शिवार वाट बघतंय!

 शिवार वाट बघतंय!

✍️ श्री. संभाजी बबन गायके 

धोतर,लांब पांढरा शर्ट,पांढरी टोपी आणि पायांत साध्या चामडी वहाणा अशा वेशात ज्ञानोबा आणि नऊवारी, काष्ट्याचं लुगडं, खणाची चोळी,हातात बऱ्याच हिरव्या बांगड्या, कपाळभर कुंकू आणि पायांत साध्या रबरी चपला असा पेहरावात निर्मलाबाई हॉटेलातल्या त्या चकचकीत टेबलापुढच्या खुर्चीत अंग चोरून बसल्या होत्या!

संदीप , त्यांचा मुलगा शहरात शिकायला म्हणून जे आला होता तो काही परत गावी गेला नव्हता. त्याने कसलासा डिप्लोमा केला होता म्हणे,पण त्यावर त्याला काही बरी नोकरी लागली नाही. सध्या शहराच्या एका नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरात त्याने एका बिल्डरच्या हाताखाली नोकरी धरली होती. आणि तिथेच एक वन बी.एच.के.भाड्याने घेतला होता. संदीपने गावी त्याच्या मित्रांना मात्र तो प्लॉट डेवलपिंगची कामे करतो,असे खोटेच सांगितलं होतं. गावातलं कोण कशाला येतंय शहरात बघायला हा काय करतोय ते! उलट गावातली माणसंच संदीपला म्हणायची,"आमच्या पोरांनाही घे कुठंतरी चिकटवून"! तशी गावात आई-बाप, भावांना शेतीत मदत करून चार घास सुखाचे खाणाऱ्या पोरांच्या डोळ्यांतही शहरातील चकचकाट चमकताना दिसायचा! शहर म्हणजे फ्लॅट,शहर म्हणजे पॉश जीवन, शहर म्हणजे खाण्याची चंगळ,सोयीसुविधा असं या पोरांना वाटणं स्वाभाविकच होतं म्हणा! संदीप मग बघतो,करतो,सध्या अवघड आहे असं म्हणून वेळ मारून न्यायचा.

निर्मलाबाई त्यांच्या गावांतून शहरात येणाऱ्या दुधगाडीच्या ड्रायवरच्या हातून अधून मधून काहीबाही धाडून द्यायच्या संदीपसाठी. कधी शेतातली ज्वारी,तर कधी कडधान्य,तर कधी तूप,लोणचं असं जमेल तसं. 

अशातच संदीपचं लग्नही गावी शेती पाहणाऱ्या थोरल्या भावाच्या लग्नानंतर तिसऱ्याच वर्षी होऊन गेलं होतं. मुलगा शहरात राहतो तो सुद्धा एकटाच या आमिषापोटी त्याच्या नात्यातली मुलगीही आणि तिच्याघरचे या लग्नाला तयार झाले होते. लग्नानंतर संदीपरावांना एक-दीड वर्षात कन्यारत्नही प्राप्त झाले होते. आणि या गोष्टीलाही आता साडेतीन-चार वर्षे उलटून गेली होती. 

आज संदीपच्या मुलीचा बर्थ डे म्हणून संदीपने ज्ञानोबा आणि निर्मलबाईंना शहरात बोलावून घेतलं होतं. त्यांनी येताना नातीसाठी हातातल्या चांदीच्या बांगडया आणि पैंजण आणले होते आणि वीस किलो घरचे तांदूळही!

संदीपच्या घरात लेकीच्या वाढदिवसाची जय्यत तयारी होती,दीड किलोचा केकही आणला होता. ज्ञानोबा केकची चारशे तीस किंमत ऐकून विचारात पडले! ती किंमत त्यांनी संदीपच्या एका शेजाऱ्यास हळूच विचारून घेतली होती! ज्ञानोबांचं आता तसं बरं चाललं आहे पावणे तीन एकर जमिनीतल्या उत्पन्नावर! पण जमिनीला पाण्याची सोय नव्हती तेंव्हा त्यांनी दुसऱ्याच्या रानात पंचवीस रुपये रोजावर मजुरी केल्याचं त्यांना अजूनही आठवत होतं. निर्मलाबाईसुद्धा खुरपायला, भुईमुगाच्या शेंगा सोलायला जायच्या लोकांच्या वावरात..तेरा रुपयांनी! एक केक चारशे तीस रुपयांना म्हणजे किती दिवसांची मजुरी झाली असती आपली असा ज्ञानोबांनी विचार केलाच! 

रीतसर हॅपी बर्थडे झाला. बाहेर जेवायला जायचं हे ऐकून निर्मलाबाई आश्चर्यात पडल्या! त्यांना वाटलं सूनबाईंनी घरीच स्वयंपाक केला असेल.

"आत्या,राईस घ्या ना!" निर्मलाबाई आपल्या सुनेच्या या वाक्यामुळे भानावर आल्या! आधीच प्लेट मधल्या रंगीबेरंगी मसाल्याच्या पदार्थांमुळे आणि त्यांच्या विचित्र नावांमुळे त्या भांबावून गेल्या होत्या. हॉटेल म्हणजे कधीतरी तालुक्याच्या आठवडे बाजारात माळवे विकायला गेलेले असताना खाल्लेली पाच सहा भजी नाहीतर जिलेबी चिवडा एवढाच निर्मलाबाईंचा पल्ला! ज्ञानोबांनाही कट-वडा किंवा मिसळ यापलीकडे हॉटेल माहीत नव्हते आणि त्यांना हे बाहेरचं खाणं पटतही नव्हतं!

