ती आणि तो

  ती आणि तो

✍️ सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

रोजच्याप्रमाणे आजही ती उदासपणे सोसायटीच्या आवारात असलेल्या गणपती मंदिराच्या कट्टयावर बसली होती. बघता बघता पन्नाशी जवळ आली आपली. इतक्या वर्षात काहीच मनासारखं नाही केलं आपण. स्वतःसाठी कसं जगतात ते माहीतच नाही मला. या अशा विचाराने अजूनच केविलवाणं वाटे तिला. तेवढ्यात तिला गेटमधून आत येत असलेला तो दिसला. स्कूटर सफाईदारपणे पार्किंगमध्ये लावत तो तिथे उभ्या असलेल्या आपल्या मित्रांसोबत बोलत उभा राहिला. पण त्या आधी तिच्याकडे एक नजर टाकायला तो विसरला नाही. ती लगबगीने उठली आणि घरी जायला निघाली.  

लिफ्टमधून जाताना तिथे लावलेल्या आरशात तिला आपले प्रतिबिंब दिसले. निम्म्यापेक्षा जास्त करडे पांढरे झालेले केस, डोळ्याखाली उमटलेली काळी वर्तुळं, निस्तेज चेहरा, भुवयांचे जंगल... किती वर्ष झाली बरे पार्लरला जावून, काही आठवलंच नाही पटकन तिला. आधी कंटाळा म्हणून आणि नंतर घरातच असतो आपण कोण बघतंय या विचाराने पार्लरला गेलीच नव्हती ती काही वर्षात.

घरी येवून पटकन हातपाय धुवून तिने देवापुढे दिवाबत्ती केली. तासाभरात नवरा आणि काॅलेजवयीन मुलगा येतील घरी म्हणून रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. हाताला मस्त चव आणि कामाचा उरक होता तिच्या. तासाभरात झालासुद्धा स्वयंपाक. नवरा आला होता. त्याला  चहा बनवून दिला. चहा पित तो टीवीवरच्या बातम्या पाहू लागला. मुलगाही येवून फ्रेश होवून आपल्या रूममध्ये काही करत होता. आता काय करावे बरे आता, ती विचारात पडली. घरातील दोघेपण आपल्या विश्वात रमले होते. तिच्यासोबत पाच मिनीट का होईना गप्पा माराव्या हे त्यांच्या गावीही नव्हतं. मनाला आलेली मरगळ झटकण्यासाठी तिने नेहमीचा उपाय काढला. कपाटाच्या खालच्या खणात ठेवलेला फोटोअल्बम बाहेर काढला आणि नेमका लग्नाचा बाहेर आला. असे चार पाच मोठे अल्बम होते, लग्नाचा, मुलाच्या वेळच्या डोहाळजेवण आणि बारशाचा, दिवसागणिक वाढणाऱ्या मुलाच्या फोटोचे तर दोन होते. ती शांतपणे पाहायला लागली. खरंतर ती हे अल्बम दर दिवसाआड पाहायची, वेळ घालवण्यासाठी...

आज आपल्या लग्नाचे फोटो पाहताना आपण किती गोड दिसायचो या विचाराने हरखून गेली. उद्या जर आपण जगात नसलो तर हे लोक असेच अल्बम घेवून आपल्याला पाहून आठवतील का हा विचार मनात तरळला आणि दचकून ती भानावर आली. पटकन तो अल्बम ठेवून देवून नवऱ्याला आणि मुलाला जेवायला वाढू का असं विचारलं. त्यांचा होकार येताच ताट वाढून टेबलावर ठेवली. ती दोघे मस्त गप्पा मारत जेवत होती आणि ही निमुटपणे जेवत होती. तिलाही आपल्या बोलण्यात सामील करावे असे दोघांनाही वाटले नाही. सगळी मागची आवराआवर करून जावून पाहते तर नवरा घोरत होता. एक उसासा सोडून तीही झोपी गेली मग.  

हे तिचे रोजचे रूटीन होते. कित्येक वर्षात यात काडीमात्र फरक नव्हता. पण आज काही विचित्र घडायचे होते. आजही मंदिराच्या कट्टयावर ती बसली असताना तो आला. नेहमीप्रमाणे मित्रांसोबत न बोलता आज तिच्याकडे आला. किती रुबाबदार दिसतोय हा, तिच्या मनात आले. तो येवून तिच्या बाजूला बसला आणि त्याने विचारलं, “रोजच बघतो मी, तू हल्ली खूपच उदास दिसतेस, काही प्राॅब्लेम आहे का? तब्बेत कशी आहे तुझी?”  

