चोरी

  चोरी

✍️ अमृता देशपांडे

बाबा विवंचनेत बसमध्ये बसला होता, आजपण काम मिळालं नव्हतंच. बाबा उत्तम रंगकाम करायचा, पण हल्ली काम मिळतंच नव्हतं. आपल्याला घरी आलेलं पाहून बंटी 'माझी बॅट कुठाय?' म्हणून हट्ट धरून बसेल, आणि कोमल 'माझी स्कॉलरशिपची फी भरायला पैसे आणले का' विचारेल. कोमलच्या कालरशिपचे पैसे भरायचा उद्याचा शेवटचा दिवस, आपल्या कोमलसाठीच तर थांबल्या होत्या तिच्या निसा मॅडम. आपल्या कोमलच्या हुशारीचं लयी कौतुक करत होत्या म्हणे हिच्याजवळ. ही कालरशिप भेटली तर खूप मदत होणार होती तिच्या शिक्सनाला. आता कुठुन आणु पैसा?...


बाबा याच विचारात होता, तोच त्याला समोर एक मुलगी बसलेली दिसली. तिच्या हातात एक बॅग होती, पण बॅगची चेन नीट लागलेली नव्हती. बाबानं निरखून पाहिलं, पाचशेच्या नोटांचं बंडल होतं त्यात, चार-पाच हजार तर नक्कीच असतील, आणि काही कागदपत्र. बाबाचे डोळे चमकले... हे पैसे चोरू का? अख्ख्या महिन्याचा प्रश्न मिटेल. कोमलची कालरशिप, बंटीची बॅट, कमळीला नि मलाबी नवी कापडं घेता येतील. तसंही दिवाळी तोंडावर आलीये...


पण नको, पोरीचे पगाराचे असतील, काही जरूरीच्या कामाचे, औषधपाण्यासाठी जमवलेले, मेहनतीनं कमावलेले असतील. आपण चोरायचे म्हणजे... कमळीला कळलं तर हातबी लावायची नाय, नकोच ते! पण कोमलची कालरशिप? बंटीची बॅट? कमळीची विटलेली साडी बगून उबग येतोय... काय करावं? बाबाचं एक मन त्याला चोरीला उद्युक्त करत होतं, तर दुसरं थोपवत होतं. मग त्याचं लक्ष त्या मुलीकडे गेलं. कपडे तर चांगले घातले होते तिनं, कानात-गळ्यात सोन्याचे दागिने, हातातली बॅगही भारीतली दिसत होती. 'पोरगी तर चांगल्या घरातली दिसतेय, गेलेत हिचे चार-पाच हजार तर हिला फार काही फरक पडेल असं दिसत नाही. शिवाय नोकरीवाली दिसते, आपल्यासारखी हातावर पोट घेऊन जगणारी नाही...'


हो-नाही, हो-नाही म्हणता म्हणता बाबाचा चोरीचा विचार पक्का झाला. पण याआधी असं वाकडं काम केलं नसल्याने मनात भीती होती. स्टॉप यायला अजून बराच वेळ होता, काय आणि कसं करायचं याची योजना मनात ठरवत त्या मुलीकडे लक्ष ठेवून बाबा होता. ती मुलगी मात्र आपल्याच विचारात होती, काय बरं विचार करत होती ती...


' चला आता उद्या कोमलचे पैसे आलेत कि सगळ्यांचे फॉर्म्स स्कॉलरशिप कमिटीकडे जमा करता येतील. खरंच हुशार आहे कोमल, घरची परिस्थिती वाईट आहे म्हणून, पण खूप काही करू शकेल आयुष्यात. ही स्कॉलरशिप मिळाली तर मदतच होईल तिला. मी स्वत: अभ्यास घेईन तिचा...' निशा मनात म्हणाली. आणि हो, घरी जाताना आईसाठी मेडिकलमधून औषध घ्यायचं ती विसरली नव्हती.


बस थांबली तशी निशा उतरली, मनाचा हिय्या करून बाबाही उतरला. हळूहळू तिच्या मागोमाग चालू लागला, ती एका सामसूम गल्लीत शिरली. बाबाने ओळखलं, हीच संधी आहे... तो तिच्या नकळत जवळ गेला. त्यान झटकन तिला धक्का मारला, आणि बॅग घेऊन पळाला. 'चोर-चोर' ती ओरडेपर्यंत तो दिसेनासाही झाला. रस्त्यावर सामसूम असल्याने कुणी मदतीला धाऊनही आले नाही. अंधारामुळे चोराचा चेहराही निशा बघू शकली नाही.


निशा तिथेच थबकली. एक पाऊलही पुढे टाकणं तिला शक्य होईना. चोरानं केवळ स्कॉलरशिपचे, आईच्या औषधपाण्याचेच पैसे नेले नव्हते, मुलांचे फॉर्म्स, इतरही काही महत्वाची कागदपत्रे सगळं नेलं होतं. त्यामुळे तिच्या नोकरीवरही प्रश्नचिन्ह उभे राहणार होते. किती कष्टाने मिळवली होती तिने ह्री नोकरी! खरं म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यावर निशाला परदेशात जायचं होतं पुढच्या शिक्षणाला, पण वडील अपघातात वारले आणि आईनी कॅंसरमुळे अंथरूण धरले. मग निशाला ही नोकरी धरावी लागली. मोठ्या जड पावलांनी ती घराकडे वळली...


