मन भर स्माईल

 

ती, तो आणि करिअर... 

✍️ दीपाली थेटे-राव

ती एकुलती एक. 

लाडाकोडात वाढलेली

 तसाच तो ही... 

"स्थळ" एकमेकांच्या तोलामोलाचं

दोन्ही बाजू श्रीमंत.. सुशिक्षित 

ओपन माइंडेड

पहिल्याच झटक्यात एकमेकांची पसंती

मेड फॉर इच अदर

साखरपुड्यातली साखर दोन्ही घरांत गोडवा पसरवत होती. 

दररोजची संध्याकाळ एकदम स्पेशल  

  नया नया लव

लाईफ कम्प्लीट लवफुल

सगळच कसं छान जुळून आलेलं.. 

           लग्नातील एका वचनाने

           मी आयुष्य तुझ्याशी बांधले

          तुझी आठवण फुलावी क्षणोक्षणी

          मी नावात तुझे नाव गुंफले..... 

तिचे पाय जमिनीवर होतेच कुठे? 

दररोज त्याला भेटणं...

लग्नाची खरेदी.. 

त्याचा स्वप्निल सहवास आणि भावी आयुष्याचं प्लॅनिंग

सारेच दिवस मंतरलेले

म्हणता म्हणता लग्न आलं की तोंडावर.. 

तदेव लग्नम सुदिनं तदेव 

ताराबलं चंद्रबलं तदेव........ 

शुभमंगल सावधान!! 

लग्नात कन्यादान करत असताना हिच्या वडिलांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. 

त्यांची नजर काहीतरी शोधत होती. 

त्यानं आश्वासक नजरेने त्यांचा थरथरता हात दाबला. 

ते गहिवरले.... 

ज णू त्याची नजर सांगत होती..... 

"मी तुमच्या मुलीचं प्रेमानं, मायेनं आणि विश्वासानं रक्षण करीन. 

तिच्या स्त्रीत्वाचा....कर्तृत्वाचा...मान राखीनं....."

लेकीचे वडिल कृतकृत्य

लेकीबद्दलच्या काळजीचं मणामणाचं ओझं उतरलेलं

सुखी रहा पोरांनो आयुष्यभर

मनभरके आशिर्वाद... 

लग्न लागलं...... 

न वीन सोनेरी आयुष्याचं माप ओलांडून ती त्याच्या घरी आली. 

 तो शिकलेला..बुद्धिमान.. 

ती ही तशीच

 त्याच्यापेक्षा काकणभर सरसच. 

तो नोकरी करणारा

मिडिल मॅनेजमेंट एम्प्लॉयी. 

प्रमोशनचे फुल चान्सेस

बेस्ट करिअर

तशी तिने पैसे कमवायची गरजही नव्हती

सगळं एकदम आलबेल

तरीही

काहीतरी खटकत होतं.. 

सुख म्हणजे नक्की काय असतं? 

सगळं सुख, स्वातंत्र्य..होतं पण तरीही... 

कुछ तो कमी है। 

शिक्षण घेतलंय इतकं आपण , तर का घालवायचं असं वाया. 

तिचं मनात झुरणं

स् वत:ला प्रुव्ह करायचा ध्यास

 नोकरी संघर्ष चालू... 

तसही सासरी सगळंच सुटसुटीत, एकदम मोकळढाकळं

कुणाचीच कुणावर जबाबदारी नाही

सेल्फ डिपेंडंट

ही नं नोकरी करायची ठरवली तरीही घराची काळजी सासुबाई आनंदानं घ्यायला तयार. 

होतेच की सगळे एकमेकांना सांभाळून घ्यायला. 

   ....पेपर मधली नोकरीची अॅड.. 

तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारी

त्या अॅड मधल्या सगळ्या रिक्वायरमेंट्सची पूर्तता करणारा तिचा प्रोफाईल

..रेझ्युमे फॉरवर्डेड

सहजच.. 

