भूक

 कथा- भूक

✍️ अमृता देशपांडे


शकू आज मोठ्या आनंदात घरी चालली होती, त्या सुभेदारबाईनं तिच्या सुमनसाठी छान-छान कपडे दिले होते. सुभेदार बाई नेहमीच असं काही-बाही देत. हो, त्यांना नको असलेलं, जुनं पुराणंच देत असत, पण शकूची नड भागून जात असे ना. त्यामुळे शकूही तिथे मनापासून काम करी, चार जास्तीचीही कामं अंगावर घेई. आज तर आरोहीचा, सुभेदार बाईच्या एकुलत्या एका मुलीचा वाढदिवस, बाईनं सुमनलाही वाढदिवसाला घेऊन यायला म्हटलेलं. 'लयी चांगल्या हायेत सुबेदारबाई, आज सुमीला चांगलंचुंगलं खायला भेटंल... केकबी तं लयी आवडते सुमीले...' शकू पुटपुटतच घरात शिरली.


'ए सुमे, सुमे, जाला का गं अभ्यास?  चल, आता इकडं-तिकडं जाऊ नगंस, आपल्याले सुबेदारबाईकडं जायाचं हाये, आज आरोहीताईचा बरडे हाय...' शकू 


'बरडे?  मंग माय तिथं पोटभर खायला भेटंल?  आन केकबी भेटंल??'   सुमनचा भाबडा प्रश्न.

'हो गं माजी माय, समदं भेटंल, आदी तू तयार हुतीस का?'  शकू.  शकूनं सुमनला साबणानं छान आंघोळ घातली, शॅम्पूनं केस धुतले. दोन्ही सुभेदारबाईनंच तर दिले होते.  ठेवणीतला जुना आरोहीचाच फ्रॉक घातला, वेणीफणी करून दिली. टपोर्या डोळ्यांची सुमन अजूनच सुंदर दिसू लागली. त्यात केक खायला मिळणार या विचारानं तिचा चेहरा उजळला होता. दोघी मायलेकी सुभेदारबाईच्या बंगल्यावर गेल्या.  


आज बंगला छान सजवला होता. बाहेर बैठकीच्या खोलीत ठिकठिकाणी फुगे, कार्टूनचे स्टिकर लावले होते. सुमनला तर खूप मजा वाटली. दहा-बारा वर्षांचं पोरसवदा वय ते, या सगळ्या गोष्टी आवडणारच. तिनं एक फुगा घेण्याचा प्रयत्न केला तर सुभेदारबाई केवढ्यानं ओरडल्या. बिचारी हिरमुसली होऊन स्वयंपाकघरात आईजवळ जाऊन बसली.  शकू प्लेट्स, चमचे, प्याले स्वच्छ करत बसली होती.  त्याखोलीत छान पावभाजी, पुलावचा घमघमाट सुटला होता.  सुमनला तर वासानेच छान भूक लागली.  सुभेदारबाई आंत आल्या, 'हिलाही घे मदतीला, नुसती इथे बसून काय करेल? पाण्याचे ग्लास भरून आणू दे हिला बाहेर.  काय गं, आणशील ना बरोबर?' सुभेदार बाई सुमनकडे बघत म्हणाल्या. तिनं नुसतीच मान डोलावली. शकूला ते काही फारसं आवडलं नाही, तिला हे कळून चुकलं, बाईनं आपल्या सुमीला वाढदिवसाला नाही,  कामाला बोलावलं होतं.  शकू स्वत:  दुसर्यांच्या घरातली धुणीभांडी करत असली तरी,  सुमीनं पुढे तेच काम करावं अशी तिची इच्छा नव्हती.  सुमीनं खूप शिकून 'मोठं सायब'  व्हावं अशी इच्छा होती तिची.  पण नोकर माणसाला कुठे बोलता येतं?  त्यात सुभेदारबाईचे फार उपकार होते तिच्यावर,  ते आठवून ती गप्प बसली.


आरोहीच्या मैत्रिणींचे सुंदर-सुंदर कपडे, पर्सेस, मेकअप न्याहाळत सुमन पाण्याचे, सरबताचे ग्लासेस फिरवत होती. 'ए ती बघ कंट्री गर्ल, माझ्या सायलीच्या ड्रेसकडे कशी निरखून बघतेय गावंढळ! घ्यायची ऐपत नसेल तर नसती स्वप्न कशाला बघायची?' एक बाई उपहासानं म्हणाली.  सात-आठ सरबताचे ग्लासेस घेऊन येताना सुमन अडखळली, त्यातील एका ग्लासातील सरबत एका मुलीच्या ड्रेसवर सांडले. 


'नीट बघून चालता येत नाही का आंधळे! माझ्या बाबांनी सिंगापूरहून हा एक्स्पेंसिव ड्रेस आणला होता, तू तो खराब केला, थांब मम्मालाच सांगते, मॉम, मॉम...' 

