वारस

वारस


✍️ नेहा उजाळे

               सदानंद पाटील गावची आसामी व्यक्ती. त्यांच्या घरात पैशाअडक्याची काहीच कमतरता नव्हती. त्यांच्या धर्मपत्नी सुनंदाबाई अतिशय सुंदर, मायाळू, दानधर्म करणाऱ्या. त्या गरीब घरातल्या होत्या पण त्यांच्या सौन्दर्याने पाटील भाळले होते म्हणूनच त्यांनी सुनंदाबाईंना स्वतःहून मागणी घातली होती.  त्यांच्या संसारात एक खंत होती ती म्हणजे त्यांना मुलबाळ नव्हते. दहा वर्षे लोटली तरी घरी पाळणा हलला नव्हता. सुनंदाबाई कितीतरी वेळा पाटीलांकडे दुसरे लग्न करा म्हणून लकडा लावायच्या परंतु पाटील या गोष्टीला त्यांच्या बायकोच्या प्रेमापोटी तयार होत नसत. 

              इथे सुनंदाबाई मूल होत नाही म्हणून खचत चाललेल्या. व्रते - वैकल्ये, दानधर्म, उपासतापास करून झाले. अनेक ज्योतिषींना पत्रिका, हात दाखवून झाले पण सुनंदाबाईंची कूस काही केल्या उजवत नव्हती. एके दिवशी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांचे डोळे लकाकले आणि त्यांनी पाटीलांना कल्पना सांगितली. पाटीलांनी पहिला तर ह्या गोष्टीला नकार दिला पण घराला वारस मिळेल यासाठी ते तयार झाले. 

              सुनंदाबाई लागलीच आपल्या माहेरी गेल्या. घरची अतिशय गरीबी. सुनंदाबाई सगळ्यात मोठ्या. त्यांच्या पाठच्या तीन बहिणींच्या लग्नाचा खर्च पाटलांनी उचलला होता. धाकटी अठरा वर्षांची बहीण लग्नाची होती. सुनंदाबाई माहेरी गेल्यावर त्यांच्या आईवडिलांना त्यांना कुठे ठेऊ आणि कुठे नाही असे झाले. सुनंदाबाईंनी माहेरी जाताना सोबत धान्य, फळे, मिठाई घेऊन गेल्या होत्या. सुनंदाबाईंनी आपल्या आईवडिलांना त्या कुठल्या कामाकरता आल्या आहेत ते सांगितले. सुनंदाबाईंचे म्हणणे ऐकून पहिल्यांदा त्यांच्या आईवडिलांनी आक्षेप घेतला पण आपल्या लेकीला वारस मिळावा म्हणून त्यांनी सुनंदाबाईंच्या प्रस्तावाला होकार दिला. तसंही सुनंदाबाईंनी माहेरी दिलेल्या वस्तूंचा मोह आईवडिलांना पडलाच होता. आईवडिलांनी होकार दिल्यावर सुनंदाबाईंनी मोठी रक्कम आईवडिलांच्या हातात सुपूर्द केली.

                सुनंदाबाईंनी आईवडिलांना आपल्या डावात सामील केले आणि धाकट्या बहिणीला त्यांच्या घरी आणले. सुमती अठरा वर्षांची असली तरी उफाड्याची होती. तिचं वाडीतल्या शेजारच्या घरात राहणाऱ्या महेशवर प्रेम बसलं होतं. दोघांनी दोघांच्या घरात संमती घेऊन लग्न करायचे ठरविले होते. सुमती ताईकडे जाते आहे म्हणून महेश खूप दुःखी झाला. सुमतीने महेशला  थोड्या दिवसांचा प्रश्न आहे असे सांगितले आणि ताईकडून लौकरात लौकर घरी परत येण्याचे वचन तिने महेशला दिले. ताईच्या भल्यामोठ्या वाड्यात राहायला जायचे म्हणून सुमती खूप खुश होती. 

