चूक तशी कोणाचीच नाही

 चूक तशी कोणाचीच नाही

✍️ वर्षा लोखंडे थोरात

' निघते मी' असं म्हणून मीता उभी राहिली. तेवढ्यात निलिमा  कुंकवाचा करंडा घेवून आली आणि अत्यंत सात्विक चेहऱ्याने तिने नवी नवरी म्हणून मीताच्या कपाळी हळदी कुंकू लावलं.क्षणभर मीता ओशाळली.' जा तू निश्चिंत . मी सांगते त्याला. नाही त्रास देणार तो तुला. सुखाने संसार सुरू कर.नंदिनी ताई म्हणजे निलिमाच्या सासूबाई म्हणाल्या.पटकन त्यांना नमस्कार करून कृतज्ञतेने मीता घराबाहेर पडली.

रस्त्यावरून चालताना  तिला सगळ्या आठवणी तिच्या पुढे पिंगा घालत आहेत असं वाटू लागलं. पश्चाताप, असहायता आणि स्वतः ची चीड या मुळे तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहत होते. अल्पशिक्षित, अतिशय साधारण घर आणि जगाच्या दृष्टीने   खालच्या कुळात जन्म घेतलेल्या निलीमाचे आजचे रूप आणि तिचे वागणे बघून मीता अचंबित झाली होती.कुठून आली असेल तिच्यात एवढी शक्ती? आपल्या नवऱ्याच्या प्रेयसी ला समोर बघून सुध्दा एवढा संयम? आणि मी एवढी शिक्षित,  घराणं, कुळ सगळ्या बाबतीत तथाकथित उच्च मग मी कशी काय एवढी वहावत गेले.माझा कसा संयम सुटला?  हेच का माझे संस्कार? प्रत्येक पावलागणिक मीताचे विचार वादळ बनून तिच्याच डोक्यात घुमत होते.

दहावीत असताना जादा तासा मुळे झालेली निनाद ची ओळख.अतिशय देखणा निनाद आणि तेवढीच आकर्षक मीता.एकुलती एक पण शिस्तीत वाढलेली.पुढे जावून डॉक्टर होण्याची स्वप्नं बघणारी.निनाद म्हणजे अगदी मनमौजी. अतिशय मोकळ्या वातावरणात वाढलेला करिअर वगेरे याचा दुरचाही संबंध नसणारा. शाळेचा हिरो . त्याची स्टाईल म्हणजे अगदी जानलेवी. त्यामुळे सगळयाच  मुलींच्या गळ्यातील ताईत.त्याने एकदा आपल्याकडे बघावं बोलावं म्हणून धडपडणाऱ्या मुली.पण हा काही कोणाला भाव देत नव्हता.अचानक एकदा मीता आणि निनाद समोरासमोर आले तिला बघून  एका क्षणात  निनाद घायाळ.त्याच्याकडे कधीच ढुंकूनही न बघणारी मीता त्याला आवडून गेली. पहिल्या नजरेतच.एकटक बघणारा निनाद आणि मीता.

त्याची धांदल बघून मीताला फुटलेले हसू.आताही तो प्रसंग आठवताना मीताच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. हळुहळू ओळख वाढत गेली .हो नाही करत मीता पण नकळत त्याच्याकडे ओढली गेली. निसर्ग आपले काम चोख बजावतो . त्यामुळेच संस्करांवर भावनेने मात केलीच. त्या कोवळ्या वयातील आकर्षणाला लगाम घालणं अगदीच अशक्य असतं.आपण काय वागतोय,काय करतोय ,याचे दुष्परिणाम काय होतील या सगळया विचारांच्या पलीकडे प्रेमी जीव गेलेले असतात.एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडालेले दोघे...ना त्यांना जगाची भीती ना भविष्याची चिंता. त्या क्षणी जे काही चालू आहे ते नितांत सुंदर आहे आणि हवाहवासा असा सहवास आहे. पाहिलं प्रेम म्हणू किंवा फक्त आकर्षण पण खूप खास.एकमेकांसाठी आतुर,डोळ्यात स्वप्नं आणि बेफिकर.. शेवटी  भावना कितीही कोमल असल्या तरी जगाच्या नजरेतून सुटतात थोड्या? मिताच्या घरी या सगळ्याची कुणकुण लागली. जात पात उच्च नीच यापेक्षा मीताच्या कुटुंबाला तिच्या करीयरची जास्त  चिंता होती. तिच्या बाळबोध घरात हे सगळं म्हणजे एक प्रकारचा भूकंप आला आणि पुढचे सगळं चित्रच बदलले.निनादच्या घरी जावून सगळा प्रकार त्यांच्या कानावर घालून मिताच्या कुटुंबाने ते गाव सोडले आणि मुंबई येथे बस्तान बसविले.गाव सोडून गेल्यावर मीता सगळं विसरेल अशी त्यांची अपेक्षा होती.पण मीता निनादच्या मनात जी प्रेमाची आग लागली होती ती विझवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी छोटीशी ठिणगी त्यांच्या मनात तशीच राहिली.

