लव्ह यू
✍️अपर्णा देशपांडे
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज तो दिवस आला होता . आपल्या एकंदर वृत्तीला आणि व्यक्तिमत्त्वाला शोभेल असा मेकअप केलेली नेहा स्वतःला आरशात बघत होती . सुंदर पैठणी , वर मोत्याचे दागिने , हिरवा शेला , केसांचा अंबाडा ,आणि त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा दाट गजरा ....एकदम खास लूक ! आईने येऊन नजर काढली तिची .
" मुलीला घेऊन या .." गुरुजींची अगदी टिपिकल आवाजातली हाक आली , तसे मामा मामी आले तिला न्यायला . मामींनी हात ओवाळून दृष्ट काढली आपल्या लाडक्या भाचीची .
मांडवाकडे जाताना मागील सगळा पट तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला . ती आणि वरुण अकरावी पासून एकमेकांना ओळखत होते . वरुण इंजिनिअरिंग ला गेला , तर नेहाने फिजिओथेरपीला प्रवेश घेतला . दोघींनाही वाचनाची आवड ....भटकंती करत तिथल्या जा अभ्यास करण्याची आवड . त्यामुळे त्यांची मैत्री अजूनच घट्ट झाली .
वरुण गोरा , उंच , देखणा तर नेहा थोडीशी सावली आणि किंचित स्थूल . त्यामुळे वरुण कधी आपली जीवनसाथी म्हणून निवड करेल असं तिला वाटलंच नाही .
वरुणने जेव्हा तिला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा तिने हो म्हणायला बराच वेळ घेतला ....तिला तो खूप आवडत असतानाही !!
****** "शुभ मंगल , सा ss वधा ss न !!" गुरुजींनी म्हटलं , आणि वाजंत्री ,टाळ्या , फटाके याचा एकच गलका झाला .
अंतरपाट सरकला , तसं वरुण ने नेहाच्या डोळ्यात बघितलं . तिच्या घाऱ्या बोलक्या डोळ्यात बघतानाच आवाज आला ,
" आता वर वधूने वरमाला घालावी"
" नंतर बघत बस रे बाबा , वरमाला घाल आधी " मागून मामाने म्हटलं .
तो भानावर येइपर्यंत नेहा ने त्याच्या गळ्यात हार घातलेला होता .
तिच्या गळ्यात वरमाला घालताना तो हळूच पुटपुटला , " सुंदर दिसतीएस"
आणि ती गोड लाजली .
खरं तर वरुण रूपाने तिच्या पेक्षा कितीतरी पटीने उजवा आणि आता तर नवरदेव म्हणून अत्यंत देखणा दिसत होता . तिला त्याच्याजवळ तसे बोलून ही दाखवायचे होते .... पण..
काल रात्री सीमंती च्या वेळी ऐकलेला संवाद तिच्या मनात काहूर उठवून गेला होता .
" वरुण ला इतक्या पोरींमध्ये हीच बरी सापडली ! आमची शर्मिला हिच्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे , पण ह्याला हिच्यात काय दिसलं काय माहीत!"
" पैसा ग , पैसा ! शिवाय श्रीमंतांची एकुलती एक मुलगी ! मस्तं फासलं तिला. " कोणी दोघी बोलल्या ,
आणि मागून खिदळण्याचा आवाज आला .
हे संवाद ऐकल्या पासून नेहाचं मन सैरभैर झालं होतं . ती आणि वरुण गेल्या आठ वर्षांपासून फार चांगले मित्र होते . एकमेकांना अतिशय जवळून ओळखणारे ...तरीही ती अस्वस्थ झाली होती . तेव्हा वरुण शी बोलावं म्हणून तिने फोन लावायचा प्रयत्न ही केला ...पण बोलणं होऊ शकलं नव्हतं.
" ओ मॅडम , कुठे आहात? लग्न झालंय आपलं ! " वरुण कानात कुजबुजला , तशी ती भानावर आली .
" का ग , कसला विचार करतेय?"
ती काही बोलण्या आधीच आजूबाजूला प्रचंड गर्दी जमली . अभिनंदनाचा वर्षाव , भेट वस्तूंचे ढीग , आणि समोर अनेक फोटोग्राफर !
प्रत्येक फोटोग्राफर ओरडत होता , "नेहा , स्माईल !! ...नेहा , इकडे बघ !"
नेहा चं लक्ष उडालंय हे लगेच लक्षात आलं वरुण च्या . त्यानं एकदोनदा तिला त्यावरून टोकलं.... कधी डोळ्याने प्रश्न विचारला , पण नेहाने मान हलवत आणि खांदे उडवत काहीच नाही असं मूकपणे सांगितलं . वरुण मात्र अस्वस्थ झाला होता . नेहमी आनंदात असणरी नेहा नेमकी आज अशी कोमेजली सारखी का दिसतेय ? हा विचार त्याला त्रास देऊ लागला .
****** विहिणीच्या पंगती साठी नेहा तयार व्हायला आत गेली , आणि मागून आवाज आला ,
" हाय !"
ती कसली दचकली .
" वरुण तू? इथे काय करतोय? अरे विहिणीची पंगत आहे , येतेय न मी बाहेर ."
वरुण ने काही न बोलता दरवाजा लावला .
" तू काय करतोय वरुण ? आत्ता माझ्या मैत्रिणी होत्या इथे ...त्या काय म्हणतील...मला....."
