मुलीच्या संसारात आईची लुडबुड

 मुलीच्या संसारात आईची लुडबुड 

✍️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे


   "हॅलोsss मी ईशा बोलते आहे!.मला परीच्या शाळेच्या अ‍ॅडमिशन साठी तुझी Id हवी आहे. परीचे आधार बनवण्यासाठी तुझं आधार कार्ड!" एवढे माफक बोलून ईशाने फोन ठेवला.


  ईशाने अशितोषच्या प्रत्त्युत्तराची वाट देखील बघितली नाही.फोन ठेवून दिला. 


अशितोष आणि ईशा एकतर्फी डिव्होर्सी जोडपं.प्रेमात पडून लग्नात रूपांतर झालेले आणि अती प्रेमाचे रूपांतर भांडणात केलेले. याचा परिणाम घटस्फोटात झाले. या काळात एका गोड परीचा जन्म!


पुढील भविष्याची ना चाचपणी ना पडताळणी. छोट्या मोठ्या कुरबुरी आणि प्रकरण विकोपाला आणि घटस्फोट झाला. याचे मुख्य कारण तर ईशाची आई. 


  अशितोषचे एकत्र कुटुंब आईवडिल, तो आणि एक लग्न झालेली बहिण,तशी ती दुरच गावातच होती पण फारसे येणे जाणे नव्हते. कारण तिचेही एकत्र कुटुंब.


  आता या ईशाला कशाचा त्रास होता कळत नाही.सासु सासरे सुस्वभावी कधीच ईशाला काहीच बोलायचे नाही.काम कर वा नको. 


   सासुबाईं अर्धाधिक काम त्याच पुर्ण करायच्या.कधीच ईशा कडून कसलीच अपेक्षा नाही. कारण त्यांनीही तरुण पणी खुप सासुरवास भोगलेला. म्हणून ठरवलेले आपण आपल्या सुनेला सुखात ठेवायचे.


  पण ईशाच्या आणि अशितोष संसारात ईशाच्या आईची मात्र खुप लुडबुड असायची.ईशाच्या मनात ती सतत काहीतरी भरवत असायची.


  ईशा सतत आईचे सल्ले घेणार.तास् न तास् आईच्या आणि हिच्या फोनवर गप्पा. अशितोष पुरता वैतागून जायचा. 

  कधी कधी फक्त ईशाच्या सासुबाईं म्हणायच्या ईशा कधीतरी अशितोषला काय हवे, नको ते बघत जा. 


  झालं याचा उलट अर्थ ईशा घेणार, आईला या उलट सांगणार. मग आईला हे सांगितलं कि,आई यात मालमसाला भरून  लेकीचे कान भरणार. "ईशा त्या तुला अडून अडून काम करायला भाग पाडतात. करू नकोस कामं, परीमध्येच वेळ घालव. एकदा ही वेळ निघून गेली कि पुन्हा नाही येणार इत्यादी, इत्यादी." 


मग ईशाला एवढे, तेवढे काहीतरी कारण पुरायचे आणि घरात वाद व्हायचे खुपदा सासुसासरे समझोता करायचे, तर त्यांनाच ईशा सुनवायची. मग त्यांचे प्रयत्न निष्फळ जायचे,

  असेच एके दिवशी छोटसं कारण ईशाला पुरले.मग तिने आणि मागचा पुढचा विचार न करता मुलीला म्हणजेच परीला घेऊन घर सोडलं. 


 तडक आईकडे गेली. रडणे पडणे झाले.आईने लेकिची समजूत घातली. तिच्या चुकांवर पांघरूण घालून माहेरी ठेवून घेतली. फोनवर सासरच्यांना शिव्या घालून पोटगीची मागणी करून मोकळी झाली.


 ईशाचे बाबा म्हणाले, "इतक्या टोकाचा नको निर्णय घेऊ समझोत्याने मिटवूया हे प्रकरण ईशा, बाळ लहान आहे,त्याला आईवडील दोघेही हवे आहेत." 


   "नाही काही गरज नाही. आपण आहोत आणि माझी ईशा समर्थ आहे परीला सांभाळायला! चांगली पोटगी मागू त्यांच्याकडे." ईशाची आई हट्टाला पेटली. शेवटी बाबांनी नमते घेतले.


  त्याचे परिणाम व्हायचे तेच झाले. ईशाच्या हलक्या कानामुळे आणि तिच्या आईच्या हट्टापायी ईशा अशितोष विभक्त झाले.


    अशितोषने पण खुप समजून सांगायचा प्रयत्न केला.पण तोही शेवटी थकला.


  कायदेशीर ते वेगळे झाले नाहीत. पण विभक्त राहू लागले. बाळ लहान असल्याने त्याची जबाबदारी ईशावर आली. 


 "नव्याचे नऊ दिवस",ईशाच्या भाऊ अविराज, याचे लग्न झाले.भावजय घरात आली. मग काय महाराणी आई व भावजयीला आॉडर सोडत. नवीन नवीन भावजय करत पण पुढे मात्र ती पण टाळू लागली.


   कारण आता तिलाही नणंद आणि सासू यांची लुडबुड स्वतःहाच्या संसारात भासू लागली. तिही या न् त्या कारणाने त्या दोघींनाही सुनावू लागली.कारण ती मोठ्या कुटुंबातून आलेलेली एकुलती एक मुलगी होती. 