बघू झालं तर झालं

रिप्लाय पॉझिटिव्ह

कॉल फॉर इंटरव्ह्यू

दिला की मग.. 

त्यानेही उत्साह दाखवला

"जाऊन तर येऊ दे

तेवढाच इंटरव्ह्यूचा एक्सपिरीअन्स

लगेच कुठलं होतय झटक्यात "

त्याचं मोटिवेशन.. 

...इंटरव्ह्यू क्रॅक... 

एका फटक्यात

हुशारीच जबरदस्त तिची

परदेशी जाण्याची आणि सहा महिने तिथे ट्रेनिंग घेण्याची संधी..... 

ट्रेनिंग नंतर परत

इकडेच जॉईनिंग

त्याच्यापेक्षा वरची पोस्ट

तिच्या मनी धाकधूक

त्याला सांगितल..... 

त्याच मन खट्टू . 

तिला वाटलं नव्या लग्नाचा विरह.. म्हणून हा उदास

  विचारांनी त्याचं डोकं सुन्न झालं.. 

"आपण साला इतकं धडपडतोय पण नॉट डन

आणि ही... 

आपल्याला हवी असणारी संधी हिच्या पॉकेट मधे? इतक्या सहज? 

जेलसी.. 

लोक काय म्हणतील.?. 

ह्याच्यापेक्षा वरचढ निघाली बायको. 

धिस इज रिअली नॉट डन

शीट यार"

ठरलं..... 

आपल्या नवरेपणाचा फायदा घेऊन

 तिला यापासून परावृत्त करायचं. 

आपल्यापेक्षा बायको लक्की ? 

 नॉट गोईंग टू हॅपन

     तो घरी आला 

बघतो तो तिचे बाबा आणि आई सोफ्यावर बसलेले. 

तो आलेला बघून तिचे बाबा म्हणाले, 

" बघा ना हो जावईबापू , 

काय वेड घेतलेय हिने. 

आम्हीही स्पष्ट सांगितलंय.. 

 जर तुमची परवानगी असेल 

तरच जायचं"

त्यानं बोलायला तोंड उघडलं आणि ...

"......मी विश्वासाने तुमच्या मुलीचे रक्षण करीन. 

तिच्या कर्तृत्वाचा मान राखीन..."

त्यानेच मनोमन दिलेलं वचन.... 

शब्द..त्याच्या कानात घुमू लागले. 

शेवटी प्रेम म्हणजे काय? 

एकमेकांना समजून घेणं महत्वाचं.... 

डोळ्यांसमोर तिचे बाबा

तिची प्रश्नार्थक पण होकार अपेक्षित असणारी नजर... 

याच्या दिलात कशमकश

 तिच्या बाबांचा हात हातात घेतला, 

" जाऊ दे तिला 

पसरु दे पंख 

झेपावू दे उंच आभाळात

 थोड्या दिवसांचाच तर प्रश्न आहे

आपण आहोतच की सगळे सांभाळून घ्यायला "

तिचे आई-वडिल कृतकृत्य

मोठ्ठा आ वासून ती पहातच राहीली. 

तिची विकेट सपशेल पडलेली

करियरची मॅच तिने जिंकली

पण मॅन ऑफ द लाईफ मॅच अॅवॉर्ड यालाच. 

 नवऱ्याबद्दलचा सार्थ अभिमान तिच्या भरून आलेल्या डोळ्यातून वाहू लागला. 

