स्वप्नपूर्ती
✍️ अतुला मेहंदळे
मेधा आज खूप दिवसांनी घराजवळच्या बागेत निवांत बसली होती. गेल्या कित्येक महिन्यात ती इथे येऊच शकली नव्हती. नाहीतर ती आणि मनोहर बरेचदा रविवारी इथे यायचे. गप्पा मारायचे आणि जाता जाता मनोहर त्यांच्या नेहमीच्या फुलवाल्याकडून मेधाला तिचा आवडीचा मोगऱ्याचा गजरा घेऊन द्यायचा. पण आज एकटीच बसण्याचं कारणच तसं होतं. बसल्यावर मेधा ला मागची ३०-३२ वर्ष जशीच्या तशी आठवायला लागली.
रत्नागिरीसारख्या त्याकाळी खूप कमी सुविधा असणाऱ्या गावात मेधाने जेमतेम बारावी पूर्ण केलं. आणि मग वयाच्या २२व्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं ते मुंबईत राहणाऱ्या, बँकेची कायमची सरकारी नोकरी असणाऱ्या, गव्हाळ पण स्मार्ट अशा मनोहर शिंत्रे याच्याशी. लग्न करून ती सौ. मेधा मनोहर शिंत्रे म्हणून बोरिवलीच्या त्यांच्या घरी आली. नव्या शहरी वातावरणात मेधा पूर्ण बावरली आणि बावचळली होती.
पहिले काही दिवस तिचे सासूसासरे होते त्यांच्या समवेत. पण नंतर ते ही गेले गावाला. जाताना सासूबाई म्हणाल्या होत्या, "सुनबाई, जमेल हो सगळं हळूहळू. अग आम्ही अजून राहिलो असतो पण गावाला शेतीची कामं पण खोळंबतील ना! तू पण सगळं शिकून घे नाहीतर या मुंबईत टिकाव कसा धरशील. पण तू करशील सगळं माहितेय मला." असं म्हणून त्या गेल्या आणि सगळी जबाबदारी मेधा वर येऊन पडली. तरी मनोहरच्या साथीने तिने सगळा संसार पेलला. जास्त शिक्षण नसल्याने, थोडे खाचखळगे आले. पण मनोहर मुळातच मनमिळावू आणि प्रेमळ त्यामुळे मेधाचा पण थोडा अवघडलेपणा कमी झाला.
नव्या नवलाईची वर्षं ओसरल्यावर एक रुटीन ठरून गेलं तिचं. सकाळी डब्बा बनवणं, बाजारहाट करणं, घरची सगळी साफसफाई एकहाती करणं, शिवण टिपण करणं सगळं ती स्वतःच करायची. स्वतःचे ब्लाऊज स्वतःच शिवायची. मग संध्याकाळी न चुकता रोज मनोहर तिला मोगऱ्याचा गजरा आणायचा. आणि रोज नववधू सारखी ती त्याच सलज्जतेने तो त्याच्याकडून माळून घ्यायची. सगळं कसं सुखात चालू होतं.
अशातच ८-१० वर्ष गेली. तितक्यात सासुसासरे ही एकामागून एक निवर्तले आणि मेधाला एकटेपणा जास्तच जाणवू लागला. ते लांब असूनही तिला खूप आधार असायचा त्यांचा. शिवाय आपणही आई व्हावं ही स्त्रीसुलभ भावना तिला कित्येक वर्ष बेचैन करतच होती. मनोहरला पण बाबा व्हायचं होतं, पण मेधाला वाईट वाटेल म्हणून तो शक्य तितका शांत रहायचा. कित्येक डॉक्टर केले . कुणातच दोष नसूनही डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं.
शेवटी लग्नाला १५ वर्ष झाल्यावर मनोहरच एक दिवशी तिला म्हणाला," मेधा, तू नको विचार करुस जास्त. अगं नाही होत कुणाकुणाला मूल. त्यासाठी आपण कशाला दुःखी व्हायचं आणि ज्यांना मुलं आहेत ते पण सुखात आहेतच हे कुणी सांगितलं? आजूबाजूच्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे तू लक्ष नको देऊस. आणि मी आहेच की तुझ्यासोबत. तुला मी आणि मला तू! मी काय म्हणतो, तू तुझे छंद जोपास. तुला शिवण छान जमतं त्याच्या शिकवण्या घे. तुझी कला दुसऱ्यांना पण शिकव. मस्त बिनधास्त रहा. अशी कुढत नको बसू. मला माझी हसरी मेधा खूप आवडते. आणि हो माझे सगळे व्यवहार, माझ्या आणि तुझ्या नावे केलेली गुंतवणूक हे आता शिकून घे बरं. उद्या मला काही झालं तर तुला सगळं माहिती पाहिजे नं वेडाबाई."
