रिक्षावाला दिनू

 

रिक्षावाला दिनू        

✍️ दीपाली थेटे- राव

सोसायटीकडे  जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्याला दिनूची रिक्षा थांबलेली असते. दिनू रिक्षावाला..... 


 कुठल्याशा फॅक्टरीत कामाला होता.  फॅक्टरी बंद पडली. बाकीच्या मित्रांनी इथे-तिथे, छोटी-मोठी नोकरी बघितली. दिनूच्या डोक्यात एकच खुळ


 आता नोकरी नाही, काहीतरी उद्योग करायचा.  पण पैशांची बाजू लंगडी पडत होती. मदतीचा हात देतील म्हणणाऱ्या नातेवाईकांनी  हात आखडता घेत पाठ फिरवली होती. 


बर ! आधीच चणचण त्यात अजून भर नको. बायको मुलाची जबाबदारीही डोक्यावर होती. 


विचार करून डोकं थकलं पण काय करायचं ते पक्कं होत नव्हतं. 


      हो-नाही म्हणता म्हणता दुजोरा दिला बायकोनं काहीतरी धंदा करायला. बिच्चारी वटपौर्णिमा करते मनापासून. सत्यवानाच्या मागे सावित्री.


तिला सतत काळजी...


नोकरी गेलेला, पैशानं शिणलेला , घरात बसून हवालदिल झालेला नवरा बघून काळजात धस्सं व्हायचं.


 भिती वाटायची.. कुठे जीव- बिव तर देणार नाही. 


रात्र रात्र झोपेविना जायची.. दिनूची धंदा काय करायचा या चिंतेने आणि बायकोची दिनूच्या चिंतेनं.

रिक्षा चालवायची .... 


 ठरलं...


लग्नात जेवढे किडूक-मिडूक दागिने तिच्या अंगावर पडले होते, ते दिनूनं सोनाराच्या अंगावर घातले आणि रिक्षासाठी थोडी पैशांची व्यवस्था केली. इकडून तिकडून मदत घेऊन सेकंड हॅन्ड रिक्षा खरेदी झाली सुद्धा. मित्र उपयोगी पडले. 


मग बायकोच्या हातून रिक्षाची पूजा... साग्रसंगीत ... सगळ्यांना साखर वाटली. 


नवऱ्याचं समाधान पाहून ती ही  कृतकृत्य.


आज दारात गाडी उभी होती... 


आजूबाजूच्या बघणाऱ्यापैकी काहींनी कौतुक केलं तर काहींनी कुचेष्टा. 


"लाखभर तरी रिक्षा असतील शहरात. त्यात याच्या एकीची भर. काही वेगळ तरी ठरवायचं. बसा आता माशा मारत नाही चालला धंदा तर."


त्यानं गाडी काढली. तिला, लेकराला  देवळात घेऊन गेला. ज्यानं मार्ग दाखवला त्याचे आभार मानायलाच हवेत. 


देवळाच्या गाभाऱ्यात त्याच्यासाठी देवाला हात जोडणाऱ्या बायकोच्या चेहऱ्यावरील समाधान, कौतुक बघून हरखून गेला तो. 


मनोमन तिला शब्द दिला, " देवा तुझ्या साक्षीने सांगतो.. खूप कष्ट करीन. लबाडीने वागणार नाही. हिचे दागिने लवकरात लवकर सोडवून आणेन"


लेकराच्या चेहऱ्यायावरून प्रेमाने हात फिरवून त्याला जवळ घेतलं. 


 दिनू अतिशय मेहनती पण स्वयंभू प्रकरण. 


स्वतः ची  रिक्षा...पण 


पांढऱ्याऐवजी खाकी शर्ट घालणार...सगळी देणी फिटोस्तोवर.....


त्याची निराळीच तऱ्हा.


ठरवलच होतं त्यानं. 

खिशात डायरी आणि पेन, बटनाचा नोकिया  मोबाईल.


 " ए रिक्षा! मंडईत जाणार काय? "


"नाही नाही दुसरी बघा  एंगेज आहे."  दिनूच उत्तर. 


 गिऱ्हाईक वैतागायचे.. किती वेळ झाला इथेच उभा आहे आणि म्हणतो एंगेज आहे.


दिनूचे कॅल्क्युलेशन मात्र भलतेच आजूबाजूच्या दोन-चार सोसायटीतल्या लोकांनाच ठरवून सेवा द्यायची. फोन फिरवायचा की दिनू रिक्षा घेऊन दारात हजर.


 बसची नीट अशी सोय नव्हती त्या भागात, त्यामुळे  दिनूनच स्वतःहून दिलेली सर्व्हिस झोकात चालू होती. बायकोचे मोडीत घातलेले दागिनेही सुटतील लवकरच. 


  फक्त ठराविक  सर्व्हिसेस. त्यामुळे त्याचा मोबाईल नंबर सोसायटीतल्या सगळ्यांकडे. गेटमधून "विदाऊट  रजिस्टर एंट्री" आत-बाहेर करण्याची दिनूला बिनविरोध मुभा. बायको ही गुणी, प्रामाणिक. दोन-चार घरची धुणीभांडी करते सोसायटीतच.