बाबा मात्र खुशीत शीळ वाजवत घराकडे वळला. त्यानं वाटेत बॅगेतले कागदपत्र फाडून फेकले, बॅग मात्र चांगली होती, आणखी चार पैसे येतील म्हणून बॅग आणि पैसे घेऊन घरात शिरला. 'ये कमळे बघ, आज मी लयी काम केलं आन लयी पैसे आनले बग. आता उद्याच बंटीले ब्याट, कोमलची कालरशिपची फी आन दिवाळीसाटी 

समद्यांना नवी कापडं घीऊ...'


कमळी बाबाच्या बोलण्यावर हसली खरी, पण 'एका दिवसात एवढे पैसे?...' तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच... मुलं मात्र खुष होती, उद्या त्यांना नवे कपडे, खेळणी, खाऊ मिळणार होता ना, ती बाबाला चिकटून

बसली होती.


  इकडे निशा विचार करत बसली, 'उद्या प्रिंसिपल सरांना काय उत्तर देऊ? त्यांना पटेल का मी सांगितलेलं? उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कसंही करून पैसे आणि फॉर्म्स जमा व्हायला हवेत, पण कसे?...' अस्वस्थपणे गळ्यातल्या चेनशी चाळा करत ती बसली होती, आणि अचानक तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली.  काहीही झालं तरी मुलांचं नुकसान ती होऊ देणार नव्हती. 'आईनी विचारलं तर काय सांगू?... सांगू काहीतरी...' ती मनाशीच पुटपुटली.


तिकडे बाबा झोपायचा प्रयत्न करू लागला,  पण झोप काही त्याला येईना. सारखा डोळ्यांपुढे त्या मुलीचा चेहरा येऊ लागला.त्याचं अंतर्मन त्याला खात होतं.  मग बंटी आणि कोमलच्या निजलेल्या निरागस चेहर्याकडे बघून त्यानं स्वत:च्या मनाची समजूत घातली.  पण कमळीला मात्र आपल्या नवर्याच्या मनातली खळबळ जाणवत होती, पण नेमकं कारण समजत नव्हतं...


  सकाळी बाबा ठरवल्याप्रमाणे मुलांना आणि कमळीला बाजारात घेऊन गेला, नवी कापडं, खेळणी घेतली, भेळ- पाणीपुरी खाल्ली. सगळे आनंदात कोमलच्या शाळेत गेले. आज बाबा पहिल्यांदा निशा मॅडमला भेटणार होता. बाबाच्या डोक्यात निशा मॅडम म्हणजे कुणी पस्तिशी-चाळिशीची विवाहित स्त्री असावी असे होते. निशा मॅडम त्यांना भेटायला बाहेर आल्या मात्र, बाबाच्या पायाखालची जमीनच सरकली. 'अरे हिच ती पोरगी, काल जिची आपण बॅग चोरली? हि कोमलची निसा मॅडम! आपण तिचेच पैसे चोरून तिला देतोय...' बाबाचं डोकं सुन्न झालं होतं. 


'निसा मॅडम, हे कोमलचे कालरसिपचे पैसे बगा, आता तुमी सोता जातीनं तिचा अब्यास घेनार म्हटल्यावर काळजीच मिटली जी...' कमळी म्हणाली. निशा कसंनुसं हसली, आज प्रिन्सिपलसर जाम भडकले होते तिच्यावर. तिची बॅग चोरीला गेली हे ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. सगळ्या मुलांचे पैसे मी भरेन असं सांगितल्यावर शांत झाले. आता पाच वाजायच्या आंत तेपण काम करायचं होतं.  


परतीच्या वाटेवर बाबा एक शब्ददेखील बोलत नव्हता. त्याला प्रचंड अपराध्यासारखं वाटू लागलं. तो घरी आला नि मटकन खाली बसला कमळीला तर काहीच समजेना. ' काय जालं वो? असे काऊन बसला? आज कामावर जायाचं न्हाई का?' पण बाबा काहीच बोलेना, नुसता घुम्यासारखा बसून राहिला.


मग कमळीच उठली, कालची बाबाची पिशवी हुडकू लागली. आणि तिला ती बॅग दिसली. 'आवो, ही ब्याग कुनाची' ती आश्चर्यानं म्हणाली. बाबा काहीच बोलेना तेव्हा कमळी खडसावून म्हणाली, ' काय वो, ब्याग कुनाची? चोरली का काय तुमी?'... 


'निसा... निसा मॅडमची...' बाबा कसंबसं उत्तरला. 'निसा मॅडमची? ...' कमळीला दोन मिनीट काही कळलंच नाही. ' आरं द्येवा!...' अचानक डोक्यात ट्युब पेटल्यागत झालं. ' म्हंजे तुमी ही नवी कापडं, बंटीची ब्याट, कालरसिपचे पैसे... समदं...?' डोक्यावर हात ठेवत कमळी बोलू लागली, ' अवो, काऊन केलं वो असं? त्या निसा मॅडम आपल्या कोमलला येवडी मदत करतात आन आपन त्यान्लाच तरास द्याचा का? आन मी म्हंते गरजच का होती?...'


