न्याय

 न्याय

लेखिका- सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

शनाया, समीर आणि संकेत दिल्लीतील उच्चभ्रू मुले. एकाच सोसायटीमध्ये राहायचे. एकाच शाळेत, एकाच क्लासमध्ये जायचे. त्यांचे पालकसुद्धा एकाच क्लबचे मेंबर होते. तिन्ही कुटुंबांची चांगली मैत्री होती. जशी जशी मुले मोठी होत होती तसे त्यांच्यातील बंध घट्ट होत होते. शनाया आणि समीर दोघांमधील नाते एका वेगळ्या वळणावरून जात होते. दोघांच्या घरुन काहीच आडकाठी नव्हती. तारुण्याच्या उंबरठयावर उभी असलेली शनाया अतिशय सुंदर दिसत होती. घरची संपन्नता असल्याने वेगवेगळ्या किमती प्रसाधनाच्या उपयोगाने ती अजूनच देखणी दिसत होती. म्हणतात ना कुणीच कुरूप नसतं फक्त गरीब असतं. इथे तर सौंदर्य आणि सुबत्ता दोन्ही होते. कितीतरी तरूणांच्या हृदयाची धडकन असलेल्या शनायाचे हृदय मात्र फक्त आपला बालमित्र असलेल्या समीरसाठी धडकत होते. संकेत मात्र या शर्यतीत मागे पडला. त्याचे सुद्धा शनायावर प्रेम होते पण तिने समीरला निवडलेले पाहून सच्च्या मित्राचे कर्तव्य निभावत तो शांत राहिला.  

शिक्षण संपताच समीरला चांगली नोकरी मिळाली. तीन वर्षात चांगल्या कामगिरीच्या बळावर समीरने स्वतःचे घर बुक केले. आता त्याला लग्नाचे वेध लागले. लवकरच शनाया समीर लग्नबंधनात अडकले. लहानपणाची मैत्री, तरुणपणीचे प्रेम नवरा बायकोच्या पवित्र नात्यात बदलले. संकेत लग्नात सहजतेने नी आनंदाने वावरत होता, शेवटी त्याच्या बालमित्रांचे लग्न होते ना!  

लग्नानंतर समीर शनायाचे सुंदर सहजीवन सुरू झाले आणि संकेतने आपली अहमदाबादला होणारी बदली स्वीकारली. दिवस आपल्या गतीने पुढे सरकत होते. पाच वर्षात शनाया दोन मुलांची आई झाली. समीरने आपले स्वतःचे कंपनीत स्थान पक्के केले होते. त्यांना कशाचीच कमतरता नव्हती. जिथे समीर घराबाहेर स्वतःचे स्थान बनवत होता तिथे शनाया घरच्या कामात, मुलांमध्ये अजुनच गुरफटत चालली होती. तिच्यासाठी सामाजिक जीवन जणु संपल्यातच जमा होते. मुलांना, समीरला सगळ्या गोष्टी हातात द्याव्या लागत. त्यांची सकाळची कामं आवरता आवरता दुपार होई आणि मुलं शाळेतून घरी आली की त्यांच्या मागे पळापळ करण्यात दुपार सरुन रात्र होत असे.  

दहा वर्षात लग्नाआधीच्या सुंदर, चार्मिंग शनायाचे नामोनिशान राहिले नाही. तिच्या जागी आता एक थोडीशी स्थूल, अधुनमधून पांढरे केस डोकावणारी, थोडी गबाळी स्त्री होती, जिला मुलांमधून आणि घरकामामधून सवडच मिळत नव्हती. ज्या शनायावर समीरने प्रेम केले होते ती आता कुठेच दिसत नव्हती. हळूहळू तो शरीराने न मग मनाने शनायापासून दूर जावू लागला. याची काहीच कल्पना नसलेली शनाया अज्ञानात सुखी होती.  

आणि अखेर तो दिवस आला. समीरने शनायाला आपल्याला तिच्यात आता कसलाच इंटरेस्ट नसल्याचे सांगून टाकले. 

“शनाया, एक वेळ होती जेव्हा मला तुला सोडून दुसऱ्या कोणाकडे पाहावे वाटत नव्हते पण आता जरा स्वतःची अवस्था पाहा मला तुझ्याकडे पाहावत नाही. मला घटस्फोट हवा आहे, मी नाही राहू शकत अजून तुझ्यासोबत. मला घटस्फोट दे. मुलांना तुझ्याकडेच राहू दे, मी त्यांच्या पालनपोषणाचा खर्च देईन.”

“तू कुठे जाणार ?”

“तू हा प्रश्न विचारलास त्यावरूनच तुझे माझ्याकडे अजिबात लक्ष नाही हे लक्षात येते. मी रियाकडे, माझ्या को वर्करकडे शिफ्ट होतोय, लिव इन रिलेशनशिपमध्ये. गेली दोन वर्षे आम्ही एकमेकांवर प्रेम करतोय.”

“दोन वर्षे!!! आपण तर जेव्हापासून समज आली तेव्हापासून एकत्र आहोत.”

“प्लीज don't argue, मला आता काहीच वाटत नाही ग आपल्या नात्याबद्दल, nothing charming.”

शनाया आणि समीर आपापल्या मार्गाने गेले. दर महिन्याला शनायाच्या अकाउंटमध्ये पैसे यायचे, बस तेवढाच संबंध उरला होता दोघांचा. दूसरीकडे रिया आणि समीरचे नाते फक्त आकर्षणाच्या पायावर उभे होते, समीरला तिच्या शरीराचे आणि रियाला त्याच्या पैशाचे आकर्षण.  

