माऊली

माऊली

✍️ सौ. नेहा उजाळे 

आषाढ सुरू झाला तरी पावसाचे चिन्ह दिसत नव्हते. सुर्यामामा रोज आशेने ढगांकडे पाहत. पाऊस चालू झाल्यावर शेतात जाऊन लावणी करायची होती. पुढच्या पावसाळ्यापर्यंत एक वर्षासाठी कुटुंबाला पुरेल इतपत भात पिकायचा त्यांच्या शेतात. आता अजून पाऊस नाही पडत तर कशाची लावणी करणार ह्या चिंतेत सुर्यामामा आकाशाकडे बघत  बसले होते. शेवंतामामी येऊन त्यांच्या बाजूला उभ्या राहिल्या तरी त्यांना समजलं नाही. 

       " मी काय म्हनते, नगा इतका इचार करू. पडंल पाऊस दोन दिसात. तुमचा त्यो इठ्ठल उपाशी न्हाई ठिवणार बगा." शेवंतामामी मामांची समजूत घालत बोलली. 

      " व्हय, समजतंय सारं, पन पाऊस न्हाई पडला तर लावणी करायला लई उशीर व्हईल. म्हनून इचार करीत बसलो." सुर्यामामा तिथून उठून म्हशीला चारा घालायला गेले. 

      सुर्यामामा आणि शेवंतामामी अतिशय स्वभावाने गरीब, प्रेमळ, दुसऱ्यांच्या मदतीला धावणारे. स्वतःच्या पोटाला काही मिळालं नाही तरी चालेल पण दारात आलेला पाहुणा उपाशीपोटी कधीच जात नसे. गावातील चच्चेबच्चेकंपनी पासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच त्यांना मान देत. त्यामुळे सुर्यामामा आणि मामींना आजुबाजूच्या गावातील लोकंही ओळखत. सुर्यामामा विठ्ठलाचे निस्सीम भक्त. त्यांच्या मुखात सदा विठ्ठलाचे नामस्मरण असे. 

      मध्यरात्रीपासुन पावसाला सुरुवात झाली आणि मामांचा जीव भांड्यात पडला. सकाळी उठून मामा, मामी, त्यांचा मुलगा, सून, दोन नातवंडे निघाले शेतात लावणी करायला. सपासप पाऊस पडत होता आणि मामांचे कुटुंब लावणी करण्यात मग्न होते. पाऊस ओसरला. दुपारचे जेवण सगळ्यांनी शेतातचं केले. संध्याकाळी सगळे घरी आले. घरी आल्यावर मामांना थोडी हुडहुडी भरून कणकणी आली. मामींनी त्यांना जबरदस्ती जेवायला देऊन तापाची गोळी खायला दिली आणि गोधडी अंगावर देऊन झोपायला लावले. रात्री ताप थोडा उतरला पण सकाळी परत भरला. त्यांच्या मुलाने त्यांना आज शेतात येऊ नका सांगितले आणि पहिलं डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. शेतात काम करायला त्याने काही मजूर बोलावले आणि मामींना देखील घरी ठेऊन स्वतः बायकोमुलांना घेऊन शेतात काम करायला गेला. 

        मामींनी मामांना डॉक्टरकडे जाण्यापूर्वी साबुदाण्याची पेज करून खायला दिली. आज मामांची आषाढी एकादशी असल्याने त्यांनी भाजी भाकरीचा नाश्ता केला नाही. गावात डॉक्टरांची सोय नसल्याने पाच - सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात त्यांना जावे लागत असे. सहा सीटर टमटमची सोय होती पण त्यासाठी ओढा ओलांडून पलीकडे चालत जावे लागे. मामांनी ओढा ओलांडला. काही वेळाने टमटम त्यांना मिळाली. ते त्यात बसले आणि थोडं पुढे गेल्यावर अचानक काळे ढग दाटून आले. मिट्ट काळोख झाला. आणि आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडू लागला. विजा चमकून ढगांचा प्रचंड गडगडाट होत होता. कशीबशी त्यांची टमटम दवाखान्यापर्यंत पोहचली. इथे मामींच्या जीवात जीव नव्हता. मुलंबाळं शेतात आणि मामा देखील बाहेर पडलेले. मामांकडे संपर्क करायला मोबाईल देखील नव्हता. मुलाचा संपर्क झालेला तो शेतातल्या झोपडीत पोराबाळांना घेऊन बसलेला. गवताच्या पेंढ्याने शाकारलेली ती झोपडी पण तिचा खूप मोठा सहारा झाला होता. आता मामींना मामांचीच चिंता वाटू लागली. 

