भरती ओहोटी भाग दोन

भरती-ओहटी  भाग दोन

✍️ प्रतिभा परांजपे

भाग एक   👉  भाग एक

सतीश------

रात्रीचे दोन वाजलेत पण, डोळ्यात झोप नाही. आताशा बऱ्याचदा असे होत असे...

उठून पाणी प्यायले . आज मॉलमध्ये अचानक भेटलेली सुमित्रा सारखी आठवत होती.

 पॅथॉलॉजीत रिपोर्ट घ्यायला आलेली, घाबरलेली...

नंतर हॉस्पिटलच्या कॅरिडॉरमध्ये जाताना बऱ्याचदा भेटलेली .

 सतीशना आठवले एकदा अचानक फॅमिली फ्रेंड सुभेदारकडे बर्थडे पार्टीमध्ये पाहिलेली सुमित्रा..

 सतीशची बायको उषा, मिसेस सुभेदा, व सुमित्रा तिघी बोलत  होत्या.

  भडक निळ्या साडीतली, भरपूर दागिने, पोनीटेल घातलेली, बायको उषा,  तर --अबोली साडी मोजकीच ज्वेलरी घातलेली लांबसडक केसांमध्ये अबोलीचा गजरा घातलेली सुमित्रा, ते सावळे रूप. 

एक लखलखणारी वीज तर दुसरे शांत सावळे सौंदर्य..

 कितीतरी वेळ सतीश दुरून पहात होते. अबोलीवरून नजर हटतच नव्हती. घरी आल्यावर ही मनात आंदोलन चालले होते. 

उषा, त्यांची सहचरी, सतीशच्या ताईच्या नात्यातली, ताई व आईने पसंत केलेली. सतीशने लग्नाविषयी फारसा विचारही केला नव्हता. नुकतेच त्यांनी एमडी इन पॅथॉलॉजीचा कोर्स पूर्ण केला होता व स्वतःची पॅथॉलॉजी सुरू केली होती.
बाबा  नव्हते व  आईची तब्येत नरम गरम असायची.  सर्वांच्या पसंतीने उषा त्याच्या जीवनात लक्ष्मीच्या पावलाने आली.

उषाने त्याचा संसार व्यवस्थित केला. त्यांचे सर्व मित्र नेहमीचच उषाची स्तुती करत. मुलेही नीट मार्गी लागली .

सर्व कसे सरळ रेषेत नीट चालले होते आणि अचानक एखाद्या सुखद वादळासारखी सुमित्रा समोर  आली .

उषा तिच्या संसारात रमलेली होती, सतीशच्या मनाची आंदोलने तिला जाणवली ही नाही.

 सतीशने कामाचा व्याप वाढवून स्वतला कामात जुंपुन घेतले .

 अचानक एका लग्नसमारंभाला परगावी गेलेली उषा मोबाईलवर बोलत बोलत रस्त्याने जात असताना एका जीपने धडक दिल्याने पडली व तिथेच गेली...

उषाच्या अशा  अचानक  जाण्याने सतीशचे जगच बदलले, एकट्याला घर खायला उठे. पॅथॉलॉजीचे काम खूप होते पण आता पूर्वीसारखा उत्साह वाटेना, कामात मन एकाग्र होत नव्हते, उषाच्या अभावी त्यांना अगदीच एकटं वाटू लागले तब्येत ही ढासळू लागली‌.

मुलगा व सून अमरावतीला येण्याचा आग्रह करू लागले.  पण एवढा पॅथॉलॉजीचा व्याप वाइंड अप करणे सहज शक्य नव्हते.

 या सर्वात एक वर्ष निघून गेले. शेवटी सतीश अमरावतीला मुलाकडे शिफ्ट झाले.

        

             सुरुवातीचे काही दिवस मुलगा व सून त्यांना वेळ देत असत. त्यांच्याकडे लक्षही खूप देत असत. पण ते दोघेही नोकरी करत असल्याने लवकरच आपणच आपले साथी हे सतीशना जाणवले.

