श्यामची मॉम

श्यामची मॉम

✍️ बीना बाचल

परवा नेहमीप्रमाणे च  संध्याकाळी जिम च्या ट्रेडमिल नामक रुळावरून माझी गाडी धावत होती. जोरदार music आणि आजूबाजूला आपल्या अर्ध्या पेक्षा ही कमी वयाची तरुण मंडळी चिवचिवत होती!(त्यांना ही कोण 'आंटी'आपल्या वेळेत नेमकी इथे येते असं होत असावं, पण मला मात्र त्यांच्या सोबत workout करायला आवडतं, त्यांच्या तरुणाईचा तो सळसळता उत्साह आपल्या अंगी लागावा आणि त्यांच्या इतकी नाही जमली तरी थोडी जोशपूर्ण कसरत आपलीही व्हावी हा उद्देश!) .परवा नेमकी अजून एक मैत्रीण माझ्यासोबत जिम मध्ये join झाली. आम्ही दोन चार वर्ष इकडे तिकडे पण समवयीन आहोत आणि मध्यमवयीन ही!! ह्या मध्यमवयात आलो की उगाच आपल्या पेक्षा लहानांना ,त्यांच्या सवयीवर ताशेरे मारण्याचा अधिकार मिळतो की काय कोण जाणे! (किमान असा आम्हां मध्यमवयीन लोकांचा तसा समज आहे😀)

देवा,विषय भरकटला! तर सांगत असं होते की परवा अशीच मी आणि माझी मैत्रीण  जिम मध्ये असताना काचेच्या त्या चकचकीत भिंती पलीकडे अगदी समोर सुंदरसा स्विमिंग पूल आहे,तिथं च एक सध्याचं दोन फुल एक हाफ (की पाव..!) म्हणता येईल असं एक आधुनिक जोडपं आलं.आधुनिक ह्याअर्थी की त्यातल्या आईच्या एका हातात त्या गोंडस पिटुकल्याचा हात गुंफला होता आणि दुसऱ्या हातात त्याचं स्विमिंगचं सगळं साहित्य त्याची कॅप,गॉगल, तरंगता यावं म्हणून असलेला फ्लोट, बॅगेत कोंबलेला बाथ रोब, टॉवेल,नॅपकिन(तिची बॅग transparent असल्यानं आणि त्यात भर  माझी बारीक नजर 😀सगळं नीट दिसत होतं!) शिवाय त्या बाबाच्या हातात सर्वोत्कृष्ट कॅमेरा असलेला फोन (त्याचेही  कॅमेराचे तीन ठसठशीत टिम्ब मला दिसले infact माझ्या बा. न.ते टिपले!😀)

त्यांचा लवाजमा आणि हातवारे (ह्याला animated conversation असा अतिशय परफेक्ट इंग्लिश शब्द आहे!)बघता त्या पिटुकल्याला पोहण्यासाठी कमी आणि 'क्लिक क्लिकायला' जास्त आणलं असावं असं माझं मन मला सांगत होतं!(म्हटलं न मध्यमवयीन वय=ताशेरे मारण्याचा परवाना)

'ही आज कालची जोडपी न नुसती फोटो काढून त्या किलोग्राम का मिलिग्राम वर अपलोड करण्यात पटाईत आहेत नुसती!' असं judgement माझ्या मैत्रिणीने  ताबडतोब देऊन टाकलं (म्हटलं न मध्यमवय= ता मा प!) कसलाही आगा पिछा न ऐकता बघता ही समोरचं ते जोडपं चक्क ते कसं चुकीचं आहे हे सिद्ध करायला लागली! मी आपली ट्रेडमिल वर धावता धावता एकदा हिच्याकडे एकदा त्या जोडप्याकडे बारीक नजरेने पाहत राहिले.

सर्वात पहिल्यांदा त्या बाबाने लेकाला आपल्या खांद्यावर घेत आणि मग कडेवर ,बाजूच्या खोट्या सजावटीच्या झाडाच्या फांदीवर असं जमेल तिथे ठेवून पाच पन्नास फोटो क्लिक क्लिकले!

मग आई कुठे मागे राहायला ! तिनंही सर्वात आधी स्वतः ठीक ठाक दिसतोय न त्याची खातरजमा केली आणि मग लेकाला घेऊन ,ठिकठिकाणी पाप्या देत सेल्फी अध्याय पूर्ण केला.

आता म्हटलं झालं ह्याचं स्विमिंग सेशन! माझी मैत्रीण च बरोबर ठरतेय वाटतं असं माझं एक मन सांगू लागलं.

पण आमचं  बोलणं  त्यांना ऐकू गेलं की काय कोण जाणे (जे केवळ अशक्य होतं!) पण त्यांनी आता चक्क ते तीन टिम्ब असलेले आपले फोन एका बॅगेत टाकून लेकीला घेऊन पाण्याकडे मोर्चा वळवला.