    इथे सुर्यामामा डॉक्टरांकडून औषध घेऊन निघाले परतीच्या वाटेवर. पाऊस थांबायचे नाव घेतंच नव्हता. धुक्याने समोरचे काही दिसत नव्हते. मामांकडे छत्री होती पण मुसळधार पावसाने तिचा टिकाव लागत नव्हता. बरं ओळखीचं पण कोणाचे घर नाही तर तिथे आश्रय घेता येईल.  पावसातून वाट काढत मामा चाललेले मुखात विठ्ठलाचे नाव. इतक्यात एका घरातून आवाज आला, " ओ दादा, कुठं निघालासा भर पावसात ? या हिकडं पाऊस जाइसतोवर बसा इकडंच." मामांनी पाहिले तर त्यांच्याच वयाचा एक माणूस त्यांना हाक मारत होता. मामा लगबगीने त्या घराकडे गेले. त्या घरात तो माणूस आणि त्याची बायको होते. सुर्यामामांना त्यांनी हातपाय धुवायला पाणी दिले. त्यांच्या बायकोने सतरंजी पसरवली. डोके आणि अंग पुसायला फडके दिले. मामा सतरंजीवर बसल्यावर माठातलं पाणी त्यांना प्यायला दिले.  आलं घातलेला गरमागरम चहाचा कप त्यांच्या पुढ्यात ठेवला.

      " रामराम, देवमानंस हायेसा तुमी. ह्या पावसात घरला कसं जाऊ त्योच इचार करीत व्हतो. नाव काय म्हनलं आपलं ?" सुर्यामामांनी चहाचा कप सारत विचारले. 

     " माझं नाव पांडुरंग, ही माझी बायको रखमा. माझी पोरं शेताकडं गेलीया. आज उपवास न्हवं एकादशीचा तर पोरं बोलली तुमी दोग बसा घरात आमी जाऊन येतो शेतात. पर तुमी या पावसात कुठं निघाला व्हता ?"

     " काल रातच्याला कणकणी आली तर पोरगा बोलला डाक्टरकडं जावा म्हनून आलतो इथं आन किती पाऊस सुरू झाला बगा." 

      " पाऊस थांबला की निघा तुमच्या घरला तोवर आराम करा वाईच." रखमाबाईंनी उपवासाचे पदार्थ, केळी आणि दुधाचा पेला सुर्यामामांच्या पुढ्यात ठेवला. 

     " आवं किती करतासा ? तुमी आश्रय दिलासा ह्येच लई व्हतं." 

      " संकोच नगा मानू. आज तुमचा बी उपवास आसल. वाईच खा आन आराम करा." पांडुरंग दादांनी मामांना टेकायला सतरंजी अंथरली. मामांनी फराळ केला आणि त्यांचा डोळा लागला. थोड्यावेळाने त्यांना जाग आली तर पावसाचा जोर कमी झाला होता. त्या उभयंतांचे त्यांनी आभार मानले आणि रस्त्यातून चालू लागले. तितक्यात एक गाडी त्यांच्याजवळ उभी राहिली. " मामा तुमी हिकडं कुटं ? चला सोडतो तुमाला घरला."  शेजारच्या गावातला बंड्या होता.

