शूट ऍट साईट

 शूट ऍट साईट 


✍️ जयश्री दाणी

        ती आढयाकडे टक लावून पहात  होती. मध्येच आपण डोळ्यांतून हसतोय की काय, फिस्कारतोय की काय अशी तिचीच तिला शंका येऊ लागली. आपण मनोरुग्ण झालोय का? या प्रश्नासरशी गंभीर झाली मात्र ती. आता जरा आढ्याच्या खाली असणाऱ्या समोरच्या भिंतीकडे बघू लागली. पिवळा रंग दिलेला होता. पिवळा रंग तिच्यासाठी शुभ - अशुभ असा दोन्ही गुणधर्म असलेला आहे हे तिला एका ज्योतिष्याने सांगितलेले होते. ज्योतिष्य वगैरे ती मानतच असे असे नाही परंतु कुणी त्या पद्धतीची आगाऊ सूचना दिली तर ती तसे तसे करे. तिने आपल्या जीवनात पडलेला पिवळ्या रंगाचा प्रभाव आठवून पाहिला. हे कायss मस्तकावर थोडा जरी ताण दिला तरी डोकं दुखायला लागलं. पण आठवलेही तिला लगेच. तिने नोकरीसाठी मुलाखत दिली तेव्हा पिवळ्याचं रंगाचे सलवार कमीज घातले होते. कबूल केला तेव्हढा पगार देत नाही म्हणून तिने नोकरी सोडली त्यादिवशीही जीन्सवर पिवळ्या रंगाचे टॉप घातले होते.

          अजून कुठे कुठे, काय काय घडताना वापरला आपण पिवळा रंग? 'त्या दिवशी' होता का आपल्या अंगात पिवळ्या रंगाचा काही कुर्ता वगैरे? नाहीss, तिला लख्ख आठवत होता ना तो दिवस. कसे विसरणार? काय विचार करून ते इथे आले नि काय होऊन बसले. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. जीवनाचा आधार नव्हे संपूर्ण आयुष्याचा केंद्रबिंदूच गमावून बसली ती. तो थरारक भयानक दिवस तिला पुन्हा आठवला. तिने गच्च डोळे मिटून घेतले परंतु बंद डोळ्यासमोरही त्या साऱ्या आकृत्या थयथय नाचू लागल्या. कानात जोरदार डरकाळी घुमली. ती महाकाय वाघीण बंद पापण्यातूनही स्पष्ट दिसली. अहाहाsss ती किती तल्लीन झाली होती सृष्टीतील ते भयचकित करणारे सौन्दर्य पहाताना. वाघिणी पाठोपाठ समोर आलेले तिचे गोजिरवाणे चार बछडे. काय नाव त्या विशालकाय वाघिणीचे? रेश्मा !! तिने अतीव दुःख व त्वेषाने दातओठ दाबले.

          किती आनंदात होते ते चार जोडपे या भागात जंगल सफारीला येताना. बंगालच्या आतल्या भागात राहणारी ती सारी सधन हौशी मित्रमंडळी. तिचे नाव मौसमी. उच्चार मौशमी! तिला आणि तिच्या नवऱ्याला, विश्वजितला जंगलभ्रमंतीची भारी आवड. लग्नाआधी आणि लग्नानंतरही त्याने भारतातला बराचसा जंगलभाग पाहिलेला. विविध पक्ष्यांची, प्राण्यांची छायाचित्र त्याच्या संग्रहात होती. तिला माहेरी असताना नातेवाईकांकडे जाणे याशिवायही काही पर्यटन असतं याची फारशी खबरबात नव्हती. नवऱ्यासोबतचा मधुचंद्र म्हणजे हिलस्टेशनला जाणे हे आणखीन एक पर्यटनातील जास्तीचे ज्ञान. पण त्यापलीकडेही पर्यटन, भरपूर अनुभवांचे सुरेल जग असते हे तिने विश्वजितच्या सान्निध्यात आल्यावर अनुभवले. त्याने हनिमूनचा प्लॅन केला तोच मुळी एका प्रसिद्ध जंगलात जायचा. मैत्रिणींनी चिडवलेही तिला, "बघ बरं खोलीबाहेर कोल्हे कुई कुई करतील आणि तुमचा प्रेमालाप भंग होईल." त्यावर घरातील मोठ्या स्त्रिया गालाला पदर लावून खुदूखुदू तर वयस्क पुरुष मंडळी मिशीत मिस्कील हसले होते.

        मधुचंद्राची मधुर मनोहर रात्र सरल्यावर पहाटे तिला जाग आली तेच विविध पक्ष्यांच्या मंजूळ कुंजनांनी. कित्ती पक्षी आजूबाजूला किलबिलत होते. लाल बुडाचा बुलबुल तर खिडकीवर टकटक करीत होता. ती, विश्वजित बाहेर आले तेव्हा झुबकेदार शेपटीच्या खारुताई झाडावर सरसर पळत होत्या. चिमण्या, पोपट, सातभाई, कबुतरे, साळुंकी, सुतार, खंड्या, कोकीळ, बगळे, मैना, पोपट याशिवाय धनचिडी, इंडियन रोलर, पिंगळे यासह असंख्य नवीन पक्षी तिने तिथे पाहिले. मनसोक्त जंगल सफारी केल्या. जंगल म्हणजे निव्वळ वाघाचे दर्शनच नसून अभूतपूर्व असे हिरवाईचे पर्व आहे . विविध पक्षी, झाडे, वेली, पाणवठे हे सर्व घटक जंगलाला समृद्ध करणारे आहेत, त्यातीलही सौन्दर्य निरखायला विश्वजितने तिला शिकविले. ती परतली ते रानभरी होऊनच. त्यानंतर त्याच्या प्रत्येक जंगल सफारीत ती आवडीने सोबत जात राहिली.