              सुनंदाबाईनी सुमतीला घरी आणले. आज जेवणात सुमतीकरिता खास बेत स्वयंपाक करणाऱ्या मावशींना सुनंदाबाईंनी करायला लावला. बासुंदी - पुरी, बटाट्याची भाजी, कोथिंबीरवडी, मसालेभात, वरण - भात त्यावर साजूक तुपाची धार, कुरडया, पापड, चटणी, लोणचे असे साग्रसंगीत भरलेले ताट पाहून सुमती खूप खुश झाली. अगदी आवडीने तिने जेवणाचा आस्वाद घेतला. इतके सुग्रास जेवण तिच्या घरी सणांना देखील होत नसे. 

             जेवणे झाल्यावर सुनंदाबाईंनी आपले कपाट उघडले आणि सुमतीला जी आवडेल ती साडी नेसायला सांगितली. सुमतीला जांभळ्या रंगाची पैठणी साडी खूप मनात भरली. सुनंदाबाईंनी सुमतीला पैठणी नेसवून, ठसठशीत दागिने घालून सजवले. इतकी भारी साडी आणि दागिने सुमतीने कधीचं पाहिले नव्हते. साडी सावरत पूर्ण वाड्याभर ती गिरकी घेत फिरत होती. आपलंच रूप सारखं सारखं आरशात न्याहाळत होती. 

              रात्री सुनंदाबाईंनी तिला आपल्या शेजारी झोपवले. मऊ गादी आणि मऊ रजईमुळे सुमतीला लगेचच गाढ झोप लागली. थोडयावेळाने सुमतीला आपल्या अंगावर कोणीतरी असल्याचा भास झाला. ती ओरडणार तर तिचे तोंड घट्ट दाबले आणि तिचे कौमार्य कुस्करले गेले. तिला कळून चुकले ती व्यक्ती कोण आहे. तिचं प्रेम, तिच्या इच्छा - आकांक्षा एका क्षणात गळून पडल्या. महेशबरोबर तिचे संसाराचे स्वप्न एका क्षणात चुरडले गेले. अशा कितीतरी रात्र ती भोगत होती. 

             इथे महेश रोज सुमतीची वाट पहात होता. सुमतीच्या आईवडिलांना सुमतीबद्दल कसे विचारायचे हेच त्याला समजत नव्हते. सुमती तिच्या ताईकडे त्याला सोडून इतके दिवस कशी राहिली हेच त्याला कळत नव्हते. सरतेशेवटी मनाचा हिय्या करून त्याने सुमतीच्या आईला रस्त्यात गाठून सुमती कुठे आहे याची चौकशी केली. 

            " काकू सांगा ना सुमती कुठे आहे ? आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. मी माझ्या आईवडिलांना घेऊन तुमच्या घरी येऊन सुमतीसाठी मागणी घालणार आहे. आमच्या घरात सगळ्यांना सुमती आवडते. आशा आहे की, तुम्ही देखील आमच्या लग्नाला संमती द्याल." महेश अगदी अगतिकपणे बोलत होता.

              महेशचे बोलणे ऐकल्यावर सुमतीच्या आईला धरणी दुभंगून तिला तिच्या पोटात घ्यावे असे वाटले. तिला आपण सुमतीबरोबर केलेल्या अन्यायाचे अतिशय दुःख झाले. महेशला ती एवढंच सांगू शकली की, " सुमतीचे तिच्या ताईने लग्न लावून दिले. तू देखील एखादी चांगली मुलगी बघून लग्न कर."

                " सुमतीचं लग्न झालं ? कोणाशी करून दिलं ? सुमतीने मला काहीच कसे सांगितले नाही ?" महेश प्रश्नांवर प्रश्न विचारत राहिला पण सुमतीची आई त्याच्या एकही प्रश्नांना उत्तर देऊ शकत नव्हती. स्वतःच्याच नजरेतून ती उतरली होती. पैशांच्या हव्यासाने आपल्या लेकीचा बळी देऊन तिने आपल्या माथ्यावर पाप घेतले होते याची जाणीव होऊन सुमतीची आई महेश समोर कोसळली. महेश सुमतीच्या आईला घेऊन तातडीने डॉक्टरांकडे गेला पण त्याच्याआधीच सुमतीच्या आईने प्राण सोडले होते.

