चैत्रपालवी

 चैत्रपालवी

लेखिका- सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

होळी सरली की वातावरणातील गारवा कमी व्हायला लागतो. पण विशाखाच्या मनातील होळी कधीची धुमसतच होती. पाच महिने होवून गेले होते त्या अनुभवाला मात्र अजून गारवा वाट्याला आला नव्हता. माणसात असून नसल्यासारखी राहायची, एखाद्या अबोल बाहुलीसारखी. तिचे ते शांत राहणे तिच्या आईच्या मनात धडकी भरवत असे. कारण वाहत्या पाण्यापेक्षा साठवलेले पाणी जास्त धोकादायक असते. मुलीची ही अवस्था न पाहवून आईने तिच्या भावजयीला म्हणजे विशाखाच्या मामीला कॉल केला.

"पार्वती, अगदी मुकीच झालीय बघ पोरगी. बोलणं नाही चालणं नाही नुसती शून्यात नजर लावून असते. मी दहा वेळा बोलले की ही एकदा उत्तर देते. जे झालं त्यात काडीभर दोष नसताना हीची ही अवस्था आणि सगळं करुन सवरून ते लोक नाक कापलं तरी छिद्र तरी आहेत अशा रुबाबात फिरत आहेत. हिला परत कसं माणसात आणावं हे मला तरी समजत नाही आहे. काय करु म्हणजे माझी पोर पुन्हा हसती खेळती होईल असं झालंय मला." बोलता बोलता आईचा आवाज जड झाला. बाजूला बसलेल्या विशाखाच्या कानावर हे संभाषण पडत होते पण मनापर्यंत पोहचत नव्हते. तिकडून ऐकणाऱ्या पार्वती मामींना भाचीबद्दल ऐकून वाईट वाटत होते. काहीसा विचार करुन त्यांनी एक प्रस्ताव मांडला,



"वहिनी, जे नशिबात आहे ते चुकवू म्हटलं तरी चुकत नाही. ती काय आपल्या हातातील गोष्ट आहे का? तिचं दुःख तीच जाणे बापडी. आपण ते वाटून तर नाही घेवू शकत पण थोडं कमी व्हावं याचा प्रयत्न तर नक्की करु शकतो. तुम्ही विशूला इकडे पाठवा, जागा बदलली म्हणजे थोडं बरं वाटेल तिला. इथल्या मोकळ्या हवेत म्हणा किंवा पोरांमुळे म्हणा थोडा तरी फरक पडेलच."

आईला मामीचे बोलणे पटले. तसंही लहानपापासूनच विशाखाला आजोळचा बराच लळा होता. सुट्टी पडल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती मामाकडे जायची. सख्खी चुलत मामेभावंड मिळून नुसता धुमाकुळ घालत असत. म्हणून आईने दुसऱ्या दिवशीच मामाला बोलावले. मामाही लाडक्या भाचीला घेवून जायला चारचाकी घेवून आला. निर्विकारपणे बॅग भरुन विशाखा आजोळी निघाली. तिचा चेहरा पाहून आईला भडभडून आले पण मामाने डोळ्यांनीच बहिणीला दिलासा दिला.

गाडी हायवेला लागली. नुकतीच होळी होवून गेल्याने वातावरणात गरमी जाणवत होती. काळया कुळकुळीत डांबरी रस्त्यामुळे उन्हात डोळे दिपल्यासारखे वाटत होते. शेतात कापणी झाल्यामुळे वाळलेले गवत चारा यांचा रचून ठेवलेला ढिगारा वातावरण अजूनच उदास बनवत होता. पण वसंताच्या आगमनाची चाहूल देणारी, मधूनच दिसणारी पोपटी हिरवळ दुःखानंतर सुख या नियतीच्या चक्राची आठवण करुन देत होती. मामा सर्व काही न्याहाळत होता पण विशाखा ढिम्मच होती.

गाडी मामाच्या वाड्यासमोर येवून उभी राहिली. लिंबाखाली वाट पाहणाऱ्या मामीने भाकर तुकडा ओवाळून भाचीचे स्वागत केले. तो वाडा आणि मामीचे स्वागत पाहून विशाखाच्या नजरेत किंचित ओळखीची खूण आली. आत आल्यावर सवयीने विशाखा स्वयंपाकघरात जाऊन पाटावर बसली. मामीने दिलेला गुळाचा खडा जिभेवर ठेवत माठातल्या थंड पाण्याचा तांब्या तोंडाला लावला. नेहमप्रमाणे मामीने विशाखाची, तिच्या आईची चौकशी केली आणि आश्चर्य म्हणजे विशाखानेही अगदी व्यवस्थित उत्तर दिले. क्षणभरासाठी असे वाटले की मधली वर्षे जणू काही लोटलीच नव्हती.