            यावेळीही नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये मित्रपरिवाराचा छान मेळ जुळून आला होता. जंगल सफारीची योजना आखली होती.  प्रवासभर सगळ्यांची लहान मुले अखंड चिवचिवत होती. "ए, जंगल सफारी करताना कुणी बोलायचे नाही हं, गपचिप रहायचे नाहीतर प्राणी पळून जातात. जिप्सीतून मध्येच उतरता पण येत नाही. वाघोबा येईल अंगावर वाघोबा...." त्यातील मोठ्याने आधीच दम भरून ठेवला होता. वाघोबा ....ती शहारलीच. तिने गप्पकन डोळे उघडले. तरी ती वाघीण डोळ्यासमोर आलीच. तिलाच तर बघायला आले होते ते सगळे पश्चिम बंगालहून इतक्या दूर महाराष्ट्रात. त्या वाघिणीच्या रुबाबदार देखण्या रूपाची कथा साऱ्या देशभर पसरली होती. देशविदेशातील वन्यजीव प्रेमी, अभ्यासक तिला बघायला धाव घेत होते. कान्हा अभयारण्यातील वजनदार वाघ 'विरे' तिचा पिता आणि ताडोबातील खुंखार वाघीण 'श्यामा'  तिची आई होती. दोघांच्याही नावातील अक्षरे गुंफून वन्यजीव विभागाने तिचे नाव रेश्मा ठेवले होते. 

      

          रेश्माने चार बछडे दिल्यावर ती पर्यटकांच्या आकर्षणाचा अधिकच केंद्रबिंदू झाली. बछड्यांसहित तिचे दर्शन साऱ्यांना सुखावत होते. त्यातच कधीकधी रेश्मा नरभक्षक झाल्याची शंका वर्तमानपत्रातून व्यक्त होऊ लागली. कारण ती वास्तव्यास असलेल्या अधिवासात दूरदूरवर दुसरी वाघीण रहात नव्हती. त्यामुळे जंगलाला लागून असलेल्या शेतात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला गुराखी, पहाटेच्या अंधारात पाणवठ्याजवळ परसाकडे बसलेल्या म्हातारीच्या मृत्यूला तिलाच कारणीभूत ठरवले गेले. तसेही ज्या जंगलात जाई तिथे रेश्माचा दबदबा असेच परंतु आता दहशतही पसरायला लागली होती. रेश्माच्या विरुद्ध मानवहत्येचा ठोस पुरावा मात्र मिळाला नव्हता.  तिला विश्वजितसह अनेक जंगलभ्रमंतीचा उत्तम अनुभव असल्याने या बातम्यांचे फारसे काही भय वाटले नाही. 

        

        रात्रीची झोप पहाटेपूर्वीच आवरून साऱ्या कच्च्याबच्च्यांना तयार करून मंडळी अंधारातच सफारी गेटजवळ पोहचली. याहूss त्यांची हत्ती सफारी बुक झाली होती. ती, विश्वजित, त्यांची अडीच वर्षाची मुलगी रिया, मित्राची पत्नी आणि सहा, सात वर्षाची छोटी मुलगी असे तीन मोठे दोन छोटे एका हत्तीवर स्वार झाले. अंगाला प्रचंड मोठा हिसका देत हत्ती जमीन हादरवत उठला तेव्हा तिला कधी नव्हे ते प्रचंड भीती वाटली. रियाला पकडू की स्वतःला सांभाळू अशी तिची भांबावलेली अवस्था झाली.  विश्वजितच्या हातात मोठ्ठा कॅमेरा असल्याने त्याच्याजवळ रियाला देता येत नव्हते. "दे, मी घेते तिला मांडीवर" म्हणत मित्राच्या पत्नीने रियाला जवळ घेऊन आपल्या ओढणीने कंबरेला बांधून ठेवले. तिला जरा बरे वाटले. रिया समोरच होती. सुरक्षित होती. तिनेही रियाचा हात घट्ट धरून ठेवला होता.     

          आठ साडेआठ, नऊ वाजले तरी वाघ दिसायचा पत्ता नाही. साडेदहाला सकाळची सफारी संपणार होती. सगळ्यांचे चेहरे नाराज होऊ लागले. रेश्माला बघायसाठीच तर सारा आटापिटा होता. मोठे मोठे रानगवे, हरणे, मोर, रानडुक्कर, चितळे, काळवीट, नीलगाय पाहतांना मजा येत होती. लहानगी रियाही लुकलूक बघत आनंद घेत होती. एरव्ही शहरात न जाणवणारा भणानणारा हिरवा रानवारा इथे शीळ घालत होता. सोनेरी किरणांनी अप्सरांसारखे चमकणारे छोटे छोटे पाणवठे होते. परंतु त्याचबरोबर आता वाघ दिसावा अशी साऱ्यांची मनोमन इच्छा होती.

