उपरती

 उपरती!

✍️ श्री. संभाजी बबन गायके 

बैलबाजारात एकही जोडी विश्वनाथला पसंत पडत नव्हती. जी पसंत पडत होती ती विश्वनाथच्या खिशाला परवडणारी नव्हती.विश्वानाथचे वडील सोपानराव वारल्याच्या एका वर्षात भावा-भावांच्यात शेती,घरदाराच्या वाटण्या झाल्या. घरी एक बैलजोडी होती, त्यातला एक बैल निशान्या पार म्हातारा झाला होता म्हणून विश्वनाथने त्याच्या वाट्याला आलेला हा बैल भावालाच ठेव म्हणून सांगितले होते. नांगरटीचा हंगाम जवळ आल्यावर विश्वनाथने तालुक्याच्या बैलबाजारात बैलजोडी विकत घेण्यासाठी चक्कर टाकली. 

सोपानराव गावात एक सांप्रदायिक वारकरी म्हणून प्रसिद्ध होते,पण त्यांच्या दोन मुलांपैकी म्हणजे वसंत आणि विश्वनाथपैकी विश्वनाथ चुकीच्या मार्गाला लागला, जणू तुळशीत भांग उगवावी! तसा विश्वनाथ इतरांशी वागायला,बोलायला बरा होता पण दारूची नशा चढल्यावर तो कुणाचा राहत नसे. बायकोला विनाकारण झोडपून काढणे त्याचे नित्याचेच. शेतातल्या कामातही काही तो फार लक्ष घालत असे असेही नव्हते. गावातल्या टुकारांसोबत पारावर बसून चिलीम ओढत बसण्यात त्याचा बराचसा वेळ जाई. सोपानरावही त्याला वैतागले होते. आपल्या माघारी विश्वनाथचे,त्याच्या बायको-मुलांचं कसं होणार ही चिंता त्यांना होतीच. “मी मेल्यावर विश्वनाथचा वाटा त्याच्या त्याला देऊन टाक” असे सोपानरावांनी वसंतला बजावून सांगितले होते. आणि वसंताने तसेच केले. 

विश्वनाथला बाजारात एक म्हातारा आपली बैलजोडी घेऊन येताना नजरेस पडला तसा तो धावतच त्याच्याकडे गेला. दोन्ही बैलं अंगानं मजबूत होती. “का आणली एवढी देखाणी जोडी विकायला?” विश्वनाथने त्या म्हातारबाबांना विचारलं. कपाळावर गोपीचंदनाचा टीळा, गळ्यात मोठी तुळशीची माळ, डोळ्यांवर जुनाट चष्मा असलेले ते आजोबा म्हणाले,”एकच लेक होता, तो गमावला आजारानं. आता माझीही ताकद नाही राहिली,बैल जुंपायची रानात. लेकाची बायको आणि पोरं निघून गेली त्यांच्या मामाकडे. आता ही बैलं ठेवून करू तरी काय? वैरणकाडी,पाणी पाजायला घरात माणसंच नाहीत तर जित्राबं ठेवून तरी काय उपयोग!” 

दलाल येण्याच्या आधीच विश्वनाथने बैलांचा सौदा केला आणि त्यांचा कासरा धरला. त्यांच्यावर गुलाल उधळला. तेवढ्यात त्यातला एक बैल,परधान्या त्याचं नाव, विश्वनाथवर गुरकला! “बाबा,मारकुटा आहे की काय हा बैल?” त्यानं म्हातारबाबाला विचारलं. “तसा नाही मारत कुणाला परधान्या,पण जनावर आहे. त्याच्या मनात काय चालतंय ते कळतंय होय आपल्याला?” 

विश्वनाथने बाजारात शिरतानाच कोप-यातल्या देशी दुकानात जाऊन दोन पेले दारू घशाखाली उतरवली होती. आता बैल घरी घेऊन जातानाही आणखी एखादी पावशेर पिण्याची त्याची इच्छा होतीच. 

म्हातारबाबांनी दोन्ही बैलांच्या गळ्यावरून,तोंडावरून मायेनं हात फिरवला. त्यांना थापटलं. “उमदी जोडी आहे. कामाला वाघ आणि चालण्याचा डौल मोरासारखा! नीट सांभाळा हे जीव” आणि डोळे पुशीत म्हातारबाबांनी मिळालेले पैसे कोपरीच्या खिशात काळजीपूर्वक ठेवले आणि ते माघारी फिरले. 

