बघू घेऊ नंतर

 बघू, घेऊ नंतर

लेखिका - सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

"एजी, सूनिये ना... मला ना काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला..." बाहेरच्या खोलीत तयार होत असलेल्या वसीमजवळ जाऊन मुमताज म्हणाली. 

"हां बोल पटपट, टाईम की खोटी मत कर मेरे." केसांवरून कंगवा फिरवत तो म्हणाला.

"वो... मेरे को न पैठणी चाहिए." घुटमळतच मुमताजने एकदाचं बोलून टाकलं.

"पैठणी? वो क्या होती है?" फॉगचा सुगंध घरभर दरवळला.

"ती एक मराठी बायकांची भारी साडी असते. रेशम की... बडासा सुंदर पल्लू आणि छान काठाची... किती अभिमानाने मिरवतात ती साडी त्या बायका. अगले महिने रुखसार मतलब मेरे चचेरे बहेन की शादी हैं, उसमे पहनुंगी. देणार ना मला घेऊन पैठणी?" आपले मोठे मोठे स्वप्नाळू डोळे अजून मोठे करत मुमताजने विचारले.

"आता रेशमी साडी म्हणजे महंगी होगी... तरी किती पर्यंत असेल ती पैठणी? बजेटमध्ये बसत असेल तर घेऊ ना. वैसे इस महिने रिक्षाका हप्ता भी जानेवाला हैं, फिर भी तू पूछके देख किसी को।" रिक्षाची चावी घेत वसीम म्हणाला. मुमताजचा उतरलेला चेहरा त्याने पाहिलाच नाही.  का नाही उतरणार चेहरा तिचा, कारण पैठणीची किंमत तिला माहीत होती. ती घेणं आता आपल्याला शक्य होईल असं तिला वाटत नव्हतं.


मुमताज आणि वसीम एक जोडपं. वसीम रिक्षा चालवायचा तर मुमताज ब्लाऊज शिवून, साड्यांना फॉल पिको करून घराला हातभार लावायची. हल्ली तिने अजून एक नवं काम सुरू केलं होतं, साड्यांच्या पदराला गोंडे घालून देणं. या नवीन कामामुळे तिच्याकडे रेशमी, गर्भरेशमी, मऊसूत पोताच्या सुंदर साड्या येऊ लागल्या, पिको करून गोंडे घालण्यासाठी. त्या भारी साड्या हाताळताना ती अलवार त्यांच्यावरून हात फिरवे. त्यांना स्पर्शाने फील करायचा प्रयत्न करायची. पण मोठी मोठी स्वप्न लहान माणसांच्या मुठीतून अलवार वाळूप्रमाणे निसटून जातात. 


काहीही न बोलता मुमताज कामाला लागली. आज तिला सुर्वे काकूंच्या सुनेच्या पैठणीला गोंडे घालायचे होते. संक्रांत जवळ आली होती, म्हणून सुर्वे काकूंनी खास ऑर्डर देऊन पैठणीमध्ये सहसा न आढळणारा काळा रंग बनवून घेतला होता. घरातील काम आवरून जमिनीवर चटई टाकून, त्यावर एक स्टूल ठेवून त्यावर पदर पसरून मुमताज गोंडे घालायला लागली. काळया साडीला लाल काठ आणि पदर, त्यावर मोर, पुष्करणी असा काहीसा देखावा सोनेरी, रंगबेरंगी धाग्यांनी विणला होता.  सलग चार तास पाठ मोडून काम केल्यावर एकदाची साडी तयार झाली. मन लावून अगदी अप्रतिम काम केले होते मुमताजने. साडीकडे पाहताना मुमताजच्या मनात काहीतरी आले. तिने लगबगीने दार खिडक्या आतून बंद केले. अगदी कडी कोयंडा घातला. आणि हलक्या हाताने पैठणी नेसून पदर अंगावर घेतला. निऱ्या करताना साडीवर एकही घडी, सुरकुती येऊ नये याची तिने दक्षता घेतली. हो नाहीतर उगाच भांडणाला निमित्त व्हायचे. एकुलत्या एका कपाटाच्या आरश्यात आपले रूप मागून पुढून न्याहाळून मुमताजने साडी सोडून व्यवस्थित घडी घालून पिशवीत घालून ठेवली. 


दुसऱ्या दिवशी सुर्वेकाकू साडी न्यायला आल्या तेव्हा न राहवून मुमताजने त्यांना साडीची किंमत विचारली. 

"अग ही बनवून घेतली आहे ना म्हणून थोडी महाग आहे, वीस हजाराची आहे."

"हाय रब्बा, बीस हजार! इससे कम वाली नही आती क्या?"

"असते ना ग अगदी सात हजारापासून लाखो रुपयांपर्यंतच्या असतात या साड्या." काकूंनी माहिती पुरवली. 


तिकडे रिक्षा स्टँडवर वसीमने ही आपल्या साथीदारांना विचारले. सगळ्यांनी एकच उत्तर दिले, आपल्यासारख्या लोकांच्या कुवतीच्या बाहेर असते पैठणी. वसीमचे मुमताजवर निस्सीम प्रेम होते पण त्याच बरोबर त्याला आपल्या मर्यादा ही ठाऊक होती. 


मुमताजने मात्र जणू ध्यासच घेतला होता. ती हल्ली जास्तीत जास्त काम करे. भेटणाऱ्या प्रत्येकीला तिने आपल्या व्यवसायाबद्दल सांगितले होते. तेवढेच चार पैसे जास्त मिळाले तर हवेच होते तिला. अधूनमधून वसीमला विचारुन ती चाचपणी करायची. तो एकच म्हणायचा, बघू घेऊ नंतर. सध्या शक्य नाही नंतर पाहता येईल.  


