दीड दिवसाचा वारस

 दीड दिवसाचा...वारस!

✍️ श्री. संभाजी बबन गायके 

शहरापासून सुमारे अठरा-वीस किलोमीटर्सवर असलेल्या एका गावठी इंग्लिश मिडीयम शाळेचे हेडमास्तर म्हणून कर्नाटकातून आलेल्या रामनाथ सरांना इथं महाराष्ट्रात कुणी नात्यातलं असेल, याची कुणाला कल्पनाही नव्हती. त्यांची पत्नी,एक पाच वर्षांची मुलगी एवढंच त्यांचं त्रिकोणी कुटूंब. या शाळेच्या आवारातच ते रहात असत. फौजेतून निवृत्त झालेला रखवालदार सिद्धाराम त्याची बायको आणि एका मुलासह याच आवारातल्या पत्र्याच्या एका शेडमध्ये राही.

त्यादिवशी शनिवार होता,शाळा हाफ डे भरून सुटली होती. शाळेतला स्टाफही घरी निघून गेला होआ. रामनाथ सर भर दुपारचेच त्यांच्या सायकवलवरून कुठे बाहेर घाईघाईत निघून गेले आणि अगदी अंधार पडायच्या सुमारास घरी परतले. पण येताना त्यांच्या सायकलच्या मागच्या कॅरीअरवर पांढ-या केसांच्या, अगदी वयस्कर,वाकलेल्या,सुमारे पंच्याहत्तरीच्या एक आजीबाई रामनाथसरांना मागून धरून बसून आलेल्या दिसल्या. रामनाथ सर घामाने एकदम ओलेचिंब झालेले होते. घरासमोर आल्यावर रामनाथ सरांनी सायकलच्या नळीच्या वरून उजवा पाय सायकलच्या डाव्या बाजूने सराईतपणे खाली घेत सायकल थांबवली, त्यांची बायको लगबगीने बाहेर आली आणि तिने हाताला धरून आजीबाईंना घरात नेऊन कॉटवर बसवले.

एरव्ही रामनाथ सरांकडे कुणीही आलेले सिद्द्धारामने बघितलेले नव्हते. रामनाथ मुलखाचे कवडीचुंबक आणि बेरकी. सारं जग सतत आपल्याविरूध्द कट-कारस्थान रचते आहे, असा त्यांना संशय असे. त्यांनी इतक्या वर्षात सिद्धारामला कधी घरात घेतलं नव्हतं की चहा दिला नव्हता. उलट त्यांच्या मुलीला दुस-या शाळेत नेणे-आणण्याचे काम त्याने सिद्धारामच्याच गळ्यात घातले होते आणि त्या कामाच्या बदल्यात ते एक पैसाही सिद्धारामला देत नसत. त्याच्या बायकोकडून घरातली बारीक-सारीक कामे मात्र हक्काने करून घेत. “ही कोण म्हातारी असावी?” असा प्रश्न सिद्धारामला पडला होताच. काहीतरी निमित्त काढून त्याने रामनाथ सरांच्या खोली समोरून एक चक्कर टाकली तर रामनाथ सर चक्क त्या आजींचे पाय चेपताना दिसले! तुसड्या,माणूसघाण्या स्वभावाच्या रामनाथ सरांचे हे रूप रांगड्या सिद्धारामच्या टाळक्यात काही फिट्ट बसेना! तेवढ्यात रामनाथ सरांनी सिद्धारामला हाक मारली आणि घरात बोलावले. “अरे,ही माझी मावशी लागते नात्याने. एकटीच राहते सिटीत,तिच्या मालकीच्या दोन खोल्यांत. हल्ली तब्येत ठीक नसते म्हणून म्हटलं तिला इथं आणून तिची सेवा करावी एक दोन दिवस!”

सिद्धारामने आजींकडे नीट पाहिले. वयाने थकलेलं शरीर,चेह-यावर शेकडो सुरकुत्या. खाण्या-पिण्याची आबाळ झालेली आहे हे सांगणारं शरीर. आजींच्या दोन्ही हातांत दोन दोन सोन्याच्या जाडजूड बांगड्या मात्र दिसल्या आणि कानांत सोन्याचे जाड डूल..जुन्या पध्दतीचे आणि चमकणारे!

दुसरे दिवशी दुपारी रामनाथसर आजीबाईंना जसे आणले तसेच परत घेऊन गेले. अठरा-वीस किलोमीटर्सचा प्रवास तो ही सायकलवर आजींना कसा सोसला असेल याचा सिद्धाराम विचार करीत बसला. आजींची तब्येत एवढी खराब असताना रामनाथ सरांनी त्यांना एवढ्या घाई-घाईत का आणले असावे आणि आणले तर आणले,पण इतक्या लवकर परत का नेऊन सोडताहेत असाही किडा सिद्धारामच्या मेंदूला स्वस्थ बसू देत नव्हता. रात्री उशीरा केंव्हा तरी रामनाथ सर माघारी आले.