        "मंकी कॉल".....गाईड पुटपुटला. सगळ्यांनी आसपासच्या झाडीत दूरवर नजरा फेकल्या. कुणी प्राणी दडून बसलाय का, कुणी दबा धरलाय का? "जंगलात खूपदा आपल्या बरोबरीने, आपल्या नकळत झाडामागे वन्यप्राणी वाटचाल करीत असतात, त्यांच्या अधिराज्यात आलेल्या प्रत्येक परक्या जिवाकडे त्यांचे काटेकर लक्ष असते. तेव्हा जंगलात खाली उतरायचा, हुल्लडबाजी करायचा प्रयत्नही कुणी करू नये."  असे मागे कधीतरी गाईडने सांगितलेले तिला आठवले. ती ताठ बसली. झाडाझुडपातील प्रत्येक बारीकचिरीक हालचालींकडे निक्षून बघू लागली. जंगलाचीही सम लागते, नाही? तिने तल्लीन विश्वजितकडे प्रेमभरे नजर टाकली. त्याला तिच्याकडे न पाहताही ते कळले. त्याने किंचित तिचा हात दाबला. लग्नानंतर सात वर्षांनेही ती पहिल्यासारखीच मोहरली.

       

          हत्ती आता अधिकाधिक आतवर गर्द भागात जाऊ लागला. बापरे जायला रस्ता सुद्धा नव्हता. साधी पायवाटही नव्हती. हत्तीचा एक पाय खड्ड्यात पडायचा तर दुसरा उंचवट्यावर. अंगाखांद्यांला भीतीदायक हेलकावे बसायला लागले. माकडांच्या टोळीचे आवाज वाढले होते. हरणे सुसाट धावत होती. वाघ जवळपास असल्याचे स्पष्टच लक्षणं होते. नाजूक नाजूक वेलींनी महाकाय वृक्षांना सहज जखडून ठेवले होते. वेलींचेही अंग प्रत्यंग जरड वृक्षस्वरूप झालेले. अबबss केव्हढे मोठे कोळीष्टक. विशाल ! ती पहातच राहीली आपल्याच जाळ्यात अडकलेला तो भलामोठ्ठा कोळी. आशियातील सगळ्यात मोठ्ठा कोळी आहे हा, गाईडने माहिती पुरविली. चारही दिशेला दाट तंतूचे जाळे पसरलेले आणि मध्ये डोळे गरगरवणारा तो कोळी. विश्वजित पटापट क्लिक करत होता. ती ती घनदाट हिरवाई डोळ्यात साठवत होती. 

         

        चहूबाजूने फक्त हिरवा रंग. हिरवाच वास, हिरवेच सान्निध्य. किती असीम शांतता. कसलाही आवाज नाही. क्वचित एखाददुसरा पक्षी पंख फडफडवत वरून जावा तेही अत्यंत अदबीने इतका दरारा. हो, तो भाग होताच रेश्माचा अतिशय खाजगी. केवळ रेश्मा आणि तिच्या बच्च्यांचे एकट हिरवे दालन. अचानक हत्ती थांबला. सगळे स्तब्ध झाले. 'वाघ' एव्हढा एकच फुत्कार तिच्या कानी आला आणि ती चारहीकडे "कुठे आहे?" म्हणून चरचर पाहू लागली. आजूबाजूला तर कुठेच दिसेना वाघ. मग वाघ आहे कुठे? अबाss त्यांच्या हत्तीच्या अगदी पायाशी. अहाहाss वाघीण आणि चार बछडे. आत लालभडक मासमच्छी पडलेले. काय दैदिप्यमान रूप होते. जंगलाची राणी, जंगलाची शान! रेश्मा !! अर्धगोलाकार एकात एक घट्ट गुरफटलेल्या वेलींमध्ये तिचे निवासस्थान होते. आत अजून किती लांबवर होते तीच जाणे. तिथे जायची कुणाची टाप थोडी होती? ती आणि तिच्या बच्च्यांचाच तिथे मुक्त वावर होता. हत्ती आणि मनुष्यप्राण्यांना इतके जवळ पाहून वाघिणीचे छोटे पिल्लं बिचकल्यासारखे झाले. अंग आक्रसून आतबाहेर करू लागले. वाघिणीची एक तीक्ष्ण नजर पिल्लांकडे तर दुसरी जरबी नजर पर्यटकांकडे होती. ती बसल्याच जागी अचूक सावध झाली होती. 