  सकाळ संध्याकाळ बाहेर फिरणे, टीव्ही व कम्प्युटरवर बसून वेळ घालवणे असे केले. पण त्यातही फार रस वाटेना आपण इथे येण्याचा निर्णय उगाचच घेतला असे त्यांना वाटू लागले.

 अशा मनाच्या नाजूक अवस्थेत असताना सुमित्रा अचानक समोर आली. जणू जुन्या डायरीत लपवलेले मोरपीस अचानक हाती यावे नी त्याच्या स्पर्शाने  रोमांचित व्हावे.

अशा मानसिक अवस्थेत मोरपिसाचा स्पर्श अनुभवत ते झोपी गेले.

आज रविवार असल्याने सकाळची ऑफिसची घाई नव्हती. दुपारी अर्चनाने विचारले , "आई आम्ही मार्केटला जातोय,-- तुम्ही पण चला न."

"अग नको, सामान बरेच असेल आणि  संकेत तिथे उगाच हट्ट करेल, तुम्ही दोघं जाऊन या. मी संकेतला गार्डनमध्ये फिरवून आणते".

पाच वाजता सुमित्रा व संकेत  बागेत गेले. तिथे  मुलांच्या घोळक्यात संकेत खूप खेळला. घरी परतताना आईस्क्रीम घ्यायला दोघं पार्लरमध्ये शिरले. निघताना तिथे सतीश दिसले पण तिने मुद्दाम न दिसल्यासारखे केले.

        

          पुढचे दोन-तीन दिवस या न त्या कारणाने ती बाहेर गेली नाही . पण योगायोग म्हणतात ना तसे, लायब्ररीत पुस्तके पाहताना ते भेटले.

इंदोरबद्दलची विचारपूस झाली. बोलणे वाढते असे वाटताच, बरे मी निघते असे म्हणत सुमित्रा निघाली.

 सतीशची नजर आपला पाठलाग करतीय असे तिला वाटत राहिले.

मध्यंतरी संकेतला बरे नव्हते, त्यामुळे चार-पाच दिवस ती घरीच होती. पण औषध संपल्याने ते घ्यायला ती जवळच्या मेडिकल स्टोअरला  गेली.  तिथे सतीश बसलेले होते.

 "तुम्ही इथे ?---कसे?"

"मी इथे पार्ट टाइम करतो तेवढाच विरंगुळा. माझा पॅथॉलॉजीचा अनुभव आहे वेळ चांगला जातो."

औषध घेता घेता बोलणे झाले ‌.

  निघताना सतीश म्हणाले , "तुमचा थोडा वेळ द्याल का? मला तुमच्याशी थोडं वेगळ्या विषयावर बोलायचं आहे, पण इथे नको".

थोडावेळ विचार करत सुमित्रा--" कुठे?"

"बिग बाजारच्या कॉफी शॉपला उद्या अकरा वाजता."

"पाहते जमतय का",  म्हणत सुमित्रा दुकानातून बाहेर आली....

सतीश--

'उद्या भेटेल कां.  तिचा होकार असो वा  नकार, तु मला  आवडतेस  हे तिच्यापाशी कबूल करायचे आहे. मग तिची काहीही रिएक्शन असो.'

सुमित्रा--

'सतीशनी दिलेले निमंत्रण स्वीकारावे का? काय मनात असेल त्यांच्या. आपल्याला जे वाटते तेच कि---, जावे की नाही ? उद्या आपल्याला बाल मैत्रीण आशाकडे पण भेटायला जायचे आहे.'

            

           सकाळी चहा पिता पिता अर्चनाने विचारले, "आई तुम्हाला आशा मावशींना भेटायला जायचे होते  आज  जाणार आहे का?"

"हो गं तयार होते."

"आई तुम्ही ती अबोली साडी नेसा न तुम्हाला खूप छान दिसते."

बर - बर म्हणत सुमित्रा तैयार झाली.

कॉफी शॉपमध्ये सतीशच्या समोर  खुर्चीत बसताना सुमित्राला अवघडल्यासारखे झाले. अशोक ऐवजी  परपुरुषाच्या सानिध्यात   इतक्या जवळ  किंचित थरथरत ती खुर्चीत बसली.