मीता गेल्यानंतर निनाद अगदीच वेडापिसा झाला होता. त्याने हर तऱ्हेने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.त्याची धडपड तिच्या पर्यंत पोहोचत होती पण तिला कळून चुकलं होतं की आता परत ती यात अडकली तर येणाऱ्या वादळात निश्चितच तिचं कुटुंब उध्वस्त होईल. तिने तिचे लक्ष पुर्णपणे अभ्यासात केंद्रित केलं .अपेक्षेप्रमाणे तिचा मेडिकल ला नंबर लागला.म्हणतात ना काळ हा सगळया गोष्टींवर औषध आहे त्यानुसार मीता आता पूर्णपणे सावरली होती.पण निनाद चे काय?

विचारांच्या गर्तेत मीता घरी पोहोचली. सगळ्या घटना जशाच्या तशा तिला लख्ख दिसू लागल्या.

बघता बघता पाच वर्ष झाली. निनाद आता पदवीधर झाला होता .त्याने एक छोटासा व्यवसाय पण चालू केला होता. मात्र एवढी वर्ष होऊन सुध्दा त्याच्या मनातील मीताचे पान मिटलं नव्हतं. त्याला अजूनही आशा होती की मीता पण आपल्यावर तेवढंच  प्रेम करत असणार. मोठ्या अपेक्षेने निनाद परत एकदा मीताला भेटायला गेला... अनपेक्षित पणे

  तिने त्याला भेटायला नकार देत निरोप पाठवला की माझ्या मनातून तू पूर्णपणे उतरला आहेस मला परत भेटायचा प्रयत्न करू नकोस.

हे ऐकून तो कोसळला, चिडला , त्रागा केला. विषण्ण अवस्थेत त्याने कित्येक महिने घालवले.कुठेतरी त्याचा अहंकार दुखावला गेला.अल्लड वयातील प्रेम आणि निर्णय. नकार पचवणं अवघड. इतक्या वर्षांची आशा होती ती धुळीला मिळाली.आणि एक क्षण   अहंकाराची भावना निर्माण झाली.मला नकार देतेस काय ? ठीक आहे मला पण तुझी गरज नाही. सहा महिन्यात लग्न करतो की नाही बघ. बदल्याची नशाच ती...आणि या बदल्या मधे भरडली गेली निलिमा!!!

अतीशय गरीब कुटुंबात वाढलेली पण त्यातही वेगळी. जगाचा विचार न करता मनमुराद आयुष्य जगणारी आणि कमालीचं सौंदर्य घेवून आलेली. केवळ मीता ने अवहेलना केली म्हणून निनाद ने निलिमा बरोबर मैत्री वाढवली .हे करताना मात्र त्याने मीता आणि त्याच्या बद्दल तिला सांगायला विसरला नाही.

आपसुकच निलिमाचा  त्याच्यावरील विश्वास दृढ झाला.

निनाद सारखा मुलगा आपल्याला भाव देतोय म्हंटल्यावर नीलिमा अगदी खुश .त्याच्याकडून सगळा भूतकाळ जाणून पण ती आनंदाने त्याच्या बरोबर लग्नाला तयार झाली.तिलाही त्या दलदलीत राहण्याचा कंटाळा आला होता.मीताच्या घरी निनाद निलीमाच्या लग्नाची पत्रिका आली आणि तिच्या घरच्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.पण मीता चे काय?

अजुन पाच वर्ष गेली.मीता डॉक्टर झाली.आता आपल्या गावी दवाखाना सुरू करून रुग्ण सेवा करावी असं तिला वाटू लागले.घरून पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला कारण त्यांच्या दृष्टीने निनाद प्रकरण आता पूर्णपणे संपलं होतं. आणि ती कुटुंबासह परत एकदा आपल्या गावी आली. तिला काय माहिती होते की आता पुढे जावून आयुष्याला काय वळण मिळणार आहे?