जेवण झाल्यावर विशाखा लिंबाच्या झाडाखाली जावून बसली. ही तिची आवडती जागा होती. लहानपणी दुपारच्या वेळेस आजी, मामी वामकुक्षी घ्यायच्या तेव्हा तिला कंटाळा आला की ती या झाडाखाली मामेभावंडांसोबत भातुकलीचा खेळ मांडे. सोनल, मोनल, दीपक, विशाल, विकास हे लोकं साधारण तिच्याच वयाची होती. सोनल आणि मोनलचे आता लग्न झाले होते. विशाल, विकास, दीपक ही भावंडं कामकाजाला लागली होती. पैकी विशाल आणि विकास विशाखाचे सख्खे मामेभाऊ होते तर दीपक, सोनल, मोनल चुलत मामांची मुलं.

बसल्या बसल्या विशाखाला त्यांची आठवण येत होती. विशालच्या दोन मुली बाजूला गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासराबरोबर खेळत होत्या. अंगापिंडाने मोठ्या असणाऱ्या विशालने शेतीमध्ये मामाची मदत करायला सुरुवात केल्यावर दोन वर्षात लग्न केले होते आणि वर्षभरात जुळ्या मुलींचा पिता झाला होता. विकास शहरात नोकरी करत होता तर दीपक त्याच्या वडिलांना शेतात मदत करे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक प्रयोग करुन त्याने शेतीमध्ये मोठे नाव कमावले होते. पंचक्रोशीत प्रगतशील बागायतदार असं नाव कमावले होते त्याने.

न जाणे किती वेळ विशाखा आठवणीत रमली होती. संध्याकाळच्या चहासाठी मामीने हाक मारल्यावर ती भानावर आली. चहाबरोबर गप्पा, मुलांसोबत खेळणे यात विशाखा आपलं दुःख काही वेळासाठी विसरली होती. दिवेलागणीची वेळ झाली होती. मामीने दिवाबत्ती करून चुलीवर तवा ठेवला.

"हे काय मामी, गॅस असतानाही तू चुलीवर स्वयंपाक करते?" विशाखाने विचारले.

"अगं, सकाळी घाई असते म्हणून गॅसवर करते, संध्याकाळी मात्र चुलीवरच्या गरम भाकऱ्याच मामाला आवडतात. आणि विशू नव्याची कास धरताना जुन्याची साथही कधी विसरू नये माणसाने."

मामी सहज बोलून गेल्या पण विशाखाच्या मनात काहूर माजलं.

'खरंच की, नव्या आयुष्यात तडजोडी करताना मी जुन्या लोकांना विसरूनच गेले. इथे आल्यापासून किती छान वाटतंय. भावंडांच्या नुसत्या आठवणीने मन प्रसन्न झालंय जर मी संपर्क ठेवला असता तर नक्की साथ दिली असती त्यांनी.' भरुन आलेले डोळे तिने मामीच्या नकळत पुसण्याचा प्रयत्न केला पण मामीने ते पाहिलेच.



"अग बाई, सूनबाईला रडवलं वाटत मी, आता हो काय करावे म्हणजे ती हसेल?" मजेत त्या म्हणाल्या. विशाखाला हसू आले. ती पण एक गंमतच होती. लहानपणी मुलांच्या भांडणात विशाखा जेव्हा रडायला लागे तेव्हा मामी अशीच तिची समजूत काढायची. बाई हे संबोधन ऐकून विशाखाला मोठं झाल्याचा फील येवून ती मोठ्या रुबाबात सांगायची, काही नको जेवायला आमरस पुरी कर म्हणजे झालं. आताही डोळे पुसत तिने त्याच रुबाबात उत्तर दिले, "काही नको जेवायला आमरस पुरी कर म्हणजे झालं."

आणि दोघी पुन्हा खळखळून हसल्या. रात्री जेवण झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले असताना दीपक आला.

