नियती

 **नियती**

✍️ प्रतिभा परांजपे

रोहनला नोकरी लागून नुकतेच चार महिने झाले होते , तोच कंपनीमध्ये स्ट्राईक सुरू झाला .आता त्याला घरी बसून कंटाळा येऊ लागला.

 कामाच्या नावावर वर्क फ्रॉम होम होते, पण ते कामही थोडेसेच मिळत असे.

 त्याचा पार्टनर  ही आपल्या गावी चालला गेला. दिवसा  वेळ घालवायला एक मोबाइलच होता. 

नुकतेच त्याने फेसबुकवर काही ग्रुप जॉईन केले त्यात "कविता मना मना मधील" हा त्याचा आवडीचा ग्रुप होता.

  एक दिवस खुपच रोमँटिक कविता त्याच्या वाचनात आली. कोण कवी म्हणून त्यांनी नाव सर्च केले.

 तन्मया नावाची कवयित्री होती. कवितेला लाईक व कमेंट देत रोहनने तिचा प्रोफाईल पाहिला.

 साधारण  तीस वर्ष वयाची, डीपीमध्ये तर खूपच स्मार्ट दिसत होती.

  तिने लिहिलेल्या  छान छान कविता वाचण्यात त्याचा बराच वेळ गेला. त्याने प्रत्येक कवितेला लाईक व कमेंट पाठवल्या.

   

     आता तो तिच्या कवितांचा नियमित वाचक झाला होता.

 तन्मयाकडून ही त्याला थँक्स पाठवले जात असत. असे करता करता दोघांमध्ये एक नातं निर्माण झालं. 

    कधीकधी कविता वाचताना त्याला तिच्या रोमॅंटिक कवितांमध्ये एक  दुःखाची धूसर अशी छाया जाणवत असे.

 त्यांनी सहजच तन्मयाला त्याबाबतीत कमेंट दिला, पण तिने फक्त थँक्स असे लिहिले....

 हळूहळू दोघं मॅसेंजरवर आपसात चॅटींग करु लागले.

सुरुवातीला कवितेवरच बोलणारे रोहन आणि तन्मया आता   एखादा आवडलेला सिनेमा ,हीरो हीरोइन त्यांचे गॉसिप अशा इतरस्त गोष्टी  मोकळेपणाने करू लागले...

 रोहन व तन्मयाने एक दुसऱ्याचे फोन नंबर ही सेव्ह केले.

           स्ट्रॉईक संपून रोहनचे ऑफिस सुरू झालं, आता तो खूप बिझी झाला. तरीही झोपायच्या आधी मेसेंजर  चेक करून  गुड नाईट मेसेज टाकत असे....

 एखादा दिवस चॅटिंग नाही झाले तर तो बेचैन होत असे मग तन्मया ला मेसेज करून चॅटिंग करता वेळ आहे का विचारे.

हळूहळू त्याच्या लक्षात आले की तो तन्मयामध्ये गुंतत चालला आहे...

  दिवसातून चार वेळा तो मेसेंजर पाहत असे आणि तन्मया ही त्याच्या मेसेजची वाट पाहत  असे...

 आता त्याला तिला प्रत्यक्ष भेटावेसे वाटू लागले. त्यांनी तसे  विचारले.

दोन-तीन दिवस तिचे काहीच उत्तर आले नाही.

एक दिवस सकाळी सकाळी तिचा गुड मॉर्निंगचा मेसेज पाहून त्याच्या जीवात जीव आला.

 तिने कॉफी शॉपला भेटूया म्हणून मेसेज केला.

कॉफी शॉप मध्ये दोघांनी बराच  वेळ घालवला.  

  रोहनने  लाल गुलाबाचे फुल तन्मयाला दिले. तिने हसून थँक्यू म्हणत घेतले.

सुरुवातीला अवघडलेला रोहन मग खूप मोकळेपणाने बोलू लागला. त्याने आपले सर्व करियर प्लॅन  पण  तिला शेअर केले . 

"तन्मया मी तुला आपल्या बाबतीत सर्व सांगितले पण तू अजून ही मला परक‌‌‌ समजते".

"तसं नाही रे ."

"मग, बोल ना!"

हळूहळू तन्मया ही रोहन बरोबर स्वतः च्या जीवनाविषयी  बोलू लागली. 
"रोहन माझे लग्न झालेले आहे.  समीर माझा नवरा  NRI आहे. दोन वर्षासाठी बाहेर देशात गेला, पण मग त्याचे येणे लांबत आहे.

एकटेपण मला खायला उठते. मग मी आपल्या भावना कवितेत व्यक्त करू लागले. मध्ये मध्ये काही दिवसांकरता समीर येतो पण त्याचे वागणे संशयास्पद वाटते. मला न्यायला ही तयार नाही. त्याला  माझ्यात इंटरेस्ट उरला नाही असे आतुन  जाणवते.

आयुष्य वाया गेले रे असे  आता वाटते…"

रोहन आश्चर्यचकित झाला, त्याने तन्मयाचे सांत्वन केले .

 तन्मयाविषयी  रोहनला आणखीनच आपुलकी वाटू लागली

रोहन तन्मयाच्या प्रेमामध्ये बुडत चालला होता.

 एक दिवस त्याच्या आईचा फोन आला बरेच दिवस झाले तू गावी परत नाही आला तेव्हा एकदा येऊन जा.

 रोहन चार दिवसाच्या सुट्टी काढून गावी गेला . आईने त्याला लग्न विषयी विचारले व मुलींचे फोटो दाखवले, यातली एखादी पहा तुला पसंत आहे का? सगळ्या चांगल्या शिकलेल्या आहेत.

