Acceptance

 Acceptance

✍️ सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

"मॉम, तू टिपीकल आईसारखी राहू शकत नाहीस का? काय गरज आहे इतकं शो ऑफ करण्याची?" हातातल्या शॉपिंग बॅग्स सोफ्यावर फेकत कांचन तणतणली. 

"अगं.. मी काय शो ऑफ केला? आणि टिपीकल आईसारखी म्हणजे? एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे तुला?" उल्का गोंधळली होती.

"हे  तू कॉलेज गोईंग गर्लसारखी जे नटते ना ते थांबव आता. लक्षात घे की तुझी मुलगी कॉलेजकन्या आहे तू नाहीस. निदान माझ्यासोबत फिरताना तरी सलवार सूट, साडी असलं काही नेसत जा. मला मान्य आहे तू अगदी  व्यवस्थित मेन्टेन ठेवलंय स्वतःला पण त्यामुळेच आपण एकत्र असतो तेव्हा लोक मला कमी आणि तुलाच जास्त अटेंशन देतात this is what I hate. आज मॉलमध्ये सुध्दा माझ्यापेक्षा जास्त कॉस्मेटिक्स, हेल्थ केअर प्रॉडक्ट्स तू खरेदी केलीस. अगदी टॉप्स, जीन्स घेतानासुध्दा तो चोंबडा सेल्समन मॅम मॅम करत तुझ्याच मागे मागे करत होता. पण एक लक्षात ठेव, तुला कितीही वाटत असलं तरी यू कॅन नॉट विन ओव्हर टाईम. जे दिसायचं ते दिसतंच."

आपल्या खोलीत जाऊन कांचनने दार बंद केलं. उल्का काही न समजून तशीच उभी राहिली. 

'असं काय गर्लिश दिसते मी! आणि कपडेही व्यवस्थित घातले आहेत. जीन्स आणि फॉर्मल शर्ट्स तर सगळेच घालतात ना मग यात कांचनला काय खटकले... काय म्हणाली ती, यू कॅन नॉट विन ओव्हर टाईम... बरोबरच आहे. पण आपल्या सौंदर्याची काळजी आपण घेतली तर त्यात गैर काय आहे. हो आहे मी पॅशनेट माझ्या सौंदर्याबाबत, वाटतं मला नेहमीच तरूण दिसावं, करते मी त्याच्यासाठी सर्वकाही. यात कुणाला प्रॉब्लेम का! मी नाही पाहू शकत स्वतःला म्हातारी झालेली. येस, आय कॅन नॉट स्टॉप एजिंग बट आय डेफीनेटली कॅन स्लोवर इट.' मानेला एक झटका देत उल्का किटी पार्टीसाठी तयार व्हायला निघून गेली.किटी पार्टीमध्ये उल्काने प्रवेश करताच सगळ्या जणी तिच्याकडे पाहायला लागल्या, काहीजणी मत्सराने तर काही नाक मुरडून. उल्का मात्र कुणालाही जास्त भाव न देता आपली मैत्रीण रश्मीच्या बाजूला जाऊन बसली. दोघी गप्पा मारू लागल्या. दर महिन्याला होणाऱ्या या पार्टीसाठी उल्का खास तयार होऊन येत असे. वास्तविक को ऑपरेटिव्ह सोसायटीत होणाऱ्या अशा पार्ट्यांचा उद्देश नेहमी घरातच राहणाऱ्या बायकांनी थोडंसं घराबाहेर पडावं, विचारांची देवाणघेवाण करावी जोडीला थोडी करमणूक करावी असा असला तरी त्याऐवजी गॉसिपिंग, एकमेकींची उणीदुणी काढणं, उखाळ्यापाखाळ्या करणं हेच जास्त होतं. आजही उल्काला पाहताच लगेच सगळ्या एकमेकींच्या कानाशी लागल्या.

"साडी कशी नेसलीय बघितलं का, बेबींच्या खाली वितभर. शोभत का या वयात असलं?"

"तिने केस थोडे जास्तच हायलाईट केले असे वाटत नाही?"

"छान दिसणार नाही तर काय, आठवड्यातून चारदा तर पार्लरमध्येच तर असते."

"काहीही म्हणा पण छान कॅरी करते हं स्वतःला, वाटत नाही लग्नाच्या वयाची मुलगी आहे हिला म्हणून."

"पण खरं सांगू का, कितीही मेकअप केला तरी वय दिसतंच ना." 

"हम्म बरोबर आहे तुझं." 

चारी बाजूंनी कुजबूज सुरू होती. शेवटी होस्ट असलेल्या मेघाने गेम सुरू केले तेव्हा कुठे चर्चा थांबली. उल्काही हसत खेळत सगळ्यात सामील झाली.