          रेश्माच्या रेशमी अंगावरचा जर्द पिवळा रंग तिच्या डोळ्यात परावर्तित होत होता. काळे पिवळे पट्टे अतिशय मखमली असावे. ती पाहता पाहता भारावून गेली. पायाशी वाघ म्हंटल्यावर घाबरूनही गेली फार. हत्ती पुढे सरकावा आणि आपण आता इथून लवकर हलावे असे तिला वाटू लागले. पण रेश्माला घेरून असलेले चारही हत्ती जागा सोडत नव्हते. सारे लोक डोळे फाडून ते दृश्य आपल्या नजरेत कैद करीत होते. त्यांच्या हत्तीवर बसलेली मित्राची छोटी मुलगी वाघिणीला वाकुल्या दाखवू लागली तशी ती अधिकच बावचळली. जीवाशी खेळ करणारे कुठलेही प्रकार नक्कोच; तिने छोट्या मुलीला तसे न करण्याविषयीही बजावले. पर्यटक हटत नाही म्हंटल्यावर रेश्माही अस्वस्थ झाली. उठून उभी राहिली. आलटून पालटून सर्वांवर नजर टाकू लागली. वाघीण हत्तीवर हल्ला करत नाही हे माहिती असल्याने सगळेजण निर्धास्त होते. छोट्या मुलीचे माकडचाळे सुरुच असल्याने रेश्माची कठोर नजर आता त्यांच्या हत्तीवर स्थिरावली होती. रेश्माने भयंकर डरकाळी फोडली. पर्यटकांचे इतका वेळ तिच्या निवासाजवळ थांबणे तिला मंजूरच नव्हते. त्यात ती नवी नवी बाळंतीण. आपल्या पिल्लांसाठी अतिशय सतर्क असणारी. 

            प्राण्यांना आपला एकांत अतिशय प्रिय असतो हे तिला जंगल फिरून फिरून माहिती होते. वनक्षेत्रात मुक्त संचार करणे प्राण्यांना आवडतं. सायंकाळी सहापर्यंत तरी आपण जंगलात फिरू शकतो पण एकदा का अंधाराचे साम्राज्य पसरले, किर्र रातकिडे किरकिरू लागले की जंगलातली झाडेझुडपे सुद्धा मनुष्याचा सहवास सहन करत नाही. पहाटे, सकाळी, दुपारी अतिशय विलोभनीय दिसणारे जंगल रात्री अत्यंत क्रूर होऊन जाते. कधी कुठल्या वन्यप्राण्याच्या भक्ष्यस्थानी पडू याची सूर्यास्तानंतर खात्री नसते. तिने असेच एकदा रात्री खूप उशिरा जंगलातून परतताना जिप्सीतून मागे वळून पाहिले. विश्वजित त्यावेळी ड्रायव्हरजवळ समोरच्या सीटवर बसला होता. ती मागच्या सीटवर एकटीच होती. जशी तिने मान मागे वळवली तसा जंगलातला काळाकभिन्न अंधार तिच्या आजूबाजू शिरला आणि ती सटपटून घाबरली. ज्या जंगलाची थोड्यावेळापूर्वी तिने हसतखेळत सफारी केली होती त्या जंगलाला आता ती भ्याली होती. खरेतर जंगलाला कुणीच मनुष्यप्राणी नको होते. आता पूर्णतः त्यांची बोली, त्यांचे राज्य चालणार होते. जिप्सी चालत होती ती वाट सुद्धा काळी कुळकुळीत होऊन त्यांना हुसकावत होती. 

  "चला, चला, निघू, निघू" ती गाईडला घाई करू लागली. तिला आता तिथे थांबणे धोकादायक वाटू लागले. एकतर छोट्या मुलीचे वाकुल्या दाखविणे थांबत नव्हते. वाघिणीची नजर क्षणाक्षणाला बदलत होती. हत्ती परतायला हलला तसा त्यांच्या शरीराला पुन्हा झटका बसला. रवीने ताक घुसळावे तसे ते घुसळल्या गेले. तेव्हढ्या क्षणभरातच त्या छोट्या मुलीने 'बाय' म्हणत जवळजवळ आपले अर्धे शरीर सुरक्षित चौकटीबाहेर काढले आणि तिचा लोंबलेला हात वाघिणीने गप्पकन झेप घेऊन जबड्यात पकडून तिला खाली ओढले. त्या भाराने हत्ती तिकडे झुकल्या गेला. आपली मुलगी वाघीण ओढून नेताना पाहून तिच्या आईने आरडाओरडा करीत सरळ खाली उडी मारली. त्याबरोबर तिच्या कंबरेला बांधलेली रियाही खाली पडली. क्षणाचाही विलंब न लावता निपचित पडलेल्या छोट्या मुलीला सोडून वाघिणीने रियाला खेचत आत नेले. चारहीकडे हाहाकार माजला. विश्वजितने दोन्ही मुलींना वाचवायला झेप घेऊन वाघिणीमागे धाव घेतली.

"साब साब साब मत जाओ, रुको" गाईड ओरडत होता. ती घेरी येऊन येऊन मूर्च्छित होऊ पहात होती. छोट्या मुलीच्या आईने मुलीला उचलले. मुलीची नाडी फाटून रक्तबंबाळ झाली होती. रियाला वाचवायला वाघिणीच्या गुहेत घुसलेल्या विश्वजितचा रियासहित मागमूस नव्हता. ती निर्जीव पुतळयासारखी डोळ्यांची पापणीही न हलवता अचल बसली होती. डोळे गुहेकडे लागले होते.