विश्वनाथने बैलांचे कासरे घट्ट हाती धरले...आणि त्याच अवस्थेतच दारू दुकानच्या बाहेर उभे राहून मद्याचा एक आणखी प्याला तोंडाला लावला. मुकी जनावरं आता दुस-याच्या ताब्यात होती. तो नेईल तिकडं जाण्याशिवाय त्यांच्या हाती होतं तरी काय? 

झुलत-डुलत विश्वनाथ गावी परतला. तोवर संध्याकाळचे पाच वाजलेले होते. पारावरच्या त्याच्या दोस्तांनी नवी बैलजोडी विकत आणली म्हणून त्याच्याकडून भेळभत्ता,चहा आणि चिलीमीचा एक बार वसूल केला. विश्वनाथ घराच्या अंगणात आला. त्याची बायको आणि मुलं बाहेर आली. विश्वनाथकडे न बघताच त्याच्या बायकोनं बैलांना ओवळलं,त्यांच्याभोवती भाकरतुकडा ओवाळून टाकला,त्यांच्या तोंडात गव्हाच्या पोळीचा घास घातला आणि विश्वनाथच्या मुलाने जोडी गोठ्यात नेऊन बांधली. परधान्याच्या जोडीदाराचं नाव होतं लख्या. हा मात्र एकदम शांत, वाट्याला आलेलं आयुष्याचं जू मानेवर घेऊन जगण्याचे दिवस संपवत असलेला मुका जीव. आधीच्या घरातून या नव्य घरात आल्यानं दोन्ही जनावरं भांबावलेली होती.

दुसरे दिवशी शेतात जुपी करायची ठरली. विश्वनाथने नांगर-फाळ उचलला आणि तो शेतात शिरला. त्याचाच एक चिलीमवाला जोडीदार त्यानं रोजावर मदतीला सोबत आणलेला होता. दोघेही सकाळी सकाळीही मद्यपान करायला सरावलेले होते. विश्वनाथ आणि त्याने मिळून लख्याला औताला जुंपला. परधान्याला जुंपताना कसं काय झालं कुणास ठाऊक, विश्वनाथ हवेत तीनताड फेकला गेला आणि पलीकडच्या वावरात दाणकन आदळला. माती असल्याने त्याला जखमा नाही झाल्या पण मुका मार मात्र जबर बसला असावा. विश्वनाथ ओरडत,शिव्या देत कसाबसा उठला. परधान्याने विश्वनाथला आपल्या शिंगावर उचलून वर उडवले होते जोरात. लख्या मात्र काहीच झाले नाही अशा आविर्भावत औताला मान देऊन उभा होता. विश्वनाथच्या पापी पित्तर जोडीदाराने कासरा ओढून परधान्याला कसंबसं धरून ठेवलं होतं म्हणून ठीक. अन्यथा परधान्या काही तिथं थांबला नसता. विश्वनाथ अंग झटकून आला. त्यानं बांधावरच्या झाडाचा ओला फोक तोडून हाती घेतला. रागारागाने परधान्याच्या पायांवर मारून त्याला जमिनीवर आडवा केला. त्याचे चारही पाय कास-यानं गच्च आवळून बांधले...नाल ठोकताना बांधतात तसे. परधान्या अजूनही धुमसतच होता. शिवारातली इतर माणसं,मजूर विश्वनाथचा आरडाओरडा ऐकून तिथं धावत आले होते. त्यांना पाहून तर विश्वनाथ अधिकच भडकला. त्याने आडव्या पडलेल्या त्य असाहाय्य जनावराला हातातल्या ओल्या फोकाने बडवायला सुरूवात केली. एवढी जाड कातडी असूनही तिच्यावर सटासटा वळ उठताना दिसत होते आणि ते बघून आसपास उभी असलेली माणसं हळहळत होती. “अरे, नको मारू एवढं...जनावर आहे ते..त्याला काही कळतंय होय?” कुणी ज्येष्ठाने म्हटल्यावर विश्वनाथ त्यांच्यावरच धावला...”मग जा घेऊन हा तुम्हांला!” ज्येष्ठ शेतकरी मागे सरले. पुढील कितीतरी वेळ परधान्या मार खात होता. हात पाय झाडीत होता. विश्वनाथ तिथेच उभ्या असलेल्या औतक-याच्या हातातला चाबूक घेऊन परधान्यावर वेड लागल्यासारखे फटके द्यायला सुरूवात केली...कारण त्याच्या हातातला लाकडी फोक तुटून गेला होता. परधान्याच्या तोंडला फेस आलेला होता, त्याचे डोळे जणू उलटेच झालेले होते, डोळ्यांची बुब्बळे पांढरी फटक पडलेली होती. वेदना ओरडून व्यक्त करण्याची शक्तीच परधान्याच्या कुडीत नव्हती. तो निपचित पडून मार सहन करीत होता. विश्वनाथची बायको कुणीतरी निरोप आणला म्हणून शेतात धावत आली. विश्वनाथ काही शुद्धीत नव्हता. तिने त्याला हाताला धरून घराकडे चालवला. कुणीतरी परधान्याचे पाय सोडले..परधान्या थरथरत आणि लटलटत्या पायांनी कसबसा उभा राहिला. कोणत्या जन्मातल्या पापाची फळे हा जीव भोगत होता कुणास ठाऊक! परधान्याला आधीच्या प्रेमळ मालकाची आठवण येत असेल का..कोण जाणे? 

