तदैव लग्नम्
✍️ अनघा लिखिते
अपुर्वाची नुसती लगबग चाललेली होती. लग्न घर; पण मोजकेच पाहुणे. बाबांचे मित्र रमेश गोडबोले आणि त्यांच्या पत्नी रमा; दोघे पुण्यातुन आले होते. अपुर्वाची आतेसासु सुलभा; थोड्या वेळाने पोहचणारच होती. अपुर्वाचा नवरा सुयश एयरपोर्टवर गेला होता आणायला. पण ज्यांच्या लग्नाची गडबड सुरू होती, ते मात्र मित्राशी गप्पा मारत आणि नातवाशी खेळण्यात रमले होते - कर्नल विश्वजित सरपोतदार.
अपुर्वानी लग्नाची तयारी जोरात केली होती. जवळच्या नातेवाईकांमध्ये तर थट्टेचा विषय होता. त्याला पुर्णविराम द्यावा या हेतूने; हा सर्व घाट घातलेला. तिचे आईवडील देखील नाराज झाले होते. एखाद्या वेळेस जर अपुर्वा आली नाही किंवा उशीरा आली तर किटी पार्टीत चविष्ट गप्पांना ऊत यायचा. सगळ्यांना जणू हॉट टॉपिक मिळाला होता.
बेडरूममध्ये बसुन अपुर्वा साड्यांना गिफ्ट पॅक करत होती. तेव्हा तिला आठवला तो दिवस. ती संध्याकाळी किटी पार्टी मधुन घरी आली. कधी एकदा बाबांशी बोलते; असं झालेलं. सुयश पण ऑफिसच्या कामानिमित्त आऊट ऑफ इंडिया होता. महीनाभरात ते तिघेही यु.एस.ला जाणार होते; तीन वर्षांसाठी. बाबा यायला तयार नव्हते; त्याचं मुळ कारण कळलं होतं. म्हणुन आज बोलायचे ठरविले.
संध्याकाळची वेळ होती; बाबा नुकतेच वृद्धाश्रमातुन जाऊन आले होते आणि फ्रेश होऊन, कपडे बदलून आरामखुर्चीत बसले. ते आणि सुयश तिला प्रेमाने "अप्पु" म्हणत. अपुर्वाने चहा-पाणी आणुन दिले आणि बंगळीवर बसली. ते नेहमी प्रमाणे म्हणाले, "अप्पु, मला येवढी सवय लावली आहे. पुढे कठीण जाईल."
अपुर्वाला अनायसे संधीच मिळाली, "बाबा, मग आपण तुमची काळजी घेणारं आणु या घरी."
"अप्पु, नको ते केयर-टेकर थोडीच आपलेपणाने करतील. मी माझं करून घेत जाईल."
"पण बाबा, तुम्ही मला चुकीचे समजताहेत. मी केयर-टेकर बद्दल नाही बोलत. जरा स्पष्टच बोलते. मला म्हणायचे आहे की लाईफ पार्टनर."
"अच्छा ! म्हणजे आमच्या मैत्रीची चर्चा बरीच पसरली म्हणायचे."
"तर काय बाबा; जग थोडीच जाणण्याची तसदी घेतं. जे दिसतं ते बोलायला मोकळे होतात. आता तुम्ही म्हणाल की दिसतं तसं नसतं."
बाबा हसुन म्हणाले, "सुनबाई, खूप हुशार आहे तु बोलण्यात." ती सुद्धा मनमोकळेपणाने हसली.
"बाबा, मला अगदी खरं खरं सांगा; मुलगी मानता नं मला ?"
"बोल काय सांगु ?"
अपुर्वानी निःसंकोचपणे विचारले, "गायत्री काकी तुम्हाला आवडतात नं ?"
कधी तरी हा विषय निघणारच होता. हे माहीत होते विश्वजित यांना; तरी पण वेळेवर काय बोलावं सुचत नव्हतं. अपुर्वाला त्यांची अगतिकता जाणवली. तिने त्यांना रिलॅक्स फिल व्हावं म्हणून स्वतः म्हटले, "बाबा, तुम्ही येवढे पुरोगामी विचारसरणीचे; मग हा संकोच का ? तुम्ही कधी विचार नाही केला का ?"
"अप्पु, मी करतो गायत्रीवर प्रेम. गायत्रीचे देखील प्रेम आहे माझ्यावर. पण ती 'घरचे, नातेवाईक, समाज काय विचार करेल?' या भितीने ती गप्प बसते."
"बाबा, त्यांच्या घरच्यांनी या उतारवयात बाहेर काढलं, तेव्हा कोणी म्हणजे नातेवाईक किंवा समाज यांनी त्यांच्या मुलांना जाब विचारला का ? मग कशाला तमा बाळगायची."