         वन अधिकारी, रेंजर, कर्मचारी, वैद्यकीय पथक धावून आले. बाकी हत्तींना रवाना करून जागा मोकळी करण्यात आली. विश्वजितच्या सगळ्याच मित्रांची विश्वजित सहीसलामत परत येतपर्यंत थांबायची इच्छा होती पण अधिकारी नाही म्हणालेत. तिला धीर देत केवळ एक मित्र तिथे उभा राहिला. कर्मचाऱ्यांनी झटपट हालचाली केल्यात. सरतेशेवटी रेश्मा वाघीण गुहेबाहेर आली आणि निचेष्ट विश्वजितला तिने आपल्या पिल्लांच्या हवाली केले. विश्वजितच्या छातीवर रिया चिपकलेली होती. दोघांचेही शरीर लालभडक दिसत होते. ती चक्कर येऊनच पडली.

        जाग आली तेव्हा ती इस्पितळात होती. छोट्या मुलीचे वडील अपराधी चेहऱ्याने तिच्याजवळ बसले होते. तिने डोळे उघडताच त्यांचा 'मौशमी...' असा गदगदलेला स्वर आला. तो स्वर आणि तिच्या हातावर थरथरणारा त्यांचा हात पाहून तिला विश्वजित आणि रिया या जगात नसल्याची क्रूर जाणीव झाली. टाहो गळ्यातच अडकला आणि थोड्यावेळाने अतीव दुःखाने ती फिस्सकन हसली. हसतच राहिली. लगेच डॉक्टर आलेत, तिच्या दंडात जड इंजेक्शन दिल्या गेले. पळभरातच तिला तेच ते दृश्य आठवत झोप लागली. तिचे हसणे, गळ्यात अडकलेला आक्रोश तेव्हढ्यापुरता शांत झाला.

          विश्वजित, रियाचा अंत्यसंस्कार करून पंधरावीस दिवस लोटले होते. तिचे वडील, सासरे, दीर, भाऊ तिच्या सोबत त्या इस्पितळात थांबले होते. कुणी कुणाशी बोलत नव्हते. प्रचंड मानसिक धक्क्याने मूक झाले होते. सकाळ झाली की दिनचर्या आटोपायची आणि रात्री "उद्या तिला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला की निघायचे" या भावनेने सारे झोपायचे. इस्पितळात वीस पंचवीस दिवसानंतर तिच्या आतले काहूर दबून तिला सगळा घटनाक्रम स्वच्छ आठवू लागला. राहून राहून रेश्माची तीव्र, निर्दयी नजर डोळ्यासमोर येत राहिली. किती मायेने तिने रेश्माच्या गोजिरवाण्या बछडयांकडे पाहिले होते. रेश्माने मात्र तिचा घात करताना जराही वेळ घालवला नव्हता. ती खूप खूप असहय्य रडली. इस्पितळाचे छप्पर फुटेल इतक्या जोरात आक्रंदली. तिचा विलाप शमविण्याचे सामर्थ्य कोणातच नव्हते. ती रडली की तिचे वडीलही ढसाढसा रडायचे. सासरे गलितगात्र होऊन टिपे गाळायचे. शेवटी छातीवर येणाऱ्या अति ताणापायी तिच्या वडीलांनाही तिथेच भरती करावे लागले. तेव्हा स्वतःला सावरत तिने प्रयत्नपूर्वक भानावर आणले. तदनंतर ती चिडून उठली. पेटून उठली. तिच्यासमोर जर रेश्मा वाघीण आली असती तर तिने बेडकीसारखे अंग फुगवत रेश्मावर नक्कीच जीवघेणा हल्ला चढवला असता. कापून काढला असता एक एक अवयव अत्यंत निर्ममपणे. किती जिवापार चिपकवले होते विश्वजितने रियाला छातीशी पण दोघेही मृत होते. विश्वजितच्या तर मानेतच मोठाले सुळे रुतविले होते.... आणि रिया....? तिला कल्पनाच करवेना. तिने झपदिशी पापण्या मिटल्या. बंद डोळ्यासमोर पुन्हा विजयी चेहऱ्याची कुत्सित रेश्मा नाचायला लागली.

        मनाशी खूप काही पक्के करून तिने त्यांच्या जिप्सीच्या गाईडला, सितारामला एकांतात बोलावले. सफारी दरम्यान जंगलाच्या कानाकोपऱ्याचे त्याला असणारे ज्ञान तिने अनुभवले होते. खाचखळगे, प्रत्येक गुहा, चप्पा चप्पा तो जाणत होता. तिला हवी ती मदत तो करू शकत होता परंतु ती करू पाहत होती ती कृती किती अशक्य आहे हेच तो परोपरीने सांगत होता. तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा तो साक्षी असल्याने तिच्याबद्दल भरपूर सहानुभूती आणि करुणाही त्याला वाटत होती. आजवर अनेक पर्यटकांनी अशा चित्रविचित्र मागण्या त्याच्याकडे केल्या होत्या नाही असे नाही पण तिची मागणी म्हणजे ??? तिच्या नाजूक कुडीकडे पाहून त्यालाच कणव दाटून आली. सर्वस्व हरवलेली ही स्त्री त्याच्याकडे अजीबच आग्रह करत होती. तो म्हणजे रेश्मा वाघिणीच्या अधिवासात भर रात्री जायचा. तिथे थांबून, दबा धरून तिला रेश्माच्या नरडीचा घोट घ्यायचा होता. शक्य तरी होते का हे? एखादया उंच्यापुऱ्या धडधाकट माणसाने जरी असा हेतू प्रकट केला असता तरी तो खदखदून हसला असता. पण तिच्या केविलवाण्या स्थितीवर त्याला हसताही येईना. तो स्तब्ध गंभीर बसून राहिला. 