राजमा म्हणजे घेवड्याच्या बिया हे पाहून आणि त्याची एक प्लेट एकशे सत्तर रुपयांना हे समजल्यावर निर्मलाबाईंना ह्या पैशात आपण तीन दिवस तरी साऱ्या घराला घेवड्याचं कोरड्यास करू शकलो असतो असं वाटून गेलं! शिवाय भात म्हणजे राईस हे त्यांनी आज पहिल्यांदा ऐकलं होतं. त्यात तो कोरडा फडफडीत,जिरे घातलेला भात त्यांच्या घशाखाली उतरेना! आता हा भात हॉटेलात कितीला पडत असेल, अशा विचारांनी निर्मलाबाई आणि ज्ञानोबा यांनी एकाचवेळी एकमेकांकडे पाहिले! 

सूनबाई मात्र सराईतपणे जेवत होत्या,सफाईने वेटरला ऑर्डर देत होत्या. ज्ञानोबा आणि निर्मलाबाई यांची काटे-चमचे,प्लेट यांच्याशी लढाई एकदाची संपली आणि वेटरने त्यांच्यापुढे वाटीभर गरम पाणी आणि त्यात लिंबाची फोड आणून ठेवली. यात मसाल्याचे हात धुवायचे म्हणजे कठीणच, मग या जोडीने वॉश बेसिनकडे धडपडत जात मोर्चा नेला.

संदीपने चुटकी वाजवत हॅलो म्हणताच वेटर पळतच टेबलाशी आला,और कुछ लेंगे,सर! जूस,आईस्क्रीम वगेरा..त्याने विचारलं. संदीपने बायकोकडे पाहिलं तेंव्हा वन बाय टू असं काहीतरी म्हटलं. एवढं जेवल्यावर आता वर फळांचा रस पोटात मावतो तरी कसा असं ज्ञानोबांना वाटलंच! सगळं झाल्यावर संदीपने 'बिल लाव' अशी शेवटची ऑर्डर दिली, उरलेले पैसे वेटरला टीप म्हणून ठेवले आणि तो उठला! त्याची बायको गोड बडीशेप चघळत आधीच उठून बाहेर गेली होती!

संदीपला बऱ्याच नोटा वेटरला देताना निर्मलाबाईंनी पाहिलं होतंच, पण त्याने आणून दिलेले पैसे संदीपने परत न घेता त्या बिलाच्या प्लेटवर ठेवलेलंही त्यांनी पाहिलं! बरेच पैसे असतील. 

निर्मलाबाई संदीप शिकायला शहरात आला होता तेंव्हा नित्यनियमाने एस.टी. ड्रायवर,मास्तरच्या हातून जेवणाचा डबा पाठवायच्या,कधी मजुरीतून आलेले पाच पन्नास रुपयेही जेवणाच्या डब्यात लपवून पाठवून द्यायच्या. घरी आपल्यासाठी भाजी करतांना तेलाचे दोन थेंब कमी घालायच्या आणि चप्पल तर त्यांनी कित्येक दिवसांत नवी म्हणून घेतलेली नव्हती. आज संदीपकडे येतानाही ते एशियाड ऐवजी लाल एस.टी.तून आल्या होत्या...तेवढेच तीस-चाळीस रुपये वाचतात म्हणून!

जेवण झाल्यावर सर्व घरी परतले. रात्री पाय मोकळे करायला म्हणून ज्ञानोबांनी संदीपला घराबाहेर नेलं. नाहीतरी त्या एवढ्याशा जागेत लवकर झोप लागणं कठीण होतं. किती पगार,काय भवितव्य, कसं भागवतोस, एवढा खर्च कसा करतोस इत्यादी माहिती त्यांनी संदीपकडून काढून घेतली. एकंदर शहरातल्या दिखाऊ दुनियेत गुरफटून कर्जबाजारी झालेला संदीप त्यांच्या ध्यानात आला. त्यात सूनबाई या आयुष्याला चांगल्याच सरावल्याचेही लक्षात आले. आणि संदीप प्रचंड दबावाखाली दिसला. त्याची बायको स्वतःचा मोठा फ्लॅट घ्या,वाटल्यास माझ्या पप्पांकडे पैसे उसने मागा, पोरीला इंग्लिश शाळेतच घाला इत्यादी तगादे लावतीये हे संदीप बोलून गेला. त्यावर ज्ञानोबांनी काही भाष्य नाही केलं. त्यांना त्यांचा संसार,निर्मलाबाईंनी दिलेली साथ आठवली. आपलं पोरगं शहराच्या पिंजऱ्यात अडकून झुरतंय हे या म्हाताऱ्या बापाच्या काळजाला जास्त टोचत होतं! 

सकाळी उठून सर्व आवरल्यावर निर्मलाबाई आणि ज्ञानोबा निघाले तेंव्हा संदीप त्यांना सोडवायला स्टँडवर आला. गाडी निघताना निर्मलाबाईंनी संदीपच्या हातावर चारशे रुपये ठेवले आणि म्हणाल्या,"लेका,आपल्या रानात तुम्ही दोघं भाऊ नेटानं राबला तर दोन वेळच्या भाकरीची चिंता नाही राहणार तुम्हांला! काय आहे काय शहरात? राईस आपल्या शेतातही होतो आणि एवढा महाग नसतोय!

आम्ही काय आज आहोत आणि उद्या नाही! शहराचा नाद सोडा...गावी या निघून... शिवार वाट बघतंय!

✍️संभाजी बबन गायके


वरील कथा श्री. संभाजी बबन गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post