तुमची मुलं तुम्हीच सांभाळा

तुमची मुलं तुम्हीच सांभाळा 

✍️ सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

 लहान मुलाचं लग्न झालं आणि नर्मदा बाईंना गंगास्नान झाल्यासारखे वाटले. आता दोन्ही मुलांची लग्न झाली, घरी सुना आल्या आपण नवराबायको गावी जाऊन शांतपणे उरलेलं आयुष्य काढू असा त्यांचा विचार होता. मोठ्या सुनेचं माहेर जवळच होतं, धाकटीचे जवळच्या शहरात. त्यामुळे अडीअडचणीला त्यांचे माहेरचे धावून येऊ शकतात असा त्यांचा विश्वास होता. मुलं अगदीच एकटी पडणार नाहीत, सुनांचे माहेर आणि आपण जोडलेली माणसं कामाला येतील म्हणून त्या निर्धास्त होत्या.


एक दिवस संधी पाहून त्यांनी सदानंदरावांकडे हा विषय काढला. आपलं गावाकडील घर उगीच पडीक पडलंय. हौसेने लावलेली  आंबा, चिकू, पेरू वगैरेंची फळं चोरापोरांची धन होत चालली आहेत. आपण तिकडे जाऊन राहू. येतंजातं घर असलं की मुलांना पुढे नातवांना सुट्टी घालवायला सोयीचं होईल अशा अनेक गोष्टी सांगून बाईंनी नवऱ्याचे मन वळवले. ते ही शहराच्या दगदगीला कंटाळले होते. त्यांनी होकार दिला. आज रात्री जेवताना मुलांकडे विषय काढू असा ठराव झाला.


रात्री ठरल्याप्रमाणे सदानंदराव काही बोलणार तोच मोठ्या मुलाने एक आनंदाची बातमी सांगणार असल्याचे सांगितले. 

"आईबाबा तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे. तुम्ही आजीआजोबा होणार आहात." त्याने आनंदाने जाहीर केले. 

"वाव, वहिनी क्या बात है. Congratulations. किती गोड बातमी... We are so happy च्या गदारोळात सदानंदरावांचे बोलणे राहूनच गेले. तसेही आता त्याला काही अर्थच राहिला नव्हता. पहिल्या मुलाचं पहिलं मूल...  दुधावरची साय येणार होती मग हे लोक कसे गावाकडे रमू शकले असते. आनंदाने दोघांनी आपले विचार आपल्यापुरतेच ठेवले. नर्मदाबाई सुनेचे कोडकौतुक करण्यात रमून गेल्या. 


यथावकाश सूनेने गोंडस मुलाला जन्म दिला. जवळच माहेर असूनही सूनेचे बाळंतपण, बाळाचं सगळं काही त्यांनी आनंदाने शिरावर घेतले. दोन्ही मुलं आणि सुना कामाला जायचे आणि आजी आजोबा बाळलीलांत रमायचे. बाळ वर्षाचा झाला. आतापर्यंत त्याला आईकडील आजी आजोबांचा ही लळा लागला होता. हात थोडासा सुटा झाल्यासारखं वाटल्याने नर्मदाबाईंनी पुन्हा जुना प्रस्ताव नवऱ्याजवळ मांडला. पण यावेळेस त्यांनी नकार दिला. त्यांचे म्हणणे होते, बाळ निदान दोन वर्षांचे तरी होऊ दे, मग ते प्लेग्रूपला जायला लागेल. उरलेला वेळ त्याचे दुसरे आजी आजोबा सांभाळतील मग पाहू.


हे बाळ दोन वर्षांचे झाले नाही तर लहान सुनेने गोड बातमी दिली. झाले नर्मदाबाई पुन्हा पहिले पाढे गिरवू लागल्या. सुनेने मुलीला जन्म दिला. दिवस पहिल्या पानावरून पुढे जात होतो. भरलं गोकुळ पाहून बाईंनी गावी जाण्याचा विचार मागे टाकला.


मुलं शाळेत जाऊ लागली.  त्यांच्या मागे पळून, त्यांच्या वेळा सांभाळताना आजी आजोबा थकत चालले होते. हल्ली शनिवार रविवार ही त्यांना आराम मिळत नव्हता. कारण शनिवार रविवार सुट्टी म्हणून मुलं सुना परस्पर फिरायला जायचे, पार्टी - हॉटेलिंगचे प्लॅन्स बनवू लागले. 