"काका पाहुण्या आल्या आहेत म्हणून ऐकलं, कुठे आहेत?" त्याने मामांना विचारले. त्याचा आवाज ऐकून मामीला काहीतरी सांगणारी विशाखा वळून त्याच्याकडे पाहू लागली. समोर उभा असणारा तरुण दीपक आहे यावर तिचा विश्वास बसेना. किती वेगळा दिसत होता तो! ऊंच, टी शर्टमधून जाणवणारे पिळदार शरीर आणि रापलेला तरीही देखणा चेहरा. आपण त्याच्याकडे टक लावून पाहतोय हे जाणवून विशाखा गोरीमोरी झाली. तिचे गाल किंचीत आरक्त झाले. स्वतःला सावरुन तिने त्याची खुशाली विचारली.

"मी बरा आहे विशाखा... खूप वर्षांनी तुला भेटून आनंद झाला." हसऱ्या चेहऱ्याने त्याने उत्तर दिले. त्याला वाटणारा आनंद त्याच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होता. दोघे बोलण्यात रमलेले पाहून मामा, मामी, विशाल, त्याची बायको वगैरे झोपायला गेले कारण ते रोज पहाटे लवकर उठत. कडुनिंबाच्या झाडाखाली असलेल्या पायरीवर दोघे बसले होते. थोड्या वेळाने बोलण्याचे विषय संपले कारण आता त्यांचे अनुभवविश्र्व वेगवेगळं होतं. समान मुद्दा सापडत नव्हता बोलायला. नुसतं शांत बसून रातकिड्यांचा आवाज ऐकण्यात ही इतका आनंद मिळतो हे विशाखाला पहिल्यांदा जाणवले होते. अचानक एक उंदीर तिच्या पावलांवरून पळत गेला. दचकून ती अस्फुट ओरडून दीपक जवळ सरकली. तिचा घाबरलेला चेहरा पाहून त्याने नकळत तिला एका हाताने कुशीत घेतलं.



"अग काही नाही, उंदीर आहे तो. किती घाबरलीस." तिची समजूत घालत तो म्हणाला.

"हो पण त्याचे नखं लागले ना माझ्या पायाला." रडवेली होवून विशाखा बोलली. साडी थोडीशी उचलून तिने पाय दाखवले. तर खरंच पावलांवर ओरखडे उमटले होते. थोडंसं रक्त ही दिसत होते. त्याने हळुवारपणे त्यांच्यावर हात फिरवला.

"चल आत जाऊ, साबण लावून धुवून घे पाय. उद्या मी डॉक्टरांना घेवून येतो, टी टी चे इंजेक्शन घ्यावे लागेल."

त्याचे बोलणे संपले आणि अचानक ती भानावर आली, अजूनही ती त्याच्या मिठीतच होती. त्याचा तो स्पर्श तिला अजिबात खुपत नव्हता तर अगदी सुरक्षित वाटत होते त्याच्या हाताच्या विळख्यात. विशाखा थरथरली आणि तिने स्वतःची सुटका करून घेतली. दीपकही ओशाळवाणा झाला.

"सॉरी... ते चुकून...तू घाबरली होतीस म्हणून नकळत..." तो माफी मागू लागला.

"इट्स ओके, आय अंडरस्टँड." विशाखाच्या पापण्या झुकल्या. पुढे काही न बोलता ती घरात गेली. तिला हुंदका फुटला. तो आवरत ती बाथरूममध्ये शिरली. तो तसाच उभा होता, तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत. तिच्या मनातील द्वंद्व त्याला समजत होते.

विशाखाच्या घरचे दार बंद करून दीपक स्वतःच्या घरी गेला. नेहमीप्रमाणे झोपायला तो गच्चीवर गेला. आईने घालून ठेवलेल्या अंथरुणावर पडला पण आज झोप त्याच्याजवळही फिरकत नव्हती. मनात आठवणींचा कल्लोळ झाला होता. तिकडे दाराला आतून कडी लावून विशाखा मामीने घालून ठेवलेल्या अंथरुणावर जावून झोपली पण तिलाही झोप येत नव्हती. राहून राहून तिला दीपकचा स्पर्श आठवत होता. पुरुषी स्पर्श तिला नवा नव्हता. उलट त्यापायीच तिची अशी मोडून पडलेल्या खेळण्यासारखी गत झाली होती. पण हे काहीसं वेगळं होतं आणि हवं हवंस...

