आधुनिक विचारांचे अरेंज मॅरेज
✍️ सौ. नेहा उजाळे
प्रांजलने तिच्या टॅबला नमस्कार केला आणि टॅब उघडला. ' बघूदे आज कोणी कोणी इंटरेस्ट पाठवला आहे.'
सात ते आठ मुलांनी ' वरदा ' साठी इंटरेस्ट दाखवला होता. त्यातील चार - पाच जणांचे प्रोफाइल प्रांजलला आवडले. संध्याकाळी लेक आल्यावर लेकीला दाखवू असे मनाशी ठरवून प्रांजल आपल्या नेहमीच्या कामाला लागली. अकरा महिने झाले तिच्या लेकीचे नाव ' मंगलाष्टक ' विवाह संस्थेत घातले होते पण अजून वरदाची मंगलाष्टके ऐकण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. लेकीची पूर्ण प्रोफाइल प्रांजलनेच बनवली होती. वरदाला तिच्या लग्नाची काहीच चिंता नसल्याने प्रांजलचं वरदाची प्रोफाइल हाताळत होती. हे रोजचेच काम प्रांजलचे झाले होते. प्रांजलने सिलेक्ट केलेले मुलांचे प्रोफाइल वरदा हॉस्पिटलमधून घरी आली की प्रांजल वरदाला दाखवत असे. त्यातूनही काटछाट करून वरदाला एखादं - दुसरी प्रोफाइल पसंत पडे. त्या मुलांबरोबर चॅटिंग करून त्यांना लगेच तिच्याकडून नापसंती कळवली जाई. ह्या अकरा महिन्यांत वरदा केवळ दोन मुलांना पर्सनली भेटली होती पण त्या मुलांबरोबर देखील तिचे सूर काही जुळले नाही. वरदाला तिच्या मतांशी सहमत असणारा जीवनसाथी हवा होता. आता मात्र प्रांजलला वरदाच्या लग्नाचे खूपचं टेन्शन येऊ लागले होते. आणि आता एकचं महिना राहिला होता आता पुन्हा विवाहसंस्थेत एक वर्षासाठी वरदाचे प्रोफाइल रिन्यू करावे लागणार होते.
' कोण आहे हिच्या नशिबात देव जाणे ? कोणीच कसं पसंत पडत नाही हिला काय माहित ? बरं तिला हे सुद्धा विचारून झालं की, कोणावर प्रेम करत असलीस तर सांग आम्ही करून देऊ तुझे लग्न तर तेही नाही. आणि वरदाच्या अशा वागण्याला तिच्या बाबांचा पाठिंबा आहे म्हणून तिचं जास्तच फावलं आहे. ह्यांना काय बोलायला की, टेन्शन नको घेऊस. जेव्हा ज्या गोष्टी होणार असतील तेव्हाच होणार. अरे पण तीस वर्षांची झाली आहे वरदा. तिचं लग्न कधी होणार ? पुढे जाऊन मुलं कधी होणार ? माझे हातपाय थकायच्या आधी एक नातवंड होऊदे म्हणजे मिळवलं. बरं असं वरदाला म्हटलं तर बोलते " कम ऑन आई ! माझ्याकडे बायका असणार कामाला. मी काही तुझ्यासारखी खितपत पडणार नाही स्वयंपाकघरात. मग तुला माझ्या बाळंतपणाचं टेन्शन कशाला हवं ?" लेकीला जास्त स्वातंत्र्य दिलं ना त्याचेच हे परिणाम.' मनामध्ये असंख्य विचार करत एकीकडे प्रांजलचे काम सुरू होते.
प्रांजल, वलय आणि वरदा या तिघांचे सुखी कुटुंब. वलय इंजिनिअर असून एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. प्रांजल ग्रॅज्युएट झाली होती पण लेकीच्या भविष्यासाठी तिने बँकेतील चांगली नोकरी सोडून गृहिणीपद स्वीकारले होते आणि वरदा एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ झाली असून ती एका नामांकित हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती. पुढे जाऊन तिला स्वतःचे क्लिनिक उघडायचे होते.
संध्याकाळी वरदा घरी आली. अंघोळ करून फ्रेश झाली. प्रांजलने तिघांसाठी जेवणाच्या टेबलवर ताटे तयार केली होती. त्यांच्याकडे एक नियमच होता की, दिवसभरातील एकमेकांशी संवाद ते तिघे जेवणाच्या टेबलवर साधत असत.
" वरदा ! सात - आठ मुलांनी इंटरेस्ट पाठवला आहे त्यातले चार - पाच जणांचे प्रोफाइल मला आवडले आहेत. त्यातील एका मुलाची प्रोफाइल ' सौरभ राजे ' म्हणून आहे मला जास्त आवडली. अगदी तुला सुटेबल वाटतो आहे. जेवून झालं की बघून घे."
" काय ग आई ? रोजचीच किटकीट का मागे लावतेस ग तू ?" वरदा त्रासिकपणे किणकिणली.
