वानप्रस्थ

 वानप्रस्थ

✍️ सौ प्रतिभा परांजपे
             

        आज आश्रमाचा वर्धापनदिन असल्याने सकाळ पासूनच कार्यकर्त्यांची लगबग सुरू  होती. त्यामुळे तिथल्या वृद्ध लोकांना पण थोडा उत्साह वाटत होता. आश्रमातल्या सेवकांनी वृद्ध लोकांची सकाळची नित्यकर्म पटापट आवरली.

आश्रमाच्या प्रांगणातच स्टेज लावले होते.

      बरोबर नऊ वाजता डॉक्टर पारीख सोबत डॉक्टर पाटील आले. हा आश्रम त्यांनी आपल्या दिवंगत आईच्या नावाने बांधला होता.

         आता एक  मोठा आश्रम मागच्या जागेत बांधून पूर्ण झाला होता त्याचे नामकरण आजच होणार होते.

     काही म्हातारे काठी टेकत टेकत व ज्यांना चालता येत नव्हते त्यांना व्हीलचेयर वरून बाहेर आणून बसविले.

    कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर पाटील यांनी  सर्व उपस्थितांचे स्वागत करुन  केली व नव्या आश्रमाचे नांव सुचवावे अशी विनंती केली. एक एक कागद देऊन त्यावर आपल्या पसंतीचे नाव लिहून कागद तिथल्या बॉक्समध्ये टाकावा, ज्याचे नांव योग्य वाटेल त्या सदस्याचा सत्कार करून त्याला शक्य असल्यास चार शब्द बोलावे असे सुचवले.

      उपस्थित सदस्यांनी सुचलेले नांव लिहून कागद बॉक्समध्ये टाकला.

        दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

 वृद्धांना जमतील असे एक मिनिट गेम व अंताक्षरी असे खेळ झाले मग जेवण, मधे थोडा ब्रेक आरामासाठी दिला.

    चार वाजता समापनाचा कार्यक्रम सुरू झाला. डॉक्टर पाटीलने माईकवर बोलायला सुरुवात केली.

     "उपस्थितांनी सुचवलेल्या नांवात एक नांव आश्रमासाठी अगदी योग्य वाटते आहे. ते आहे "वानप्रस्थ"आणि हे नांव सुचवले आहे, आपल्या आश्रमातल्या उत्साही सदस्य ऊषाताई पाठक यांनी. कृपया ऊषाताईंना स्टेजवर घेऊन यावे."

        ताईंना स्टेजवर आणताच बाकी सदस्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. डॉक्टर पाटीलनी ताईंना शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा बहुमान  केला व दोन शब्द बोलावे अशी विनंती केली.

             इतक्या लोकांसमोर  बोलायचे या विचारांनीच ताईंना घाबरायला झाले दोन मिनिट शांतपणे खुर्चीवर बसून मग त्यांनी बोलायला सुरुवात केली.

            सर्वप्रथम त्यांनी आश्रमाचे संस्थापक इतर सहयोगी व डॉक्टर साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले पुढे त्या म्हणाल्या "वानप्रस्थ" ही परिकल्पना पार जुनी अगदी ऋषी मुनी, राजे-महाराजे यांच्या काळातील आहे. ते आपली सांसारिक कर्तव्य पूर्ण पार पडल्यावर गृहस्थाश्रम सोडून उर्वरित आयुष्य रानावनात घालवत त्याला वानप्रस्थाश्रम असे म्हणतात त्याचप्रमाणे "वृद्धाश्रम" हेही त्याचेच आधुनिक स्वरूप आहे जिथे  आपली कर्तव्य पूर्ण करूनकुठल्या ही भावनिक बंधनात न गुंतता पूर्णत्वाला जायचे.

       असो मी काही कमी अधिक बोलले असल्यास क्षमा असावी,

 व आपण जो माझा बहुमान केला त्याबद्दल मी आभारी आहे " असे म्हणत ताई जागेवर बसल्या. कार्यक्रम संपल्याची सूचना देत संस्थापकांनी सर्वांचे आभार मानले.

       रात्री बिछान्यात पडल्यावर ताई विचार करत होत्या. डॉक्टर पाटीलनी त्यांचे कौतुक 'सकारात्मक विचारसरणीच्या' ह्या शब्दात केली, ही सकारात्मकता त्यांच्यामध्ये कशी व केव्हा आली?