सुदर्शन, सुदर्शन विधाते नाव होतं त्याचं... तो म्हणजे विशाखाचा विधिपूर्वक केलेल्या लग्नाचा नवरा... टिपीकल कांदेपोहे पद्धतीने लग्न जमले त्यांचे आणि चार महिन्यांत लग्न. मधल्या चार महिन्यांत दोन तीनदा दोघे बाहेर भेटले होते. चांगला, सभ्य वाटला तिला तो आणि कुटुंबही सुशिक्षीत होते. तेविसाव्या वर्षी कुठे जगाचा इतका अनुभव असतो. त्यातून तो होणारा नवरा! त्याचे खांद्याभोवती हात टाकणं, गालावर थोपटणे किंवा मांडीवर हात ठेवणे विशाखाला खटकत नसे. त्यात इतकी सहजता असे की त्याचा सभ्यतेवर कुणाला शंकाही येत नसे.



पण मधुचंद्राच्या रात्री हा सभ्यतेचा बुरखा फाटला. सुदर्शनने अक्षरशः विशाखाचे लचके तोडले. तिने त्याचा इतका धसका घेतला, की तिला सडकून ताप भरला. नाइलाजाने ट्रीप अर्धवट सोडून त्यांना परतावे लागले. सुनेचा उतरलेला चेहरा, नवरा सहज जरी जवळ आला तरी अंग चोरणे या गोष्टी सुदर्शनच्या आईने हेरल्या. घरी कुणी नसताना त्यांनी प्रेमाने विचारले तर विशाखा हमसून हमसून रडू लागली. तिच्या अंगावरील खुणा पाहून सासूबाई चरकल्या. आपला मुलगा असा जनावरासारखा वागू शकतो यावर त्यांचा विश्वास बसेना. पण जे डोळ्यांना दिसते ते खोटे कसे म्हणावे. त्यांनी परस्पर निर्णय घेवून विशाखाला माहेरी पाठवले.

संध्याकाळी सुदर्शन घरी आला. विशाखा घरी नसल्याचे पाहताच तो रागावला. आईने त्याची समजूत घातली. दोन दिवस गप्प राहून तिसऱ्या दिवशी तो परस्पर जावून विशाखा ला घेवून आला. ते सहा महिने तिने अक्षरशः नरकयातना झेलल्या. सासूबाई सुदर्शनला समजावण्याचा प्रयत्न करत पण पालथ्या घड्यावर पाणी. मुलाच्या या विकृतीचा आपल्याला अंदाज आला नाही याचा त्यांना पश्र्चाताप होत होता. विशाखाला अगदी माहेरीसुद्धा सुदर्शन जावू देत नसे.

सुनेचा डोळ्यादेखत होणारा छळ पाहून सासूबाईंनी मन कठोर केले आणि तिच्या माहेरच्यांना बोलणे पाठवले. सर्व काही सांगून तिला परत घेवून जाण्याची विनंती केली.

"दादा, माझा मुलगा असा निघेल अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्याला सुधारण्याचे आम्ही खूप प्रयत्न केले पण गोष्ट आता हाताबाहेर गेली आहे. मी तुमची, तुमच्या मुलीची गुन्हेगार आहे. कोणत्या तोंडाने तुमची माफी मागू ते समजत नाही. तुम्ही विशाखाला घेवून जा. डिवोर्सची नोटीस पाठवा. जे झालं ते आपण बदलू शकत नाही पण भविष्यात पुन्हा असे घडू नये याची काळजी तर नक्की घेवू शकतो. मी कोर्टात विशाखाच्या बाजूने साक्ष देईन." हात जोडून त्या विशाखा च्या वडिलांची माफी मागत होत्या. ते सुन्न झाले होते. खरंतर थोडी चूक त्यांचीही होतीच. गावात माहेर असून सहा महिने मुलगी माहेरी आली नाही हे त्यांना खटकायला हवे होते. पण बहुतेक विशाखाच्याच नशिबाचे ते भोग असावेत! ते तिला घेवून गेले.



यथावकाश कोर्टकचेरी होवून विशाखाला घटस्फोट मिळाला. सुदर्शनने खूप आकांडतांडव केले परंतु त्याची आई सुनेच्या पाठीमागे ठाम उभी राहिली आणि कोर्टात तिच्या बाजूने साक्ष ही दिली. त्यामुळे जास्त त्रास नाही झाला. त्या विषारी नात्यातून सुटका तर झाली पण त्यातून मिळालेले अनुभव विशाखाची पाठ सोडायला तयार नव्हते. त्या प्रसंगापासून विशाखा कोलमडली.

