नशीब

  नशीब 

✍️सौ. नेहा उजाळे

          "जरा थोडं बोलायचंय तुझ्याशी". मिहिरने रोहिणीला ऑफिसच्या गेटपाशीच अडविले.

       "हा! बोल ना मिहीर, मला माहिती आहे तुला काय सांगायचंय. तरीपण बोल."

         "या ऑफिसमध्ये आता माझे काही दिवसच उरले आहेत. माझा एक वर्षाचा करार संपत आला आहे. मी आता जॉबसाठी परदेशी जाईन. एक वर्ष होत आलं मी पूजाला लग्नाबद्दल आडून विचारलं, थेट विचारलं तरी ती अजूनही विषय टाळते. मला काहीच समजतं नाही ती अशी का वागते? कदाचित तुला काही माहीत असेल, तू तिला गेली दोन वर्षे ओळखतेस, आणि चांगली मैत्री पण आहे तुमची. तिच्या मनात नक्की काय आहे हे तुझ्याशिवाय कोणीच जाणून घेऊ शकणार नाही. मला तुझी मदत पाहिजे रोहिणी. कधी वाटतं की पूजाला माझ्याविषयी काहीतरी वाटतं असेल तर कधी वाटतं ती नुसती एक मित्र म्हणून मला पहात असेल. बरं तिचं दुसऱ्या कोणाशी प्रेम वगैरे पण नाही. मग ती मला होकार का देत नाही अजून. मला काहीच समजेनासे झालं आहे." मिहिर रोहिणीसमोर मोठ्या आशेने व्यक्त झाला.

          "हो अरे, मी देखील तू या ऑफिसमध्ये येण्याच्या आधीपासून तिला लग्नाबद्दल विचारते आहे. माझ्या मिस्टरांनी देखील एक मुलगा सुचवलेला तिला पण तेव्हा देखील ती नाही म्हणाली. कारण विचारले तर गप्प तरी बसते नाहीतर विषय तरी टाळते. ती तिचं मन व्यक्तच करत नाही. आता मीदेखील तिला काही विचारत नाही ,कारण तिला काही विचारलं तर तिचे डोळे बोलून जातात की ती आतून दुःखी आहे. ती तिच्या आईसोबत रहाते. तिच्या आईने देखील मला एकदोनदा तिला लग्नासाठी तयार कर असे बोललेली. ती माऊली तरी काय करणार? तू काळजी करू नकोस मिहीर. मी पूजाशी बोलते. उद्या तसाही रविवार आहे. मी तिला भेटून बोलेन." रोहिणीने मिहिरला आश्वासन दिले.

            रोहिणीने रात्री पूजाला फोन लावला,"पूजा,उद्या दुपारी आपण बाहेर जाऊया.थोडं शॉपिंग करायचं होतं, नेमका सुनील पण नाही आहे. हॉटेल मध्ये जेऊया पहिलं. मग भटकंती करू. येशील ना?"

          "हो येते मी. आईला तसं सांगते. चल बाय."

           रोहिणीने सांगितलेल्या हॉटेलमध्ये पूजा पोहचली.रोहिणी तिच्या आधी पाच मिनिटे येऊन तिची वाट पाहत होती.

          "ये ग बाई, मला वाटले येतेस की नाही ?"  रोहिणी थट्टेच्या सुरात बोलली.

         "तू बोलावलस आणि मी येणार नाही असं होईल का?" पूजाने प्रश्नार्थक चंबू करून विचारले.

           "किती गोड दिसतेस ग,जेव्हा असा चंबू करतेस. आपण पहिली खाण्याची ऑर्डर देऊया. खाणे येईपर्यंत मस्त गप्पा हाणूया."

          "हे बघ पूजा, मी सरळ विषयालाच हात घालते. मिहीर इतका छान मुलगा आहे तरी त्याला का नाकारते आहेस? त्याचे आता आपल्या ऑफिसमध्ये देखील कमी दिवस उरले आहेत. आता तो परदेशी जाईल. तुझ्यावर त्याचं किती प्रेम आहे हे तू देखील जाणतेस. तरी तू अशी का वागतेस मला खरंच समजतं नाही. तू जर काही सांगितले नाहीस तर कसं कळणार तुझ्या मनातलं? मी तुझी चांगली मैत्रीण आहे मला देखील तू कधीच काही सांगितले नाहीस. आता मात्र तुला सगळं सांगाव लागेल. तुला माझी शपथ आहे." रोहिणी भावनाविवश झाली.

