भूक

 

भूक.... 

✍️ दीपाली थेटे-राव

माळावर ओसाड जागेत चिता जळत होती पांडबाची. 

सगळे मजूर जमले होते

इपरीतच घडलं होतं सारं

सकाळी न्याहारी करून एकत्रच कामावर गेले होते सगळे

अन् हे असं घडलं. 

घमेलं खाली सोडता सोडता नवव्या मजल्यावरून पांडबाही खाली आला. 

गर्दी गडबड झाली. 

काम सोडून लोक गोळा झाले

रक्ताच्या थारोळ्यातला 'तो' क्षणात होत्याचा नव्हता झाला. 

रांगडा गडी. 

एकलाच चाराला भारी. 

तरी बी मनानं मऊ

बायका पोरांवर लई जीव. 

...त्याची बायको धाय मोकलून रडत होती. बघवत नव्हतं

तीन लेकरं तिच्या कुपाटीला घाबरून बसलेली.... 

"काय भरवसा नाय बग आयुष्याचा. 

कष्ट करायचं.. मर मर मरायचं .. 

लोकांची मोठी मोठी घरं बांधून द्यायची पर आपल्याला ना धड रहायला जागा ना लेकरांना पोटभर खायला." 

प्रत्येकाच्या मनात अशाश्वताची भिती... 

उद्याची चिंता.. 

आज पांडबा गेला तरी त्यांना दुसर्या दिवशी मजुरीला जावच लागणार होतं. 

परत कधी त्यांच्यापैकी कोणीही मेलं तरी मागच्यांना थांबता येणारच नव्हतं. 

इथे आयुष्याची किंमत शून्य झाली होती... आणि भूक फार महाग

हळूहळू करत सगळे निघाले. 

तिला हा निघायला हवं होतं.

 'नवर् याकडे' शेवटची नजर टाकून ती निघाली. 

चौदा-पंधरा दिवस सरले.. 

आता त्यांच्या पोटाची काळजी त्यांना घ्यावीच लागणार होती. 

कोण किती दिवस पोसणार फुकट

...

... 

काही घरांमध्ये धुणं- भांड्यांची कामं मिळवली 

खूप मेहनतीनं करायची काम ती

अगदी स्वतःच्या घरातलं असल्यासारखं निगुतीनं आणि स्वच्छ. 

त्यामानानं मिळणारा मोबदला तिला पुरेसा नव्हता खरंतर 

पण तरीही ती करत होती 

पोट जाळण्यासाठी .. 

सणासुदीला उरलं सुरलं मिळायचं

जीव आभाळाइतका मोठ्ठा होऊन जायचा. 

लगबगीनं भराभरा काम उरकून निघायची ती घराच्या- मुलांच्या ओढीनं 

तेवढंच मुलांच्या तोंडी काही-बाही चांगलं पडायचं 

तिचं पोट भरून जायचं मग.. 

कधी एखाद्या घरातून मिळालेली 'कामवाली' वागणूक तिला दुःखी करून जायची 

पण ती दुर्लक्ष करत रहायची

अन् त्या दिवशी ती घटना घडली... 

मालकिणबाई काही कामासाठी बाहेर गेल्या होत्या. 

मालक घरी एकलेच.

तसही ती काम करत असताना कायम तिच्याकडे नजर रोखून बघत रहायचे 

तिला लाख वाटायचं मालकीणबाईंना वेळेचं विचारुन हे दुकानावर गेले की मग जावं कामाला. 

तसं एकदा आडून आडून बोलून पण बघितलं होतं तिनं. तशा त्या उत्तरल्या 

"नको गं बाई! हीच वेळ बरीय. माझीही कामं एकात एक उरकून जातात.

मग मी ही मोकळी अन् तू ही"

  तिला अवघडल्यासारखं व्हायचं

 पण रेटत होती ती सगळं

वेळेत पोहोचता यायचं घराकडे एवढंच... 

 आज मात्र मालकीणबाई नसल्याचा पुरेपूर फायदा घेतला त्यांनी 

ती आल्या आल्या तिला चहा करायला लावला..

  ती नको नको म्हणत असताना जबरदस्तीने समोर बसवून घ्यायलाही लावला

हे सगळं लादलेपण झिडकारून द्यावसं वाटत होतं तिला

पण तिचे हात दगडाखाली होते

 काम जाण्याची भीती होती 

परिस्थितीनी तिचं तोंड शिवून टाकलं होतं

  त्याही स्थितीत ती जमेल तसा प्रतिकार करत होती

 विरोध दाखवून देत होती

   आत जाऊन साहेब नवीन कोरी साडी घेऊन आले आणि तिला म्हणाले

" ही तुझ्यासाठी

 तुझ्यावरच जास्त शोभेल 

घेऊन टाक तुला..माझ्याकडून गिफ्ट समज."

तिच्या खांद्यावर हात ठेवून ते तिला कुरवाळत होते आणि ती अंग आखडून घेत होती. 

तितक्यात दार उघडून मालकीणबाई आत आल्या.

त्यांनी पाहिलं... 