त्याच्या तोंडावर हात ठेवत मेधा रागातच बोलली, "हे हो काय अभद्र बोलताय. आत्ता कुठे आपली चाळिशी आलेय. काही होत नाही तुम्हाला."
तेव्हा लगेचच तिचा तोंडावर धरलेला हात बाजूला करून हसतंच मनोहर म्हणाला," इतकंच काय, अगं मी तर आत्ताच सांगून ठेवतोय की मी गेल्यावर कुठलीही कर्मकांड करत बसायची नाहीत. आपल्या जवळच्या मेडिकल कॉलेजला माझा देहदान करायचा आणि मोकळं व्हायचं. अग उद्याच काही जात नाही मी. पण कधीतरी हे व्हायचंच. हेच विश्वाचं अंतिम सत्य आहे. पण तरीही तू शिकून जाणून ठेवलं तर काय बिघडतंय. नंतर पंचाईत नको."
त्याचं बोलणं अर्धवट सोडून ती उठलीच. म्हणाली," मी जातेच कशी इथून. असंही ही वेळ येणारच नाही. मीच जाणार तुमच्या आधी." आणि तिने विषय तिथेच सोडला. थोड्या महिन्यात ती बाळाचा विषयही विसरली. ते आपल्या नशिबात नाही हे सत्य तिने आता स्वीकारलं होतं.
लग्नाची २५ वर्ष कशी आनंदात गेली. रौप्यमहोत्सव पण दोघांनी अगदी छान साजरा केला. मनोहरने सुट्टीच टाकलीन पूर्ण दिवस. आता हळूहळू केसात रुपेरी झाक चांगलीच दिसत होती. मनोहर पण झोनल मॅनेजर झाला होता मोठ्या सरकारी बँकेत. रहायला घर, दिमतीला गाडी सगळं ऐश्वर्य होतं. पण अचानक या सगळ्याला दृष्ट लागली. आजही मेधाला तो दिवस चांगलाच आठवत होता. वर्षभरापूर्वी रविवारचं वृत्तपत्र वाचत असताना अचानक मनोहरच्या छातीत दुखण्याचं निमित्त झालं आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मनोहरने मेधाच्या मांडीवरच प्राण सोडला.
मेधा तर जागीच थिजली. अचानक आकाशात वीज चमकावी आणि झाडावर पडून झाड बेचिराख व्हावं तसं तिचं झालं. ती बोलेनाशी झाली. मित्रमंडळी, नातेवाईक येऊन गेले. मनोहरच्या सांगण्यानुसार मेडिकल कॉलेजला देहदान करतानाही मेधाच्या डोळ्यात टिपूस ही आला नाही. मेधाची आई सारखी सांगत होती मोकळी हो बाळा. पण मेधा ढिम्म हलली नाही. पुतळाच झाला होता जणू तिचा. तिची आई पण थोडे दिवस होती. पण तीही एखाद महिन्याने गेली रत्नागिरीला. जाताना "तू चल माझ्यासोबत तेवढाच तुला बदल होईल." असं सारखं आई सांगत होती पण हिचं हु नाही की चु नाही.
आता घर खायला उठत होतं. म्हणून तिने एकेदिवशी इतके दिवस बंद असलेलं मनोहरचं कपाट उघडलं. त्यात सगळ्या त्याच्या आठवणी अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यातच मनोहर रोज लिहीत असलेली डायरी पण होती. तिला अचानक आठवलं मनोहर रोज डायरी लिहायचे. ती तिने अधाशासारखी वाचायला घेतली. त्यात बरंच काही लिहिलं होतं. पुरुष माणूस घडाघडा बोलत नाहीत हे ऐकलं होतं पण एकांतात स्वतःशीच इतके बोलतात याचं तिला आश्चर्य वाटलं. मनोहरने मेधाबद्दल खूप काही लिहिलं होतं. कधी राग व्यक्त केला होता तर कधी अगदी भरभरून कौतुक केलं होतं.
शेवटच्या पानावर म्हणजे मनोहर गेले त्याच्या आदल्या दिवशीचं लिखाण वाचून तर ती थक्कच झाली. मनोहर ना मरण दिसलं होतं की काय आधीच असं तिला वाटून गेलं. मनोहर ने लिहिलं होतं," मेधा, आज बऱ्याच वर्षांनी तुला पत्र लिहावंसं वाटतंय. कोण जाणे तू हे कधी वाचशील? कदाचित लवकरच. बँकेत असताना बदली व्हायची तेव्हा तिथून पत्र लिहायचो तसं आज का कुणास ठाऊक काहीतरी वेगळंच वाटतंय. राणी, तू आपल्या घरासाठी खूप केलंस. मी मात्र कामामुळे तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. पण एकमात्र आहे उद्या जर मला काही झालं तर मी तुला तुझ्या शंभरीपर्यंत पुरेल इतकी सोय केली आहे. आणि तसं नाहीच झालं तर मी आहेच त्यातला वाटेकरी.😊 तू कधी लक्ष दिलं नाहीस पैशांच्या व्यवहारात म्हणून मला कधीकधी तुझा खूप राग यायचा. पण तू हसलीस की सगळा राग कुठल्या कुठे पळून जायचा..