        वार्‍याच्या झोताने जशी पुस्तकाची पाने पलटतात तसे त्यांचे मन ही आयुष्याच्या पहिल्या पानांवर स्थिरावले.

        चारचौघांसारखे त्यांचे जग होते. माहेरी तीन बहिणी मधली ऊषा, बी.ए. झाली नी सुधाकर रावांशी त्यांचे लग्न झाले. कॉटन मिल मध्ये नोकरी राहायला क्वार्टर मध्यमवर्गी परिवार , एक मुलगा गिरीश व मुलगी नेहा असे चौकोनी कुटुंब. मुले अभ्यासात हुशार पण गांव लहान असल्यामुळे  उच्च शिक्षणासाठी महानगरात हॉस्टेलमध्ये ठेवले. गिरीश इंजिनीयर तर नेहा डॉक्टर झाली. गिरीशला पुण्याला नोकरी लागली. नेहाचे पण लग्न झाले ती नवऱ्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाली.

        सर्व कसे अगदी दृष्ट लागेल असे होते . काही वर्षाने सुधाकरराव   रिटायर झाले . गिरीश आग्रहाने त्यांना  पुण्याला घेऊन गेला व ते दोघे तिथेच स्थायिक झाले.

     ऊषाताई व सुधाकर राव दोघांनाही पुणे खूप आवडले. लवकरच गिरीशचे ही लग्न झाले सुन ही उच्चशिक्षित मिळाली. सर्व छान मनासारखे चालले होते , पण थोड्याच दिवसात गिरीशला कंपनीतर्फे जर्मनीला नोकरीचे ऑफर आले . कंपनी छान होती पैसाही खूप देणार म्हणून त्याने ती स्वीकारली तो व त्याची बायको दोघे जर्मनीला गेली ती कायमचीच...

        आता पुण्यात ऊषाताई व सुधाकर राव दोघच राहत. पण तरीही सर्व छान चालले होते, पुणे त्यांच्या अंगवळणी पडले होते. काही समवयस्क मित्र-मैत्रिणी झाल्या होत्या, त्यांच्यात ते मिसळत त्यामुळे त्यांना करमत असे एक-दोनदा ते जर्मनीला गिरीशकडे राहूनही आले पण तिथले हवामान राहणीमान त्यांना फारसे सोसले नाही. तेव्हा चार महिन्यांनी ते पुण्यात परत आले असेच एकदा नेहाने पण आग्रहाने अमेरिकेची वारी घडवली डॉक्टर असल्यामुळे ती कामात व्यस्त त्यामुळे थोडे फिरून ते परत पुण्यात परतले.

         इथे त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. त्यात ते आनंदात होते वयानुसार थोडेफार तब्येतीचे त्रास सोडता सर्व छान चालले होते. पैशांचीही काळजी नव्हती सर्व कामाला बाई ठेवली होती मधून मधून मुले ही येऊन जात असत.

असे सर्व छान चालले असताना एक दिवस सुधाकररावांना हार्ट अटॅक आला दोन दिवस दवाखान्यात होते, सर्व औषध उपचार करूनही काही फायदा झाला नाही. ऊषाताईंना एकटं सोडून ते गेलेच. मुले दोन दिवसांनी पोहोचली अचानक असे झाल्याने ऊषाताईंना खूप मोठा धक्का बसला त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. मुले फार दिवस सुट्टी घेऊन राहू शकत नव्हती. तेरा दिवसांत नातेवाईक आले आणि गेलेही, ऊषा ताईंच्या बहिणीने त्यांच्यासोबत चल म्हणून आग्रहही केला पण त्याही आपल्या मुला- सुनांच्या संसारात, त्यामुळे तिथेही किती दिवस रहाणार? पण ऊषाताई अजून सावरल्या नव्हत्या . त्यांचे मन कशातच रमत नव्हते. एकटेपणाच्या कल्पनेने त्या भांबावून गेल्या होत्या. सर्व पाहुणे  गेले तेव्हा गिरीशने त्यांना आपल्याबरोबर किंवा नेहासोबत राहतेस का असे विचारले पण त्यांनी नकार दिला .