त्याने आपल्या हाताने तिचे तोंड बंद केले .
" शू sss!! चूप ! एकदम चूप ! आता मी काय बोलतोय ते नीट ऐक ! मी तोंडावरचा हात काढतोय , ओरडायचं नाही ! "
ती फक्त मोठ्ठे डोळे करून त्याच्याकडे बघत होती .
" हे असे सुंदर टपोरे डोळे घेऊन माझ्याकडे बघतेस न , तुला खाऊन टाकावं वाटतं ."
तिने बोलायला तोंड उघडलं की त्याने पुन्हा हात ठेवला .
" नेहा मॅडम , तुम्ही का अस्वस्थ आहात ते समजलं मला . आमच्या काकी बाईंचे मुक्ताफळं ऐकवले मला मुग्धा ने .
" मला सांग, आपण एकमेकांना किती वर्षांपासून ओळखतो नेहा ?"
" उंम्म्मम्म्मम्म ....."
" ओह ! हात काढलाय मी , ओरडू नकोस ! आणि ओरडली तरी काय , आता मी नवरा आहे तुझा ." म्हणत तो तिच्या जवळ सरकला , तसं तिने त्याला हसून दूर ढकललं .
" ऐक नेहा . बारावीत अपेक्षाभंग झाल्यावर माझ्यातील सॉफ्टवेअर स्किल्स ओळखून मला प्रोत्साहन देणारी , आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी माझ्यासाठी रात्र रात्र जागणारी , माझ्या चेहऱ्यावरून विना संवाद माझ्या भावना ओळखणारी , अप्रतिम पेंटिंग करणारी , आईच्या आजारपणात सतत बाबांना मदत करणारी , आजीला दोन महिने न थकता फिजिओथेरपी देणारी एक दुर्मिळ गुणांची व्यक्ती मला पत्नी म्हणून लाभली हे माझं भाग्य आहे . कुण्या एकाच्या यःकीचीत मतामुळे आपल्या निवडीवर शंका घेणाऱ्या ह्या व्यक्तीला मी ओळखत नाही ."
म्हणून , पुन्हा मागे न बघता तो बाहेर पडला .
तो गेला की लगेच मुग्धा आत आली .
" नेहु , काय म्हणाला तो ? तू दुखावलस न त्याला ? काहीही उलट विचार करतेस!!"
" आता ग मुग्धा ?"
" मी नाही बाई नवरा बायको च्या मध्ये बोलणार ."
"एक देईल ठेवून . काडी लावलीस , आता मजा घेतेय !"
वरात वरुण च्या घरी पोहोचली .
तो मात्र शांत च होता . ती चोरून चोरून त्याच्याकडे बघत होती . त्याचा रुसवा कसा काढायचा ह्याचा विचार सुरू होता .
"वरुण , आता गृहप्रवेश होईल . माप ओलांडायची वेळ आली . मी सॉरी म्हटलं न ? आता काय करू म्हणजे तू खुश होशील ? ...सांग न ! बोल न वरु !"
" तुला काय सांगायचंय ते माप ओलांडताना उखण्यात सांगायचं ! कबूल? आणि हिम्मत असेल सगळ्यांसमोर I Love You म्हणायचं . कबूल?"
" कबूल बाबा , कबूल!"
सजवलेल्या दरवाज्यातून आत जाण्या आधी सरिता ताईंनी दोघांना ओवाळलं . नेहा सारखी वरुण कडे बघत होती , आणि वरुण तिला फक्त
डोळ्यांनी मापाकडे निर्देश करत होता .
दारात सुरेख सजवलेलं , तांदूळ भरलेलं माप ठेवलं होतं . एक मावशीने पटकन पुढे होऊन दोघांचे हात हातात दिले , आणि सोडायच नाही बरं , अशी प्रेमळ धमकी पण दिली .
चला सुनबाई , उखाणा घ्या आता!
कुणीतरी म्हटलं . वरुण ने आव्हानात्मक नजरेने तिच्याकडे बघितलं , आणि तिने चक्क त्याच्या हाताला चिमटा काढला . तो आऊच ! म्हणे पर्यंत तिने खणखणीत आवाजात उखाणा सुरू केला .
वरुण ने मला वरलं
मन आलंय भरून
माप ओलांडते सौभाग्याचं
पण आत न्यायचं मला उचलून (© अपर्णा देशपांडे)
तिनं असं म्हटलं की एकच गलका झाला . सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या .
आणि वरुण चे बाबा म्हणाले ,
" वरुण राव , घ्या आता उचलून आमच्या सूनबाईंना !"
आणि वरुण ने तिच्या डोळयात बघत अलगद तिला उचललं .
त्याच्या मानेभोवती हात घालून ती त्याच्या कानापर्यंत पोहोचली , आणि कानात म्हणाली ,
" आय लव्ह यु , आय लव्ह यु , आय लव्ह यु!!!"
तसा तो तिच्याकडे पाहून गोड हसला .
तिला आत सोफ्यावर बसवत सगळ्यांसमोर म्हणाला ,
" फार जिद्दी आहेत ह्या घरच्या सुनबाई!! "
आणि तिने लाजून चेहरा हातात लपवला .
✍️ अपर्णा देशपांडे
वरील कथा अपर्णा देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.