बघता बघता गावी येवून सहा महिने झाले.दवाखाना सुरू झाला. माणसाचं  मन खूप गूढ असते. दहा वर्षापूर्वी फुललेला प्रेमाचा अंकुर परत धुमारे धरू लागला.म्हणतात ना की

 कुठलंही नातं आयुष्यातून पूर्णपणे पुसून टाकून पाटी परत कोरी करता येत नाही. पुन्हा त्याच ठिकाणी आल्यामुळे मीता आता परत गतकाळात रमु लागली. जुन्या आठवणी तिला व्याकूळ करू लागल्या. शाळा,रस्ते,जुने मित्र मैत्रिणी बघून नकळत तिला त्याची प्रकर्षाने आठवण येवू लागली. डोळे त्याला शोधू लागले.आग विझली तरी ठिणगी होतीच.नकळत तिला  मीता हवा देत होती पण ती या गोष्टींपासून अनिभिज्ञ होती  की याचा परिणाम खूप काही उध्वस्त करू शकतं. की सगळं समजून उमजून पण ती कानाडोळा करत होती?

इकडे निनाद पण मीता परत आल्यापासून बेचैन होताच. तिला बघण्याची ओढ तो टाळू शकत नसतो. मीताच्या समोर न येत लांबूनच तो तिला डोळे भरून बघत असे. सहाजिकच त्याचे घरातील वागणे बोलणे बदलत होते. कुठेतरी शून्यात हरवलेला निनाद . घरात असूनही नसल्यासारखा.त्याची बेचैनी एक बायको म्हणून नीलिमा चांगलीच ओळखू शकत होती.कुठे तरी तिला धास्ती वाटत होती पण अतीशय संयम पाळत तिने स्वतःवर ताबा ठेवत होती. कुठली ताकद होती तिच्यात देव जाणे?

न राहवून निनाद त्याच्या पाहिल्या प्रेमाला भेटायला गेलाच आणि एकदाच भेटायचं फक्त असं म्हणता म्हणता त्या भेटी कधी वाढत गेल्या दोघानाही समजले नाही.मधली दहा वर्षे जणू गेलीच नाही . पाप पुण्य चूक बरोबर या पलीकडे विचार गेले. शिक्षण, पेशा,वय या सगळ्यानी पुढे जाऊन सुध्दा मीता तिच्या मनाला सावरू शकली नाही आणि संसार मांडून सुध्दा निनाद स्वतः ला मीतापासून दूर ठेवू शकला नाही. निलिमाला हे सगळं माहीत होतं कारण निनाद तिच्यापासून लपवत नव्हताच.शांत राहून सगळं चुपचाप बघण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता आणि  तसंही पाच वर्षाच्या संसारात कित्येकदा मीता कुठल्या न कुठल्या रूपाने  त्यांच्यात डोकावत होतीच.

बघता बघता सहा महिने निघून गेले. मीता निनाद परत प्रेमात बुडालेले. ज्या नात्याला काही भविष्य नाही असं नातं उराशी कवटाळून बसले होते दोघे.

  आता निनाद  च्या मनावर परत मीताने तिच्या ओढीने कब्जा मिळवला.त्यांचं मन बंड करु लागले.एक दिवस अचानक निनाद म्हणाला , मीता आपण परत कायम स्वरुपी एकत्र येवू यात का? लग्न करणार माझ्या बरोबर? त्या क्षणी मीताचे डोळे खाडकन उघडले. तिच्या डोळ्यासमोर त्याची गोड अशी मुलगी आली आणि क्षणात तिला तिचीच लाज वाटली. हा बायको मुलांचा नाही झाला माझा कसा होईल? काय करत होते मी?

 तिच्या डोळ्यावर असलेली प्रेमाची धुंदी उतरली.,नैतिक अनैकतिक यातील रेषा ठळक दिसू लागली . कोणाची दूसरी पत्नी होणं कसं काय स्वीकारू शकणार? विचाराने पण तिच्या अंगावर काटा आला.आपण कुठल्या मार्गावर चाललो होतो याचा विचार करून तिच्या अंगातील त्राण गेले. साहजिकच तिने परत निनाद कडे पाठ फिरवली.

पण या वेळेस  मात्र भानावर येत कायमस्वरूपी.