           मुलांना आपली नोकरी सोडून परत फिरणे शक्य नव्हते. तेव्हा मग शेवटचा पर्याय म्हणून तू इथे पुण्यातच चांगल्या वृद्धाश्रमात राहशील का, मी विचारपूस करतो, असे गिरीशने विचारताऊषा ताईंना  एक आणखीनच धक्का बसला. स्वतःचे घर मुले असता वृद्धाश्रमात नीराश्रिता सारखे राहायचे या कल्पनेने त्यांचे डिप्रेशन आणखीनच वाढले त्या सैरभैर झाल्या.

      आठ दिवसांनी त्यांची सोय ह्या वृद्धाश्रमात करून मुले आपल्या मार्गी गेलीं.

         या नव्या वातावरणात ऊषाताई आणखीनच घाबरल्या, नवे नवे अनोळखी चेहरे, त्या दिवसभर खोलीतच पडुन रहायच्या. आश्रमातले डॉक्टर पारीख नियमित तपासून जात. औषध पाणी सर्व व नीट होते, पण त्यांचा आजार शरीराचा नसून मनाचा होता.

       एक दिवस डॉक्टर पारिख सोबत एक तरुण मुलगी होती, वय साधारण तीस-पस्तीस, या मनोरोगतज्ञ डॉक्टर साधना साने, --असे डॉक्टर पारिखनी सांगितले.

        डॉक्टर साधना आली ती बागेतल्या फुलांचा सुंदर गुच्छ घेऊनच. तिने ती फुले टेबल वरच्या ग्लासमध्ये सजवली. फुलांच्या सुगंधाने ऊषा ताईंच्या मनाला एक तरतरी आली , चेहऱ्यावर हलकासा आनंद दिसू लागला .

 मग आठवड्यातून दोन वेळा डॉक्टर साधना येऊ लागली. तिच्याशी बोलताना ऊषाताईंना ती नेहासम वाटायची, मग त्या तिच्याशी छान बोलायच्या.

 एक दिवस डॉक्टर साधनासोबत तिचा मुलगा साधारण दोन ते तीन वर्षाचा असावा,  होता. त्यानेही 'नमस्ते आजी 'असे बोबड्या स्वरात म्हटले तसे ऊषाताईंनी त्याला मांडीत घेऊन प्रेमाने पप्पी घेतली व व कुठे निघाली स्वारी अशी विचारणा केली.

'याला क्रॅश मध्ये सोडून मी क्लिनिक मध्ये जाते.'

    '......अग बाई पण हा तर खूप लहान आहे ग!!

"हो ना -पण ,ह्याला घरी पाहणारे कोणी नाही ना! म्हणून ही सोय , होईल हळूहळू सवय त्याला. लहान मुले लवकर ॲडजस्ट होतात."

डॉक्टर साधना भेटून गेल्यावर ऊषा ताईंना जाणवले लहान मुलांचे मन निरागस असते म्हणूनच ते वातावरणाशी लवकर जुळवून घेतात पण तेच मोठ्या वयात कां नाही जमत ?मन इतके का हट्टी होते?

मग त्या बराच वेळ त्याच विचारात गुंतल्या.

            डॉक्टर साधनाच्या समुपदेशाने ऊषाताई हळूहळू आश्रमाच्या वातावरणात रमू लागल्या त्यांनी इथल्या लोकांशी ओळख करायला सुरुवात केली.

आश्रमाचे संस्थापक सानेसाहेब, पुरुष कर्मचारी रमेश, गणेश महिलांमध्ये श्यामा ,पुष्पा. एक-दोन स्वयंपाकी ,एक माळी. 

      आजूबाजूंच्या खोल्यांमध्ये त्यांच्याच प्रमाणे कमीअधिक वयाचे स्त्री-पुरुष काही एकटे, तर काही जोडपे. सर्वांच्याच कथा थोड्याफार फरकाने सारख्याच. कुणाचे मुलांशी पटत नव्हते, तर काहींची मुले बाहेरच्या देशात असल्याने. एक गृहस्थ या वयात घरातील गोंधळ सहन होत नसल्याने इथल्या या शांत वातावरणात येऊन राहिले काही जोडप्यांनी या वयात एकट राहण्यात जीवाला धोका म्हणून,

अशी अनेक कारणे प्रत्येकाची होती.