" वरदा ! आई म्हणते आहे ना तर बघून घ्यायला काय हरकत आहे ?" पहिल्यांदाचं लेकीची बाजू न घेता वलयने प्रांजलची बाजू घेतल्याने प्रांजल सुखावली.
" ठीक आहे." असे म्हणून वरदाने जेवण संपवले आणि तिच्या बेडरूममध्ये पळाली.
" ही आई पण ना, रोज लग्नासाठी कटकट करते. इतकी जड झाली आहे का मी तिला ? काय नाव बोलली ? हां ! सौरभ राजे. बघूदे कसे आहेत हे राजे."
वरदाने सौरभ राजेची प्रोफाइल उघडली असता सौरभचा फोटो आणि माहिती बघूनच ती स्तिमित झाली. सौरभ राजे ऑर्थोपेडिक सर्जन असून अमेरिकेत जाऊन त्याने पुढचे शिक्षण घेतले होते पण शिक्षण घेऊन तो अमेरिकेत स्थायिक झाला नाही. त्याला आपल्या शिक्षणाचा उपयोग मायदेशी करायचा होता. वरदाने सौरभला इंटरेस्ट पाठवला असता लगेच समोरून सौरभचा मेसेज आला. थोडे चॅटिंग करून दोघांनी रविवारी भेटण्याचे ठरविले.
सकाळी उठल्यावर वरदाने आईला गुड न्यूज दिली की ती सौरभला येत्या रविवारी भेटणार आहे. प्रांजलने देवाचे मनोमन आभार मानले.
रविवार उजाडला. आज सकाळपासूनचं वरदाला संध्याकाळचे चार कधी वाजतात याची ओढ लागली होती. का कोण जाणे सौरभ एका नजरेतच तिला आवडून गेला होता. इथे सौरभला देखील वरदा खूप आवडली होती. आता एकमेकांना भेटण्याची ओढ दोघांना लागली होती.
प्रशस्त अशा एका सी.सी.डी. मध्ये वरदा सौरभला भेटायला गेली असता सौरभ आधीच तिची वाट पाहत होता. दोघांनी एकमेकांचे फोटो बघितले असल्याने दोघांना एकमेकांना ओळखणे कठीण गेले नाही. एकमेकांना हस्तांदोलन करून अगदी नम्रपणे वेटरला सौरभने हाक मारली आणि कॉफी आणि सँडविचची ऑर्डर दिली. सौरभच्या व्यक्तिमत्वावर तसेच त्याच्या नम्र बोलण्यावर वरदा भाळली होती. दोघांनी खूप गप्पा मारल्या. गप्पा मारता मारता दोघांनी एकमेकांच्या घरच्यांची माहिती, एकमेकांच्या आवडीनिवडी, मते शेअर केली.
" हे बघ सौरभ, मला लग्न करायचा इतका इंटरेस्ट नव्हता पण तुला बघितलं आणि का कोण जाणे तुला भेटावेसे वाटले. पण नुसत्या बाह्यरूपावर भाळून आयुष्याचे निर्णय घेणे चुकीचे ठरेल. त्यामुळे आधीच क्लिअर असलेलं बरं. माझी काही तत्वे आहेत. बघ मी एकुलती एक असून अतिशय प्रगल्भ विचारांमध्ये वाढलेली आहे. देव ही शक्ती मी मानते पण अंधश्रद्धा मानत नाही. मी देव देव करण्यापेक्षा माणुसकी धर्म जपते. मी उपासतापास करत नाही. मला प्राणी खूप आवडतात. मला रस्त्यांवर राहणाऱ्या प्राण्यांसाठी एक हक्काचे छत उभारायचे आहे." वरदा सौरभला सांगत असताना अचानक सौरभ वरदाचा हात हातात घेऊन म्हणाला, " आय लव्ह यू वरदा. माझे आणि तुझे विचार प्रचंड जुळत आहेत. मी अशाच मुलीच्या शोधात होतो की, जी माझ्या विचारांशी मिळतीजुळती असेल. तुझा फोटो पाहिला आणि तेव्हाच माझ्या हृदयाने कौल दिला की ही तीच मुलगी आहे जिच्या शोधात मी होतो. असं म्हणतात ना की, स्वर्गातचं लग्नाच्या गाठी बांधून ठेवलेल्या असतात त्याचाचं प्रत्यय तुला भेटून आला. माझ्याशी लग्न करशील ना ?" सौरभने गुढघ्यावर बसून वरदाला लग्नाची मागणी घातली असता वरदाने लाजून त्याला होकार दिला.
प्रांजल आणि वलय वरदाची वाट पहात होते तितक्यात वरदा आणि सौरभ गेटमधून आत आले. आल्या आल्या वरदाने आपल्या आईबाबांना सौरभची ओळख करून दिली आणि एकमेकांचा होकार देखील सांगितला.