"प्लिज .. " अधिक बोलण्याचे बळच नव्हते तिच्यात. तिने कानातला एक हिरा त्याच्यापुढे ठेवला. घरातले अठराविश्व दारिद्र्य, लखवा मारलेले लुळेपांगळे वडील, छातीची खपाटी झालेली काटक्या वेचणारी आई, विधवा बहीण असे तीन जीव त्याच्यासमोर आले. या हिऱ्याच्या पैशात तो त्यांना सहज सावरू शकत होता. आपली नड साधायला तिचा जीव धोक्यात टाकावा का? ती डोक्यावर कफन बांधूनच निश्चयाने मैदानात उतरली आहे हे त्याला ठाऊक होते पण तरीही हिऱ्याच्या मोबदल्यात तिच्या जीवाची बाजी लावणे त्याच्या सरळ मनाला पटेना. आपण मदत नाही केली तर ही अन्य कोणाची तरी मदत घेईलच आणि तो हिरा दुसऱ्याच्या नशिबी जाईल ही खात्री पटल्यावर त्याने तो हिरा हातात घेतला आणि मूठ बांधली. 

          रात्री अकरा साडेअकराला सारी सामसूम झाल्यावर त्याने शिताफीने तिच्या जागी त्याच्या बहिणीला निजवले आणि तिला रहस्यमयी गुप्त मार्गाने घेऊन तो जंगल तुडवू लागला. वाघीण, अस्वल यांचा अधिवास शोधायला ठिकठिकाणी कॅमेरे लागले होते. त्या कॅमेरात त्यांचे फोटो बंदिस्त झाले असते तर उद्या दोघांचीही धडगत नव्हती. ते सगळे चुकवून तो मोठ्या हुशारीने पायाखालचा रस्ता कापत होता. मध्यरात्री, सुनसान अंधारात नानाविविध पशुपक्ष्यांचे आवाज येतांना आपल्या सारख्या परपुरुषाबरोबर तिला भीती वाटत नाही का म्हणून त्याने एकदोनदा तिच्याकडे पाहिलेही पण आपण अबला स्त्री आहोत हे विसरून ती त्याच्या बरोबरीने तर कधी पुढे जाऊन सपासप रान तुडवत होती. सौभाग्य गमावून बसलेल्या स्त्रीला आणखीन काय गमवायची भीती राहणार? 

          रेश्मा आपल्या बच्च्यांना शिकार शिकवते ते रात्रीचे ठिकाण त्याला माहिती होते. रानडुकरांच्या एका दुष्ट कळपाला गुंगारा देत ते पोहचलेही त्या ठिकाणी. अंधाराला तिचे डोळे सरावल्यामुळे बछड्यांशी खेळणारी रेश्मा तिलाही लवकर दिसली आणि तिचा आत्मक्लेश उफाळून आला. सर्वशक्तीनिशी ती रेश्मावर धावून जाणार तोच सीतारामने तिला चपळाईने पकडले. पँटच्या खिशातून एक जुनाट पिस्तूल काढून तिच्या हातात दिले. त्याबरोबर तिचे डोळे अंधारातल्या श्वापदाप्रमाणे लकाकले. त्याने तिला गप्प रहायची खूण केली. कधी डाव साधायचा हे तो सांगणारच होता. रात्रीचे दीड दोन वाजले तरी रेश्मा बछड्यांपासून दूर होत नव्हती. तिच्यावर नेम धरावा का? तिला आता घाई होत होती. ती घाईकुतीला आली होती. दोन जीवांचा बदला तिला त्वरित घ्यायचा होता.

        जवळपास मनुष्यप्राणी असल्याचा वास रेश्माला किंवा अन्य वनचरांना येऊ नये म्हणून त्यांनी विशिष्ट रसायन अंगाला फासले होते. तरीदेखील रेश्माचा सर्वात लहान बछडा ते लपले होते त्या झाडाजवळ येऊन हुंगू लागला तेव्हा ते दोघे सावध झालेत. तिला तिची लडिवाळ हलणारी डुलणारी रिया आठवली आणि दोन तप्त अश्रूबिंदू तिच्या गालावर ओघळले. काडीचाही विचार न करता ती अंधारात समोर गेली आणि त्या पिल्लाची मान दबोचत तिने त्याला आपल्या ताब्यात घेतले. वाघीण सतर्क झाली. डरकाळ्या मागून डरकाळ्या फोडू लागली. सीतारामने हातात असणाऱ्या मोठ्या टॉर्चला ऑन करीत रेश्माच्या तोंडावर जळजळीत प्रकाश फेकला. वाघीण गांगारून जागीच थबकली मात्र पिल्लासाठी तिचा जीव सेकंदासेकंदाला कासावीस होत होता. ती हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, सीतारामने गुंगीचा एक तिर बरोबर रेश्माच्या पाठीत मारला. वाघीण सुस्तावली पण मेंदू पक्का जागा असावा, त्याही अवस्थेत पिल्लाकडे टक लावून पाऊल पुढे टाकायच्या प्रयत्नात होती. 