      डॉक्टर साधना त्यांना हेच समजावत असे मुले परदेशी असणाऱ्या पालकांनी खूप वय वाढायच्या आधीच निर्णय घ्यायला हवा .एक तर आपण स्वतः मुलांजवळ राहायला जावे म्हणजे तिथले राहणीमान हवामानाची सवय होते व आपण तिथे ऍडजेस्ट होतो किंवा, जर मुलांजवळ रहाणे शक्य नसले तर म्हातारपणी वृद्धाश्रम हाच पर्याय असे मानावे.

   ताईंना डॉक्टर साधनाचे म्हणणे पटत असे. पण तरीही कधीकधी त्या आलेल्या प्रसंगाने दुःखी होत असत.

       वृद्धाश्रमाची दिनचर्या बरीच नियमित असे. सकाळचे नित्यकर्म झाले की प्रार्थनासभेत प्रार्थना होत .त्यानंतर वय व शारीरिक क्षमतेनुसार ध्यान, प्राणायम, योग असे व्यायाम होत. तिथले कर्मचारी मालिश व स्नानादि मध्ये मदत करत. मग नाश्ता झाला की कोणी पेपर वाचन किंवा टीव्ही पाहत, काहीजण गप्पा मारत त्यातून जुन्या आठवणी व स्वानुभव कळायचे.

              महिन्यातून एकदा नातेवाईकांना भेटायची परवानगी असायची, पण इथे राहणाऱ्या वृद्धांचे फारच कमी नातेवाईक यायचे .असे कोणी आले की ऊषा ताईंना आपल्या मुलांची आठवण यायची, मग त्या  मुलांचे, नातवांचे  फोटो पाहत.

असेच एक दिवस त्या फोटो पाहत असताना त्यांना आठवले की काल आपल्या मुलीचा नेहाचा वाढदिवस होता आता त्यांना नेहाशी बोलावेसे वाटू लागले यामधल्या वर्षभरात त्यांनी मुलांशी अबोला धरला होता त्या आश्रमाच्या संचालक सानें कडे गेल्या व नेहाचा नंबर मागू लागल्या. साने साहेबांना खूप आनंद झाला. त्यांनी ताईंना सांगितले 

    'तुमची दोन्ही मुले नियमित तुमची विचारपूस करतात हो, पण तुमची इच्छा नसल्याने.…..' असो ,

ताईंनी नेहाला फोन लावला फोनवर त्या भरभरून बोलल्या नंतर त्यांनी गिरीशलाही फोन लावला.  गिरीशने त्यांना व्हिडिओ कॉल लावला. मुले व्हिडिओ वर का होईना पण दिसली पाहून ताईंना खूप खूप बरे वाटले.

हळू हळू त्यांच्या स्वभावात बदल होतगेला .आयुष्याकडे पाहण्याचा, ते जगण्याचा दृष्टिकोन  बदलला.

परदेशात राहणाऱ्या  मुलांनाही आपल्या आईवडिलांची खूप काळजी असते पण त्यांच्याही काही अडचणी असतात. तेव्हा  आपण जिथे आहोत तिथे आनंदाने राहिलो तर मुलेही निसंग मनाने आपले आयुष्य जगतील. नाहीतर त्यांच्या मनात कुठेतरी अपराधी भाव जागेल आणि आपण जेव्हा हे जग सोडून जाऊ तेव्हा त्यांना तो मनात सलत राहील.

      मनाचे दुःख कमी होताच शरीर ही साथ देऊ लागले. त्यांनी पुण्याचे घर विकून आलेल्या पैशातून काही देणगी आश्रमाला द्यावी असे मुलांना सुचवले.

आश्रम हेच आता आपले घर असे मानून ताई इतरांशी आपलेपणाने वागू लागल्या त्यामुळे त्या प्रेमळ व आदरणीय झाल्या. नव्या येणाऱ्या सदस्यांना ही भावनिक गरज असते ती समजून त्यांच्या दुःखावर प्रेमाचा उपचार करू लागल्या. म्हणूनच डॉक्टर पारीख नी त्यांना "सकारात्मक विचारसरणीच्या सदस्या"असा बहुमान दिला. हे सर्व कौतुक आता ताईंना मुलांना सांगायचे होते.आता त्यांना सकाळ कधी होते असे झाले होते.

-----------------------------------------

लेखन. सौ प्रतिभा परांजपे

वरील कथा सौ प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post