             पुजाचे डोळे भरून आले. तिने एक सुस्कारा सोडला. " तुला जाणून घ्यायचं आहे ना रोहिणी मी मिहिरला का नाही बोलते मग ऐक."

              " दहावीची परीक्षा उत्कृष्ट मार्कानी पास झाले आणि माझे वडील अचानक हार्ट अटॅक येऊन आम्हाला सोडून गेले. दादा नुकताच पदवीधर झाला होता. त्याला पुढे शिकायचे होते पण वडिलांच्या अचानक जाण्याने त्याने नोकरी करायचे ठरविले. आई त्याला समजावत होती की, बाबांनी आपल्या पुढच्या आयुष्यासाठी पुंजी ठेवली आहे तू पुढे शिक पण दादाने ऐकले नाही आणि आईला बोलला ह्या शेंडफळाला शिकवूया चांगलं. दादाने आणि आईने मला कसलीच उणीव भासू दिली नाही. मी मानसशास्त्र विषय घेऊन शेवटच्या वर्षीची परीक्षा दिली. आई दादासाठी मुलगी बघत होती. दादाने आईला सांगून ठेवलेले की, काळी सावळी असली तरी चालेल पण तिने आपलं घर प्रेमाने बांधून ठेवले पाहिजे.

            माझा पदवी परीक्षेचा निकाल लागला मी प्रथम श्रेणी मध्ये कॉलेजमधून पहिली आले. दादा आणि आईच्या खुशीला पारावार उरला नव्हता आणि संध्याकाळीच दादासाठी माधवी वहिनीचे स्थळ सांगून आले.ती नावाप्रमाणेच खूप गोड आणि सुंदर होती.दादाने तिला पाहताक्षणीच पसंत केले.

त्या दिवशी आमच्याकडे दोन चांगल्या गोष्टी घडलेल्या त्यामुळे आम्ही सगळे खूप खुश होतो.

दादाचा साखरपुडा पण छान पार पडला. वहिनीचा मामेभाऊ समीर कार्यक्रमासाठी आलेला.

मला पाहून माझ्या अवतीभवती रुंजी घालू लागला. दादा, आईच्या हे लक्षात लगेच आले. दादाने मला लगेच चिडवायला सुरवात केली. आईला बोलला, आई आता हीच पण ठरवून टाकू लग्नं.

               मला देखील समीर एका नजरेतच आवडलेला. आई म्हणाली तुझं लग्न उरकलं की हिची बोलणी करू.

                वहिनी पण खुश होती तिला दोन्हीकडून मान मिळणार होता.

                दादाच्या लग्नात समीर माझा भावी नवरा होणार आहे हे सर्वांनाच समजले. दादाचे लग्न खूप छान पार पडले.

            समीरच्या घरी पण मी पसंत होते. आमचे रोज भेटणे होत होते. समीर C.A. झाला होता आणि मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करत होता. मी तर हुरळूनच गेलेले इतका छान नवरा मला लाभणार होता.

समीर मला बोलायचा की तू इतक्यात नोकरी नाही केलीस तरी चालेल पण पुढे शिक.

                मला पण शिक्षणाची आवड होतीच.

आमच्या लग्नाची बोलणी दोन्ही घरच्यांनी सुरू केली. मला अजूनही सार स्वप्नवत वाटतं होतं. आमचा साखरपुडा दणक्यात पार पडला. लग्नाची तारीख ठरली.

लग्नासाठी खरेदी सुरू झाली. वहिनी पण उत्साहाने सगळं करत होती. मंगळसूत्राची ऑर्डर माझ्या आवडीनुसार दिली. दहा दिवसांत मंगळसूत्र मिळणार होते.

            समीर आणि माझी भेट ह्या ना त्या कारणाने रोज होतंच होती. सगळं काही आलबेल होते.