"आई पार्थला घेऊन जायचा विचार होता पण त्याच्या वयाचं तिथं कुणीच असणार नाही, तो उगाच बोर होईल म्हणून सोडून जातोय." मोठी सून म्हणे तर "बाबा जान्हवी पिक्चर बघू देत नाही, मधूनच उठून यावं लागतं मग मूड खराब होतो. एक दिवस तर मिळतो आम्हाला तोही वाया जातो." लहान मुलगा कारण देई.


सदानंदरावांना म्हणावेसे वाटे, बाळा एक तरी दिवस आम्हाला स्वतःचा मिळू दे. आम्ही कधी आराम करावा? पण मनातलं ओठावर कधी येत नसे. कारण आपलीच नातवंडं ती, आपणच असं म्हटलं तर कुणाकडे जातील अशी भावना. 


एक दिवस तर कहरच झाला. नर्मदाबाईंच्या बहिणीने मोठ्या मुलाच्या मोबाइलवर फोन केला आणि येत्या शनिवारी तिच्या मुलाला मुलगी बघायला जाण्यासाठी ताईला पाठव असे सांगितले.

"अरे ताईने दोन मुलांची लग्न केली, तिला अनुभव आहे वधूपरीक्षेचा म्हणून पाठव. बरेच महिने झाले आमची भेट नाही झाली. या निमित्ताने भेटून घेऊ. दोन चार दिवस राहील माझ्याकडे." मावशी म्हणाली. 


मुलाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. 'शनिवारी जायचे म्हणजे आईला शुक्रवारी रात्रीच जावे लागेल. शिवाय मावशी आग्रहाने ठेऊन घेईल म्हणजे लगेच येणार नाही आई. घराकडे कोण लक्ष देईल?' 


"मावशी, आईला जमेल असं वाटत नाही. स्वाती आणि मी बाहेर चाललोय. यावेळेस तू adjust कर पुढच्या वेळेस मी स्वतः तिला घेऊन येईन." मुलाने उत्तर दिले. 


"अरे मला आता गरज आहे, पुढच्या वेळेस काय म्हणतोस. तुमची अडचण होऊ नये म्हणून मी शनिवारचा दिवस धरला तरी जमत नाही म्हणतोस. वेळेला कामाला नाही आलं तर मग कधी येणार. तू तुझं बाहेर जाणं कॅन्सल नाही करू शकत, मावशीने मात्र adjust करावं. ठेऊन घे तुझ्या आईला तुझ्याजवळच. नको पाठवू, बघेन माझं मी काय करायचं ते." मावशीने रागाने फोन बंद केला. शनिवार आला आणि गेलाही. मावशीचा परत काही फोन आला नाही. 


सहा महिन्यांनी अचानक एक दिवस नर्मदाबाईंची मैत्रिण घरी आली. रविवारचा दिवस होता. मुलं, सुना, नातवंडे दुपारचं जेवण करून आपापल्या खोलीत आराम करत होती. नर्मदाबाई मैत्रिणीला पाहून खूश झाल्या. किती तरी महिन्यांनी कुणी बाहेरची व्यक्ती घरी आली होती. गप्पाटप्पा रंगल्या होत्या. 

"नर्मदा, तू सुजाताच्या मुलाच्या इंगेजमेंटला आली नाहीस? मला वाटलं तेव्हा आपली भेट होईल."

"आमच्या सुजाताबद्दल बोलते आहेस का तू?" नर्मदाबाईंनी गोंधळून विचारलं.

"हो, तुझी बहीण सुजाता. तिच्या मुलाचा साखरपुडा झाला पंधरा दिवसांपूर्वी. तू दिसली नाहीस."

"अग हो, माझी तब्बेत बरी नव्हती. बीपी वाढलं होतं खूप. उभ्या उभ्या चक्कर येत होती. म्हणून डॉक्टरांनी नको सांगितलं होतं. म्हणून नाही जमलं." नर्मदाबाईंनी वेळ मारून नेली. तिथेच बसलेले सदानंदराव सगळं ऐकत होते. त्यांना थोडासा अंदाज आला. अजून थोडा वेळ बसून मैत्रीण निघुन गेली. नर्मदाबाईंनी सरळ बहिणीला कॉल केला. 

"तुझ्या मोठ्या मुलाला विचार. मी मुलगी बघायला तुला बोलवायला फोन केला तर सरळ आईला जमणार नाही म्हणाला. तुला मुलं, सुना नातवंडे यांच्यातून वेळ मिळेल तेव्हाच येशील ना आमच्याकडे. ताई अगं प्रत्येकाची वेळ असते तेव्हा जर तुम्ही जमणार नाही म्हणून हात वर करणार असाल तर उपयोग काय? आताही तुमचं काहीतरी कारण असेल, बोलावून नाही ऐकण्यापेक्षा मी बोलवलंच नाही तुला." सुजाता म्हणाली.


