*एकटी*
स्मिता मुंगळे
"राहशील ना ग आई तू 'एकटी'?",लेकीने तिला विचारले तसे त्याही परिस्थितीत आणि मनस्थितीत तिला त्या प्रश्नाची गंमत वाटली.ती मनात म्हणाली,"पंधरा दिवसांपूर्वी नवरा गेला म्हणून जगाच्या दृष्टीने मी 'एकटी' झाले असेल पण खरेतर लग्न झाल्या दिवसापासून मी 'एकटीच' तर आहे."पण लेकीला काय माहिती आपली आई खूप आधीपासूनच एकटी आहे ते.लेकीने लहानपणापासूनच आईची धाडसी आणि कर्तृत्ववान हीच रूपे बघितली होती.मुलांची शिक्षण,लग्न,घर घेणं असे कितीतरी महत्वाचे निर्णय तिने एकटीने घेतले होते.
लेकीच्या 'एकटी' या एका शब्दाने तिचं मन तीस पस्तीस वर्षे मागे भूतकाळात गेलं.अगदी लहान असल्यापासून तिला एकटेपणाची खूप भिती वाटायची.एरवी मोठमोठ्या गप्पा मारणारी,पोहताना विहिरीत वरून धडाधड उड्या मारणारी,शाळेत असताना भरधाव वेगाने सायकल चालवणारी आणि अशा अनेक गोष्टी न घाबरता करणारी ती एकटेपणाला मात्र प्रचंड घाबरत असे.रात्रीच्या वेळी मोठा पाऊस आला आणि विजांचा कडकडाट सुरू झाला तरी ती लहान बहिणीला घट्ट बिलगून झोपायची.खरे तर तिच्या भल्या मोठ्या घरात तिच्यासाठी स्वतंत्र खोली होती पण ती तिथे ती कधीच एकटी झोपली नव्हती.दिवसभर बाहेर शूरपणा दाखवणारी संध्याकाळी घरी आल्यावर अंधार पडताच भित्रा ससा बनून जाई.आई,बाबा आणि लहान बहीण तिला यावरून कायम हसत असत.इतर कोणत्याही गोष्टीसाठी कोणी हसले तर चिडणारी ती एकटेपणावरून कोणी चिडवले वा हसले तरी गप्प राहायची.
शाळेत जाताना देखील ती कायम मैत्रिणींबरोबर असे.अगदीच कोणी नसले तर हक्काची बहीण होतीच की.आई गृहिणी असल्याने नेहमी घरात असणारच याची तिला खात्री असे."आई,मी शाळेतून यायच्या वेळी तू रोज घरी हवीस ह",अशी ताकीद आईला देऊन ठेवलेली असायची त्यामुळे ती घरी यायच्या वेळी आई हमखास घरी थांबे.हिच्या एकटेपणाच्या भीतीचे कोडे काही केल्या आईला उलगडत नसे.ती तर कायम म्हणायची सुद्धा..."एवढी कसली ग भीती वाटते तुला एकटेपणाची? इतर वेळी तर नको तेवढे धाडस करत असतेस आणि आमच्या जीवाला घोर लावतेस."
एकटेपणाची भीती घालवण्यासाठी आई बाबांनी तिला कित्येकदा समजावले देखील. पण एकटेपणाच्या बाबतीत ती भित्री राहिली ते राहिलीच.शेवटी मोठी झाल्यावर येईल समज असे म्हणून आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले.तरीही आई मैत्रिणींशी बोलताना सहज लेकीच्या एकटेपणाच्या भितीबद्दल विचारत असे.आईची एक मैत्रीण तर समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ होती.पण तिनेदेखील आईला याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.