                  आईच्या कार्याला सगळ्या मुली आल्या होत्या पण सुमती कुठेही दिसत नव्हती. महेशची नजर सुमतीला शोधत होती पण सुमती न दिसल्याने त्याचे मन खट्टू झाले होते. सुमतीला तिच्या आईच्या कार्याला जावे असे वाटलेच नाही कारण तिच्या आईने लोभामुळे मुलीचे मन जाणलेच नव्हते आणि महेशला सामोरे जाणे तिच्यासाठी खूपचं कठीण गेले असते.

              महेशला सुमतीविषयी एवढीच माहिती मिळाली होती की, तिचे लग्न झाले आहे. ती कुठे आहे ? कुठे राहते याचा त्याने बराच शोध घेतला पण सुमतीचा ठावठिकाणा त्याला लागला नाही म्हणून मग सरतेशेवटी त्याच्या आईवडिलांच्या मर्जीने त्याने लग्न केले. 

               काही दिवसांनी सुमतीला दिवस गेले. सुनंदाबाई आणि पाटीलांना खूप आनंद झाला. तिची एखाद्या राणीसारखी बडदास्त ठेवण्यात आली. आपल्या ताईचा आणि दाजींचा डाव तिच्या लक्षात आला होता. मूल झाल्यावर ताईच्या हवाली ते बाळ करायचे होते. भविष्यात तिच्याच मुलावर तिचा हक्क राहणार नव्हता आणि पुढच्या आयुष्याची चिंता तिला भेडसावू लागली होती. सुमतीने एक निर्णय घेऊन मनाशी पक्के ठरविले. ताई आणि दाजींकडून तिने वचन घेतले की, ' मूल झाल्यावर ती काय मागेल ते तिला मिळेल.' त्या दोघांनीही आनंदाने तिला वचन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. 

            यथावकाश नऊ महिने पूर्ण झाल्यावर सुमतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ताई आणि दाजी हरखून गेले. सुमतीने ताई आणि पाटलांना तिला दिलेल्या वचनाची आठवण करून दिली.

 

       सुमती बोलली, " कपटाने तुम्ही दोघांनी मूल होण्यासाठी माझा वापर केला. मी एका मुलावर मनापासून प्रेम करत होते. आम्ही दोघे आपापल्या आईवडिलांच्या संमतीने लग्न देखील करणार होतो. माझ्या प्रेमाचा बळी गेला. तुमच्या घराला वारस हवा म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझं जीवन बरबाद केलं. बाहेरच्या जगात आता मला कवडीची किंमत नाही. माझ्या आईवडिलांनी आणि मोठ्या बहिणीने माझा कुठलाही विचार केला नाही. माझे आईवडील तर पैशाला भुलले. मुलीच्या आयुष्यापेक्षा त्यांना पैसा जास्त महत्वाचा वाटला पण माझ्या पुढच्या आयुष्यात मला रखेल म्हणून जगायचं नाही. चार भिंतीत तुमच्या प्रतिष्ठेसाठी मला स्वतःला कोंडून ठेवायचे नाही. ताठ मानेने मला जगायचे आहे. माझे अस्तित्व मला पुसायचे नाही. मला तुमच्या धर्मपत्नीचा दर्जा हवा आणि माझ्या मुलावर  केवळ माझाच हक्क राहील. ताईचा तिच्या संसारात अधिकार कायम राहील पण मी पाटीलांची रखेल म्हणून राहणार नाही. " 

      सुमतीचे शब्द ऐकून ताई आणि पाटलांच्या डोळ्यांतून घळघळ पाणी वाहू लागले. आपल्या वागण्याचा त्यांना अत्यंत पश्चाताप झाला. दोघांनी वारसाच्या हव्यासापोटी डोळ्यांवर पट्टी बांधली होती. भलं - बुरं कसलाही विचार केला नव्हता आणि एका कोवळ्या पोरीचं आयुष्य कुस्करून टाकलं होतं.

      सुमतीशी पाटीलांनी लग्न केले. सुमतीला पाटीलांच्या धर्मपत्नीचा दर्जा मिळाला आणि तिचे मातृत्वही अबाधित राहिले.

( समाप्त )

✍️ सौ. नेहा उजाळे

वरील कथा नेहा उजाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post