        बछडा तिला आवरत नाही पाहिल्यावर सीतारामने भारीभक्कम दगड बछड्याच्या तोंडात कोंबून गुंगीचे एक इंजेक्शन झटक्याने कातडीत घुसवले. आता जंगलाची राणी, जंगलाची शान  "द रेश्मा" चा निष्पाप बछडा तिच्या हातात बेशुद्ध होऊन लोंबकळत होता तर अर्धी शुद्ध हरपलेली रेश्मा त्याच्याकडे मवाळ पाझराने बघत होती. तिला विश्वजित, त्याच्या छातीवर निपचित पडलेली रिया आठवली आणि तिने रेश्मावर पिस्तूल ताणले.

        तिचा नेम चुकला तरी कोणत्याही क्षणी गोळी रेश्माच्या छातीत, पाठीत, काळजात, हृदयात कुठेतरी नक्कीच घुसणार होती आणि ती महाकाय नरभक्षक वाघीण लोळागोळा होऊन जमिनीवर उताणी लोळणार होती. आता शक्ती, युक्ती सगळेच तिच्याजवळ होते तर वाघीणजवळ साधे सरळ उभे रहाण्याचेही त्राण नव्हते. असेच केले होते ना रेश्माने त्यावेळी निहत्त्या विश्वजितवर हल्ला चढवताना. कसलीही दयामाया दाखविली नव्हती. ते दोन सजीव, उत्साहाने जीवन जगू पाहणारे जीव तिच्या लेखी निव्वळ एक भक्ष्य होते. केवळ भूक ही एकच भावना होती का रेश्माला त्यावेळी? इतर जाणिवा कळत नव्हत्या? मग आता का डोळ्यात असे दयार्द्र भाव? आता कुठे गेली ती मग्रुरी? ते माजोर उरफाटे काळीज? अन् आपण का विचार करावा एव्हढा त्या बेमुर्वतखोर वाघिणीचा? तिचे देखणे रूप, तिचा राजेशाही थाटच तर पहायला आलो होतो आपण आणि तिने कृतघ्नपणे आपल्या आयुष्याचाच घात केला? मनुष्य आणि प्राणी हा संघर्ष अटळ आहे, आदिम आहे. त्यात ममत्व नाहीच ! विश्वास नाहीच! असलाच तर तो आपल्या भाबड्या मनाचा मूर्खपणा समजावा अजून काय? 

          उशीर कसला? धरलाच नेम तिने बरोबर. एक गोळी बछड्याच्या मेंदूत घुसवायची होती तर उर्वरित रेश्माच्या. तिचा प्रतिशोध, तिचा बदला पुरा होणार होता. तसे करूनच तिला आता आपल्या रिकाम्या भणंग बंगालच्या घरात परतायचे होते. मनाला अत्यंत क्रूर करायचा प्रयत्न करीत तिने बेशुद्ध बछड्याला रेश्माच्या दिशेने फेकले. पण स्वतःच्या त्या तेव्हढ्याच कृतीने तीच कळवळली. लहान बाळांना कुणी असे फेकतं का? आडव्यातिडव्या आदळलेल्या बछड्यावर अर्धजागृत रेश्माने काळजीपूर्वक पंजा ठेवला आणि तिला तिला बिलगणारी रिया आठवली. हे मातृप्रेम, हे आईचे कनवाळू हृदय किती तिच्या परिचयाचे होते. रिया झाल्यापासून तिला प्रत्येक लहान मुलात आपलेच बाळ दिसायचे. तशीच माया दाटून यायची. अगदी कुत्र्याचे चावरे, नख मारणारे पिल्लू असू दे किंवा गाईचे द्वाड वासरू असू दे तिला त्यांच्याविषयी प्रेमच वाटायचे. 

          बछड्याला फेकणाऱ्या आपल्या हाताकडे ती पहातच राहिली घडीभर आणि मेघ गडगडावे तसा आवाज काढत धाय मोकलून रडायला लागली. जमिनीत गाडावे तसे पाय दुमडत मट्टकन खाली बसली. आसवांच्या सरसर धारा मातीत झिरपू लागल्या. सीताराम एकदम गडबडून गेला पण तिच्या मनस्थितीत झालेला बदल अल्पावधीतच त्याच्या लक्षात आला. त्याने रडू दिले तिला खूप. तोवर मायेने हात फिरवत राहिला तिच्या केसांवर. रडून रडून ती खोकलायला लागली तसे त्याने हलकेच तिला उठवले. तिच्या अशक्त देहाला पाठंगुळी घेतले आणि चालू लागला परतीच्या मार्गावर झपझप. तारे विलक्षण वेगात चमकत होते. तुटत होते. निशाचरे निर्धास्त फिरत होते. 