"पण तू मला फोन करायचा, यांना फोन करायचा ना." 


"केला होता पण कुणी उचलत नव्हतं. सायलेंटवर असेल म्हणून मी त्याला केला."


"सुजू, खरं सांगते. इतकं सगळं झालं पण मला काहीच माहिती नाही. तुझा फोन आल्याचा वगैरे कुणी बोललाच नाही. माहीत असतं तर हातातलं काम टाकून धावत आले असते. खूप झालं यांचं. थांब जरा मी चांगलंच बघून घेते." नर्मदाबाईंचाही पारा चढला.


  फोनवरील बोलणे ऐकून सदानंदराव ही चिडले होते. आपल्या मुलांचं गृहीत धरणं त्यांना पटले नव्हते. इतके दिवस सहन करत आले होते पण हे अति झाले असे त्यांना ही वाटून गेले. आज त्यांनी बायकोला साथ देण्याचा निर्णय घेतला. खूप वर्षापूर्वी केलेला गावी जाण्याचा प्लॅन तात्काळ अंमलात आणायचा असे दोघांनी ठरवले. 


विचार पक्का झाल्यावर नर्मदाबाईंनी दोन्ही मुलांच्या बेडरूमवर जोरजोरात थापा मारायला सुरुवात केली. आवाज ऐकून चिडलेली मुलं सुना बाहेर आली. 

"आई बाबा, हे काय चालू आहे तुमचं. एक दिवस ही आराम करू देत नाही आहात. इतका वेळ मुलं किरकिर करत होती, त्यांना सांभाळा म्हटलं तर नाही. आत्ताच तर झोप लागली होती." मुलगा करवादला. 


"बाळा तेच सांगण्यासाठी आम्ही तुमची सगळ्यांची झोपमोड केली. आजपासून तुमची मुलं तुम्ही सांभाळायची. आम्ही दोघे आज रात्रीच कायमचे गावी जाणार आहोत." सदानंदरावांचे बोलणे ऐकून सगळ्यांची झोप उडाली. 


"काय! असे अचानक?" मोठ्या सुनेने विचारले.


"अचानक नाही, खूप वर्षापूर्वी आम्ही हे ठरवले होते. पण तुमची बाळंतपणं, मुलं, त्यांची शाळा या चक्रात असे अडकलो की तोंड उघडताच येईना. आज मात्र तोंड आणि डोळे दोन्ही उघडले म्हणून तातडीने निघतोय."


"म्हणजे? आमचं काही चुकलं का? असेल तर आम्ही ती चूक सुधारू पण तुम्ही जाऊ नका. तुम्हीच नसलात तर... हे घर फक्त तुमच्या दोघांमुळे चालू आहे." इति लहान मुलगा


"नाही, चूक तुमची नाही तर आमची आहे. आम्ही डोळे उघडून पाहिलंच नाही. तुम्ही आठवड्याचे पाच दिवस काम करून थकता म्हणून शनिवार रविवार बाहेर जाणार, मौजमजा करणार आणि आम्ही काय करायचं तर तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून तुमची मुलं सांभाळायची. आठवड्याचे बाकीचे दिवस घरातील वरची कामं करता करता तुमच्या मुलांची वेळापत्रक सांभाळायची. मुलं मोठी होत आहेत आणि आम्ही म्हातारे याचा विचार न करता त्यांच्या मागे पळापळी करायची. इतकं करूनही तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमचा आनंद बाजूला ठेवायचा. सुजाता मावशीला माझी गरज होती पण तुम्हाला फिरायला जायचे म्हणून तुम्ही तिला चक्क नाही म्हणालात. तसं करताना एकदाही मनात आलं नाही का, जाऊ दे आपल्या आई वडिलांना थोडा change मिळेल? अरे तुम्ही सगळे इतके स्वार्थी आहात की गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही दोघांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पाऊल ही टाकले नाही हे तुमच्या लक्षात नाही आले. आता हे यापुढे चालणार नाही. आमचा विचार आम्ही स्वतःच करु. आमचा निर्णय ठरला आहे, कुणाच्या काही बोलण्याने यात बदल होणार नाही. तर मग लागा तुम्ही कामाला, बघा आपली आपली सोय." 


बोलून झाल्यावर नर्मदाबाई बॅग पॅक करायला लागल्या तर सदानंदराव गाडीची व्यवस्था करायला निघून गेले. दोन्ही मुलं आणि सुना मात्र अजूनही अंगावर वीज पडल्याप्रमाणे सुन्न उभे होते.


समाप्त

©️ सविता किरनाळे 


वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post