पहिली अंघोळ

 पहिली आंघोळ!

✍️ श्री. संभाजी बबन गायके


“पाय पुढं करा,दादा!” सभोवती रांगोळी काढलेल्या पाटावर बसलेल्या वामनरावांना त्यांची धाकटी सूनबाई,विद्या म्हणत होती. पासष्टी ओलांडलेले वामनराव आता सर्वांचे दादा आहेत. आज दिवाळीतली पहिली आंघोळ. वामनराव गावाहून काल रात्रीच शहरात राहणा-या त्यांच्या मुलाकडे,निलेशकडे आले होते...पहिल्यांदाच! निलेशनं त्यांच्या मर्जीविरूद्ध लग्न जमवलं होतं स्वत:चं म्हणून वामनराव खूप नाराज झाले होते. त्याला आता आठ वर्ष होऊन गेली होती. निलेशने नात्यातली चांगली स्थळं सोडून कुणाच्या तरी ओळखीतून अनाथाश्रमातील एका मुलीशी लग्न ठरवले हे गावात समजल्यावर वामनरावांना आपली इज्जत गेली अशी भावना झाली होती. तसं त्यांना गावात तोंडावर कुणी काही म्हणत नव्हतं पण लोकांच्या नजरा तसंच काहीबाही म्हणत आहेत, असं त्यांना आपलं उगीचच वाटे! वामनरावांच्या पत्नी,वत्सलाबाई आता हयात नाहीत. त्या नेहमी म्हणायच्या ‘लेक श्रीमंताघरी द्यावी आणि गरीबाघरची लेक सून करून घ्यावी”. त्यांनी आपली मुलगी खरोखरीच उत्तम सांपत्तिक स्थिती असलेल्या घरात दिली होती, त्यासाठी जमिनीचा एक मोठा तुकडा विकून पैसे उभे केले होते. थोरल्या लेकाचं, सुनीलचं लग्नही लेकीच्याच लग्नात जमलं. जावयाच्याच नात्यातली मुलगी मिळाली जरा मध्यम ऐपत असलेल्या घरची. त्यामुळे गरीबाघरची सून आणावी,ही त्यांचा विचार बाजूला राहिला होता.

निलेशने गरीबाचीच लेक केली. पण “आपल्या पाहुण्या-रावळ्यांत गरीबांची काय वानवा होती की काय? कोण,कुठली पोर? कोणत्या खानदानातली,कुण्या जाती-पातीची असेल कुणास ठाऊक! हे पोरगं शिकायला शहरात गेलं आणि कुणाच्या नादी लागलं काय माहीत!” वत्सलाबाई म्हणाल्या. त्यामुळे निलेशच्या लग्नात गावातलं कुणी नव्हतंच आणि वामनराव आणि वत्सलाबाईही अगदीच मुहूर्तावर हजर राहिल्या आणि लगोलग गावी परतल्या. निलेश आणि विद्या पाया पडायला आले तेंव्हा त्यांनी विद्याकडे एकदा पाहिले आणि ‘असू दे...असू दे...सुखाचं राहा’ असं वत्सलाबाई पुटपुटल्या.

त्यानंतर वामनराव निलेशकडे कधी आले नाहीत आणि त्यालाही कधी गावी बोलावले नाही. सूनबाईला आपलं खरं सासर कधी पहायलाही मिळालं नव्हतं आजवर. वत्सलाबाई निवर्तल्या आणि वामनराव गावी एकटे पडले. सुनील त्याच्या सासुरवाडीला रहायला गेला होता. त्याच्या बायकोचं आणि वत्सलाबाईंचं फारसं पटत नव्हतं. या सूनबाईंना नव-यानं गाव सोडून शहरात रहावं असं वाटायचं आणि सुनीलला ते पसंत नव्हतं. निलेश आधीच शहरात गेलाय मग इथं शेती आणि आई-वडीलांकडे कोण पाहणार असा त्याचा रास्त प्रश्न होता. पण मग नंतर त्याला बायकोच्या माहेरच्याचं ऐकावं लागलं, त्यांनी त्याला त्यांच्या गावी शेती अवजारांचं,खतांचं दुकान काढून दिलं आणि हा गडीही गेला बायकोमागं. त्याच्या दोन मुलांचा लळा होता वामनराव-वत्सलाबाई आजोबा-आजींना! तशी त्याची सासुरवाडी काही फार लांब नव्हती. सुनील यायचा आठवड्यात एखाद-दुसरा दिवस. मग नंतर त्याचं येणं-जाणं कमी कमी होत गेलं. त्यानं तिकडंच स्वतंत्र घर बांधलं. चला की माझ्याकडं राहायला. आता वयं होत चाललीत तुमची. शेत द्या खंडानं करायला तात्याच्या पोरांना अन चला.”