    "दिनू दुपारी चाराला ये बरं नक्की. अाजींना दवाखान्यात घेऊन जायचं आहे  टिळक रोडला."
एखाद्या सुनेची दिनूशी बोलणी होतात. मग दिनू डायरीमध्ये नाव, फ्लॅट नंबर आणि वेळ  नोंद करतो. 


दिनूची रिक्षा म्हणजे जाण्या-येण्याच्या सोयी बरोबरच चालतं बोलतं  वर्तमानपत्र. 


 त्याचे कार्यक्रम राजकारण्यांच्या कार्यक्रमापेक्षा भरगच्च असतात. हा हा म्हणता डायरी निळी शाई जिरवून  भरून जाते. 


 येणार् या फोन कॉल्सशी दोन हात करत दिवसभर चौफेर लढतो तो. आधीची  अपॉइंटमेंट असेल तर दुसरी सोय करून देतो रिक्षाची. जाता-येता अनेक गोष्टी उरकतो.. कोणाचं दळण .. भाजी.. फुलपुडा.. 


गौरी गणपतीत, दिवाळीत...तर उसंत नसते त्याला. 


    दिनूला प्रत्येक घराची इत्यंभूत माहिती. कोणाकडे पाहुणे आलेत, कोणाचं लग्न ठरलं, कुठे कोण आजारी आहे आणि इंटरनल प्रेमप्रकरणं सुद्धा..


दुपारचा चहा घेता घेता मग कोणत्यातरी म्हातारीला सोसायटीची इत्थंभूत माहिती घरबसल्या मिळते. 


    "नाही नाही आत्ता या वेळेला कुठे बाहेर नाही फिरकायच." सोसायटीतील मुलांना बिनदिक्कत ओरडायच लायसन्स आहे त्याच्याकडे. मुलंही या प्रेमळ दिनू काकाचं म्हणणं डावलत नाहीत.   कधी फारच उत्साहात असेल तर छोट्या छोट्या मुलांना रिक्षातून चक्कर मारून  खुश करून टाकतो तो आणि त्यांच्या निरागस आनंदात स्वतःचा आनंद शोधतो. 

     या दोन-तीन सोसायट्यांच्या गळ्यातला ताईत आहे दिनू. प्रेमळपणाने बोलणारा, कामाला मागे पुढे न बघणारा, काळजी घेणारा भारवाहक. 


  जोशींचा मंगेश सोसायटीच्या  पुढच्या चौकात गाडीवरून पडला. 


दिनूनं पाहिलं.


 मंगेशला उचलून रिक्षात घालून दवाखान्यात घेऊन गेला सुद्धा लगेच. पायाचं हाड फ्रॅक्चर झालं होतं. दवाखान्यात पूर्णवेळ त्याला धीर देत प्लास्टर घालून होईपर्यंत मंगेश बरोबरच थांबला तो. मग त्याला घरी घेऊन आला. मंदा ताईंना ते पाहून धक्काच बसला..


"काळजी करायची काही गरज नाही एवढी मंदाताई. फक्त महिनाभर आराम झाला की एकदम बरा होईल बघा मंगेश. त्यासाठी एवढं डोळ्यातून पाणी काढायची काय गरज. 


 मी आहे ना दवाखान्यात 


नेण्या-आणण्यासाठी.  बिनधास्त फोन फिरवा कधीही . "

"अरे पण पडला तेव्हाच फोन नाही करायचा का रे दिनू घरी." मंदाताई म्हणाल्या.


"तुम्ही काय करणार होतात येऊन तिथे. उगाच डॉक्टरांच्या डोक्याला त्रास." दिनू हसत म्हणाला. 


"नाहीतर काय, उगीच बावरून जातात  घरची माणसं म्हणूनच नाही कळवलं. 


"डॉक्टरांनी विचारलं...बरोबर कोणी घरचे आहेत का? 


म्हंटलं मीच आहे 'घरचा' 


माझ्याशी बोला काय बोलायचं ते... "


  मंदाताईच्या डोळ्यातलं  पाणी दिनूच्या शब्दांनी घळाघळा वाहू लागलं.


"हं ! ही औषध घ्या बरं.  कशी घ्यायची ते सगळं लिहिलं आहे डॉक्टरांनी चिठ्ठीत. "


 "अरे पण या सगळ्याचे पैसे.... "


 "द्या हो सावकाशीने.  ना तुम्ही कुठे जाणार आहात ना मी."
त्यांना पुढचं काहीच न बोलू देता  त्यांन मंगेश ला रिक्षातून उतरवून   घरात कॉटवर निजवलं. 


"निघू का रे मंगेश! आराम कर आता. "


आभाराचे शब्द तोंडातून निघण्याआधीच दिनू पुढच्या कोणालातरी मदत करायला सरसावला.


    स णासुदीला दिनूचा सुद्धा डबा भरला जातो घरा-घरांमधून. अन् मग आपोआपच श्रीमंत होऊन जातो तो. 


