आणि चिमणी उडाली

आणि चिमणी उडाली 

✍️ वैशाली स्वामी
           एका चिमणीची गोष्ट आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात चिमणीने जन्म घेतला. रूपाने गोरीपान, मनाने हळवी...खूप हूशार... अभ्यासाबरोबरच ईतर कला-गुणातही! आई-वडीलांचे स्वप्न होते... चिमणीने खूप शिकावे... नोकरी करावी... स्वत:च्या पायावर उभ राहावं, त्यासाठी त्यांनी लागेल ते कष्ट घेतले...वेळ पडली तर स्वतःची स्वप्ने... ईच्छा... सर्वकाही बाजूला ठेवले आणि चिमणीला उच्च-शिक्षीत केले. 

                    आता वेळ आली चिमणीच्या लग्नाची... तेंव्हा चिमणीच्या वडिलांनी सांगितले... मला पसंत असेल त्या मुलाशी लग्न करायचं... तू उच्च शिक्षण घेतलेस म्हणून उच्च शिक्षीतच नवरा हवा असा हट्ट चालणार नाही. चिमणी म्हणाली माझी काहीच हरकत नाही, पण चिमणीच नशीबच की काय...पहिलंच स्थळ उच्च-शिक्षीत आणि श्रीमंत चिमण्याचं आलं! मग काय... सगळे खूष... चिमणा बघायच्या कार्यक्रमाला आला तेंव्हा चिमणीला म्हणाला...माझ्या मते चिमणा-चिमणीला समान अधिकार असतात! कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं नसतं! 

          चिमण्याचे वडिल म्हणाले, तूझ शिक्षण आम्हाला सर्वांना पसंत आहे... अजूनही पूढे शिकायचं असेल तर शिकू शकतेस आणि घर सांभाळून नोकरी पण करू शकतेस! चिमण्याची आई म्हणाली स्वयंपाक पाणी येत असेल तर माझी हरकत नाही. 

            सर्व कसोट्यांवर पास होऊन चिमणीच त्या चिमण्यासोबत थाटामाटात लग्न झाले. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपले आणि सगळ्यांचे मुखवटे गळून पडू लागले. चिमणा म्हणाला, आता तू आमच्या घरात राहातेस... आमच्या घरातल्या कायद्याप्रमाणेच तूला राहावे लागेल. माझचं सगळ ऐकाव लागेल...आता तूझ्या आई-वडिलांचा तूझ्यावर कसलाच हक्क नाही. माझ्या मर्जीशिवाय कुठलाच निर्णय तूला घेता येणार नाही. चिमण्याचे वडिल म्हणाले, आमच्याकडे खूप संपत्ती आहे... त्यामुळे तू नोकरी करण्याची गरज नाही... फक्त घर सांभाळ...घराण्याला वारस दे...सण-उत्सव... पै-पाहूणा यासर्वांची बडदास्त ठेव! सुरूवातीला चिमणी भांबावून गेली... हे काय होत आहे?... अस काही होईल असा विचारही चिमणीच्या मनात आला नव्हता...समानहक्क तर दूरच तिचे अधिकार देखील तिच्याकडून घेतले गेले. चिमण्याच्या वडिलांनी तर स्पष्ट सांगितले... फक्त घरकाम करण्याचा तूला अधिकार... बाकी कोणत्याही गोष्टीत लक्ष द्यायचे नाही. चिमणीची हुशारी चुलीपुरती मर्यादित झाली. 

                काही दिवसांनी चिमणा-चिमणीला पिल्लू झालं!... आता चिमण्याला वाटूलागलं... चिमणीने पण कमवायला हवं... पण एकदा मोकळ सोडलं तर चिमणी फार उंच उडेल... कदाचित तिच्यावर निर्बंध घालता येणार नाहीत!... मग काय कराव?... यावर चिमण्याला उपाय सूचला... घरात बसून करता येईल असा व्यवसाय त्याने चिमणीला सुरू करून दिला... आर्थिक व्यवहारही शिकवले... पण सगळं स्वत:च्या ताब्यात कसं राहील हे बघितलं. चिमणी आधीच पापभीरू... गरीब स्वभावाची... तिला बिचारीला तर वाटलं... किती चांगला चिमणा भेटला आपल्याला... आपली काळजी करणारा... प्रगतीला हातभार लावणारा!... चिमणी अजून चिमण्याला जीव लावू लागली. 