बघता बघता ती कॉलेजमध्ये जायला लागली. मुळातच दिसायला सुंदर तर ती होतीच पण कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून तर जरा जास्तच मोहक दिसत होती.मैत्रिणीसोबत गप्पागोष्टी आणि हास्यविनोद करत कॉलेजला जाताना तर ती खूपच खुश असायची.मात्र एखादा दिवस मैत्रीण आली नाही तर तिला एकटीला कॉलेजला जायला भीती वाटायची. रोज कॉलेज सुटल्यावर घरी जाताना "उद्या येणार ना ग तू कॉलेजला,आत्ताच काय ते नक्की सांग म्हणजे मला माझे ठरवता येईल" असे मैत्रिणीला विचारूनच मग ती घरी यायची.मैत्रीण येणार नसेल तर हिची सुट्टी ठरलेली असे.
कित्येक वेळा आई बाबा गावाला गेले असताना हिची बहीण एकटी घरी बसून स्वतःत रमून जात असे.पण ही मात्र कधी घरात देखील एकटी बसली नव्हती.आई कायम म्हणायची,"कसं होणार ग तुझं लग्न झाल्यानंतर?सासरी भरलं घर असेल तर ठीक.नाहीतर मुलगा नोकरीच्या गावी एकटा रहात असेल तर अवघड होईल."तेव्हा हिचे उत्तर ठरलेले असे. म्हणायची "आई,तुम्ही माझ्यासाठी घरात भरपूर माणस असलेलाच मुलगा बघा ह.दोघेच राहत असू तर तो ऑफिसला गेल्यावर मी नाही घरी एकटी थांबणार."त्याचवेळी तिच्या मैत्रिणीना घरापासून लांब राहणारा आणि आई वडील जवळ नसलेला मुलगा हवा असे,नव्हे तीच त्यांची अपेक्षा आणि मुला बाबतची अट होती.'हिचं काहीतरी वेगळंच असतं' असेच त्यावेळी सगळ्यांना वाटत होते.
शेवटी तिच्या मनासारखं झालं.कॉलेज संपता संपता एक स्थळ तिच्यासाठी चालून आलं. घरची परिस्थिती उत्तम,मुलगा दिसायला चांगला होता.गावात त्यांचा नावलौकिक होता आणि मुख्य म्हणजे मुलगा गावातच आई वडिलांसोबत राहणार होता. फारसा विचार न करता तिने पहिल्याच स्थळाला होकार देऊन टाकला.आता आयुष्यात कधीच एकटेपण येणार नाही असे वाटून ती अगदी निःशंक झाली.आई बाबा मात्र तालेवार स्थळ मिळाले म्हणून आनंदात होते तर नातेवाईकांच्या मते पोरीने नशीब काढलं होते.हिला श्रीमंती, घरदार याच्याशी काहीही घेणेदेणे नव्हते केवळ घरात असणारी माणसं हेच तिच्या होकाराचे खरे कारण होते.
लग्नानंतर नव्याची नवलाई संपून गेली आणि हळूहळू नवऱ्याने त्याचे मूळ रंग दाखवायला सुरुवात केली अन आता आपण लवकरच एकटे पडणार याची तिला चाहूल लागली. त्याच्या विक्षिप्त वागण्याने माणसं दुरावू लागली.इतकेच काय पण सासू सासरे पण म्हातारपणी लेकाच्या वागण्याला कंटाळून त्यांच्या गावी,खेड्यात शांतपणे रहायला निघून गेले आणि तिची उरलीसुरली सोबतदेखील संपली.खरंतर तिला त्यावेळी सोबतीची खूप गरज होती. मुलं लहान होती,त्यामुळे बोलायला, मनातील सांगायला कोणी नव्हते.
नवऱ्याचे वागणे आणि प्रतापच असे होते की तिला बाहेर चारचौघात मिसळायलाही नको वाटायचे.त्यामुळे मैत्रिणी अशा फारश्या नव्हत्याच.जाणीवपूर्वक ती सगळ्यांपासून लांब राहू लागली आणि हळूहळू एकटी पडत गेली.सुरुवातीला आस्थेने चौकशी करणारे नातेवाईक नंतर बघ्याची भूमिका घेऊ लागले. आता आपल्यालाच स्वतःच्या हिमतीवर सगळे निभावून न्यायचे आहे हे ओळखून तीदेखील आलेल्या परिस्थितीला टक्कर देण्यासाठी जणू मनाने सज्ज झाली.खूप वेळा तिला वाटत असे की माहेरी जाऊन आई बाबांना सगळं सांगावं पण त्या थकलेल्या,वयोमानानुसार शारीरिक तक्रारींनी त्रस्त असलेल्या आईबापांच्या जीवाला उगाच घोर नको असा विचार करून ती गप्प बसत असे.