आणि अजून एक वादळ आले समीरच्या आयुष्यात. मंदीमुळे उच्चपदावर असलेल्या काही लोकांना काढून टाकण्याचे त्याच्या मॅनेजमेंटने ठरवले आणि दुर्दैवाने त्या काही लोकात समीरचे ही नाव होते. त्याची नोकरी गेली. आधी लाडीकपणे वागणारी रिया अचानक व्यवहारी झाली. जोपर्यंत समीरच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे होते तोपर्यंत रियाने संयम धरला. जशी पैशांना ओहोटी लागली तसे तिने त्याला स्पष्ट सांगून टाकले, ‘आता तुझी तू दुसरी व्यवस्था पाहावी कारण तू घरभाडं शेअर करण्याच्या परिस्थितीत नाहीस.’  आता समीरला सत्याची जाणीव झाली. रियाचे त्याच्यावर नाही तर त्याच्या पैशावर, स्टेटसवर प्रेम होते...

अशात एक दिवस त्याला शनायाचा काॅल आला. “समीर, आज तुला सिटी हाॅस्पिटलला येणं जमेल का? रिहान तिथे अॅडमिट आहे. न्यूमोनिया झालाय त्याला आणि त्याने तुझ्या नावाचा नुसता घोशा लावलाय. अरे मी त्याला समजवलं पण ऐकतच नाही म्हणून तुला त्रास देतेय.”

किती महिन्याने तिचा आवाज ऐकला समीरने... 

“शनाया, मी येतोय हाॅस्पिटलला.”

समीरला पाहून रिहान, त्याचा लहान मुलगा, खूप खूश झाला. समीर रोज हाॅस्पिटलमध्ये जायचा. रिहानची तब्बेत झपाट्याने सुधारु लागली. त्याच्या बाजूला बसलेल्या शनायाकडे पाहून समीर विचार करू लागला, ‘अजूनही ही तशीच आहे थोडीशी जाड, मी गेल्यापासून पांढरे केस थोडे जास्त वाटतायत, हम्म वाटतीलच ना कारण आता दोन्ही मुलांची जबाबदारी तिच्या एकटीवरच आहे... अरे आधीपासूनच ती एकटीच पाहतेय ना मुलांकडे आणि माझी ही मुलासारखीच काळजी घ्यायची.  मी पैसे देणे सोडून कोणतीच मदत नाही केली तिला, पण तिने हे कधीच म्हणून नाही दाखवले, एकटीच सगळं करत राहिली. कदाचित म्हणूनच तिला स्वतःकडे लक्ष देता आले नाही. हे पांढरे केस, वाढलेले फॅट तिची चूक नाही तर तिचे आमच्या प्रति समर्पण सिद्ध करते.  

विचारांच्या जंजाळात तो गुरफटत चालला होता. शनायाला त्याच्या या मनोव्यापाराची काहीच कल्पना नव्हती. समीर फक्त मुलासाठी इथे आला आहे बाकी त्याचा आपला काहीच संबंध नाही असेच ती धरून चालत होती. समीरचे आता डोळे उघडले होते. दुरून डोंगर साजरे या म्हणीचा प्रत्यय आला होता. सुंदर दिसणाऱ्या रियाचे खरे अंतरंग त्याला कळले होते. त्याने आपली चूक सुधारायचे ठरवले. 

रिहानला घरी सोडण्यात आले होते.  

समीरने शनायाला काॅल करून लग्नाआधी ते तिघे संकेत, समीर, शनाया ज्या काॅफी शाॅपमध्ये भेटायचे तिथे भेटायला बोलावले. वेळेवर शनाया तिथे पोहोचली. खूप खूश दिसत होती. समीर थोडा नर्वस होता कारण घटस्फोटानंतर तो पहिल्यांदा तिला एकटीला भेटत होता. तेवढ्यात शनायाने कुणाला तरी पाहून हात हलवला. समीरने वळून पाहिले तर तो संकेत होता. किती रुबाबदार दिसत होता. त्याला पाहून समीरला ही आनंद झाला. काही वर्षापुर्वी संकेतच्या उपस्थितीतच शनायाने समीरच्या प्रपोजलला होकार दिला होता आणि आताही तेच होणार होते. संकेत आत आला. समीरची त्याने गळाभेट घेतली आणि शनायाच्या कपाळावर ओठ टेकवले.  

“ओके, आपण परत तिघे एक टीम झालो आहोत, संकेत अन शनाया, so let’s celebrate and I wanna ask you something Shanaya.” समीर म्हणाला.

“हो सेलेबरेशन तो बनता हैं बाॅस, आज डबल सेलेबरेशन करुया, आम्हाला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे.”

समीरचा प्रश्नार्थक चेहरा पाहून संकेतने सांगून टाकले, “मी आणि शनाया पुढच्या आठवडयात लग्न करतोय.”

शनायाकडे वळून खिशातून अंगठीचा बाॅक्स काढून तो गुढघ्यावर बसून बोलला, “शनाया, the most beautiful lady in the world, will you marry me?” 

शनायाने हसून होकार दिला आणि संकेतने ती अंगठी तिच्या बोटात सरकवली. समीर पाहातच राहिला. संकेतला त्याचे प्रेम मिळाले होते तर शनायाला तिचा मिस्टर राईट. फक्त समीरची अवस्था तेलही गेले आणि तूपही गेले अशी झाली होती. 

समाप्त

©️Savita Kirnale

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post