त्यादिवशीची नांगरणी झालीच नाही. विश्वनाथ दिवसभर नशेत पडून राहिला. परधान्याला शिव्या देणे काही थांबले नव्हते. दुसरे दिवशी दारू उतरल्यावर विशनाथ वैरण घेऊन गोठ्यात शिरताच...परधान्या उठून उभा राहिला...थरथरत,कांपत! त्याच्या डोळ्यांत कालचा मार स्पष्ट दिसत होता. विश्वनाथने त्याच्या पुढे वैरण टाकली...पण परधान्या त्याला तोंड लावीना. खाली,इकडे तिकडे बघत तर कधी विश्वनाथकडे बघत तो जीव वेडेवाकडे हलत होता. मागे सरत होता, वेसण त्याच्या नाकपुड्यांना काचते आहे, याचेही त्याला भान नव्हते. “खा, नाहीतर मर. मला मारतो....तुझ्या मालकाला मारतोस....” असं बडबडत विश्वनाथ घरात निघून गेला. आता आंघोळ उरकून गावात जायचं आणि हातभट्टीचा गल्लास मारून यायचा त्याचा विचार होताच नेहमीसारखाच. त्यानं आंघोळ उरकली आणि घरातल्या देवडीपाशी गेला. तिथं केसाला लावायच्या तेलाची बाटली असते. त्या देवडीच्या वरच भिंतीवर खिळा ठोकून कै.सोपानरावांची एक तसबीर टांगून ठेवली होती विश्वनाथच्या बायकोने. तसबीरीसमोर एक फळकूट ठोकून ठेवलेले आणि त्यावर निरांजन पेटवून ठेवलेली होती. उदबत्तीही लावलेली होती बटाट्याच्या कापावर खोचून. तसबीरीवरच्या बाजूला सोपानरावांची तुळशीमाळ अडकवलेली होती, त्यांची आठवण म्हणून. “आज एकादशी. बापाच्या फोटोला हात जोडून तरी जा की घराबाहेर! त्यांचं नाव राखता नाही आलं तरी ते घालवू तरी नका!” विश्वनाथने बायकोच्या बोलण्याकडे आज पहिल्यांदा इतकं लक्ष दिलं. त्याने डोळे झाकले आणि बापाच्या तसबीरीला हात जोडले...बापाच्या फोटोतल्या का असेना पण डोळ्याला डोळा भिडवण्याची त्याची शुद्धीत असताना तरी हिंम्मत नव्हती. तसबीरीच्या वरच्या बाजूला अडकवलेली तुळशीमाळ कशी कुणास ठाऊक वरून निसटली आणि समोर हात जोडून उभ्या असलेल्या विश्वनाथच्या जोडलेल्या हातांमध्ये अलगद पडली. वीजेचा झटका बसावा तसा विश्वनाथने डोळे उघडले. क्षणार्धात त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. त्याने ती माळ आपल्या माथ्याला लावली आणि घराच्या बाहेर पडला. गावातल्या पाराजवळच वडाप गाडी उभी होती. देहू गावातून आठ-दहा मैलांच्या अंतरावर होती. वडापमधल्या माणसांना विश्वनाथची स्वारी आज कुठं निघाली असेल असा प्रश्न पडला. वाटेतच एखाद्या दारूगुत्त्यावर हे शीट उतरणार डुलतडुलत पायीच माघारी फिरणार असे त्यांना खात्रीने वाटत होते. कारण गावातल्या हातभट्टीवर रात्रीच पोलिसांची धाड पडलेली सर्व गावाला माहित पडले होते...