" अरे ! कमालच झाली म्हणायची. तुम्ही दोघांनी एका भेटीत एकमेकांना पसंत देखील केलेत. काय जादू केली म्हणायची ही ?" प्रांजल अतिशय खुश झाली होती. सौरभ वरदाच्या आईबाबांना देखील खूप आवडला. थोडीशी त्याची जुजबी माहिती वलयने विचारून घेतली. प्रांजलने सौरभला मँगो मिल्कशेक प्यावयास दिले. सौरभ लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या आईवडिलांना लग्नाची बोलणी करावयास आणणार होता.
सौरभ गेल्यावर वलय प्रांजलला म्हणाला," बघ प्रांजल ! मी म्हणत होतो ना की, ज्या गोष्टी व्हायच्या असतील त्या त्याच वेळी होणार म्हणून. तू उगीचच टेन्शन घेऊन बसायचीस."
" हो बाई ! बरंच झालं. आता त्या माझ्या टॅबला, माझ्या डोळ्यांना विश्रांती मिळेल आणि बरं झालं मला हिची प्रोफाइल आता रिन्यू करायला लागणार नाही." प्रांजलच्या ह्या विनोदी वक्तव्याने वलय आणि वरदाला खूप हसू आले.
दुसऱ्या दिवशी सौरभ आपल्या आईवडिलांना वरदाच्या घरी लग्नाची बोलणी करावयास घेऊन आला. सौरभच्या आईवडिलांचे प्रगल्भ विचार ऐकून वरदाला तिच्या योग्यतेचे सासर मिळणार म्हणून वरदाचे आईवडील अतिशय खुश झाले होते. सौरभचे घर देखील वरदा आणि तिचे आईवडील बघून आले.
पुढच्या तीन महिन्यांतच वरदा आणि सौरभच्या लग्नाची तारीख काढली गेली. देणं - घेणं, मानपान ह्या गोष्टी टाळल्या जाणार होत्या त्यामुळे त्या खर्चाला आळा बसला. तसेच वरदा आणि सौरभ स्वतः लग्नासाठी महागडे कपडे घेणार नव्हते. वरदाने अगदी मोजकेच दागिने स्वतःसाठी घेतले त्यामुळे कपडे आणि दागिन्यांच्या अफाट खर्चावर साहजिकच नियंत्रण आले होते. वरदा आणि सौरभला लग्नानंतर रस्त्यांवरील भटक्या प्राण्यांसाठी हक्काचे छत उभारायचे होते.
वरदा आणि सौरभच्या घरून केवळ देवाजवळ ठेवायला म्हणून एक - एकेकचं पत्रिका छापली. त्यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण नातेवाईकांना तसेच मित्रपरिवाराला इमेल तसेच व्हाट्सएपच्या माध्यमातून दिले. लग्नाच्या पत्रिका नंतर रद्दीतच जातात म्हणून पत्रिकेचा अवाजवी खर्च त्यांनी टाळला होता.
वरदा आणि सौरभचे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यात आले. त्यांच्या लग्नात ' कन्यादान ' ह्या संकल्पनेला काट मारण्यात आली. कारण आईवडिलांना आपली कन्या दुसऱ्यांना दान करणे ही बाबच दोघांना रुचत नव्हती. वरदाची मंगलाष्टके प्रांजलने ऐकली कारण वरदाचे मत होते की, जी आई आपल्याला नऊ महिने उदरात वाढवते, मोठे करण्यासाठी अफाट परिश्रम घेते त्याच आईला मंगलाष्टके ऐकण्यास बंदी का हवी ? वरदाने गुरुजींना त्यामागची कारणे विचारली असता गुरुजी म्हणाले की, काही ठोस असे कारण नाही आहे. कदाचित आपली मुलगी आता परक्याकडे जाते आहे या विचाराने मंगलाष्टके ऐकून मुलीच्या आईला भरून येते आणि तिच्या डोळ्यांतून गंगा - जमुना वाहू लागतात म्हणून अशी रीत तयार केली असावी. अक्षता म्हणून वधू - वरावर फुलांच्या पाकळ्या उधळल्या गेल्या. लग्नाच्या जेवणामध्ये अगदी मोजकेचं पदार्थ ठेवण्यात आले होते. अन्नाचा नासाडा होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली गेली होती. पर्यावरण पूरक अशी संकल्पना राबवली गेली होती. डेकोरेशनसाठी प्लास्टिक, थर्माकोलचा वापर केला गेला नव्हता.
अशा तऱ्हेने अतिशय प्रगल्भ विचाराने वरदा आणि सौरभचे अरेंज मॅरेज पार पडले होते. वरदा आणि सौरभने त्यांचे प्रगल्भ विचार त्यांच्या कृतीतूनही दर्शवले होते.
( समाप्त )
सौ. नेहा उजाळे
वरील कथा सौ. नेहा उजाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
प्रगल्भ आचार विचाराचे साथी भेटले तर खरे मनुष्यपण जगण्याची किमया साध्य करता येते
ReplyDeleteप्रगल्भ विचारांचे जीवनसाथी भेटले तर आयुष्याचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होते
ReplyDelete