“सोय-याच्या गावात नको!” या सबबीखाली दोघंही गावीच राहिले. वत्सलाबाईंनी रेटता येईल तेवढा घरगाडा रेटला. लेक यायची अधूनमधून, पण तिलाही तिचा संसार होताच. वत्सलाबाईंचा मधूमेह लवकर लक्षात आला नाही. गावात तसा तो फारसा कुणाच्या लक्षातही येत नाही म्हणा! हा तर श्रीमंतांचा आजार...आम्हांला कशाला होतोय? पण यानेच वत्सलाबाई गेल्या!

आईच्या दिवसा-कार्याला निलेश आणि विद्या सगळी कामं बाजूला ठेवून आले, विद्यानं सर्व काही व्यवस्थित पार पाडलं. सुनीलची बायको, सुनील काही विद्याशी फारसं बोलले नाहीत. वामनरावांनाही त्यावेळी काही सुचलं नाही. दिवस निघून गेले!

वामनरावांची भाकर-तुकड्याची तशी त्यांच्या मोठ्या भावाच्या घरानं केली होतीच पण त्यात काही मजा नव्हती. वामनराव बहुतेकवेळा स्वत:च आपापलं जेवण बनवायचे आणि असेच दिवस चालले होते. वत्सलाबाई जाऊन आता आठवं वर्ष लागलं. दिवाळी आली. वत्सलाबाई होत्या तोवर दिवाळीतली साग्रसंगीत आंघोळ घालायच्या नव-याला भल्या पहाटे..छान चुलीवर पाणी तापवून..तेल,उटणं आणि त्यांच्या आवडीचे बुंदीचे लाडू...थरथरत्या हातांनी वळलेले! शेजा-या-पाजा-यांनी आणून दिलेलं लाडू वामनरावांच्या घशाखाली उतरत नसत.

निलेशनं गावी निरोप पाठवला आणि गावातल्या शहाण्या-सुरत्या माणसांनी वामनरावांना “आता राग सोडा! नातीचं तोंड बघून या..जा!” असा सल्ला दिला आणि शहरात चाललेल्या गावातल्या एकाबरोबर वामनरावांनी एस.टी.पकडली आणि ते निलेशच्या दारात उभे राहिले. निलेशने वामनरावांची दीड वर्षांची नात त्यांच्या मांडीवर दिली. पोरीचे डोळे वामनरावांच्या मुलीच्या मुलीसारखेच भासले त्यांन. विद्याने नेहमीप्रमाणेच छान स्वयंपाक केला होता. तिच्या हातची मेथीची भाजी तर अगदी वत्सलाबाईंच्या हातचीच जणू! सुनेचे कौतुक करायचं राहून गेलं वामनरावांकडून. इतक्या वर्षांत कधी बोलणं नव्हतं! विद्याने मात्र वामनरावांना अगदी व्यवस्थित वाढलं जेवायला...किती तरी दिवसांनी असं घरचं ताट वामनरावांच्या पुढ्यात होतं.

निलेशचं घर भाड्याचं होतं,दोन खोल्यांचं. आत कोप-यात छोटं किचन आणि छोटंसं देवघर....देवघराच्या वरच्या भिंतीवर वत्सलाबाईंचा फोटो…आज ताज्या फुलांचा हार होता त्यावर...दिवाळीनिमित्त. हॉलमधल्या भिंतीवर निलेश-विद्याच्या लग्नातला वामनराव-वत्सलाबाई आशीर्वाद देतानाचा फोटो होता फ्रेममध्ये लावलेला.

नवीन जागेत वामनरावांना लवकर झोप लागली नाही पण नेमका पहाटे डोळा लागला. वामनरावांना जाग आली ती विद्याच्या हाकेनं. पहाटेच उठायची सवय असल्याने वामनरावांना झोपेतून जागे व्हायला वेळ नाही लागला. त्यांनी वॉशबेसिनमध्ये चूळ भरली. निलेशने त्यांना टॉयलेटचं लाईटचं बटन चालू करून दिलं.