ती भान हरपून पाहतच राहिली. किती दिवसांनी तिची अशी कोणी विचारपूस केली होती.

 “मी ठीक आहे, तुला वाटते तसे काही नाही.” तिने उत्तर दिले. आता हे रोजचे होवू लागले. तो रोज आला की तिच्यासोबत पंधरा मिनीट का होईना गप्पा मारत बसे आणि मग तो मित्रांकडे आणि ती घराकडे जायला निघत असे. घरी गेली की तिला सवड नसे कोणाला बोलायची. एक दिवस त्याने सहज तिला विचारले, “किती दिवस झाले ग तुला ब्यूटीपार्लरला जावून?”

“दिवस काय, किती वर्ष झाले असं विचार.” ती हसून म्हणाली. त्याचा चेहरा बघून तिला अजून हसू आले. तो मात्र विचारात गढून गेला होता. 

दुसऱ्यादिवशी दुपारी दारावरची बेल वाजली. कोण आले असावे बरे असा विचार करतच तिने दार उघडले तर दारात एक बाई व्हॅनिटी केस घेवून उभी होती. तिने हिचे नाव घेवून सांगितले की मी चार्मीज ब्यूटीपार्लर मधून आले आहे, तुमच्या नावाने कंप्लिट ब्यूटी पॅकेज बुक केले आहे, निम्मे पैसे भरुन अपाॅईंटमेंट घेतली आहे उरलेले पैसे भरून सर्विस घेवू शकता. त्यानेच केलेला दिसतोय हा कारभार, तिच्या मनात विचार चमकून गेला. ‘अजून किती पैसे भरायचे आहेत?’ तिने चौकशी केली. आकडा ऐकून तिने होकार दिला, फारसे काही जास्त नव्हते तीन हजार रुपये.

  दोन तासांनी जेव्हा तिने स्वतःचे रुपडे आरशात न्याहाळले तेव्हा तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. अजूनही आपण इतके छान दिसतो! डाय केलेले केस, नीटंस कोरलेल्या भुवया, फेशियल, ब्लीचिंगने उजळलेला चेहरा, वॅक्सिंग, पेडीक्युअर, मॅनीक्युअरने पुर्ण कांति चमकत होती. खूश होवून तिने मनातल्या मनात त्याचे आभार मानले.  

आजच्या संध्याकाळची ती आतुरतेने वाट पाहत होती. नेहमीच्या वेळी तो गेटमधून आत आला. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ‘किती सुंदर दिसतेस आज तू,’ तिच्या बाजूला बसत तो म्हणाला. ती मोहरून गेली.

 “बरं मला सांग तू दुपारी काय करतेस, काही छंद वगैरे?”

“दुपारी खास असे काही नाही, छंद म्हणशील तर आधी स्वेटर विणायची मी. खूप आवडायचे सगळ्यांना.” जुन्या आठवणीत रमत ती म्हणाली. 

“मग आता परत कर ना सुरू.”

“आता विसरली बाबा ते सगळं, परत कसे जमेल?”

“काही नाही, जमेल सगळं, तू सुरूवात तर कर.” त्याने आग्रह केला.

 “बरं बघू,” म्हणत ती घरी जायला उठली. रात्रीचा स्वयंपाक करताना ती चक्क गुणगुणत होती.  नवऱ्याने जेव्हा तिचा मेकओवर पाहिला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ‘किती सुंदर दिसतेस तू मनू’ तिचे हात पकडत तो बोलला. दुसऱ्यादिवशी दुपारी तिला त्याचे बोलणे आठवले आणि तिने बेडच्या स्टोरेज यूनिटमध्ये ठेवलेले आपले विणकामाचे साहित्य बाहेर काढले. अजूनही त्यात सुया आणि बरेच लोकरीचे गुंडे होते. मुलासाठी विणलेला स्वेटर त्याला छोटा होवू लागला म्हणून तिने यातच ठेवून दिला होता. मोबाईलवर त्या स्वेटरचा फोटो काढून घेवून परत ते सामान तिने जिथल्या तिथे ठेवून दिले. मंदिराच्या पायरीवर बसल्याबसल्या तिने त्याला जेव्हा तो फोटो दाखवला तेव्हा त्याने ठणकावून तिला सांगितले की त्याला सेम तसा स्वेटर हवा आहे आणि याबाबतीत तो काहीच ऐकणार नाही.