सकाळी रामनाथसरांनी सिद्धारामला चक्क चहाला बोलावल्यावर सिद्धारामला खूप नवल वाटले. “सिद्धाराम,इथं गावात जमीन काय गुंठा भावाने मिळेल रे?” सिद्धारामला गावातल्या जमिनीचा गुंठ्याचा भाव चांगलाच ठाऊक होता. असे अचानक रामनाथ सरांकडे गुंठाभर जागा घेण्याचे आर्थिक बळ कोठून आले ते काही त्याला उमगेना. “सर, आहेत माझ्या ओळखीचे काही एजंट. जमवून देतील रेटमध्ये! पण कधी घ्यायची आहे जमीन? असे विचारून सिद्धानाथने रामनाथला जमिनीचा भाव सांगितला! “एवढा?” असं म्हणून रामनाथसरांनी त्यांच्या जाड भिंगाच्या चष्म्यातून दिसणारे गोल गरगरीत पांढरे डोळे आणखीनच मोठे केले आणि नाकावरून खाली येऊ पाहणारा,त्याची एक काडी बारीक दो-याने बांधलेला चष्मा वर घेतला. बायकोकडे पहात रामनाथ सर म्हणाले,”थोडे दिवसांत करून टाकू व्यवहार!”

आता थोडे दिवस म्हणजे किती दिवस, आणि रामनाथ सर कुठून एवढे पैसे उभारणार होते? सिद्धारामला आपला साधा व्यावहारीक प्रश्न पडला. असेल काही तरी पैशांची तरतूद म्हणून तो शांत बसला. त्याच दिवशी सायंकाळी सिद्धाराम शाळेची किल्ली द्यायला रामनाथसरांच्या घरी आला तेंव्हा त्याला विचारत होते...टू व्हीलर घ्यायचीये नवीन. कोणती घ्यावी? सिद्धाराम त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत असलेला पाहून तेच म्हणाले, “आता लगेच नाही, पण थोड्याच दिवसांत घेऊ!” या ‘थोड्याच’ दिवसांचे गणित सिद्धारामला काही सुटत नव्हते. शाळेचे मालक तर काही इतक्यात पगार वाढवणार नव्हते!

चारच दिवस मध्ये गेले असतील नसतील, रामनाथ सरांना कुणाचा कोण जाणे पण फोन आला. “कधी...? आणि तू मला हे इतक्या उशीरा कळवतोयस?” रामनाथ सर फोनवरच्या माणसाला झापण्याच्या सूरात बोलत होते. रामनाथसरांनी सिद्धारामला ताबडतोब बोलावून घेतले. “मावशी गेल्या! मला ताबडतोब सिटीत पोहोचलं पाहिजे...नाही तर मावशीचं अंत्यदर्शन होणार नाही. गावात कुणाची रिक्षा मिळते का बघतोस का?” त्यांनी सिद्धारामला घाईघाईत सांगितलं. “पण सर, रिक्षाचं भाडं काहीच्या काही होईल!” तो म्हणाला. यावर रामनाथ सर म्हणाले, “अशा वेळी पैशांचा विचार नसतो करायचा. आणि यापुढे पैशांचा तसा काही प्रश्न येणार नाही. तू जा, रिक्षा घेऊन ये लवकर!” रामनाथ सर, त्यांची बायको आणि त्यांची मुलगी तातडीने सिटीकडे रवाना झाले.

आजी राहात असलेल्या वाड्याबाहेर तशी फार काही माणसे नव्हती जमा झालेली एरव्ही कुणी गेल्यावर होतात तशी. आजी त्या वाड्यात बरीच वर्षे एकट्याच रहात होत्या आणि त्यांच्याकडे कुणाही नातेवाईकाचं येणं-जाणं नव्हतंच कधी. वाड्यासमोरच्या किराणा दुकानदाराशी मात्र आजींचे संबंध चांगले होते. जिग्नेशभाई नावाचा तो गुजराथी भला गृहस्थ होता. आजीला तिच्या यजमानांची थोडी पेन्शन मिळे, त्याचा हिशेब तोच ठेवायचा. आजीची आपल्या आईसारखी काळजी घ्यायचा,औषधपाणी पहायचा..त्याला आई नव्हती!

