आई तुला कसे काहीच समजत नाही?..

 आई तुला कसे काहीच समजत नाही?..

✍️ सौ.ऊ‌ज्वला रविंद्र राहणे


 अग आई OTP सांग तुझ्या फोनवर आला आहे.अश्विनी फोन वरुन आईवर ओरडत होती.फोन चालू ठेव.


  अग कुठे तो असतो OTP? मेसेजवर का? मला दिसत नाही?'तु फोन ठेव, मला ते काही बघता येत नाही. 


 अग आई किती ग हा अडाणी पणा!  कितीदा  शिकवायचे ग?पण मला कळत नाही तर,माझा फोन कशाला लागतो तुम्हांला तोंडी लावायला? मी कित्येक वेळा सांगते माझ्या फोनवर असली लफडी करत जाऊ नका. 


  या सगळ्या गोंधळातमध्ये भाजी करपली . सोड ते किचन! म्हणे भाजी करपली.पोळी करपली.ओटा नाही आवरला. कोण येते तुझं घर रोज पाह्यला?


    आता मी सांगते तसं कर. फोन उघड मेसेज वर जा, गेलीस? तिथे नंबर दिसले का मागे लिहिले आहे बघ OTP! तो नंबर मला पाठव लवकर.


    हो दिसले, दिसले. थांब लिहून घेते. प्रतिभाने ते आकडे लिहून घेतले  व अश्विनीला what's app केला.


   मग नंतर तिला फोन केला

बरोबर का ग बाई?हो बरोबर आहे. पण यामध्ये वेळ खुप गेला.त्यामुळे  तो OTP Time out झाला. दुसरा येईल. पटकन सांग.


    प्रतिभाने फोनवरच डोळे ठेवले. पटकन स्क्रीनवर आकडे दिसले.चालू फोनवर तिने पटकन् सांगितले. 


  आई बरोबर Thanku! चल ठेवते फोन. अश्विनीने फोन ठेवला. 

 प्रतिभा थोडी खजील झाली. नेहमी यान् त्या कारणाने तिला ऐकायला मिळायचं."आई कसं ग तुला समजत नाही". 


   माझ्या परीने मी योग्य आहे. रोज नवीन काही तरी तंत्रज्ञान निघते आणि ज्ञानात भर पडते.पण मीही शिकते आहे ना! वेळ लागतो थोडा.म्हणजे काय अक्कलच नाही का मला.


  मी कशात परफेक्ट आहे तुम्ही कशात.लगेच समजत नाही मोकळे कशी होतात हे पोरं.


  कळेल महाराणी तुम्हांला ही कळेल तुम्हांलाही. आता घोडमैदान जवळच आहे.तुम्हीं पण एकदिवशीआई व्हालच कळेल तुम्हाला पण.


  प्रतिभा स्वत:हाशीच बोलत होती. एवढ्या अवधीत भाजीने आपला रंग दाखवला होताच.आता हिच करपलेली भाजी ठेऊया मॅडम पुढे म्हणाल्या ना सोड ते किचन? बघूया!.. 


   एक मन मात्र सांगत होते.नको असे करू. तिला पण वाटते ना आपली आई पण स्मार्ट असावी. जगाबरोबर चालावी. कोठेही अडू नये. कोणी तिच्याकडे अडाणी म्हणून बोट दाखवू नये. काय चुकले तिचे तरी? आपण आहोत या ज्ञानात कमी तर  ऐकून घ्यायलाच हवे.


     पण नाही आता मीच हे शिकणार. मलाही प्रत्येक गोष्ट यायलाच हावी. आज पासूनच श्री गणेशा.म्हणत प्रतिभाने किचन आवरले. करपलेली भाजी काढून ठेवली. दुसरी भाजी करून ठेवली. सगळे आवरून तिने मोबाईल हातात घेतला. 


लेकीने बऱ्याच app तिच्या फोनवर डाऊनलोड केलेल्या होत्या.पण हिने कधी तिकडे लक्षच दिले नव्हते.


   आपल्या काय कामाच्या म्हणून ती कधी तिकडे बघायचीच नाही. आज हळूच तिने एक एक करून app उघडून बघितली. काय आहे यात हे जाणून घेऊ लागली.


अरे तर किती सोप्पे आहे सगळे?नक्कीच जमेल मला! आपण सगळे शिकून घेऊ. आता यांना आपण आश्चर्याचे धक्के देऊ म्हणत तिने फोन हातावेगळा केला.


  संध्याकाळी नेहमीप्रमाणेच बाप लेक घरट्यात परतले.जेवताना अश्विनी म्हणालीच ,काय आई साध्या ,साध्या गोष्टी तुला समजत नाहीत.


 आॉफीसमध्ये आजुबाजूला माझे कलीग असतात.साधा OTP सांगता येत नाही तुला? आजुबाजुचे लोक बघतात माझ्याकडे.किती लाजिरवाणे वाटते.


      हो ना! परवा एक आॉफीसचे पार्सल आले होते माझे! तेंव्हाही त्यांने हिला मोबाईलवर डिजिटल सिग्नेचर करायला सांगीतली. तर हिने लगेचच मला फोन केला.आहो बघा ना तो मला. मोबाइलवर सही करायला सांगतो आहे.काय करू? 


    डोंबल माझे कर सही काही घाबरु नकोस आणि बाई ते पार्सल घे. म्हणून सांगितले.प्रतिभाच्या अडाणीपणाला. परेशने झणझणीत अश्विनी बरोबर तडका मारला.


  आई शिकून घे ग सगळे. स्वयंपाकपाणी, स्वच्छता सगळे होते आपोआप.नको त्यात वेळ घालवूस.