दारूड्यांना तर ही खबर होतीच. विश्वनाथ थेट देहूफाट्यावर उतरला. तुकोबारायांच्या मंदिरात पोहोचला..आज तशी मोठी बारी होती दर्शनाला. विश्वनाथ सावकाश चालत गाभा-यात पोहोचला. हातातली तुळशीमाळ कलत्या मानेने भक्तांकडे पाहणा-या पांडुरंगाच्या चरणावर ठेवली आणि आपल्या हातांनीच आपल्या गळ्यात घातली. मंदिरातल्या सेवेक-याने विश्वनाथच्या भाळी अबीर रेखला. विश्वनाथ शांतचित्ताने देऊळवाड्याबाहेर आला. आषाढीची तयारी सुरू होती देऊळवाड्यात. तुकोबारायांच्या रथाला जोडण्यासाठी आपलीच बैलजोडी निवडली जावी, असा परिसरातील शेतकरी बांधवांचा प्रयत्न असतो. यंदाच्या नाही, पण पुढल्या वारीला पालखी रथाला आपलीच लखू-परधान्याची जोडी असणार असा निश्चय आणि तुकोबारायांना तशी मनोमन प्रार्थना करून विश्वनाथ घरी परतला. आज त्याला भूकही नव्हती. आपोआपच एकादशी घडणार होती. पण त्याने पेढ्यांचा पावशेर प्रसाद बांधून घेतला दुकानातून. त्याला घरी परतायला संध्याकाळ झाली. घरात आला तसा विश्वनाथ थेट गोठ्यात शिरला. लखू उभाच होता पण परधान्या डोळे मिटून बसून होता. त्याच्या पुढ्यातला हिरवा चारा तसाच पडून होता. “परधान्या!” विश्वनाथची हाक ऐकून परधान्या गडबडून उठून उभा राहिला...सर्वांगी थरथरत..त्याच्या डोळ्यांखाली ओघळलेल्या पाण्याचे ओघळ आता सुकलेले होते ! विश्वनाथ त्याच्या जवळ गेला... त्याच्या माथ्यावर हलकेच हात ठेवला...त्याच्या गळ्याला खाजवलं. परधान्याच्या डोळ्यांत आता चमक आलेली दिसली. विश्वनाथने परधान्याला पेढ्यांचा गोड घास भरवला आणि विश्वनाथ परधान्याच्या मस्तकावर आपले मस्तक ठेवून लहान मुलासारखा रडू लागला. ते मुकं जनावरही शहाण्या मुलासारखं शांत उभे राहिले... त्याच्या गळ्यातल्या घुंघरांचा आवाज आता गोड भासत होता. आपल्या या नव्या धन्याचे आपल्या जीभेने परधान्या जणू डोळेच पुसू पहात होता..या धन्याच्या तोंडाला आता दारूचा गंध नव्हता पण कपाळी मात्र गंध शोभून दिसत होता. “पुढल्या वर्षी आपण वारीला जायचं...परधान्या! तुम्ही दोघं तुकोबारायांच्या पालखीरथाला जुंपून आणि मी तुमच्या सोबतीनं चालणार! परधान्याने जणू सर्वकाही समजल्यासारखे खालून वर खाली मान हलवली आणि चा-याच्या गव्हाणीत तोंड घातले! गावातल्या विठ्ठलमंदिरातून हरिपाठाचा आवाज कानी येऊ लागला होता. 

(एका सत्यघटनेवर आधारीत. काही तपशील,नावे काल्पनिक.) 

✍️संभाजी बबन गायके


वरील कथा श्री. संभाजी बबन गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post