✍️ दीपाली थेटे-राव

---------------------------------------------

#मनभर_स्माईल

✍️  दीपाली थेटे-राव

जुनीच सवय तिची.
ऑफीसमध्ये जाताना त्याला विचारायचं,
" कशी दिसतेय रे?".
त्याने दिलखुलास स्माईली दिला की आवरल्याचं सार्थक व्हायचं.
ती खल्लास.
दिवस झक्कास.
त्याच्याबद्दलची ओढ मग दिवस सरताना पावलं घराकडे ओढायची.
आग दोनो तरफ बराबर लगी थी।
हिरो की हालत भी बेकरार टाईप
नया नया लव्ह..नई नई शादी
मग घरी येताना तो गजरा आणणार
धुंद मोगरा..
घरच्यांची नजर चुकवत हळूच तिच्या केसांत माळणार.
चोरटे कटाक्ष
संध्याकाळ रंगीन...
दिवस फुलपाखरू.....
प्रेमात आकंठ बुडालेलं एकत्र कुटुंबातलं वेगळं छोटंसं जग
दोघांच्या घरच्यांनाही कळतंय की सगळंच...
तो एकुलता एक लाडाचा
तशीच ती ही एकुलतीच आईवडिलांची.
घरचे ही मनमुराद सगळं आस्वादतात. ...
हिस्टरी रिपीट्स म्हणत.
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे
खरंतर कित्येकदा ठरवूनही द्रुष्ट काढायची राहूनच जाते...
या सुखाला कोणाची नजर न लागो
सासूबाईंच्या मनात नेहमीच येतं दोघांना असं एकमेकांत गुंतलेलं बघून..
नांदा सौख्यभरे...
पण सुखाची किंमत कळायला दु:ख वाट्यात येतंच.....
...................
... खूप दिवसांनी ती परत ऑफिसला निघाली आणि सवयीने आजही तिने विचारलं....
" कशी दिसतेय रे?".
अॅक्सीडेंटमध्ये काही दिवसांपूर्वीच गेलेल्या त्याच्या, फोटोतल्या हास्याने तिचा दिवस सुरू झाला.
तो गेला होता... जगासाठी.‌
तिच्यासाठी... तिचं हक्काचं स्माईल त्यानं कधीचं ओठांवर पेरून ठेवलं होतं.. फोटोतही...कायमसाठी.

घरचेही दु:खात चूर
पण आता त्यांच्या एकुलत्या एक लेकाचा 'जीव' जीवापाड सांभाळणारे.
तिला जपण्यासाठी आता आई वडिल झालेले
ती ही हट्टाने त्यांच्याकडेच राहिलेली...."त्याची" आठवण जपत..
............
काही दिवसांत तिला आयुष्य परत भरभरून जगण्यासाठी तयार केलं.
हो आज पुन्हा संसार थाटतिये ती....
सगळ्यांना मनापासून वाटतंय म्हणून.
लग्नात कौतुक करायला दोन आई-बाबा.
कोर्टात लग्न...
हट्टाने पहिल्या सासरहूनच नवर्या घरी जाईन म्हणाली.
आवरलं आणि निघताना परत नेहमीचाच प्रश्न केला त्याला..शेवटचा..
"कशी दिसतेय रे?"
त्याच्या फोटोतलं स्माईल आज जास्तच फुललेलं वाटलं.
मागून खांद्यावर आईंचा हात.. विश्वासाने ओथंबलेला.
आज त्यांनाही त्याचं स्माईल जाणवलं..समाधान पावलेलं.
ते बघून त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यांतील अश्रूंबरोबरच चेहर्यावर कर्यव्यपूर्तीचं हलकं हसू तरळलेलं.
घरभर परत एकदा आनंदी आनंद
गाडीचा हॉर्न वाजला...
तिला लग्नासाठी नेण्यासाठी 'तो' आला होता.
तेवढ्यात पाठवणीआधी आईंनी तिला हात धरून आतल्या खोलीत नेलं.
पाटावर बसवलं.
ती आश्र्चर्यचकित...
त्या मात्र तेव्हा काढायची राहून गेलेली द्रुष्ट काढत होत्या..आठवणीने.
त्यांचं मानसिक समाधान....
तिने भरल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकला..
तिकडे  स्माईल ओठांच्या कक्षा रूंदावत फोटोभर पससरलेलं....
नांदा सौख्यभरे....

✍️ दीपाली थेटे-राव

वरील कथा दीपाली थेटे राव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post