ज्या दिवशी मंगळसूत्र मिळणार होते त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे समीर ऑफिसला गेला. त्याला नेहमीपेक्षा खूप घाम आलेला. एका मित्राकडे प्यायला पाणी मागितले आणि डेस्क वर डोके ठेऊन त्याने डोळे मिटले ते कायमचेच. हार्ट फेल झाले होते त्याचे. त्याचा मित्र पाणी घेऊन त्याच्या जवळ गेला तर तोंडातून फेस आलेला त्याच्या. हॉस्पिटलमध्ये तातडीने घेऊन गेली त्याला ऑफिसमधली लोकं पण तो केव्हांच प्राण सोडून गेलेला.

            अचानक हा प्रसंग आम्हा सर्वांवर ओढवला. सर्वांवर जणू आभाळ कोसळले. घरी त्याचं शवं जमिनीवर ठेवलेलं. ज्याच्याबरोबर मी भावी आयुष्याची स्वप्ने बघत होते तोच असा निपचित होऊन पडलेला. मी तर एखादया पुतळ्यासारखी झालेले आणि तेवढ्यात सोनार मंगळसूत्र घेऊन आला तेव्हा मला माझे अश्रू थांबविता आले नाही. मी मोठ्यांदा हंबरडा फोडला. सगळ्यांचे काळीज पिळवटले पण नंतर मला अपशकुनी ठरवून समीरच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद झाले.

             वहिनी देखील नंतर मानसिक त्रास देऊ लागली. दादाला सर्व समजत होते पण वहिनीपुढे त्याचे काही चालत नव्हते. आईचा तर प्रचंड कोंडमारा होतं होता.

            मला देखील मुंबईमध्ये राहवेसे वाटत नव्हते कारण आमच्या भेटीच्या जागा त्याच्या आठवणीमध्ये भर घालत होत्या म्हणून मी आईला घेऊन इथे पुण्यात आले आणि मनाशीच ठरविले की कधी ह्यापुढे लग्नं करायचे नाही. सुख समोर उभे असून माझ्या वाट्याला नाही आले. जर माझ्या नशिबात सुखच नसेल तर दुसऱ्या कोणाचे आयुष्य मी का बरबाद करू ? एक प्रकारची धास्तीचं निर्माण झाली आहे माझ्या मनात. मिहीर मला पण आवडतो ग पण नको वाटत सगळं." रोहिणीला  सांगताना पूजाच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते.

            पूजाची कर्मकहाणी ऐकून रोहिणीचे काळीज हेलावले. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

रोहिणी बोलली, "अग पूजा ! किती तुझ्या जीवनात कठीण प्रसंग येऊन गेला. तरी तू धीराने आईला देखील संभाळतेस. अग, नेहमीच असे आपल्या जीवनात वाईट प्रसंग येत नाहीत. मिहिरच्या रूपाने तुला पुन्हा आयुष्य जगण्याचे निमित्त मिळाले आहे त्याचा स्वीकार कर. अजूनही वेळ गेलेली नाही. नीट विचार कर."

दोघींनी समोर आलेले खाणे बळजबरीने संपविले आणि जड मनाने घरी गेल्या.

        रोहिणीने मिहिरला भेटून पूजाची कहाणी सांगितली. मिहिरला खूप वाईट वाटले आणि पूजाला सुखी ठेवण्याचा निश्चय केला. त्याने तडक पूजाचे घरं गाठले आणि तिच्या आईसमोर पूजाला मागणी घातली.

"पूजा ! मला सर्व काही रोहिणीकडून समजले आहे आणि तू असं समजू नकोस परत तशाच गोष्टी घडतील. माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. मी तुझ्या कायम पाठीशी असेनच. अग मला तुझ्यासाठी भरपूर आयुष्य देऊन पाठवलंय देवाने. नेहमीच नशीब आपल्यावर रुसत नसतं. तुला मी कायम सुखी ठेवेन. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा?"

            मिहिरने प्रेमाने हात पुढे केला. पूजानेही त्याच्या हातात मोठया विश्वासाने हात दिला. दोघांना गहिवरून आले.

          पूजाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि तिने दोघांची मिठमोहरीने दृष्ट काढली. दोघांना भरभरून सुखी भावी आयुष्यासाठी आशिर्वाद दिला.

( समाप्त )

✍️ सौ. नेहा उजाळे

वरील कथा नेहा उजाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post