आजीच्या खोल्या कुणी बळकाऊ नये याची दक्षता त्यानेच तर घेतली होती इतके दिवस. त्या दिवशी त्याने दुकान बंद ठेवून आजींच्या अंत्ययात्रेची तयारी केली होती. रामनाथला कळवायची तशी त्याला काही गरज वाटली नव्हती पण त्या वाड्यातल्या कुणीतरी रामनाथला फोन करून ही खबर दिली होती. तसे रामनाथ सरांनी एकाला सांगूनच ठेवले होते म्हणा!

तिरडी उचलणार इतक्यात रामनाथ अ‍ॅन्ड कंपनी वाड्यासमोर पोहोचली. रिक्षाचे भाडे परत घरी गेल्यावर द्यायचे होते. उरकेल तासा-दोन तासांत अशा बोलीवर रामनाथ सरांनी रिक्षावाल्याला थांबण्यास भाग पाडले होते. तो ही रिटर्न-भाडे मिळेल म्हणून तयार झाला होता.

रामनाथ सर घाईघाईत तिरडीपाशी गेले. शक्य होईल तेव्हढा मोठा हुंदका त्यांनी काढला मात्र डोळ्यांनी पाणी काढायला नकार दिला. त्यांनी मावशीच्या देहाचे हात चाचपून पाहिले...हातात काहीही नव्हते. कानांतले डूलही दिसत नव्हते! रामनाथ सरांनी जिग्नेशभाईकडे पाहिले. “निकाल के रखा है ठीकसे!” असं त्याने इशा-यानेच सांगितल्यावर रामनाथ सरांनी “बरं झालं!” अशा अर्थी मान हलवली आणि वाड्यातल्या चार लोकांनी तिरडी उचलली,त्यात रामनाथ सर सर्वांत पुढे तर जिग्नेशभाई मागे होते. रामनाथ सरांना मानेचा थोडा त्रास असल्याने त्यांनी सुरूवातीला खांद्यावर घेतलेली तिरडी लगेच सोबतच्या एकाच्या खांद्यावर दिली. इतर कुणी रडणारे नव्हते. स्मशानातही फार वेळ गेला नाही. आजी शांततेत गेल्या....एकटी,निराधार माणसं जातात तशी रामनाथ सर वाड्यापाशी परत आले तर आजींच्या खोलीला कुलूप लावलेले दिसले. ते जिग्नेशशेठच्या दुकानी गेले. दुकानाच्यावरच जिग्नेशशेठ राहात होते. आंघोळ करून ते बाहेर आले तर रामनाथ त्यांच्या दारात उभे. “अच्छी औरत थी,बेचारी! बेवारीस मौत लिखी थी नसीब में” जिग्नेशभाई उदास स्वरात म्हणाले. “मैं हूँ ना! मेरी दूरकी ही सही लेकीन मौसीही थी!” रामनाथने तात्काळ फासा टाकला. “उनके हाथों में थी वह चुडीयाँ आपने निकाल के रख दी यह बहोत अच्छा क्या आपने! नहीं तो लोग मुर्दों को भी नही छोडते आजकल!”

जिग्नेशभाईंनी शांतपणे कपाटातून एक फाईल बाहेर काढली. रामनाथच्या पुढ्यात ठेवली. रामनाथ सरांच्या या दूरच्या मावशींनी मृत्यूपत्रातही रामनाथ सरांना दूरच ठेवले होते...जे होते नव्हते ते जिग्नेशच्या हवाली करून ठेवले होते दानधर्माच्या कामी लावण्यासाठी !

पण रामनाथच्या घरी एक दिवसाचा मुक्काम आणि झालेला पाहुणचार याचे जे काही पैसे होतील ते मात्र रामनाथला रोख मिळतील याची तजवीज त्यांनी जिग्नेशभाईंना तोंडी सांगून करून ठेवली होती......मावशींच्या दहावा-तेराव्याच्या कार्याला एवढं लांब येणं, ते ही रिक्षेने रामनाथ सरांना परवडणारं नव्हतं!

घरी परतल्यावर रिक्षाचं भाडं देताना रामनाथसरांचे हात थरथरत होते. “सिद्धाराम, जमीन आणि टूव्हीलरचे आपण सध्या रद्द करू!” असं म्हणून रामनाथ सर कुटूंबासह घरात शिरले. सिद्धानाथला रामनाथ सर ‘थोडे दिवस थांब’ असं का म्हणत होते, हे न सांगता समजले!


ही कथा काल्पनिक नाही. स्थळाची,पात्रांची नांवे आणी घटनाक्रम किंचित बदलला आहे. कथेतून कुणी बोध घेतला तर घेतला! 

✍️ संभाजी बबन गायके.


वरील कथा श्री. संभाजी बबन गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post