याही वेळी निनाद परत सैरभैर झाला.कदाचित आधी पेक्षा जास्तच कारण त्याला कळून चुकलं होतं की मीता सध्या काय विचार करत असणार त्यामुळे त्याला पक्की जाणीव झाली की कुठलीच स्त्री या गोष्टीला तयार होणार नाही .पण तरीही या वेळेस तो इरेला पेटला होता. सहजासहजी त्याला तिला गमवायची तयारी नव्हती.

दरम्यान मीताचे पण सुस्थळी लग्न जमले .मुलगा अमेरिकेत डॉक्टर त्यामुळे अगदी पटकन लग्नाचा मुहूर्त काढला.

 निनाद तिला भेटायचा हर तऱ्हेने प्रयत्न करत होता.पण त्याला तिच्या पर्यंत पोहोचता येत नव्हतं.आणि तीच प्रतिसाद देत नाही आणि स्वतः विवाहित असल्यामुळे लग्नात काही अडचणही आणू शकत नव्हता. मीताचे लग्न व्यवस्थित पार पडले.तिने मनोमन ठरवलं की मनापासून नवीन आयुष्यात पदार्पण करायचं.पण निनाद ला मान्य होतं का हे?

त्याने  तिला भंडावून सोडायला सुरुवात केली.सतत फोन करणे,  पाठलाग करणे.धमकी देणे.रडणे, गयावया करणे.आज तर  कहरच केला आणि माहेरी तिच्या घरा पर्यंत  येवून पोहोचला .मीता आवराआवर करायला दवाखान्यात गेली होती.घरी आल्यावर तिला निनाद येवून गेल्याचं कळलं आणि तिने तडक त्यांचं घर गाठलं. मोठ्या प्रेमाने निलिमा ने तिचे स्वागत केले.जणू तिची मैत्रीण. पण नंदिनी ताईंनी मात्र तिला खडे बोल सुनावले.

तू का आलीस इथे विचारलं? अगदी काकुळतीला येवून तिने त्यांना सगळं सांगितलं.त्या वेळी त्या म्हणाल्या आधीच तुला कळलं असतं  हे सगळं मला येवून सांगितलं असतं तर मुलगी समजून तुला नक्कीच मार्ग दाखवला असता. त्यांचं सोड तू तर एवढी शिकलीस मग कशी काय अशी दुर्बुद्धी झाली तुला?

मीता त्या क्षणी काह बोलू शकली नाही.पण एका गोष्टीची तिला नक्कीच जाणीव झाली की सप्तपदी ने जोडलेले पाश न तोडता येण्यासारखे आहेत लग्नाच्या पंधरा दिवसातच तिला त्यातील मान सन्मान काय असतो त्याची जाणीव झाली आणि त्या बंधनाला काळजीपूर्वक जपणं किती गरजेचं आहे हे जाणवलं.म्हणूनच ती आज माफी मागायला आणि आधार घ्यायला त्याच्या घरी आली होती.नंदिनी ताईंनी तिला निर्धास्त रहा म्हणून  खात्री दिली आणि तोंडभरून आशीर्वाद दिला. लग्नाचं बंधन सहजासहजी तुटणार नाही याची खात्री असल्यामुळे  कदाचित निलिमा अगदी सहजपणे नवी नवरी म्हणून मीता च्या कपाळी  हळदी कुंकू लावू शकली.

रात्रीचे अकरा वाजले होते. मागील दहा वर्षातील सगळ्या गोष्टी आठवून मीता परत सावरली होती. नंदिनी ताईंनी दिलेला आशीर्वाद, निलिमाने दिलेला एक स्त्री म्हणून दिलेला सन्मान आणि पश्चात्ताप होवून शांत झालेलं मीताचे मन. या सगळ्या मुळे  सावरलेली  मीता पुढील वाटचालीसाठी सज्ज झाली.आपण कितीही आटापिटा केला तरी नियतीच्या मनात जे असतं तेच होतं.

पुढील महिनाभरात मीता अमेरिकेला गेली. नंदिनी ताईंनी शब्द दिल्याप्रमाणे निनाद ने परत कधीही मीताकडे मागे वळून बघितले नाही. निलिमाने सगळं समजून उमजून अत्यंत कुशलतेने परिस्थिती सांभाळत निनादला परत नवीन संधी दिली👍🏻 एक अनैतिक नातं  प्रस्थापित होण्याच्या आधीच संपले ते केवळ सदसद्विवेकबुद्धी मुळे 🙏🙏

✍️ वर्षा लोखंडे थोरात
वरील कथा वर्षा लोखंडे थोरात यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post