नवऱ्याला असणाऱ्या व्यसनांमुळे संसाराची आर्थिक घडी कधीचीच विस्कटली होती,म्हणून तिने मिळेल ती नोकरी पत्करली. मग काय,घर,मुलं आणि ऑफिस.... एवढंच काय ते तिचं विश्व झालं. आपण बरं आणि आपलं काम बरं. उगाच लोकांकडून काहीबाही ऐकून घ्यायला नको म्हणून तिनं एकटे राहणं पसंत केलं.आणि मग त्याचीच सवय होऊन गेली.कधीकाळी आपण एकटेपणाला घाबरत होतो हेदेखील ती आता विसरून गेली होती.स्वतःची सोबतदेखील इतकी छान असते हे तिला नव्याने जाणवले होते.
व्यसनांमुळे उदभवलेले नवऱ्याचे आजारपण,ऑपरेशन आणि त्यानंतर कायम सुरू झालेल्या डॉक्टरांकडच्या फेऱ्या. तेंव्हा मुलं लहान होती. ती एकटीच मुलांची आई अन बाबा देखील झाली.घरातल्या वातावरणाचा मुलांवर परिणाम होऊ नये यासाठी जिवापाड प्रयत्न करत राहिली. मुलांचे करता करता तिने घर,नोकरी आणि नवऱ्याची आजारपण सगळं हिमतीने निभावले,अगदी एकटीने ते अगदी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पर्यंत.
आणि आज अचानक लेकीने विचारलेला हा प्रश्न.या प्रश्नाने तिच्या कित्येक जुन्या आठवणी जाग्या झाल्या.तिच्या एकटेपणाची काळजी करणाऱ्या सगळ्या नातेवाईक, मैत्रिणी आणि हितचिंतकाना तिला ओरडून सांगावेसे वाटत होते की नका करू माझी काळजी,मी गेले कित्येक वर्ष एकटीच आहे.ज्यावेळी कोणीतरी मला आधाराचा हात पुढे करावा असे वाटत होते,कोणीतरी आपली मनापासून चौकशी करावी अशी अपेक्षा होती आणि एकटेपणाची भीती वाटून कोणीतरी सोबत असावं असे वाटत होते तेव्हा सगळ्यांनी चार हात लांब राहणे पसंत केले आणि आता सगळ्यांना माझी काळजी वाटते आहे.पण असतं हे सांगून कोणाला खरं वाटणार होते?तिचा नवऱ्यासोबतचा सो कॉल्ड सुखी संसार सगळेच तर इतके दिवस बघत होते ना.लहानपणापासून झालेले मध्यमवर्गीय संस्कार...'चार भिंतींच्या बाहेर घरातल्या कुरबुरी जावू द्यायच्या नाहीत आणि कायम बाईच्या जातीलाच तडजोड करावी लागते,पडतं घ्यावं लागतं'...हे ऐकतच ती लहानाची मोठी झाली होती. त्यामुळे बाहेरच्या जगात वावरताना तिने कायम आपला संसार खूप छान चालू आहे असेच मिरवले होते.नकळत स्मार्ट,हुशार आणि कर्तबगार अशीच तिची प्रतिमा समाजात निर्माण झाली होती आणि तीच सांभाळण्याचा ती जीवापाड प्रयत्न करत राहिली.
मात्र आता ज्या गोष्टीची पूर्वीपासून तिला भीती वाटत होती ते एकटेपण तिला आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत करणार होते.
© स्मिता मुंगळे.
वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
Kharach ahe me pan ashich ekti aahe Ani to divas kadhi yel jevha me kharach ekti hyil yachi vat baghat
ReplyDelete