेत." 


निशा हादरली. मोहित इतका टोकाला जाईल असा तिने विचार केला नव्हता. त्या दिवसापासून तिचा मानसिक, शारिरीक छळ सुरु झाला. उच्चशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबातून आलेल्या मुलाच्या डोक्यात इतके घाणेरडे विचार असतील अशी तिची कल्पना नव्हती. नवरेपणाचा पुरेपूर फायदा तो उठवू लागला. सकाळी उठून तिने कामावर जाऊ नये म्हणून शक्य तितका प्रयत्न करु लागला. एक दिवस अशाच एका भांडणात निशाने तडकाफडकी घर सोडले. काही दिवस माहेरी राहून मोहितला घटस्फोटाची नोटीस पाठवून दिली. सुरुवातीला आकांडतांडव करून मोहितने शेवटी मान्यता दिली. निशा आपले सामान आणि आयुष्य गोळा करून नव्या शहरात सेटल झाली.  मोहितने दुसरे लग्न केल्याचे तिच्या कानावर आले. पण तिने तसा काही विचार केला नव्हता.


एक दिवस कुठल्याशा कामासाठी दुसऱ्या ब्रांचचा सुजित निशाच्या ब्रांचमध्ये आला. त्याचे उमदे व्यक्तीमत्व, सर्वांशी आदराने बोलणे, मधूनच मिश्किल टिप्पणी करणे यामुळे ऑफिसमधील वातावरण प्रफुल्लित राहू लागले. त्याच्याकडे पाहताना निशाला वाटायचे,  किती जॉली आहे हा माणूस. किती नशीबवान असावी याची बायको... दुसरीकडे सुजितही निशाच्या प्रसन्न, सुंदर व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होत होता. अगदी काही दिवसातच दोघे मैत्रीच्या नात्यात बांधले गेले. अनेक विषयांवर गप्पा होत. रसिक मनाचा सुजित अनेक कलांचा भोक्ता होता. कुठल्याही विषयावर तो आत्मविश्वासाने बोलायचा.


  नंतर सुजित स्वतःच्या ब्रांचमध्ये गेला तरी त्यांची मैत्री तशीच राहिली. उलट आता कधीतरी ठरवून कॉफी, लंचसाठी दोघे भेटू लागले. दोघांच्या Wavelengths जुळू लागल्या. मनाला एक ओढ लागू लागली आणि एक दिवस दोघांनीही ते कबूल केलं. 

"सुजित, मी घटस्फोटीत आहे. पण तू तुझ्या बायकोला फसवत आहेस असं तुला वाटत नाही?" तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडलेला सुजित हलकेच हसला. 

"तू स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि मग ठरव." उठून बसत त्याने उत्तर दिले.


दोनच आठवड्यात आपल्या नवीन फ्लॅटच्या पूजेसाठी सुजितने सगळ्या सहकाऱ्यांना आमंत्रण दिले. इतरांबरोबर निशाही त्याच्या घरी पोहोचली. सुजितने एका स्त्रीची बायको म्हणून ओळख करून दिली. तिच्याशी थोडंसं बोलून सगळे चकित झाले. अतिशय सामान्य व्यक्तिमत्वाची आणि वकुबाची स्त्री होती ती. सुजितसारख्या माणसाने कसं काय तिच्याबरोबर लग्न केलं हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. 


या प्रसंगानंतर निशाच्या मनात जी अपराधीपणाची भावना होती ती हळूहळू कमी होत गेली. तिला हवे असणारे प्रेम सुजित भरभरून देत होता. माणसाला फक्त शारीरिक गरजा नसतात, मानसिक गरजाही असतात. त्या पुऱ्या करण्यासाठी योग्य व्यक्ती मिळणे अवघड असते. सुजित आणि निशा एकमेकांसाठी अनुरूप होते. खरे soulmates असेच असावेत कदाचित...


पाच वर्षात निशा, सुजितचे नाते छान बहरले.  असे असले तरी एक अंतर मात्र दोघांनी राखले होते. घरी असताना एकमेकांना फोन न करणे, सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो न करणे, शक्यतो ठरलेल्या वेळीच भेटणे, बोलणे या गोष्टी दोघे कटाक्षाने पाळत. सुजित खूप कमी वेळा निशाच्या घरी यायचा. त्यामुळेच आजच्या या भेटीची उत्सुकता वाढली होती. 