"Be Comfortable",  म्हणत सतीशने वेटरला दोन कॉफीची ऑर्डर देत सुमित्राकडे नजर टाकली .

त्यांना आवडलेली अबोली, किंचीत कोमेजलेली, तरीही पहात रहावी अशी.

"इथे किती दिवस आहात?"

  "मी, चार सहा दिवसात सुट्ट्या संपल्या की परत जाईन."

"ओ.. मला तुम्हाला, म्हणजे मी स्पष्ट बोलतो. मला तुम्ही खूप आवडता.  म्हणजे पूर्वी -- पण तेव्हा--- असो, पुढच्या आयुष्यात तुमची साथ मला  मिळेल का? तुम्ही माझ्या Companion व्हाल कां? तुम्ही विचार करून उत्तर द्या. Take Your own time जर तुमची इच्छा नसेल तर , okay. मी माझे मन तुमच्यापाशी मोकळे केले. तुमच्याजवळ जवळ माझा मोबाईल नंबर आहे."

सुमित्रा काहीच बोलत नाही पाहून सतीशने वेटरला बिल द्यायला सांगितले व ते उठून गेले.

सुमित्राने कशीबशी कॉफी संपवली. सतीशच्या प्रश्नांनी ती गोंधळून गेली. 

ते तिला आवडले होते, पण-- अशोक गेल्यावर नव्या जोडीदाराचा विचार तिने केला ही नव्हता.

दोघं एका शहरात राहत होते. त्यामुळे मित्रपरिवार हि दोघांचा एक असतानां काही गैरसमज होण्याची शक्यता, उगाचच बदनामी.

 मुले समजून घेतील कां? आणि यांच्याबरोबर आपलं जुळेल कां?

असे किती ओळखतो आपण एकमेकांना. या वयात ॲडजस्ट करणे जमेल?  सतीश जोडीदार म्हणून जरी आदर्श असले तरीही.

अशा असंख्य विचारांच्या लाटा मनात उसळत होत्या  व बुद्धीच्या तटबंधाला आदळून माघार घेत होत्या.

 समाजाचे तटबंध ओलांडून जाण्याची शक्ति व वेग या लाटांमध्ये नव्हता. सतीशचा नंबर सेव्ह  करावा कि  डिलीट या  संभ्रमात सुमित्राने  बाहेर येऊन आशाकडे जाण्यासाठी रिक्षावाल्याला हात केला.


  

   आशा दारातच उभी होती. "अगं किती उशीर मी केव्हाची वाट पाहते" म्हणत तिने सुमित्राला मिठीत घेतले.

"घर किती छान सजवले ग, तुझा नीटनेटकेपणा अजूनही तसाच आहे", सुमित्रा घराचे निरीक्षण करत म्हणाली.

आशा सुमित्राला न्याहाळत, "सुमी अजूनही किती छान दिसतेस ग या वयातही, कोणीही फिदा होईल तुझ्यावर"

"तुझ आपलं काहीतरीच हं, बरं घर इतक  शांत कस?"

"अगं  -- आज सर्वांच पिकनिकला जायचं ठरलं."

"अरे वा तू नाही गेलीस? कि मी आले म्हणून ."

"अगं नाही मला खूप दगदग नाही सहन होत.

आपण अगदी निवांत बोलू."

जेवणानंतर टेबल आवरुन दोघी हॉलमध्ये बसल्या. आशाने सुमित्राकडे पाहत विचारले'

"सुमि -- आल्यापासून मी पाहते आहे तू काहिशी विचारात दिसते ,काही वेगळे घडले का? घरी काही झाले की , अशोकच्या आठवणी काय झाले सांग ना."

तेव्हा मग सुमित्राने सतीशनी घातलेली मागणी व मनातल्या शंका आशा समोर मांडल्या.

        -----------------------
           क्रमशः

✍️ प्रतिभा परांजपे

आशा  सुमित्राचा पेच कसा सोडवते ,त्यावर सुमित्रा काय निर्णय घेते पाहू, शेवट काय होतो?

वाचकांना काय वाटते??

 भाग अंतिम 👉 भाग अंतिम

 वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


1 Comments

  1. सुंदर व खिळवून ठेवणारी कथा.

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post