  त्याचा तो हट्ट पुरवण्यासाठी ती कामाला लागली. रोज दुपारी थोडा थोडा करत तिने दहा बारा दिवसात स्वेटर पुर्ण केला आणि त्याच्या बावीसाव्या वाढदिवसाची भेट म्हणून त्याच्या हातात ठेवला. निळ्या आणि पिवळ्या रंगांचे काॅम्बीनेशन खूप सुंदर दिसत होते. त्याने स्वेटर घातलेला स्वतःचा फोटो what's app आणि facebook ला अपलोड केला तर खूप लोकांनी त्याचे कौतुक केले.

 एक दिवस तिला त्याने विचारले, असे स्वेटर तू अजून विणशील का, मला खूप लोकांनी तुला विचारायला सांगितले आहे. बघ तुझा वेळही जाईल आणि चार पैसेपण कमावता येतील. या प्रस्तावाने ती भांबावून गेली. आत्तापर्यंत तर अडगळीत पडलेल्या आपल्या छंदाचा असा उपयोग होईल असे तिच्या स्वप्नातही आले नव्हते. हो ना करत ती तयार झाली. जीव ओतून काम करत तिने पहिली आॅर्डर पुर्ण केली. त्याचे पैसे हातात पडताच कोण आनंद झाला तिला.

  आता तिला आधीसारखे खिन्न, उदास वाटत नव्हते. पन्नाशीत तिला जगणे सापडले होते. आणि याचे श्रेय फक्त त्यालाच होते. नैराश्याच्या खाईत पडण्यापासून त्याने तिला वेळेवर सावरले होते.  एक दिवस तिने त्याला विनंती केली की एक स्वेटर पोहोचवायचा आहे तू पोहोचवशील का, त्याने चक्क नकार दिला आणि सांगितले स्वतः जावून देवून ये. तिला रागच आला. दुसऱ्यादिवशी फणकाऱ्यानेच ती स्वतः रिक्शाने जावून तो पोहोचवून आली. संध्याकाळी मिश्कील हसत त्याने विचारले, “काय मॅडम, कसं वाटलं एकटीने प्रवास करुन?” तिच्या डोक्यात प्रकाश पडला.

 “चल तुला मी स्कूटर चालवायला शिकवतो. म्हणजे कधी गरज पडली तर तू वापरु शकशील?”

“आता! या वयात मी स्कूटर शिकू? नको रे लोक काय म्हणतील?”

पण तिचे काही एक न ऐकता तो तिला शिकवायला लागला. ते पाहून काहीजणांनी कुत्सित शेरे मारायला सुरु केले पण तिकडे दुर्लक्ष करुन तो तिला शिकवतच राहिला. आधी हातात साधी सायकल न धरलेल्या तिला महिनाभरात स्कूटर चालवायला यायला लागली. आता मात्र तिला भरून आले. कोण होतो आपण आणि आता काय झालो आहोत. तिचा जणु आता पुनर्जन्म झाला होता. आधीची मनू आणि आताची आत्मविश्वासू मनू यांचा जणु एकमेकांशी काही संबंधच नव्हता. याचे सर्व श्रेय फक्त त्यालाच जात होते. तिने हळूच त्याला मिठी मारली. 

“I love you, सोन्या, आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळेच.” ती त्याच्या कानात कुजबुजली.

  “खरं सांगायचं तर मी तुला पाहिल्या क्षणापासून तुझ्या प्रेमात आहे आणि जन्मभर राहीन. तू खूप अमेजिंग आहेस आणि नेमकं तेच विसरलीस, मी फक्त तुझ्या मनावर जमलेली धूळ झटकली. मला समजत होत घरी आपले जास्त बोलणं होत नाही. मी माझा अभ्यास आणि तू तुझ्या कामात गुंतलेली असतेस. पण इथे मंदिरात मात्र तू एकटीच निवांत बसलेली असतेस म्हणून मी ही वेळ निवडली गप्पा मारायला. त्यामुळेच मला समजलं, दाखवत नसलीस तरी तू किती एकटी पडली आहेस ते. मग ठरवलं की इथे बसूनच तुला तुझ्या कोषातून बाहेर काढायचे. आणि हो, मी ही फक्त तू जन्म दिलास म्हणूनच या जगात आहे. I love you too आई.”

©️Savita Kirnale

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post