'अरे देवा, एक साधं काम नीट नाही करता येत तुला?  लाज आणलीस नुसती! आता या शर्वरीच्या ड्रेसची नुकसानभरपाई कोण करणार?  तुझ्या आईची लायकी आहे का आठ हजाराचा ड्रेस घ्यायची?  मी तुला आरोहीचे सगळे जुने कपडे वापरायला देते आणि तू असा कामचुकारपणा करतेस?'  सुभेदारबाई सुमनवर खेकसल्या. 

'राहू द्या हो मिसेस सुभेदार, काम टाळायची नाटकं असतात यांची.  या असल्या लोकांचा काही भरोसा नसतो.  बाहेर काही किमती वस्तू ठेवत जाऊ नका हो,  चोरीला जातील' शर्वरीची आई. 

'आणि जुने कपडे हिला कशाला देताय?  या लोकांना कितीही दिलं तरी यांचं पोट भरत नाही,  ती श्रीनगरला एन. जी. ओ. आहे ना, माझी मावसबहीण चालवते ती, तिथेच देत जा.  आम्ही तर तिथेच देतो,  कुणाला उपयोगी तरी पडतात...' मिसेस प्रधान म्हणाल्या.

थोड्यावेळानं ऊत्सवमुर्ती आरोही बाहेर आली.  आठ-दहा हजाराचा इव्हिनिंग गाऊन, हिर्यांचा नेकलेस, वर मोकळे सोडलेले कुरळे केस, आरोही तर एखादी परीच वाटत होती,  सुमन तर तिला पाहून हरखून गेली. आरोहीनं केक कापला,  सगळ्यांनी  'हॅपी बर्थडे' म्हणत टाळ्या वाजवल्या.  सुमनही टाळ्या वाजवू लागली.  नंतर सगळेजण गाण्याच्या तालावर नाचू लागले, सुमनलाही नाचावंसं वाटू लागलं,  पण शकूनं तिला खूणेनंच नको म्हटलं,  ती आपली कोपर्यात उभी राहिली.  आता तो पावभाजीचा वास तिच्या नाकातून पोटात शिरला, कधी एकदा तो केक नि पावभाजी खायला मिळते असं झालं होतं तिला. तरीसुद्धा पोटातली भूक पोटात दाबून ती आलेल्या पाहुण्यांना प्लेट्स नेऊन देत होती. सगळ्यांच झाल्यावर आपल्यालाही मिळेल, या आशेवर ती बसली होती.


एक डिश भरून तिनं आरोहीपुढं ठेवली, आणि तिला काही कळायच्या आंत आरोहीनं ती प्लेट सुमनच्या तोंडावर फेकली. सुमन घाबरली, धावत जाऊन आईला बिलगली. 

'मम्मा, मम्मा, हे काय? मी पिझ्झा सांगितला होता ना?  मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सनापण पिझ्झा प्रॉमिस केलेलं ना...' आरोही आवाज चढवून म्हणाली. आणि तिनं टेबलावर ठेवलेले सगळे पाव इकडे-तिकडे भिरकावले. 

'अगं राणी, पिझ्झा आपण उद्याही मागवू शकतो, आज पावभाजी केलीये ना...' सुभेदारबाई 

 'श्शी बोअर! पावभाजी!! मला आणि माझ्या फ्रेंड्सना आत्ता पिझ्झा हवा. आज माझा बर्थडे आहे किनाई? मग आज मी म्हणेन तेच करायचं...' आरोही पाय आपटत म्हणाली. 

'ओके शोना, आता एव्हढुश्यासाठी तू आपला मूड नको बिघडवू.  मागवूयात हा आपण पिझ्झा...' सुभेदारबाई पोरीला लाडावत म्हणाल्या.  त्यांनी खुणेनंच सुमनला खाली पडलेले पाव उचलायला सांगितले.

पार्टी संपत आल्यावर सुभेदारबाईनं ते खाली पडलेले पाव आणि थोडी भाजी कॅरिबॅगमध्ये बांधून शकूला दिले, म्हणाल्या, 'हे घरी नेऊन खा. आणि आता पार्टी संपलीये, तुम्ही जाऊ शकता...' त्यांचं ते वागणं बघून शकू काही न बोलता सुमनचा हात ओढून फरफटत घेऊन गेली.

शकूला राग सुभेदारबाईचा येत नव्हता, चीड येत होती आपल्या लाचारीच्या जगण्याची.  पण लहानग्या सुमनला मात्र काहीच समजत नव्हते, तिला फक्त पावभाजी खायची घाई झाली होती.  वाटेत रस्त्याच्या कडेला उकिरड्यावर चार कुत्री एका पावाच्या तुकड्यासाटी भांडत होती. शकूनं ते कॅरीबॅगमधले पाव आणि भाजी त्यांच्या दिशेनं भिरकावले. ती चारही कुत्री त्यावर तुटून पडली, त्यांच्यासाठी मेजवानीच होती ना ती! ते बघून सुमन रडू लागली.  घरी जाईपर्यंत तिचा एकच हट्ट सुरू होता, 

'आई वं, पावभाजी... आई वं केक... आई वं पावभाजी... आई वं केक...'


सौ. अमृता श्रीरंग देशपांडे


वरील कथा अमृता देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.



Post a Comment (0)
Previous Post Next Post