विचाराच्या तंद्रितून बाहेर येऊन निशाने घड्याळाकडे नजर टाकली. पावणे अकरा वाजलेले पाहून ती दचकलीच. 

'अजून कसा नाही आला हा, साडेनऊपर्यंत येणार होता... कॉल, मेसेज केला असेल का?' 

निशा पटकन उठली आणि तिने बेडरूममध्ये ठेवलेला मोबाइल हाती घेतला. पाहते तर ऑफिसमधील सहकाऱ्यांचे सहा सात मिस्ड कॉल्स. सकाळी कामाच्या वेळी डिस्टर्ब होऊ नये म्हणून तिने नेट बंद करून फोन सायलेंट मोडवर टाकला होता. तिने घाईघाईने नेट चालू केला. धडाधड मेसेजेस यायला सुरुवात झाली. मेसेज वाचून तिच्या पायातील बळ नाहीसे झाले. मटकन ती बेडवर बसली. तिच्या सुजितचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. 


किती वेळ ती सुन्नपणे बसून होती कुणास ठाऊक. कधीतरी उठून यांत्रिकपणे साडी बदलली. भूक तर नव्हतीच. बसल्या बसल्या तिला डोळा लागून गेला. कुठेतरी वाजणाऱ्या मोबाइलच्या रिंगटोनमुळे जाग आल्यासारखी वाटली. रिंगटोनची धून ओळखीची वाटत होती. अरे आपलाच मोबाइल वाजतोय वाटतं. हात लांबवून तिने मोबाइल उचलून कानाशी लावला.  

"निशा अग येतेय ना ऑफीसला? मी खाली उभी आहे." पलीकडून मैत्रीण विचारत होती. 

"तू जा मी येईन नंतर," म्हणत तिने फोन ठेवून दिला. 


'ऑफिस... म्हणजे आज सोमवार... इतक्या लवकर दिवस संपला? काल जे घडले ते सत्य होते की स्वप्न.... खरचं सुजित गेला की... ' निशा विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत होती. भूक लागलेशी वाटल्यावर ती उठली. उठताक्षणी डोळ्यासमोर अंधारी आली.  काल सबंध दिवस उपाशी असल्याचा परिणाम... या विचारागणीक काल जे घडले ते सत्य असल्याची जाणीव अंगावर चाल करून आली आणि जमिनीवर बसून निशा धाय मोकलून रडू लागली. रडून रडून रितं झाल्यावर तिने ऑफिसमध्ये कॉल करून आठ दिवस येत नसल्याची सूचना दिली.


  हे आठ दिवस ती फक्त आठवणीत जगत होती. आयुष्यात शेवटी एकदाचे सुख आले असं वाटत असतानाच हा घाव पडला होता. जास्त काही नको होते तिला... त्याचा ना पैसा हवा होता ना शारीरिक साथ संगत... हवं होतं घुसमट व्यक्त करायला, वेन्ट आऊट व्हायला एक जागा. दोघांचे नाते अतिशय वेगळे होते. इंग्लिशमध्ये म्हणतात ना, complementry, एकमेकांना पूर्णत्व देणारे...


सात आठ दिवसांनी जेव्हा ती भानावर आली तेव्हा मनात पहिला विचार आला तो सुजितच्या बायकोचा. 'माझी आणि त्याची ओळख फक्त गेल्या पाच वर्षांची तरीही मी इतकं मोडून पडलेय. ती तर त्याची जीवनसंगिनी तिचं काय झालं असेल. मी माझ्या दुःखात इतकी बुडाले होते की त्याच्या अंतिम दर्शनालाही गेले नाही. इतकी कशी मी स्वार्थी झाले... '

निशा उलटसुलट विचार करत होती. दुसऱ्या दिवशी सुजितच्या बायकोला भेटायला जायचं तिने नक्की केलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता निशा सुजितच्या घरी गेली. सुजितची बायको दोन तीन बायकांसोबत बसली होती. चेहऱ्यावरची कळा तिचे दुःख व्यक्त करत होती. भावनेच्या भरात निशा गेली तर होती पण का कुणास ठाऊक तिथे गेल्यावर मात्र तिला अपराधी वाटू लागले. असेच मागे फिरावे ही भावना उसळून येऊ लागली. तशी ती परत फिरणार तेवढ्यात सुजितची बायको रेखाने तिला पाहिले. 