 हो ना...माणुसकीची श्रीमंती... 


         "वच्छी मावशी तुम्ही काही काळजी करू नका. एकदा मी सांगितलं ना येणार म्हणून, मग येणारच. रात्री-बेरात्रीसुद्धा कितीही वाजता फोन करा, मी हजर होईन पाच मिनिटात."


     दिनू मावशींना धीर देत होता. मावशींची मुलगी बाळंतपणाला आली होती. उमा...वच्छी मावशींची  एकुलती एक मुलगी. दिवस भरत आले होते. जशी माहेरी आली होती तशी दिनूनं भावासारखी  जबाबदारी घेतली होती. 


सांभाळून, व्यवस्थित  न्यायचा तो तिला कुठे जायचे असेल तर. 


ती असायची मग एकदम निर्धास्त. स्वतःची आणि हो येणाऱ्या बाळाचीही जबाबदारी या कृष्णसारथ्यावर  सोपवून. 


  म्हाताऱ्या काका आणि वच्छी मावशींच्या घराला आपोआपच त्याचा भक्कम आधार मिळाला होता. मावशींची चिंता सरली होती. तो ही येता-जाता लक्ष ठेवायचा, हवं-नको ते मधून मधून येत विचारत राहायचा, काहीबाही आणून द्यायचा. उमाच सासर दुसऱ्या शहरात आणि नोकरीमुळे तिच्या नवऱ्यालाही इथे येणं कठीण होतं. 


 ....आता कधीही डिलिव्हरी होणार होती. 


      मावशींना टेन्शन आलं होतं. दवाखाना तसा जवळच होता, दिनूलाही त्यांनी सांगून ठेवलं होतं.  


         रात्री  उमाच्या पोटात कळा यायला सुरुवात झाली. मावशी दिनूचा फोन फिरवत होत्या. 


 लागेचना.. सारखा आउट ऑफ कव्हरेज.. 


     बऱ्याच वेळानंतर मावशींचा धीर खचला. उमा पोटात कळा येऊन बेजार झाली होती आणि अचानक दिनूची हाक आली. 


  " मावशी या घेऊन ताईंना लवकर. जाऊ दवाखान्यात पटकन."


      उमाला दवाखान्यात नेऊन अॅडमिट केल्यावर मावशींनी दिनूला विचारले,


" एवढा वेळ कुठे होतास रे? तुला फोन करून करून थकले पण लागेच ना. "


   "मावशे! अग मुलगा तापानं फणफणलाय. त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले..रक्ताच्या तपासण्या करायला लागतील. अॅडमिट केलं. 


   तिथे रेंज नव्हती.  काऊंटरपाशी आलो.. पेशंटची नोंदणी करायला.. तो तुझे इतके सारे मिस्ड-कॉल दिसले. म्हणलं..नक्कीच गडबड असेल.


    बायकोला तिथे बसवून लगेच येतो म्हणून सांगितलं आणि इकडे आलो बघ. तुला शब्द दिला होता ना."


त्यानंतरच्या उमाच्या डिलिव्हरी मधल्या अडचणी... रक्ताच्या बाटल्यांची लागलेली गरज... दिनूनं धावपळ करत रक्तपेढीतून मिळवलेली मदत... सारं काही  शब्दात मांडणं कठीण होतं. 


डिलिव्हरी झाल्यानंतर  नर्स बाळाला घेऊन आली, "घ्या बाळाला आजीबाई."


"बाळाला पहिल्यांदी तिच्या मामाच्या हातात द्या." उमा भारावून बोलली. त्या नाजुकशा बाळाच्या कोवळ्या स्पर्शानं की उमान दिलेल्या नात्याच्या उपाधीनं... काय की... दिनूचे डोळे मात्र ओलावले. मन भरून आशीर्वाद आणि शंभराची नोट बाळाच्या हातापाशी ठेवत त्यानं गदगदित होऊन मान फिरवली. 


"मावशी तुझे नातेवाईक पोहोचतीलच थोड्या वेळात.आता निघू मी ?जाऊन मुलाकडे बघतो."  आणि तो उमाच्या डोक्यावर हात फिरवून निघाला. 


      वच्छी मावशीने  पाठमोऱ्या  मनुष्य रुपी देवाला धन्यवाद देत हात जोडले. 


      दुसऱ्या दिवशी सोसायटीत दिनूचीच हवा... 


    दिनूच्या मुलाला भेटायला भरपूर खाऊ घेऊन सोसायटीतल्या लोकांची गर्दी.  डिस्चार्जच्यावेळी बिल सुद्धा कोणीतरी सहज भरून टाकलेलं. 


 माणुसकीची श्रीमंती...दुसरं काय? दिनूचाच वसा....... 


       दिनूला या कौतुकाशी काही घेणंदेणं नाही.   तो आताही उभा असेल सोसायटीच्या कोपऱ्यावर  हातात डायरी आणि पेन तयार ठेवून कोणाच्यातरी फोनची वाट बघत....

✍️ दीपाली थेटे-राव


वरील कथा दीपाली थेटे राव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post