  "करावे तसे भरावे" इकडे अविराजची बायको अभिलाषा हिला पण माहेरच्यांचा पुर्ण पाठिंबा.त्यात अभिलाषा गरोदर होती.तिचे सर्व कोडकौतुक झाले.तिला मुलगा झाला आणि मग ईशाच्या आईचे झुकते माप तिकडे गेले. ईशा मनातून दूखावली.


 आता ईशाची किंमत थोडी कमीच होऊ लागली.पण तिला कोणाला सांगणार? कारण तिने स्वतःहाच पायावर धोंडा पाडून घेतलेला.


 परीला आता थोडी समज आली होती.कधीकधी अशितोष परीला भेटला कि, ती सोडून जाताना रडायची मला बाबा हवा म्हणायची. तिचं रडणे अशितोषच्या ह्रदय हेलावून टाकायचे. 


  पण ईशाचा इगो अडवा यायचा.परत ईशाचे बाबा ईशाची समजून घालायचे.ईशा नको वंचित करू तिला बापाच्या प्रेमापासून थोडा कमी पणा घे ,तिचं बालमन जप परत जा सासरी.


  अग माहेर चार दिवसाचे.मी आहे तोपर्यंत ठीक भावाच्या संसारात पुढे अडचण होते. आपली किंमत आपणच ओळखावी बाळा!..


 कोणीही कोणाचं नसते. आईचे किती ऐकायचे ते ठरव ईशा बाळा!


  तु आणि अविराज दोघेही माझेच अहात.भेदभाव करत नाही. पण राजा कुठेतरी पण असतोच. ऐक माझे जा अशितोषकडे परत. 


    घे माघार मी घाबरु नकोस, मी तुझ्या पाठीशी भक्कम आहे. तुझ्या सासरी तुला काहीही त्रास झाला तर मी स्वतःहा तुला घेऊन येईल आणि तुझी आणि परीची आयुष्य भराची तरतूद करेल.


   अगदी अशितोष कडून पोटगीची भीक सुध्दा घेणार नाही. हा माझा शब्द आहे.


आपल्यातलं बोलणं आपल्यात ठेव आईच्या शब्दांला बळी  पडू नको. तिला तुझं सुख कशात आहे हेच समजत नाही हे आपलं दुर्दैव आहे.


   ईशाबाळा आज अविराजचे बाळ छोटे आहे.कालांतराने ते मोठे होईल आणि नात्याची दरी अजून रुंदावेल.वेळीच सावध हो!


  हे तुझ्या आईला का समजत नाही?आपली किंमत आपणच ठेवायची.हे सगळे राजा तुझ्या आईने तुला समजून सांगायला हवे! पण मला तुला समजावून सांगावे लागते हेही माझे दुर्दैव!


  आज का कोणास ठाऊक ईशाला पटलं,बाबा तुम्ही माझ्या पाठीशी अहात ना! तिने परत विचारलं. "अग केंव्हाही!"बाबा म्हणाले.

 

"बाबा मला देखील अशितोष हवा आहे. परीला पण बाबा!" मला काय हवे आहे मी काय करते मला काहीच कळत नाही." म्हणत ईशा बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. 


"मग कुठे घोडे अडले. कर फोन त्याला ये मला घ्यायला" बघ कसा धावत येतो तो "बाबा म्हणाले.


 ईशाने बाबांच्या समोरच अशितोषला फोन लावला." "अशु मी येऊ का तिकडे? परीच्या शाळेचा अ‍ॅडमिशनचा फॉर्म भरायचा आहे. मग तेंव्हाच तुझं आधार कार्ड दे, नाहीतर आपण दोघेच जाऊया परीला घेऊन शाळेत सगळ्या फॉर्मालिटी पुर्ण करायला. काय करू या!" 


  अशितोष ईशाचे हे बदलले बोल,फोनवर ऐकतच राहिला.

त्याला काय बोलायचं ते सुचत नव्हते.

   

 मागवून ईशाची आई आलीच, काय चालले आहे ईशा.का कमीपणा घेतेस?सिंगल पेरेंटस् आहे म्हणून सांग शाळेत!


    "आई आता माझे डोळे उघडले.मी परत जाते आहे अशितोषकडे तु मध्ये पडली नाहीस तर माझे कल्याण होईल."


 फोन चालूच होता अशितोष तिकडून हे सगळं ऐकत होता.


  इतक्यात अशितोषच्या फोनच्या स्क्रीनवर बाबांचा मेसेज झळकला.अशितोष बेटा ये आणि तुझी अमानत सुखरूप घेऊन जा परत काळजी घे.


  अशितोषची आई शेजारी ऊभी होती.ती म्हणाली,"जा बाळा वेळीच घेऊन ये तिला, शेवटी पेल्यातील वादळे पेल्यातच मिटवून टाकावेत त्याला मुर्त स्वरूप नको द्यायला!" 


  पुरूषांसारखा पुरुष पण आईच्या गळ्यात पडला आणि पोटभर रडला.

    

    अशितोषचे बाबा म्हणाले, "आजकाल मुलीच्या संसारात आईने ढवळाढवळ केली तरी खंबीरपणे तिच्या पाठीशी बाबा उभा राहिला तर, बरेच संसार वाचतील. जा अशितोष जा ईशाला आणि परीला घेऊन ये, कर तिला फोन मी आणि आईबाबा येतोय तुला न्यायला!"..


✍️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे


वरील कथा सौ. ऊज्वला रवींद्र राहणे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post