  घरात मात्र वातावरण थोडे शांतच होते. कारण दोघेही आपापल्या विचारात होते. विचारांची दिशा मात्र एकच होती. ध्यास होता पैठणीचा.


एक दिवस वसीम दुपारी त्याच्या रिक्षात आराम करत होता. बऱ्याच वेळापासून एकही भाडं आले नव्हते. त्याचा नुकताच डोळा लागत होता तर एक आजी आल्या. त्यांच्याजवळ दोन तीन बॅग होत्या. त्यांनी कपाळावरील घाम पुसला आणि गावाबाहेर असलेल्या एका मंगलकार्यालयाच्या पत्त्यावर चल म्हणू लागल्या. छान, टापटीप वेशभूषेत असणाऱ्या आजी चांगल्या घरंदाज वाटत होत्या. वसीमने मुकाट्याने रिक्षा चालू केली. थोड्यावेळात सांगितलेल्या पत्यावर वसीमने त्यांना पोहचवले आणि रिक्षा परत फिरवली.


  अर्ध्या रस्त्यापर्यंत आल्यावर त्याच्या लक्षात आले, सीटवर एक लहान पिशवी तशीच राहिली आहे. वसीमने रिक्षा रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि ती पिशवी उघडून पाहिली. पाहताच त्याला घाम फुटला. कारण पिशवीत दोन तीन तलम साड्या आणि एक चपटा डबा होता. थरथरत्या हाताने त्याने डबा उघडला तर त्यात काठोकाठ भरलेले पारंपरिक सोन्याचे दागिने होते. काय करावे न सुचल्याने तो कावराबावरा झाला. त्याची द्विधा मनस्थिती झाली. एक मन म्हणे, जा ज्याची अमानत त्याला परत कर. तर दुसरं म्हणे, अरे वेड्या अगदी आयुष्यभर मेहनत केली तरीही इतकं धन नाही मिळवू शकणार तू.


वसीमच्या डोळ्यासमोर मुमताजचा पैठणी मागणारा चेहरा येऊ लागला. यातील साड्याही महाग दिसत आहेत, शिवाय दागिने ही जोडीला आहेतच. 'किती खूश होईल ती हे सर्व पाहून' वसीम मनात मांडे खाऊ लागला. ती पिशवी त्याने आपल्या सीट खाली ठेवून दिली. थोड्या वेळाने मात्र त्याला पश्चाताप होऊ लागला. 

'या साड्या आणि दागिने त्या कुटुंबाचे पिढीजात असतील. किती मोठा धक्का बसला असेल आजींना. शिवाय त्या मंगलकार्यालयात गेल्या म्हणजे नक्कीच घरी मंगल कार्य असावे. मुमताजला पैठणी आज नाही तर उद्या नक्की घेऊ. हवं तर व्याजाने पैसे घेऊ कुणाकडून पण असं ऐवज लंपास करणं चुकीचं आहे.'


वसीमने रिक्षा परत फिरवली. तो पुन्हा मंगलकार्यालयाजवळ आला. त्या आजी त्याला बाहेरच काही लोकांसोबत बोलताना दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. वसीमला पाहताच त्यांना ओळख पटली. त्या लगबगीने रिक्षाजवळ आल्या. वसीमने सीटखालून पिशवी काढून त्यांच्या हाती दिली. आजींचा आणि सोबतच्या लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. लाखो रुपयांचा ऐवज एका सामान्य रिक्षावाल्याने परत केला होता. ते त्याला बक्षिसी देऊ करत होते पण वसीम फक्त हात जोडून परत फिरला. तो निघणार तेवढ्यात आजींनी त्याला हाक मारली.

"बेटा ही पिशवी तू तुझी आई किंवा बायकोला दे, आजीकडून भेट समज. नको म्हणू नकोस."

वसीमला त्यांचे मन मोडवेना. त्याने पिशवी हातात घेतली. सहज आत डोकावले तर आत एक सुंदर रेशमी साडी होती.

"आजी, ही साडी तर खूप महाग वाटतेय. कशाला... मी तर फक्त माझं कर्तव्य केलं. तुम्ही खूप मोठं बक्षीस देताय." वसीम म्हणाला.

"ही पैठणी आहे बाळा, दोन वर्षांपूर्वी माझ्या यजमानांनी मला भेट दिली होती, खास बनवून घेऊन. आता ते नाहीत. मग ही महागमोलाची पैठणी घालून कुठे मिरवू... मी ही साडी माझ्या नातीला द्यायला आणली होती... पण तू ही मला नातवासारखाच. लाखो रुपयांचा ऐवज परत करून तू मनाचा जो मोठेपणा दाखवला आहेस त्याला तोड नाही. एका आजीकडून तिच्या नातवाला त्याच्या चांगल्या कामाचं बक्षीस समज हवं तर. नाही म्हणू नकोस."


वसीमचा कानावर विश्वास बसत नव्हता. अनपेक्षितपणे त्याच्या बायकोचे स्वप्न पूर्ण होणार होते. मोठ्या आनंदाने शीळ घालत त्याने रिक्षा घराच्या दिशेने वळवली. आज त्याच्या रिक्षाला जणू पंखच लागले होते.


✍️ सविता किरनाळे


वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


1 Comments

  1. खूप सुंदर कथा.
    अगदी तलम रेशमी जरतारी पैठणीसारखीच

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post