मेधा मी आज तुला एक गुपित सांगतो. मी जे काही कमावलं आहे जी गुंतवणूक केली आहे ते सर्व कागदपत्र तुझ्या नावेच घेतले आहेत. आणि ते आपल्या गावच्या घरी असलेल्या कपाटातल्या लॉकरमध्ये आईबाबा गेल्यावर सेफमध्ये ठेवले आहेत. लॉकर ची चावी माझ्या जुन्या पांढऱ्या रंगाच्या कॉलर वाल्या शर्टच्या खिशात आहे. ते तू बघ. आणि मी हे ही दिलखुलासपणे सांगतो की जर मी तुझ्या आधी गेलो तर तू दुसरं लग्न पण करूच शकतेस. अग companion ची गरज असतेच ग. हो पण, तरी तुझ्या मनातल्या तळ्यात तुझ्या या 'मन्या' ला जपून ठेवशील ना? तुला एक प्रेमळ शिक्षाही मी ठोठावणार आहे. मी गेलो तरी आणि असलो तरी आपलं संध्याकाळचं ते गजरा प्रकरण चालूच ठेवायचं बरं का! अजून एक सांगायचं होतं तुला माझ्या मनात खोल दडवून ठेवलेलं स्वप्न. आपल्याला मूल नाही याचं वाईट मलाही खूप वाटायचं ग. कित्येकदा रात्र रात्र झोप यायची नाही. पण तुला त्रास व्हायचा तो काय कमी होता का म्हणून मी कधी तुला बोलून नाही दाखवलं. तेव्हाच मी ठरवलेलं जर आपल्याकडे भरपूर पैसा आला तर एका अनाथाश्रम ला दान करायचा. आणि एक किंवा जमेल तेवढ्या मुलांचं शिक्षण आपण आपल्याकडून करायचं. बघू कसं जमतंय तसं. असो, तू हे पत्र वाचशील तेव्हा मी असो अथवा नसो but I am and I will miss u yaar! I Love U.
तुझाच,
मन्या. ♥️
हे वाचल्यावर मात्र मेधाचा बांध फुटला. डोळ्यांना वहायला वाट मिळाली होती. इतके दिवस साचून राहिलेलं दुःख आज ओक्साबोक्शी बाहेर वहात होतं.
हे सगळं आठवून तिला आजही, त्यांच्या दोघांच्या बागेतल्या नेहमीच्या बाकड्यावर बसून, हुंदका दाटून आला. .. पण त्या दिवसानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं. शहाणपण येण्यासाठी हा पर्याय खरंतर तिला अजिबातच नको होता. पण त्यालाही आता पर्याय नव्हता.
तिने थोड्याच कालावधीत सगळे व्यवहार चोख शिकून घेतले. मनोहर ने केलेली गुंतवणूक तिने अजून वाढवली. शेअर्स मध्ये तिने भरपूर नफा कमवला. आणि आजच तिने मनोहरच्या वर्षश्राद्धपूर्ती ला मनोहरचं स्वप्न पूर्ण केलं होतं. तिने गुंतवणुकीतून झालेला नफा एका अनाथाश्रमाला दिला. आणि एक नव्हे तर चक्क दोन मुलांचं शिक्षण आता ती करणार होती. एक मुलगा आणि एक मुलगी. आता ती त्यांची माय बनली होती. विचारांच्या नादात स्मितहास्य करतच ती उठली. नेहमीच्या फुलवाल्याकडून तिने आज एक नाही तर दोन गजरे घेतले.एक तिने तिच्या केसात माळला आणि एक मनोहरच्या फोटोला घालुन दिवा लावून मनापासून नमस्कार केला. आज मात्र फोटोतल्या मनोहरच्या डोळ्यात त्याच्या स्वप्नपूर्तीची वेगळीच चमक तिला दिसत होती.
।। शुभम् भवतु।।
✍️ सौ. अतुला प्रणव मेहेंदळे.
वरील कथा सौ. अतुला मेहंदळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
खूप खूप छान, मनाला स्पर्शून जाणारी
ReplyDelete