वामनराव टॉयलेटमधून बाहेर येताच विद्याने त्यांच्या हातात नवा टूथब्रश ठेवला आणि दात घासून घ्या म्हणाली. वामनरावांना टूथब्रशची सवय कुठली? “दादा,तुमच्यासाठी काळी दाताची पावडर आणून ठेवलीये रात्रीच! वाटल्यास ब्रशवर लावून घासा दात! यावर वामनराव किंचित हसले आणि त्यांनी आरशात पाहून दंतमंजन केले. थंड पाण्यानं आंघोळ करण्याची कित्येक वर्षांची सवय होती वामनरावांना. गरम पाण्याचे चार तांबे अंगावर पडायचे ते दिवाळीतच...वत्सलाबाई गेल्यापासून त्याचीही सवय मोडलीच म्हणायची! वामनरावांनी अंगावरची बंडी काढून दारामागच्या हुकवर टाकली, आपल्या पिशवीतून टॉवेल काढला आणि ते हळूहळू न्हाणीकडे निघाले....विद्याने त्यांचा हात धरला...”दादा,हॉलमध्ये चला.” “कशाला? वामनरावांनी विद्याकडे पाहून विचारलं. “चला,तर खरं!” म्हणत विद्याने त्यांना हळूहळू चालवत हॉलमध्ये आणलं. हॉलमधलं टेबल गॅलरीत ठेवून तिने तिथं पाट मांडला होता,त्याच्याभोवती लहानशी पण रेखीव रांगोळी काढलेली होती. निलेशला आज सुट्टी होती..तो थोडा उशीरा उठणार होता आज. “दादा,बसा पाटावर!” विद्या म्हणाली. “अगं,पण कशाला?” म्हणत वामनराव पाटावर बसले. विद्याने त्यांच्या पायाला वाटीतलं गरम तेल लावलं...तिच्या हातांतून कोमलता ओघळत होती. पायजमा गुडघ्यापर्यंत वर घ्या,दादा! विद्याने म्हटलं तसा वामनरावांनी संकोचत त्यांचा चट्यापट्यांचा पायजमा गुडघ्यापर्यंत वर घेतला आणि ते अंग चोरून बसले. वामनरावांच्या अंगावर बंडीच्या आतमध्ये नेहमी कोपरी असायची. “कोपरी काढा की,दादा. पाठीला तेल लावून देते!” विद्या असं म्हणताच आधीच संकोचलेले वामनराव आणखीन संकोचले. “राहू दे! हातापायाला तेल लावलंस की आता, पुरे झाले! ते उत्तरले. “लेकीला असं लाजता का,दादा? विद्या असं म्हणाल्यावर त्यांचा नाईलाज झाला. पहाटेच्या थंडीत वामनरावांचा कृश होत चाललेलं शरीर थरथरत होतं, त्यात गरम तेलाच्या स्पर्शानं आणखीनच शहारत होतं...त्यात विद्याचे नाजूक हात..वत्सलाबाईंची आठवण जागी करणारे! विद्याने वामनरावांच्या पाठीला,डोक्याला छान तेल लावून रगडलं. वामनरावांच्या पिकलेल्या केसांना कित्येक दिवसांनी तेलाचा असा हात लागला असेल!

विद्याने वामनरावांना न्हाणीत नेले. गरमा-गरम पाण्याचा तांब्या घालून त्यांचं अंग ओलं केलं आनि सुगंधी उटणं सर्वांगाला लावलं. तोवर निलेश उठून आला होता...दोघांनी मिळून वामनरावांना एखाद्या बाळासारखं न्हाऊ-माखू घातलं. त्यात निलेशचा स्पर्श वामनरावांना अधिक जवळचा वाटला आणि निलेशही!

“आईनं आंघोळ घातली असेलही लहानपणी अशी...आता आठवत नाही. ती माझ्या लहानपणीच देवाकडे गेली होती. नंतर मात्र तुझ्या सासूनं आईची कमतरता भासू दिली नव्हती कधी...आज तुझा हात वत्सलासारखाच भासला!” वामनराव विद्याकडे पाहून म्हणाले! त्यांच्या चेह-यावरून खाली येणा-या पाण्याच्या थेंबांमध्ये त्यांचे गरम अश्रू लपून-छपून खाली ओघळून गेले!

“दादा,आम्ही तुमच्याकडं राहायला आलं तर चालेल का..कायमचं?” गावी परत निघालेल्या वामनरावांना नमस्कार करून झाल्यावर विद्याने विचारलं....वामनरावांचा चेहरा फुलून आला दिवाळीत लावल्या जाणा-या,रंगीबेरंगी प्रकाशाचे थेंब उंच उडवणा-या भुईनळ्यासारखा!

(दिवाळीतल्या अभ्यंगस्नानाची ही एक ओली आठवण....एका विद्याची...एका वामनरावांची! नावे,प्रसंगाची मालिका काल्पनिक पण कथाबीज सत्याच्या मातीत पेरलेलं.  . )


✍️ श्री.संभाजी बबन गायके

वरील कथा श्री. संभाजी बबन गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post