         त्याने हळूच बहिणीला उठवले आणि तिला निजवले. ती अद्यापही ग्लानीतच होती. 

          इस्पितळ सोडून ती जाणार त्या दिवशी तो पुन्हा तिच्याजवळ आला. ती कारमध्ये बसतच होती. भेट झाली नाहीतर थोडक्याने चुकामुक झाली असती. त्याने खिशात काळजीपूर्वक ठेवलेला तो हिरा तिच्यापुढे धरला. त्याच्या चमकणाऱ्या तळहाताकडे काहीच आठवत नसल्यासारखे तिने क्षण दोन क्षण संभ्रमित पाहिले. मग स्मृती आल्यासारखी ती म्हणाली, "रख लो भय्या मेरी बिनती है, अब इसका मुझे कोई काम नहीं।" तो मानेने नाही नाहीच म्हणत होता. तिने हळुवारपणे त्याची मूठ बंद केली. निरोपाचा हात हलवला. त्याने एक इंग्रजी वर्तमानपत्र तिच्या हातात दिले. 

"पढना जरूर मॅडमजी" तो पुटपुटला.

"ठीक है, हम निकलते है।" तीही पुटपुटली.

"फिर आईये पक्का" सवयीने त्याच्या गळ्यात परवलीचे निमंत्रण आले होते. निरोप घेऊन जाणाऱ्या पर्यटकांना तो वारंवार हेच सांगायचा. पुन्हा या नक्की. आमच्या निर्मळ सुजलाम सुफलाम भूमीत तुमचे मनापासून स्वागत आहे. तिला कोणत्या शब्दात सांगणार पण तो हे? त्याच्या याच भूमीने तिच्या जगण्याचा आधारच नष्ट केला होता. कायमचा हिरावून घेतला होता तिचा आनंद. अनेक प्रश्न डोळ्यात घेऊन तो तिच्या धुरळा उडवत जाणाऱ्या गाडीला पहात राहिला.

       

       विमानात बसल्यावर सीतारामने दिलेल्या वर्तमानपत्राची तिला आठवण आली. काय बातमी असावी त्यात म्हणून तिने इच्छा नसतांनाही वर्तमानपत्राची पुंगळी उघडली. वरच्या काही राजकीय बातम्या सोडल्यावर पहिल्याच पानावर खाली ठळक मथळा होता,

" Shoot at sight order for man-eater tigress Reshma, " तिने परत डोळे मिटून घेतले. उघडले तेव्हा पाणी डबडबून आले होते. बातमीत विश्वजित रियाच्या दुर्दैवी हकनाक मृत्यूचा उल्लेख होता. रेश्माला मारायला कर्नाटक येथील शार्प शूटर इकबाल राजाला पाचारण करण्यात आले होते. दोन दिवसातच राजाचा लवाजमा अरण्यात तळ ठोकणार होता. रेश्माचा मृत्यू चारएक दिवसात अगदी निश्चित होता. बछडे अनाथ होणार होते. वन्यजीवप्रेमींनी या शासन हुकुमाला कडवा विरोध केला होता....बरेच काही होते बातमीत.  तिच्याने वाचणे झाले नाही.

    

      विश्वजित असता तर त्यानेही वाघ मारण्याऱ्यांविरुद्ध निदर्शनेच केले असते. कोर्टाने ऑर्डर मागे घ्यावी म्हणून घणाघाती आंदोलन केले असते. पण आता विश्वजित नाही, त्याची जिवंत कृती नाही. आहे फक्त मन तळमळवणाऱ्या अनंत अनाम आठवणी. 

        तिला आठवले मागे असेच एकदा बंगालच्या आतल्या भागात एका पांढऱ्या वाघिणीने नावेत बसलेल्या छोट्या बालिकेला पाण्यात खेचून ठार मारले आणि फरफरटवत जंगलात नेले. त्यावेळी नदीजवळचा जनसमुदाय चवताळून निघाला होता. रात्रंदिवस हल्लेखोर वाघिणीला मारावे हा एकच घोषा नागरिकांनी लावला होता. त्यावेळी तिथल्या रहिवास्यांना अन्नसाखळीतील वाघाचे महत्व पटवून द्यायला सामाजिक कार्यकर्त्यांसोबत विश्वजितही तिथे गेला होता. तेव्हा त्या मुलीच्या आईने, आजोबांनी ओल्या डोळ्यांनी त्वेषाने त्याच्या अंगावर धावून जात, "तुझे कुणी गेले नाही ना, म्हणून बोलायला सोपे जाते वाघ वाचवा, जंगल वाचवा" असे म्हणत हाकलून लावले होते. त्यावेळी निरुत्तर झालेल्या विश्वजितला तिने दुरून न्याहाळले होते. तसेच आता पुन्हा तिने त्या मथळ्याकडे पाहिले 

"Shoot at sight order....." 

      वर्तमानपत्र बाजूला सारत तिने खिडकीतून दिसणाऱ्या शुभ्र ढगांवर नजर रोवली. डोळे अखंड वहात होते.

-जयश्री दाणी

वरील कथा जयश्री दाणी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post