"निशाताई थांबा," रेखाने हाक मारली. तिच्या तोंडून आपले नाव ऐकून निशा स्तब्ध झाली. 


 रेखा तिला घेऊन बाजूच्या खोलीत गेली आणि रडायला लागली. कितीतरी वेळ ती रडत होती. निशा मात्र सुन्न होऊन नुसतीच बसली होती. डोळ्यातील अश्रू जणू सुकून गेले असावेत.

थोड्यावेळाने शांत होऊन रेखा बोलू लागली.

"मी खूप वाट पाहिली तुमची. यांना शेवटचा निरोप द्यायला याल असं वाटलं होतं... नाही अशा कानकोंड्या झाल्यागत नका बघू माझ्याकडे. मला तुमच्याबद्दल, तुमच्या आणि यांच्याबद्दल सगळं काही ठाऊक होतं. म्हणजे त्यांनीच सांगितलं होतं मला ते."

"मग तुला माझा राग नाही का आला?"

"राग? नाही तर. आमच्या दोघांमध्ये किती टोकाचा फरक आहे हे जगजाहीर आहे.माझं आणि यांचं लग्न खूप विपरीत परिस्थितीत झालं. मांडवातून नवरदेव पळून गेल्याने माझ्या वडिलांची तर वाचाच गेली. पण ऐनवेळी यांनी सगळं सांभाळून घेतलं. पण या नात्यात होणारी त्यांची घुसमट सारखीच जाणवायची. मी प्रयत्न केला त्यांना अनुरूप होण्याचा पण नाही शक्य झालं. कारण त्यांच्यात ती रसिकता, हुषारी, बुद्धिमत्ता उपजतच होती. एक सांस्कृतिक दरीच होती म्हणा ना दोघात. पण आपल्या वागण्यातून ते तसं मुळीच जाणवू देत नसत. पतीची सगळी कर्तव्य अगदी व्यवस्थित पार पाडायचे. पण मी ठरवलं, कुणी त्यांच्यासारखी मिळाली तर आपण बाजूला व्हायचं. तुम्ही त्यांच्या आयुष्यात आलात. त्यांचा प्रफुल्लित चेहराच सगळं सांगून गेला. क्षणभर मला मत्सर वाटला पण जेव्हा पहिल्यांदा तुम्ही घरी आलात तेव्हा तुम्हाला पाहून खात्री पटली की तुम्हीच त्यांच्या खऱ्या अर्थाने सखी होऊ शकता.


 निशाताई, अहो लहानपणापासूनच कुणाच्या तरी आधाराने जगायची सवय पडली आहे मला... आधी बाबा नंतर हे आणि आता... समजत नाही आहे काय करू, कसं करू...  एक माणूस जाताना इतकं सारं घेऊन जातो आपल्यातून! अगदी रिकामं वाटतंय आतून... कोण समजून घेईल हे रितंपण..." 


आभाळ भरल्या डोळ्यांनी रेखा कितीवेळ असंच काही तरी बोलत होती. निशाच्या कानात काही शब्द शिरत होते तर काही नाही. तिच्या भावना मात्र अगदी स्वतःच्याच असाव्यात असं वाटत होत्या. दोन वेगवेगळ्या बायका पण कोणता बंध त्यांना एकत्र जोडू पाहत होता? 

काहीही न बोलता निशाने उठून येऊन रेखाला मिठी मारली. आतून कढ दाटून यायला लागले. गेले काही दिवस ती एकटीच रडत होती आज मात्र तिला रेखाच्या गळ्यात पडून रडावेसे वाटू लागले. तसंही दोघींच्या दुःखाची जातकुळी एकच तर होती. एका सहवेदनेने दोघींना जगावेगळ्या नात्यात बांधले होते. नकळत दोघीही हमसून हमसून रडू लागल्या, एकमेकींच्या मिठीत हरवलेला आधार शोधू लागल्या.


✍️ सविता किरनाळे


वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post