'लयी दिवस जाले गं, कुटं कामच भेटंना. रिकाम्या हाती घरला येऊसंच वाटंना बग...'- बाबा

'अवो, मी चार घरचे जास्तीचे कामं केले असते. तुमाला मी सांगितलं न्हवं, चार घास कमी खाऊ, पर मेहनतीचं खाऊ. हे असलं चोरीमारीचं काय बी नको...' कमळी पुढे म्हनाली. 'त्या निसा मॅडम बिचार्या सोता अडचणीत असूनबी दुसर्याचा येवढा विचार करतात आन आपन... ते काय नाय, चला उठा, आधी त्या निसा मॅडमची माफी मांगू, आन फुडल्या दोन महिन्यात त्यांचे समदे पैसे परत देण्याचं वचन देऊ...' 


'अगं पर कमळे, निसा मॅडम आपल्याले पोलिसात टाकतील, आपल्या लेकरांस्नी शाळेतून काढून टाकतील, रस्त्यावर येतील गं आपली लेकरं...' - बाबा

'ते काहीबी करोत. पण हा चोरीचा माल आपल्याला पचायचा नाय. आपण पाया पडू निसा मॅडमच्या, नाक रगडू त्यांच्या पायावर. चला म्हंते ना, नाहीतर त्या नव्या कपड्याला मी हातबी लावायची नाय...' कमळी निर्धाराने म्हणाली.


कमळी नवर्याला शाळेत घेऊन गेलीच. बाबाकडून सगळी हकिगत ऐकल्यावर निशा थक्कच झाली, तिला काय बोलावं तेच कळेना. 

'मॅडम, माफी करून देजा माह्या मालकाले, मजबूरीमंदी जालं वो त्याईच्याहुन हे पाप. पण मी वचन देते मॅडम, फुडल्या दोन महिन्यात तुमचे सम्दे पैसे परत करू...' हात जोडून कमळी विनवणी करू लागली. 


'अगं कमळे, हात काय जोडतेस? यात तुझी किंवा तुझ्या नवर्याची काहीच चूक नाही, चूक कुणाची असेल तर ती या परिस्थितीची आहे, परिस्थिती माणसाला लाचार बनवते, आणि त्याच्याकडून वाट्टेल ते करवून घेते. हे माझ्यापेक्षा कोण अधिक समजू शकेल. ते जाऊद्या, मला कौतुक तुझ्या प्रामाणिकपणाचं वाटतं. बाबाजी तुम्हीही वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला तुमची चूक उमगली यातच सर्व आलं...' निशा म्हणाली. 'तुम्हाला तुमच्या मुलांना एवढं शिकवावंसं वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त एकच करा, काहीही झालं तरी मुलांचं शिक्षण पूर्ण करा...' ती हसत हसत म्हणाली.


ती दोघं जाऊ लागली, पण चार पावलं पुढं जाऊन बाबा थांबला. 'मॅडम, तुमचे लईच उपकार झालेत आमच्यावर... पण... बंटीला नि कोमलला...' बाबा पुढं बोलू शकत नसला तरी निशानी ते ओळखलं. 'अहो काळजी करू नका, तुमच्या मुलांनाच काय इतर कुणालाही मी यातलं काहीच सांगणार नाही. मुलांसाठी तीळ-तीळ तुटणारं बापाचं काळीज दिसतं मलापण... हो पण तुम्हीही मला वचन द्या, यानंतर कधीही चोरी किंवा इतर कुठल्याही वाईट मार्गाला लागणार नाहीत, भलेही कितीही वाईट वेळ येवो...' 


'व्हय मॅडम, अहो आज आयुष्यभराची अद्दल घडली, पुन्हा त्या मार्गानं जायचा इचरबी करनार नाई...' बाबा म्हणाला. ती दोघं डोळे पुसत शाळेच्या गेटबाहेर पडत होती. निशा त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहिली, का कुणास ठाऊक तीला आपल्या वडीलांची खूप आठवण येऊ लागली. 'मायबाप शिकलेले असोत कि अडाणी, लेकरांची काळजी तर दोघांना सारखीच असते ना...' निशा विचार करत करतच वर्गात शिरली.


-सौ. अमृता श्रीरंग देशपांडे, नागपूर


वरील कथा अमृता देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

2 Comments

 1. फारच छान लिहिली आहे गोष्ट. निशा आणि बाबाच्या मनातले विचार समांतर जातात हे वाचायला मजा आली. शेवटही छान.
  पण त्याने ती कागदपत्र फाडून टाकण्याची गरज नव्हती. आता मुलांचे फॉर्म्स कसे वेळेत जाणार?

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 🙏 बाबा अडाणी होता, त्यामुळे त्या कागदपत्रांचे महत्व त्याला समजले नाही. आता निशाला परत सगळे forms मुलांकडून भरून घ्यावे लागणार.

   Delete
Post a Comment
Previous Post Next Post