माझा वाटा

 *माझा वाटा*

✍️ प्रतिभा परांजपे 


शुभदाचे सारखे घड्याळाकडे लक्ष जात होते . चार वेळा तरी बाहेर जाऊन पाहिले, पाच वाजले तरी प्रसाद तिचा नवरा अजून ऑफिसमधून आला नव्हता. आताशा बरेचदा तो उशिरा येत असे, आणि हे सर्व तिच्या अंगवळणी पडल होत, पण-- आज ती त्याची वाट पाहत होती.



 चंदा तिच्या मुलीने विचारलेही आई-- "काय झालं ग तू सारखी आत-बाहेर करतीये ??"


"काही नाही ग, बघ न हे अजून आले नाही."


 "काही विशेष?" सासूबाईंनी विचारले तेव्हा तिला क्षणभर हसूच आले.



  अगदी लग्न झाल्यानंतर ती अशीच वाट पाहत असे आणि प्रसाद हि सुरुवातीला लवकरच घरी यायचा.


 सासरे म्हणाले पण एकदा, "अरे प्रसाद एक वर्ष झालं की लग्नाला आता जरा कामात लक्ष घाल" तेव्हा तिला खूप लाजल्यासारखे झाले.



प्रसादने घरात पाऊल टाकताच शुभदाने "अहो ताईंचा फोन होता त्या येणार आहेत असे म्हणाल्या".


"हं  --"मलाही फोन केला होता तिने."


"कां बरं येणार काही बोलल्या का तुम्हाला."


"नाही."


"कमाल आहे मग? तुम्ही विचारले का??"


 "नाही अगं असं बरं नाही दिसत किती वर्षांनी येती आहे."


"हो मलाही आनंदच आहे पण असे अचानक आता काय कारण?"



 "कळेलच ग आली की."



"मला तर शंकाच येती आहे, त्या मोघम बोलल्या मी विचारले तर-- बाबांच्या  मृत्यूपत्राबद्दल काहीस--"


बघा म्हणजे त्यांचा पैशावर डोळा आहे."  शुभदा बडबडली.


"आणि तिकडे बाबांनी  शेवटपर्यंत  ताईंचं कधीं नावही घेतल नाही. आणि ते गेल्यावर ही ताई आल्या नाहीत."


" हं खरय."



प्रसादला सर्व प्रसंग आठवायला लागले.


 सुनंदाताई त्याच्यापेक्षा बरीच मोठी , तिच शिक्षण झालं तशी तिच्यासाठी बाबांनी स्थळ पाहायला सुरुवात केली तेव्हा ताईने अशोक पाटीलचे व तिचे प्रेम आहे व त्याच्याशी तिला लग्न करायचे असे घरात सांगताच बाबा खूप संतापले.


 पाटील खूप श्रीमंत, बडे लोक असले तरी जात वेगळी होती आणि बाबांना ते पसंत नव्हते त्यांनी ताईला ह्या लग्नासाठी नकार दिला . मग ताईने पळून जाऊन लग्न केले आणि बाबांनी त्यानंतर तिचे नांव टाकले. 


ताई कधीच माहेरी आली नाही.



ताईंच्या घरची माणसं सर्व चांगली होती,काही  वर्षांनी भाऊजी व ताई शहरात राहायला गेले.



बाबांनी  जरी ताईचं नाव टाकलं तरी ताईनी संबंध तोडले नाही.


सासरी आली आली की प्रसादला बाहेर भेटत असे गरज असल्यास मदत ही करत असे पण --बाबांना न कळू देता. त्यामुळे भावाबहिणीचे संबंध टिकून होते.



 प्रसादच्या लग्नात ताई सर्व मान बाजूला ठेवून  आली होती. तो प्रसंग प्रसादला आठवला.



ताई व अशोक भाऊजी लग्नात अगदी वेळेवर आले . सर्व पाहुणे मंडळी पाहतच राहिली. बाबांचा पारा चढला होता पण आईने त्यांना शांत केले .


दागिन्यांनी मढलेली प्रसन्न चेहऱ्याची, किती सुंदर दिसत होती ताई, आणि भाऊजी पण, खरोखरच दोघांची जोडी शोभून दिसत होती . सर्व जणकौतुकाने पाहत होते.  पण लग्न लागताच आहेर देऊन दोघे  निघून गेले.


आईने बाबांची खूप समजूत काढली "मुलगी सुखात आहे आता तरी राग सोडावा."


 बाबा मनातून वरमले पण ताठा सोडला नाही.


ताई सासरी गावात येत असे. चंदाच्या जन्मानंतर बाळंतविडा ही पाठवला होता



   बाबा गेल्यावर इतक्या वर्षानंतर  ताई माहेरी आली. आता तिच्या सासरी पण कोणी नाही तेव्हा सरळ इकडे आली.


आल्याबरोबर ताई बाबांच्या खोलीत गेली त्यांच्या फोटोसमोर बसून खूप रडली. शेवटी आईने तिला शांत केले.



"भाऊजी नाही आले एकट्याच आलात ?" शुभदाने मुद्दाम खोचकपणे विचारले?



"येतिल  घ्यायला", ताईंनी हसत हसत सांगितल.


"मुलं कशी आहे ?"


"आपापल्या उद्योगात."