  रोहनने  फोटो पाहिले पण पसंती दाखवली नाही . मला सध्या अजून लग्न करायचे नाही असे कारण सांगून तो परत आला .

 खरे कारण तन्मया होती, त्याला तन्मयाविषयी प्रेम वाटू लागले होते पण तन्मयाच्या मनात काय आहे ,  ती काय विचार करते ? तिला मी आवडतो कि फक्त एक मित्र समजते. हे समजत नव्हते.

असेच एक दिवशी तन्मयाचा फोन आला, "रोहन काल मी माझ्या नवर्याशी समीरशी स्पष्ट बोलले त्याला ही हे रिलेशन नको आहे."

"मग?" रोहन ने विचारले .

"तो व मी या बंधनातून मोकळे होतो आहे.."

"आता तरी तू माझे प्रेम कबूल करतेस",  रोहनने तिला  विचारले.

तन्मयाने हसुन होकार दिला.

जसे जसे दिवस जाऊ लागले रोहन आणि तन्मया एक दुसऱ्याच्या प्रेमात बुडू लागले आता त्यांना हा विरह सहन होत नव्हता.

एका रविवारी सुट्टी असल्याने रोहनने  तन्मयाला कुठेतरी दूर जाऊ या असे  विचारले.

 दिवसभर तिचे काहीच उत्तर आले नाही. तिला बहुतेक इतकी जवळीक नको असावी असे वाटून रोहन खूप उदास झाला आपण भलतीच मागणी तर नाही केली. 

 त्यांने 'सॉरी .... सॉरी' असे लिहून पाठवले.

  संध्याकाळी तन्मयाने कुठे भेटायचे? असे विचारतात. खूप उत्साहात येऊन रोहनने तन्मयाला हायवेवरचा एक  रिसॉर्टमध्ये रूम बुक करून ऍड्रेस करून संध्याकाळी ये असा फोन केला .

रोहन बरोबर सहा वाजता रेस्टोरेंटला पोहोचला बाहेर कोणी त्यांना पाहून ओळखणार नाही याची काळजी म्हणून त्यांनी इतक्या दूर भेटायचे ठरवले .

नऊ वाजायला आले तरी तन्मयाचा पत्ता नव्हता.

 त्याने फोन केला, पण फोन बंद येत होता. वाटले ट्रॅफिकमध्ये असेल त्यांनी मेसेज केला तेव्हा तिने पोहोचते आहे असा मेसेज केला रोहनचे मन अधीर झाले होते.

त न्मया आली तेव्हा रात्रीचे सवा नऊ वाजले होते. रेस्टॉरंटमध्ये तुरळक गर्दी उरली होती.

 तन्मया आज विशेष तयार झाल्यासारखी दिसत होती. तिचे चमकदार लांब केस तिने मोकळे सोडले होत

 अंगात हाफ शोल्डर गाऊन घातला होता. त्यातून तिचे गोरेपान  सुडौल बाहू , रोहनला मूक निमंत्रण देत होते .

दोघांनी कॅण्डल लाईट डिनर घेतले. जेवण होताच तिने  रोहनचा हात धरला व आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवत म्हणाली.

"आज मीच बंधनातून मुक्त झाले."

  रोहन तिचे मनोगत समजून तिला रूममध्ये घेऊन गेला.

रूममध्ये त्यांनी कॉफी घेतली . रोहनचे मन तन्मयाला  जवळ घ्यायला आता अधीर झाले होते त्यांनी हलके हलके शीळ झालायला सुरुवात केली. त्याचे मुक निमंत्रण समजून तन्मया त्याच्या जवळ सरकली रोहन ने लाईट ऑफ करत तिला जवळ घेतले  ती त्याला घट्ट बिलगली...

सोमवारी  रोहनचे खूप काम पेंडिंग होते त्यामुळे तो लवकरच ऑफिसला गेला व उशिरा घरी पोहोचला. त्याने तन्मयाला कॉल केला पण तिचा फोन ऑफ येत होता. रोहनचे मन  तन्मयाला भेटायला  अधीर झाले  म्हणून त्याने परत मेसेज केला पण तिचा मेसेज  ही नव्हता.

वेळ जाता जात नाही म्हणून त्याने फेसबुक उघडले. दोन-तीन पोस्ट नंतर त्याला तन्मयाचा मोठा फोटो दिसला. खाली लिहिले होते आपली आवडती कवयित्री तन्मया यांचा अपघाती मृत्यू .

खाली लोकांचे सांत्वनपर मेसेज. रोहनने परत  परत पोस्ट वाचली रविवार  हायवेवर स्कूटर ट्रकची टक्कर होऊन अपघाती मृत्यू वेळ आठ वाजता.

 रोहनच्या हातातून फोन खाली गळून पडला.  नऊ वाजता तन्मया त्याच्याबरोबर होती ती ??

त्याला दरदरून घाम फुटला .

त्यादिवशी तन्मयाने स्वतःहून समर्पण केले होते .जाता जाता ती म्हणत होती, "तिला नवऱ्यापासून सुटका हवी होती आज मी मुक्त झाले."

तिला रोहनसोबत आयुष्य जगायचे आहे पण--- नियतीला ते मंजूर नव्हते .

रोहनला भेटायला म्हणून निघालेल्या तन्मयाचा वाटेतच  अपघात  झाला.

     पण---तरीही तिने आपले वचन पूर्ण केले होते.नियतीने ही त्यांची शेवटची भेट ठरवली…..

✍️ सौ प्रतिभा परांजपे

वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

फोटोवर क्लिक करून पाहा एक सुंदर नवी कथा 
Post a Comment (0)
Previous Post Next Post