उल्का दीक्षित, सत्तेचाळीस वर्षांची गृहिणी. दिसायला सुंदर आणि तशी जाणीव असणारी. लहानपणी हलाखीची परिस्थिती असल्याने कसलीच हौसमौज झाली नाही. पण नक्षत्रासारखं रूप लग्नाच्या बाजारात कामाला आलं आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असलेल्या सुहास दीक्षितसोबत लग्न झालं. एका क्षणात तिच्या नशिबाने कूस बदलली आणि भरभरून सुख पदरी पडलं. लग्नानंतर दोन वर्षात कांचनचा जन्म झाला. आई वडिलांचे उत्तम गुण घेऊन पोरगी जन्मली होती. दीक्षितांच्या घरी फक्त मुलांची मांदियाळी असल्याने कांचनला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले जायचे. पूर्ण वेळ ती आत्या, काका, काकू आणि आजी आजोबांच्या ताब्यात असे. म्हणून उल्का स्वतःला वेळ देऊ शकत होती. नियमीत व्यायाम, जिम, योगासन करून तिने स्वतःला अगदी बांधेसूद ठेवलं होतं. जोडीला महागडी सौंदर्य प्रसाधने, ट्रीटमेंट होत्याच. ज्या रुपामुळे हे ऐश्वर्य प्राप्त झाले ते अबाधित ठेवणं तिला गरजेचं वाटायचं. 


पण ती नुसती सोनपुतळी नव्हती. लग्नानंतर वेळ घालवण्यासाठी म्हणून केलेला फॅशन डिझायनिंगचा कोर्स आता बुटिक चालवण्यासाठी तिला उपयोगी पडत होता. उल्काचा सुंदर प्रफुल्लित चेहरा आणि संवाद कौशल्यामुळे कित्येक हाय प्रोफाईल स्त्रिया तिच्या बुटिकच्या नियमीत ग्राहक बनल्या होत्या. 


सकाळी जिम सेशन संपल्यावर हातात वाफाळता कॉफीचा मग घेऊन उल्का विचार करत होती. राहून कालची किटी पार्टीमधील चर्चा तिच्या डोक्यात फिरत होती. नाही म्हटले तरी स्वतःबद्दल, स्वतःच्या दिसण्याबद्दल उल्का प्रचंड पजेसिव होती. चेहऱ्यावर अगदी बारीकशी पुटकुळी आली किंवा वजन एखादं किलो जरी वाढलं तरी तिला सहन व्हायचे नाही. सत्तेचाळीस वय म्हणजे उतारवयाची सुरुवातच पण उल्काला ते पटत नसे. आताही सहजच उठून ती आरशासमोर उभी राहिली. सुंदर हायलाइट केलेल्या केसांमध्ये एक पांढरा केस तिच्या नजरेस पडला. घाई घाईत हातात ब्रश आणि हेअर कलर घेऊन तो केस लपवायला लागली. पण तसं करताना सुहासने पाहिले. 

"राणी काय करतेस?" उल्काला मागून मिठी मारत सुहासने विचारले. 

"काही नाही, एक पांढरा केस दिसतोय तो कलर करतेय."

"आता चाळीशी ओलांडली आपण मग होणारच ना केस पांढरे, त्यात काय लपवायचे?"

"म्हणून काय झालं, अजून काही म्हातारे नाही झालो." केस बांधत उल्का उत्तरली.

"हां, पूर्ण नाही पण म्हातारपणाची सुरुवात तर झाली आहे. तुझं वय फारसं दिसत नाही पण जे आहे ते आहे बुवा." सुहास म्हणाला. 


दिवस पुढे सरकत होते. उल्काच तरुण दिसण्याचे वेड ही वाढत चाललं होतं. कांचन मात्र हल्ली तिच्याबरोबर कुठे जात नसे. आणि एक दिवस स्वतःच रूटीन चेक अप करताना काही वेगळं जाणवलं. डाव्या स्तनात एक गाठ जाणवत होती. काही दिवसांपूर्वी उल्काला ती हाताला जाणवली होती पण मासिक पाळी यायच्या आधी अशा गाठी, किंचीत वेदना होण्याचा तिला अनुभव होता म्हणून तिने दुर्लक्ष केले होते. आज मात्र तिने लगेच संध्याकाळची डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. 

"हम्म, तुमचा अंदाज कदाचित बरोबर असू शकतो. लक्षणं तर तशीच वाटत आहेत. पण आधी बाकीच्या टेस्ट करून पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपोर्ट्स काहीही असले तरी शंभर टक्के सकारात्मक राहायचं कारण सध्याच्या मेडीकल सायन्समुळे कॅन्सरवर नक्की विजय मिळवता येतो."


रिपोर्ट्स येईपर्यंत कुणालाच काही सांगायचे नाही असं उल्काने ठरवले. चार दिवसात रिपोर्ट आला. ती गाठ मनिग्लेंट म्हणजे कॅन्सरची होती. पहिली स्टेज होती. उल्काची ट्रीटमेंट सुरु झाली. अख्खं घर उल्काची काळजी घेऊ लागलं. तिचा आहारविहार सांभाळणं, डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट, केमो सेशन्स सगळं सगळं. एरवी आईसोबत फटकून वागणारी कांचन आता आईला कसलाच शारीरिक, मानसिक त्रास होऊ नये म्हणून जपत होती. कॅन्सरशी लढा देत असताना उल्काचे सौंदर्य मात्र लुप्त झाले. तकतकीत कांती पिवळसर दिसू लागली. अशक्तपणा इतका आला होता की हातावरच्या शिरा सुध्दा स्पष्ट दिसत होत्या. केस पूर्ण गळून गेले. उल्काला वाईट वाटू नये म्हणून सुहास आणि कांचनने घरातली सगळे आरसे काढून टाकले. भेटायला येणाऱ्यांना ही तिच्या दिसण्याबद्दल काहीच बोलायचं नाही अशी सक्त ताकीद दिली त्यांनी. 