अंथरुणावर तळमळत असताना विशाखाला हे सर्व आठवत होते. पुर्ण रात्र तशीच घालवल्यावर सकाळी कोमेजलेल्या चेहऱ्याने ती उठली. घरातली सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण तिची कळी काही खुलली नाही. रात्रीच्या प्रसंगामुळे ती दीपकच्या समोर सुध्दा गेली नाही. दोन तीन दिवस असेच गेले. मामाने विशाखाला शेताला घेवून जाण्याचे ठरवले.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी विशाखा मामासोबत शेताला गेली. छान फुललेला मळा, आंबा, चिकू, जांभळाची झाडं, बाजूने वाहणारा ओढा पाहून तिचा मूड चांगला होवू लागला. तिला तिथेच सोडून मामा कुठल्यातरी कामात गुंतले. विशाखा इकडे तिकडे फिरत होती. फिरता फिरता तिची नजर बांधापलिकडे असलेल्या मळ्यावर गेली. टी शर्ट आणि शॉर्ट्स वर एक व्यक्ती कसल्यातरी कामात गढली होती. विशाखा चट्कन मागे फिरली पण तोपर्यंत त्याने तिला पाहिले होते.

थोड्या वेळात हात पाय धुवून तो माणूस म्हणजे दीपक तिथे आला.

"विशू तू मला का टाळत आहेस? मी घरी आलो तरी समोर येत नाहीस. आताही मला बघून परत फिरलीस. माझं काही चुकलं का?"

"तुझं काही चुकलं नाही दीपू... पण माझ्याकडून काही चुकू नये म्हणून मी काळजी घेतेय." खालमानेने ती उत्तरली.

"हे बघ, तू कधी चुकणार नाहीस पण माझ्याबाबतीत चुकलीस तर मला ते आवडेल. इन फॅक्ट मला तेच हवं आहे." तिचे हात घट्ट धरुन तो म्हणाला.

"अं ... काय म्हणालास?" विशाखा चमकली.

"मी खरं तेच सांगतो. आय लव्ह यू विशू. आताच नाही, अगदी लहानपणापासून... तुला कधीच मागणी घालणार होतो. पण वाटलं, तुझ्यासारखी शहरी मुलगी माझ्यासारख्या साध्या शेतकऱ्याला का हो म्हणेल. म्हणून आधी स्वतःला सिद्ध करु, तुझ्या लायक बनू आणि मग तुझा हात मागू असं ठरवून दिवस रात्र मेहनत करत होतो. हवं ते साध्य केलं पण तोपर्यंत तुझं लग्न झालं होतं. वाटलं आता सगळं संपलं... रागावू नकोस पण तुझा घटस्फोट झाला तेव्हा मनातला एक कोपरा आनंदला होता... मग परत माझ्या स्वार्थीपणाचा राग आला. तुला पुन्हा पाहिलं आणि लक्षात आलं, मी अजुनही तितकंच कदाचित त्याहून थोडं जास्त प्रेम करतो तुझ्यावर. माझ्याशी लग्न करशील का?"



एका दमात इतकं सगळं बोलून दीपकला धाप लागली होती. विशाखाला काय बोलावे सुचेनासे झाले होते.

"तुला वेड लागलंय का? हे कसं शक्य आहे? माझ्याबरोबर काय घडलं याची तुला अजिबात कल्पना नाही. एका घटस्फोटीत बाईबरोबर लग्न करायचं म्हणतोस तू... मी अपवित्र आहे... तुझ्या अजिबात लायक नाही... नको हा हट्ट धरु... इथे बोललास परत कधी, कुठे नको बोलू." त्याचा हात झिडकारून ती म्हणाली.

"हे अपवित्र वगैरे शब्द नको वापरु स्वतःसाठी. तू माझ्यासाठी नेहमीच पवित्र होतीस आणि राहशील. जग काय म्हणेल याची मला पर्वा नाही. तू मला फक्त एक सांग, मी तुला नाही आवडत का? माझ्याबरोबर तुला अन्कंफर्टेबल वाटतं का? तसं असेल तर बिनधास्त सांग. हा विषय इथेच संपवू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगाच्या रिवाजांमुळे तुझ्या भावनांचा गळा घोटू नकोस. तू एक हाडामांसाची माणूस आहेस. सुखी होण्याचा तुला पुर्ण अधिकार आहे. माझ्या सोबत जरी नाही तरी तू दुसरं लग्न जरुर कर. मी नेहमीच तुझ्या सुखासाठी प्रार्थना करेन."