   " बंड्या तू हायेस व्हय ?" मामांनी त्याला सकाळपासूनची सगळी गोष्ट सांगितली. " त्या घरात थांबलेलो बघ पाऊस थांबेस तोवर." मामांनी थांबलेल्या घराकडे बोट दाखवले तर तिथे ते घरचं नव्हते. 

    " आर असं कसं झालं, तिकडंच तर घर व्हतं." मामांना खूपच आश्चर्य वाटलं. 

   " मामा तुमचा पांडुरंग आला असेल तुमच्या मदतीला. चला गाडीत बसा मी सोडतो घरला." 

    " व्हय बाबा असल त्यो पांडुरंग माझा. त्यानं नाव बी त्येचं सांगितलं त्याचं. माऊली तू माझी सावली." मामांनी भक्तिभावाने आकाशाकडे पाहत हात जोडले.

      इथे मामींचा जीव टांगणीला लागलेला. ओढ्याच्यावर पाणी आलेले तर पोराबाळांना पण मामांना शोधायला पाठवता येईना. 

     बंड्याच्या गाडीचा दारात हॉर्न वाजला. घरातले सगळे लगबगीने दारात आले. बंड्या मामांच्या मुलाचा संतोषचा मित्र असल्याने त्याचे सगळ्यांनी मामांना घरापर्यंत सोडल्याबद्दल आभार मानले. बंड्याला सगळ्यांनी घरात यायचा, चहा प्यायचा आग्रह केला पण तो बोलला," मी आज न्हाई येत, येईन कवातरी. आज उपवास हाय माझा तर माझी बी रखमा वाट बघत आसल फराळ करायला. येतो मी." असं म्हणून बंड्याने कार चालू केली. 

    सुर्यामामांनी सगळा चमत्कार घरी सांगितला. सगळ्यांना मामांच्या माऊलीसाठी असलेल्या भक्तीचे मोठेच आश्चर्य वाटले. अंगावर शहारे उभे राहिले. देव एका भक्तासाठी कसा धाऊ शकतो याचे सर्वांनाच नवल वाटले. सगळ्यांनी भक्तिभावाने विठ्ठलाची पूजा केली. 

     दुसऱ्या दिवशी सुर्यामामांच्या मुलाचे संतोषचे बंड्याच्याच गावात काम असल्याने तो त्या गावात गेला. तिथे बंड्या त्याची गुरे हाकत चालला होता. 

    " काय रं भावा, आज इकडं कुणीकडे ? लई दिसांनी गाठ पडलीया आपली." बंड्या म्हैस हाकत बोलला. 

    " काय बोलतोस लेका, शुद्दीत हायस न्हवं ? काल आप्पांना घरला आनून सोडलंस न्हवं तू  तुझ्या गाडीतून ?" संतोषने आश्चर्यानं विचारले. 

      " आरं म्या तीन दिस झालं कुटंबी भायेर पडलो न्हाई तर कसा काय सोडन मामांना गाडीतून ?" 

     संतोषने सगळी कथा बंड्याला ऐकवली. ही सगळी माऊलीची करणी. दोघांचे डोळे आणि हृदय भरून आले. 

    संतोषने घरी आल्यावर सगळे वृत्त कथन केले. सुर्यामामांचे हात भक्तिभावाने जोडले गेले. " माऊली तू ह्या पामरापायी किती रूपं घेतलीस ? मला आश्रय दिलासा, माझा वाहक झालासा. दोन येळेस माझ्या समोर आलासा पर म्या करंट्याने तुला वलीखलं न्हाई. तुझी महिमा अगाध हाये. आशीच कृपादृष्टी ठेव रं माझ्या देवा." 

   सगळ्यांचे हृदय भक्तिभावाने भरून आले आणि  सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. 

( समाप्त )

सौ. नेहा उजाळे
वरील कथा सौ. नेहा उजाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post