 ईतका लवाजमा घेऊन आले खरे पण ते गोंडस पिल्लू पाण्याला स्पर्श करायला ही तयार नाही!! आली का पंचाईत!!

आता आई नं परिस्थिती ताब्यात घेतली आहे असं दिसू लागलं.

चक्क आईनेच पाण्यात उडी मारली, ते पाहून तिचा गोड लेक आनंदाने टाळ्या पिटू लागला पण जागचा हलेना!

आईनं तिला पाण्यात गिरक्या काय घालून दाखवल्या, तो आणलेला float स्वतः च काय घालून दाखवला...एक न दोन ! पण प्रयत्न निष्फळ...😢 मैत्रीण=1 ,जोडपं=0 असा score बोर्ड मला दिसू लागला!

मी तर चालता चालता (ट्रेडमिल वर हो.....)मनाशी खूणगाठ बांधली होती की  माझी मैत्रीण म्हणते तसं हिला काही लेकीला पोहायला तयार करता येणार नाही असं वाटू लागलं.तोवर 'ही कसली आताची कचकडी पिढी...लेकीचा मूड जाऊ नये म्हणून सतत मन जपणारी...फोटो काढून अपलोड करण्यात धन्यता मानणारी....आमच्या आयांनी एव्हाना एखादा धपाटा घालून पाण्यात जायला लावलं असतं! आमच्या आया श्यामच्या आईपेक्षा कमी नव्हत्याच म्हणा!! आणि ह्या आया... ह्यांना स्वतः ला तरी श्याम आणि श्यामची आई कोण हे माहीत असेल की नाही कोण जाणे!सगळा नुसता दिखावा...'इति  माझी  मैत्रीण(म व= ता मा प)!!तिची बडबड आज माझ्या पायांच्या गती पेक्षा ही जास्त वेगाने होत होती.

पण तेवढयात त्या आईनं बाहेर येऊन आपल्या लेकाला कुशीत घेतलं आणि त्याच्या सकट पाण्यात उतरली. तिचा लेक बहुदा घाबरून किंवा रागाने रडू लागला.

पण त्या आईनं त्याला काय समजावलं कोण जाणे... तो छोटू हळूहळू शांत होऊ लागला ,त्यानं पाण्याला पाय लावून बघण्याचा प्रयत्न केला. मग हळूहळू बाबाने त्याचे दोन तीन फोटो पुन्हा क्लिकक्लिकले. त्या गोडुल्याची थोडी भीती कमी झाली असावी ,त्याने आता पाण्याला हात लावला आणि यथावकाश तो ते पाणी आईच्या आणि बाबाच्या दिशेने उडवू लागला.

मग एका बेसावध क्षणी आईने त्याला आपल्या कुशीतून  डायरेक्ट पाण्यात उभं केलं आणि त्या पिटुकल्याला समजलं की इतका वेळ ज्या पाण्याला आपण घाबरत होतो आणि त्यात बुडून जाऊ की काय अशी भीती वाटत होती ते चक्क आपल्या गुडघ्यापर्यंत च तर आहे की!! आणि त्याची भीती कुठल्या कुठे पळून गेली! का कोण जाणे पण माझा जीव भांड्यात पडला.उगाचच मी मनात तयार केलेला score बोर्ड  मी अगदी पुसून टाकला! मैत्रीण मात्र 'ह sssss' म्हणत सुस्कारात राहिली.

इथे माझ्या जीवाची तगमग ही थांबली आणि श्यामची आई कुठेही हरवली नाहीये , ती थोडीशी बदलली आहे इतकंच; पूर्वीची सरळ पाण्यात ढकलून देत होती आणि आताची थोडी मुलाच्या कलाने घेत का होईना पण 'पोहता यायलाच हवं' ही शिकवण मात्र विसरली नाहीये ह्याचं भलं थोरलं समाधान घेऊन मी माझ्या त्या चालत्या फिरत्या  रुळावरून पायउतार झाले.चला श्यामची आई फक्त श्यामची मॉम झालीये इतकंच!

आणि मग लक्षात आलं  पूर्वी स्वतः रानोमाळ तुडवणारी मी  काय किंवा शेजारी( स्वतः चा पराभव झालेली )माझी मैत्रीण काय;आज जिम च्या ह्या कृत्रिम थंड हवेत शेवटी आरोग्यच जपतेय की ही जाणीव होताच थोडं कसनुस मात्र झालं च!!

✍️ सौ बीना समीर बाचल

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

फोटोवर क्लिक करून पाहा एक सुंदर नवी कथा 



Post a Comment (0)
Previous Post Next Post