दीपक वळून चालू लागला. एक क्षण थांबून विशाखा धावत त्याच्याकडे गेली. त्याच्या पाठीला मिठी मारुन हमसून हमसून रडू लागली. तो थांबला. त्याने हळुवारपणे तिला मिठीत घेतले. तिच्या मनाचा बांध फुटला होता. इतके महिने साठलेल्या दुःखाचा निचरा होत होता. हळूहळू ती शांत झाली. त्यांना एक गोष्ट माहीत नव्हती, मामा बाहेर उभे राहून सर्व ऐकत होते. भाचीसाठी आनंदी व्हावं की पुतण्यासाठी चुलत भाऊ भावजयीची समजूत काढावी हे त्यांना समजत नव्हते. ते आवाज न करता दूर जाऊन बसून राहिले.

थोड्या वेळाने दीपक विशाखा खोलीच्या बाहेर आले. मामांना पाहून ते दचकले पण मामांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नसलेले पाहून त्यांना थोडा धीर आला. पण हा विषय आपण घरी काढायचा अशी दीपकने  मनाशी खूणगाठ बांधली.



चार दिवसांनी गुढी पाडवा होता. या चार दिवसांत दीपक विशाखाच्या मामाच्या घरी फिरकला नाही. भाचीची घालमेल मामाला समजत होती पण समोरुन प्रस्ताव आल्याशिवाय ते पुढाकार घेवू शकत नव्हते. कारण मामला थोडासा नाजूक होता.

गुढी पाडव्याच्या दिवशी मामाने स्वच्छ धुतलेल्या वेळूवर लखलखीत तांब्याचा गडू, साखरेच्या गाठ्या, रेशमी गुढीवस्त्र, हार वगैरे घालून सजवलेली गुढी उंचावर उभारली. विशाखा तयार होवून मामी आणि त्यांच्या सूनेला स्वयंपाकात मदत करत होती. बाहेरुन खणखणीत आवाजात हाक आली,

"दादा आहेस का घरी?"

सगळे बाहेर येवून पाहतात तर दीपक त्याच्या आई वडिलाबरोबर उभा होता. सर्वांनी सणाचे कपडे घातले होते पण चेहरा गंभीर होता.

"दादा, हा दीपक काय म्हणतो आहे ऐक जरा. गेले चार दिवस झाले हेच बोलणे चालू आहे घरी. आतापर्यंत आपल्या घराण्यात असं कधी झालं नव्हतं..."

प्रस्तावना ऐकून विशाखाचे डोळे झरू लागले. मामाही थोडे खट्टू झाले. ते पाहून दीपकची आई समोर आली.

"हो, असं कधी झालं नव्हतं... पण होणार नाही असं नाही ना. जग कुठल्या कुठे चाललंय मग आपण का अशा जुन्या समजुती कवटाळून बसावं. विशाखाही आपलंच लेकरू आहे की... अन्याय झालाय लेकरावर... तिचं सुख का नाकारावं...  दीपकची निवड आम्हाला पसंद आहे. मी स्वतः ज्योती वहिनीकडे जाऊन विशाखाला मागणी घालेन."

मामाचा कानावर विश्वास बसेना. पुढे होवून त्यांनी भावाचे हात धरले.

"मोहन खरं सांगतात का वहिनी?"

"हो, अगदी खरं. आम्हाला मुलगी पसंद आहे." हसून त्यांनी उत्तर दिले.

दीपकने पुढे होवून विशाखाला मिठीत घेतले. तिच्या चेहऱ्यावर लज्जेची लाली चढली होती. नुकतीच चढवलेली गुढी मंद झुळूकेवर डुलत होती. अखेर वठलेल्या झाडाला चैत्रपालवी फुटली होती.

समाप्त


✍️  Savita Kirnale


वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

फोटोवर क्लिक करून वाचा एक अप्रतिम कथा 



4 Comments

  1. खुप सुंदर लिहिले आहे. डोळ्यातले अश्रु थिजल्यासारखी अवस्था आहे

    ReplyDelete
  2. छान कहाणी. नवीन विचार मनाला उभारी देणारे. चला lनव्या विचारांची गुढी उभारूयात

    ReplyDelete
  3. नवीन आचार विचार अनुसरण्याची समाजाला गरज आहे.पारंपरिक रूढी मधून बाहेर आले पाहिजे. छान कथा आहे

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिले आहे.

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post