                घरचं सगळ सांभाळून व्यवसाय पण बघू लागली... सोबत चिमण्याची ईच्छा म्हणून शिक्षण पण घेऊ लागली. या सगळ्या कामाच्या रामरगाड्यात ती माहेराला विसरूनही गेली. कधी तरी ख्याली-खूशाली विचारायची. माहेरी जायचं म्हणलं की चिमणा वेगवेगळ्या अटी घालायचा... याच दिवशी जायचं... त्याच दिवशी यायचं... चारचं दिवस राहायचं...हे सगळे मनस्ताप टाळण्यासाठी चिमणी सासरीच राहायची... स्वतःची समजूत काढायची... की कधीतरी आपल्या कष्टांची किंमत चिमण्यालाही कळेल... आपल्या आई-वडिलांच्या भेटीसाठी आपल्या जीवाची होणारी घालमेल त्यालाही कधीतरी जाणवेल!... याच एका आशेवर ती तिच्या कर्तव्यात कधीच... कुठेच कमी पडू नये म्हणून सतत झटायची. 

                  चिमणीची अशी कसरत चालू असताना अचानक चिमणीच्या आईची तब्येत खूप खराब झाली... चिमणी ज्या गावात राहात होती त्याच गावात आईला ऐडमीट करण्यात आले. चिमणीला आईची खूप काळजी वाटू लागली, तरीही ती स्वतः आईला भेटायला जाऊ शकत नव्हती... तिला तो अधिकारच नव्हता!... चिमणा त्याचं काम संपवून रात्री उशीरा आला तेंव्हा कुठे ती आईला भेटायला जाऊ शकली! 

आई अजून काही दिवस तिथेच असणार होती... पण चिमणीच्या हातात काही अधिकार नसल्यामुळे ती डब्बा पण पोहचवू शकत नव्हती... तरीही हिंम्मत करून चिमण्याला ती म्हणाली, आई जवळ दूसरे कोणीही नाही... मला रोज आणता का भेटायला... चिमणा हो म्हणाला... ती तेवढ्यावर खूश झाली. घरी जाऊन सगळ आवरल... काम केले... सकाळी लवकर उठून आवरल... पण चिमणा कामात व्यस्त... रात्री उशिरापर्यंत...रोज असचं होऊ लागलं... दिवसभर चिमणीच्या जीवाची घालमेल व्हायची... चिमणा त्याकडे दुर्लक्ष करायचा...आणि एक दिवस तर चिमण्याची आई पण म्हणाली... तूच का रोज-रोज जात आहेस दवाखान्यात बसायला... आई जवळ राहायला दूसर कोणी नाही का?.... 

                    चिमणीला त्यांच्या बोलण्याचं खूप आश्चर्य वाटलं... आणि रागही आला! चिमणी म्हणाली... तुम्ही असं कसं म्हणू शकता?... लेकीपेक्षा जवळच दूसरं कोणी असतं का??? आईचे ऋण तर आपण कधीच फेडू शकत नाहीत... पण मग तिच्या प्रती माझं काहीच कर्तव्य नाही का? ... त्यावर चिमण्याची आई म्हणाली, तूझीच एकटीची खूप दमछाक होतीये म्हणून म्हणलं!!! 

                      चिमणी आश्चर्याने चिमण्याच्या आईकडे बघत होती... आणि विचार करत होती... इतके दिवस माझी होणारी धावपळ... दमछाक यांना दिसली नाही... आत्ताच कशी काय दिसतेय??? 😲🙄  

                      या घटनेवरून तिच्या लक्षात आलं... हे लोक आपल्याला फक्त वापरून घेत आहेत... त्यांच्यापैकी एक समजत नाहीत. मग तिने एक निर्णय घेतला... आजही चिमण्याने तिला खूप उशीरा दवाखान्यात सोडले...त्यानंतर चिमणी चिमण्याच्या घरट्यात गेली नाही... तिला माहीत होत... कदाचित चिमणा आता परत कधीच तिला घरट्यात घेणार नाही! तरीही तिने आई सोबत येण्याचा निर्णय घेतला... आणि चिमणी उडाली!!!... ती मनात म्हणत होती.... 

               "चिमण्या शिवाय जगण्याची

             माझ्यात बिलकुल हिम्मत नव्हती

                     पण काय करणार? 

      चिमण्याला माझी अजिबातच किंमत नव्हती!"

©®🖋 वैशाली स्वामी.
वरील कथा वैशाली स्वामी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
       

       

Post a Comment (0)
Previous Post Next Post