ताईला पाहून आईला पण खूप आनंद झाला. आताशा आईला बरे नसायचे, पाय गेले होते त्यामुळे चालणं फिरण  बंद होते सर्व हातात द्यावे लागे, त्यामुळे पण शुभदा चिडचिडी झाली होती.



ताईने रीतीप्रमाणे शुभदला सुंदर साडी , प्रसादला कपडे व मुलांना पैसे दिले मोबाईल घ्यायला त्यामुळे मुलं आत्यावर खुश होती.


  दोन दिवस ताईने आईचं सर्व केलं अगदी आंघोळ घालण्यापासून. जेवण झाल्यावर तोंड धुवून दिल.



 रात्री खोलीत आल्यावर शुभदाची बडबड सुरू झाली,  "अहो दोन चार दिवस कौतुकाने करणं वेगळं नेहमी करावे लागेल ना तेव्हा कळेल, उगाच खोटं कौतुक, मला हेच आवडत नाही. जसं मी काही करतंच नाही."


"अग तुला कोणी काही बोलले कां?"


 "बोलल नाही पण..


 या चार दिवस करणार आणि जाणार,गेल्या की मग कोण आहे? मलाच करायचं आणि मी कितीही केलं तरी शेवटी मी  सून,मुलगी नाही, आणि हे सगळ कौतुक आईंना खुश करण्यासाठी, वाटा हवा आहे न,"   शुभदा चा संताप होत होता.


 प्रसाद न बोलता झोपी गेला.



दोन दिवसांनी ताई चहा पिता पिता म्हणाली, "प्रसाद व शुभदा मला जरा बोलायचे"


 शुभदा सरसावून बसली .प्रसाद शांतपणे चहा पीत होता,


"म्हणजे बघ प्रसाद माझं लग्न बाबांच्या इच्छेविरुद्ध झालं त्यामुळे मला काहीच मिळाले नाही. तरीही मी त्यांची मुलगी या नात्याने माझा हक्क आहेच."



"अहो वन्स अशी कोणती संपत्ती ठेवून गेलेत बाबा, हे राहतं घर आणि थोडीशी जमीन, आईचे चार दागिने  याला संपत्ती म्हणता? यात वाटा मागता आहे? आम्हाला पण संसार आहे मुलीचं लग्न करायचंय," शुभदाने मनातली खदखद व्यक्त केली.


"शुभदा अग बोलू  दे, तिला काय हवे ते कळू दे. तिचं म्हणणं चूक नाहीये लग्नात तिला काहीच दिलं नव्हतं."


"मग त्यात आपली काय चूक? ह्यानी बाबांच्या मर्जीविरूध्द लग्न केले नाही तर, आणि तो बाबांचा निर्णय होता."  शुभदा रागात म्हणाली.


"हो ग बाबांनी शेवटपर्यंत माझ्याशी अबोला ठेवला.' डोळ्यातलं पाणी पुसत सुनंदा म्हणाली.


"अग नाही ग त्यांचा राग वरवरचा होता. एकदा बोलले माझ्याजवळ ते,  ताई सुखात दिसते मी उगाचच ताणले म्हणून, पण तुझ्याशी बोलायला वेळच नाही मिळाला". आई डोळे पुसत म्हणाली.



" असो, आता त्यांच्या माघारी मला माझा वाटा हवाय."


"पहा मी म्हंटले होते न-- "शुभदा बडबडली.



"काय हवं आहे?" प्रसादने विचारले.



"मला ज्याची  गरज होती ते प्रेम नाही मिळाले व सेवाही नाही केली बाबांची,  बाबा तर आता नाही पण आई आहे माझ्या नशिबाने.


 म्हणून माझ्या वाट्याचं प्रेम व सेवा म्हणून आई मला हवी.."


 "अहो आई आहे तर तुमच्या."


" हो पण --मला कायमची हवी आहे मी तिला आपल्या सोबत घरी नेऊ शकते का?"


 "काय ताई? अगं तू केव्हाही आईला भेटायला ये."


  "नाही तसं नाही मला "माझा वाटा" म्हणून आई हवी आहे. पुढच्या आयुष्यात मला तिचा सहवास व प्रेम हवे आहे . हाच माझा  संपत्तीतला "माझा वाटा"  असं समज.


 ताईंचे बोलणं शुभदा अवाक होऊन ऐकत होती तिला आपल्या वागण्याची लाज वाटली, तिच्या मनातला गैरसमज दूर झाला तशी तिने धावत  येऊन काय हे म्हणत ताईंना मिठी मारली.


 "मग  नेऊ न तुझ्या सासूला चालेल ना??"


  "हो बाई--- चहाचे कप उचलत शुभदा म्हणाली, "माझी काय बिशाद तुम्हा भाऊ बहिणीच्या मध्ये पडायची"?  


"पण भाऊजी? त्यांचा विचार--"



"अरे त्यांची पण हिचं इच्छा आहे. ते येणार आहे उद्या घ्यायला. मग काय आई तु तयार आहे?"


आईने प्रसाद कडे पहात मान डोलावली


"अरे आई बाबा हीच खरी आपली संपत्ती"


 असे म्हणत ताई आईच्या कुशीत शिरली.


_________________________लेखिका. सौ. प्रतिभा परांजपे


वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post