'पकडले जाऊ' या भीतीने मग मालकांनी उलट आरडाओरडा चालू केला 

" ही बघ कालच तुझ्यासाठी साडी आणली होती. आज तुला सरप्राईज देणार होतो. 

ही आली..

काम करत होती.. 

सहज आत चक्कर टाकली आणि बघतो तर काय? 

ही तुझ्यासाठी आणलेली साडी चोरत होती. 

रंगेहाथ पकडलं तर हे मी तुला सांगू नये म्हणून माझ्यावरच डोरे टाकू पाहत होती"

काय खरं अन् काय खोटं

तिचे शब्दच गारठले.

 खूप रंगवून रंगवून सांगून त्यांनी खोटी घटना खरी मानण्यास भाग पाडलं बाईंना.

 मग मालकीणबाईंचा आरडाओरडा चालू झाला

  आजूबाजूचे ही त्यात सामील झाले..

"अगोबाई ! अशी आहे का ही ? 

वाटत नाही हो बघून. 

किती सोज्वळ वाटते. "

"गरीब म्हणून कामाला ठेवलं तर ही थेरं करतेस काय? "

"हो ना मेली ची नजरच तशी वाटतच होती पहिल्यापासून. "

"काय तरी बाई दिवस आलेत ! अशा बायकांना घरी ठेवायचं म्हणजे जीवाला घोरच की. "

"मला तर पहिल्यापासून तशीच वाटत होती म्हणून कामाला ठेवायला नाही म्हणलं. अगदी पदर पसरला तरी. "

खरतर खूप कामं झाली म्हणून हिनेच त्यांना नाही सांगितलं होतं. 

     अब्रुची पार लक्तरं लक्तर झाली तिच्या

गरीबाकडे तेवढी एकच तर जीवापाड जपलेली पुंजी असते. तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वहायला लागलं. 

"आता बघा कशी साळसूदपणे रडते आहे"

   एकालाही दया येत नव्हती तिची... 

 समाजाचं असच आहे..खरं काय आहे हे माहीत करून न घेता झुंडीच्या मागे धावतात.. 

मग खोटं ही बेमालूमपणे खपून जातं... 

 कोण होतं तिच्या बाजूनी बोलणारं...

काहीही न करताही ती तोंड काळ करून परतली होती 

धक्के मारून बाहेर काढण्यात आलं होतं तिला सोसायटीच्या... 

 जगण्याचं गणितच अवघड होऊन बसलं. कसंतरी करून नवर् याच्याच कामावर बांधकाम मजुरीचं काम परत मिळवलं हातापाया पडून. 

------------------

"आये.....

      आज तरी कायतरी पोटभर 

खायला आण ना...

 भाकर तिखटा-मिठाच्या पाण्याबरोबर खाऊ नगो वाटू लागलंया"

  'व्हय नक्की आणते रे माझ्या पिलांनो'.

 झोपडीच्या दाराशी बसलेल्या तिच्या चिल्या-पिल्ल्यांकडे तिने हताशपणे पाहिलं आणि ती निघाली. 

ती तरी काय करणार होती

नवरा मेला. 

हिच्या मागे तीन लेकरं ठेवून... 

जमेल ते.. पडेल ते काम करत ती मोलमजुरी करून त्यांचं पोट भरण्याचा प्रयत्न करत होती. 

       कामावर जाताना वाटेत 'त्यांचा' वाडा लागायचा. शिशारी येईल अशी त्यांची नजर तिच्या अंगावरून फिरत राहायची. तिला कळायचं...

  पण करणार काय

 मोठं प्रस्थ होतं 'ते' . ... 

अन् तिला आलेला आधीचा अनुभव? ... 

ती मग पदर जरा जास्तच ओढून, 

लपेटून खाली मान घालून भराभर

 चालत पुढे जायची. 

       तिचं सुंदर रूपडं ज्यावर पांडबा भाळला होता.. 

तिच्यावर जीव ओवाळून टाकला होता त्यानं.. 

ते रूपडंच आज तिच्यासाठी शाप ठरलं होतं

नवरा गेल्यापासून तिला अशा नजरांमधला बुभुक्षितपणा जास्तच जाणवू लागला होता.

 आणि मंगळसूत्राची कमतरताही. ... 

  कामावर गेल्यावर कळलं की 

काम सुटलं होतं.  

आता त्यांना इतक्या मजुरांची गरज नव्हती. 

तिने गयावया करून पाहिलं 

पायही धरले कत्राटदार सायबाचे 

पण काहीच उपयोग झाला नाही. 

डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. 

माघारी निघाली. 

पुन्हा वाटेत तोच 'वाडा'......... 

तिनं वर पाहिलं 

नजरेला नजर मिळाली

  त्या नजरेतली 'भूक' तिला ओळखता आली. 

डोळ्यासमोर मुलांचे भुकेलेले चेहरे दिसत होते. 

दोन्ही नजरांमध्ये भूकच........ 

फक्त स्वरूप वेगवेगळं. 

आणि ती आगतिकपणे वाड्याच्या

 पायर् या चढू लागली.....

©️®️ दीपाली थेटे-राव

वरील कथा दीपाली थेटे-राव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post