   एकटे कुठे जायची वेळ आली तर काय करणार? प्रतिभाला आज फार वाईट वाटले.बोलणारं बोलून गेले. आपापल्या कामाला लागले. 


    प्रतिभाने मागचं आवरलं.मनात विचारांनी गर्दी केली होती. किती ऐकवतात हे दोघे मला?आता मी श्री गणेशा करणार.मनाशी दृढनिश्चय करून ती  परेशकडे पाठ करून झोपून गेली. 


    रात गयी बात गयी नेहमीप्रमाणे सकाळी दोघांचीही आरडाओरडी सुरू झाली. आई माझ्या टॉपला इस्त्री. डब्यात चांगले काही तरी दे! 


प्रतिभा फोन चार्जिंगला लाव. प्रतिभा माझा डबा,चहा दे लवकर, सॉक्स कुठे आहेत माझे? प्रतिभा हे कुठे, प्रतिभा ते कुठे? 


 दोघांचे आवाज चालू,आज हिचा पक्का निर्णय झालेला.आता आपण खरच बदलून दाखवायचे.प्रतिभाने सराईतपणे सगळे दोघांनाही हातात आणून दिले. 


  आज हे मी करते.उद्या पासून आपले कामे आपली आपण करायची, सकाळी घाई होते तर सगळी रात्री तयारी करून ठेवायची.यापुढे हातात कोणतीही वस्तू मिळणार नाही.


 हे काय? तु कुठे चाललीस? एका सुरात दोघेही उद्गारले! मी न मला काही समजत नाही ना, ते सगळे समजून उमजून घ्यायला! 


   म्हणजे ग काय करणार तू ?अश्विनी तोंडाचा चंबू करत विचारू लागली.


  बघूया किती आता किती आत्मसन्मान वाढवता येतो ते? शेवटी स्वतःहातला आत्मविश्वास वाढवणे महत्वाचा ना! प्रतिभाचे  यावर उत्तर.


    अग यासाठी बाहेर जायची गरज नाही. तुला आई घर सांभाळून हे सगळं  तु शिकू शकतेस! इति अश्विनी. 


    अग मी पण बाहेर  जाणारच नाही. पण तुमच्या दृष्टीने ज्या निरर्थक गोष्टीत मी वेळ घालवते, त्या आता बंद करणार.म्हणूनच पुर्वसुचना दिली.


 ऊद्या पासुन आपापले काम आपली आपणच करायची. म्हणजे मला पण माझा वेळ मिळेल.बघूया जमते का?


    अग प्रतिभा हे काय नवीन खुळ तुझे  सकाळी, सकाळी? परेश चिडून बोलला. चिडचिड नको संयमाने घ्या परेश! तुम्हांला देखील अडाणी बायको नको आहे ना मग?


   आणि हो! अश्विनी गाडीची चावी घरीच ठेव. जमलं तर बाबांच्या बरोबर जा,नाहीतर रिक्षाने जा तू ऑफीसला. मला हवी आहे गाडी आज.


  अग आई किती दिवस झाले तु गाडी चालवली नाहीस.फक्त चालवली नाही अश्विनी ,पण त्याचा अर्थ मला गाडी येत नाही असा होत नाही. 


    आई कसं तुला समजत नाही.काय चालले आहे हे? तुझं वय काय? शांत हो अश्विनी ! मी काहीही वेगळे करत नाही. मनापासून सगळे शिकण्याचा प्रयत्न करते आहे. हे सगळे शिकायला काही वयाची अट आड येत नाही ना? मग तुला काय अडचण आहे? 


  पण तु मात्र अश्विनी घरातले काम शिकून घे, निदान डाळी डाळीतील तरी फरक समजून घे आणि पीठाचे प्रकार पण हं! पोळीला कोणते पीठ, भाकरीला कोणते? नाहीतर लग्नानंतर इज्जत निघायची तुझ्याबरोबर माझीही! सगळे शिकून घे नाहीतर माझ्या सारखी तुझी अवस्था व्हायला नको. नाहीतर तुझी लेक तुला म्हणायची मम्मा तुला कसे कळत नाही! आई  sss अश्वीनी पुन्हा चिडली. 


   आणि हो  अश्विनी काल जरा चार ड्रेस मिंत्रावरून add to cart मध्ये टाकलेत बघ कसे आहेत?आज मागविण म्हणते.


   आई खरच! हो पण तुझ्यासाठी नाही बाळा! माझ्यासाठी मागवलेत. OTP मात्र तुझ्याकडे येईल हं. तेवढा दे ह! अगदी मोठ्यानी सांग, अगदी आजूबाजूला तुझ्या कलीगला ऐकायला येऊ दे.


   आज अश्विनीला सकाळी, सकाळी बरेच थक्के आई देत होती. परेशची तर बोलतीच बंद झाली होती.आता मला पण डिजिटल सिग्नेचर करायला लावणार का तू प्रतिभा. म्हणून त्याने पण कोपरखळी मारली.


   आता आई तुला कसं समजत नाही.असे नको म्हणू, आता आईला सगळेच समजते बरका! ड्रायव्हर शिकत आहे बरका! म्हणत प्रतिभा पायात स्पोर्ट शुज घालून वॉकला निघून गेली. 


  अश्विनी आणि परेश एकमेकांकडे बघत राहिले. आज आईने चहा सुद्धा विचारला नाही आपल्याला म्हणत!.

   काय मग तुमचा अनुभव प्रतिभा पेक्षा काही वेगळा?.. नक्कीच ऐकायला आवडेल!😅😅


 ✍️ सौ.ऊ‌ज्वला रविंद्र राहणे 


   वरील कथा  सौ.ऊ‌ज्वला रविंद्र राहणे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post