शे वटी एकदाची उल्काने कॅन्सरवर मात केली. जेव्हा तिचा शेवटचा रिपोर्ट नॉर्मल आला तेव्हा दीक्षित कुटुंबियांनी आनंदोत्सव साजरा केला. हळूहळू उल्का आपल्या नॉर्मल लाईफमध्ये परतू लागली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने घरीच व्यायाम, योगासने, प्राणायाम करायला सुरुवात केली. काही महिन्यांच्या कालावधीत ती पुन्हा पहिल्यासारखी तंदुरुस्त झाली. घरात पुन्हा पहिल्यासारखे आरसे लावण्याचा तिने आदेश दिला. 


बरी झाल्यानंतर आज पहिल्यांदाच उल्का घराबाहेर पडणार होती. गेल्या अर्ध्यातासापासून कांचन, सुहास तिला मंदिरात घेऊन जाण्यासाठी वाट पाहत होते. 

"पप्पा, मॉम नक्कीच आधीसारखी टॉप टू बॉटम परफेक्ट तयार होत असणार. बघा ना किती वेळ लावतेय." कांचन ओठ चावत थोड्याशा रागातच म्हणाली. 

खोलीचा दरवाजा उघडला आणि उल्का बाहेर आली. 

"मॉम, मॉम तू बरी आहेस ना? अशी म्हणजे या अवतारात तू घराबाहेर पडणार आहेस? नीट तयार का नाही झालीस?" कांचनने धावत जाऊन उल्काला विचारले. तिचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हिरव्या काठपदराची पिवळी कांचीवरम साडी, गळ्यात फक्त एक मंगळसूत्र, हातात एक एक सोन्याची बांगडी, कानात साधेसे टॉप्स घालून उल्का उभी होती. कांचनला धक्का बसण्याचे कारण म्हणजे उल्काने लिपस्टीक सोडली तर कसलाच मेकअप केला नव्हता. आपले चंदेरी करडे, मानेवर रुळणारे केस अजिबात न रंगवता हसतमुखाने ती उभी होती. तिच्या मूळच्या गोड चेहऱ्याला सुंदर प्रफुल्लित हास्याने अजून शोभा आली होती.

"अरे मी स्वप्नात तर नाही ना, मला कुणीतरी एक चिमटा काढा रे. उल्का मॅडम आणि नो हेअर टू टोज ग्लॅमर!" सुहास अविश्वासने म्हणाले. 

"तुम्ही दोघं नाटकं बंद करा पाहू. मला समजलंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. आधी एक सांगा, मी कशी दिसतेय?"

"अतिसुंदर, कुणाची नजर न लागो," डोळ्यातील पाणी लपवत कांचनने उल्काच्या कानामागे काजळ लावले.

"बेटा, तू बरोबरच होतीस. काळावर कुणीच विजय मिळवू शकत नाही. सौंदर्य शाश्वत टिकत नाही. वय हातात सापडत नाही, उगाच त्याच्या मागे जीव तोडून धावण्यात काही अर्थ नाही. तुम्ही जरी घरातले सगळे आरसे काढले तरी मोबाइलच्या कॅमेरा मध्ये मी स्वतःला पाहिलं होतं. खूप खूप त्रास झाला स्वतःच कळाहीन रूप पाहून. पण मग काही दिवसांनी मी आपल्या स्वयंपाकाच्या काकूंना पाहिलं. माझ्यासाठी गरम भाकरी बनवताना घामाघूम झाल्या होत्या, कपाळावरचं कुंकू पसरलं होतं पण टम्म फुगलेली भाकरी पाहून किती प्रसन्न दिसत होता त्यांचा चेहरा. त्याक्षणी त्या मला सगळ्यात सुंदर स्त्री वाटल्या. आपली भांडी घासणारी रेखा कळकट मळकट दिसते म्हणून नाक मुरडायची तिला पाहून मी. पण एक दिवस तिने मला पाहून हसून कसं वाटतं मॅडम म्हटलं तेव्हा समजलं की नुसतं प्रसन्न हसू लेवून माणूस इतका गोड दिसू शकतो. या रोगाने भलेही माझं शारीरिक सौंदर्य हिरावून घेतलं असेल पण आंतरिक सौंदर्य पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली. सो बेटा आय वॉज नेवर सो बेटर. आत्ता खऱ्या अर्थाने बरी झाली मी.

खरं सांगू का राणी, ज्या क्षणी मी आपण हळू हळू म्हातारं होत जाणार हे स्वीकारलं तेव्हाच मी बरी झाली. ॲक्सेप्टनस् इज द की ऑफ हॅपिनेस."


समाप्त

✍️ सविता किरनाळे 

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

3 Comments

Post a Comment
Previous Post Next Post