"मी बरंच समजावलं. ती म्हणते की आता थोडे दिवस तर राहिले आहे आयुष्यात; राहु असेच मित्र बनुन."
"मला वाटतं की मीच जाऊन भेटावं एकदा; बघुच कशा माझ्या हॅन्डसम, डॅशिंग बाबांना नाही म्हणतात ते."
"अप्पु, पण माझ्या लेकाने कुठे अजून परमिशन दिलीये. त्याच्या कानावर गेले असते; तर कसला तणतणात केला असता. लहानपणी त्याची आई गेली; तेव्हा सुयश चार वर्षाचाच होता. सुलभाने माझ्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला होता; किती रडपड झाली, दोन दिवस जेवला नाही, अबोला धरला होता, तापानं फणफणला होता; तेव्हा मी ठरवलं की काहीही झालं तरी सुयशला सिंगल पॅरेंट म्हणून सांभाळायचे. त्याला मी वचन दिले की मी तुझ्या साठी दुसरी आई नाही आणणार. तेव्हा कुठे तो निवळला; बोलु लागला. तो दिवस आठवला की मी सुद्धा मग लग्नाच्या विषयावर मागे हटतो."
"पण बाबा तो आता मोठा झाला आहे. सि.ई.ओ. पदावर आहे. मग ही गोष्ट नाही समजून घेणार ? मी माझ्या नवऱ्याला बरोबर पटवते; तो स्वतः या विषयावर बोलेल तुमच्याशी."
"अप्पु, असं झालं तर खरंच चांगलं होईल बरं; मी खुप आभारी आहे बेटा."
अपुर्वा हेल काढून म्हणते, "बाबा..., हे काही काय म्हणता. आपल्या लोकांचे कधी आभार मानायचे का ? म्हणजे तुम्ही मला सुन मानता वाटतं."
"नाही गं बेटा. तु माझ्या मनावरचं मोठ्ठं ओझं दुर केलं."
अपुर्वानी बाबांशी चर्चा करून; निर्णय घेतला लग्नाचा. आता सुयशच्या कोर्टात चेंडू टाकायची वेळ आली आहे. रविवारी त्याच्या आवडीचं चिकन बिर्याणी, खिमा पॅटीस असा बेत करावा; म्हणजे स्वारी खुश राहील. मग संध्याकाळी लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाऊ.
उजाडला रविवार. सुयश सोहम सोबत खेळत होता. आठवडाभर बाप-लेक भेटत नाही; मग रविवार हक्काचा असतो सोहमसाठी. अपुर्वाचे सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होते. बिर्याणीच्या सुगंधाने सुयश किचन मध्ये आला.
"अरे व्वा अप्पु ! खुपचं मस्त सुगंध दरवळत आहे बिर्याणीचा. मजा येणार जेवायला. आज अचानक का ? मला वाटलं की बाहेरचा प्रोग्राम असेल."
"सुयश, मी सोहमला बाहेरचं कमीच देणार आहे."
तिला हग करत, "दॅट्स व्हेरी गुड."
ती पण लाडाने, "पण संध्याकाळी लॉंग ड्राईव्हला यावं लागेल."
सोहमला बाबांनी नेलं. संध्याकाळी ते दोघे गेले लॉंग ड्राईव्ह वर. तिने सुयशला सांगितले; तेव्हा तो कसला भडकला. नंतर मग तिला समजवावे लागले बराच वेळ. सुयश, "अपुर्वा, तुझी खासियत आहे. तुला खुप चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडता येते." तो सुद्धा तयार झाला आणि आता बाबांचा लग्नसोहळा मस्त एन्जॉय करतोय. आठवल्यावर ती गालातल्या गालात हसली. रमाकाकी जवळच बसल्या होत्या नाश्ता करत. त्या पण गपीष्ट आणि चौकस होत्या.
"अपुर्वा, काय गं ? का हसतेस गालातल्या गालात ?"
"काकी, मी बाबांच्या लग्नाची बातमी सांगितली; तेव्हा सुयश खुप चिडला होता. ते आठवलं म्हणून हसु आलं. इतके वर्ष बाबांनी एकट्याने व्यतीत केले. आता आयुष्यात सुख समाधानाचे दिवस येणार."
आत्या आली; तेव्हा नुसता जल्लोष. तिचा पण स्वभाव बडबडा, बाबांना आणि सुयशला चिडवीत म्हणाली, "सुयश, आता ताप नाही नं येणार ? काय अबोला धरला होता. बाप रे !!! मी तर व्हिलनच झाले होते, तुझ्या नजरेत." नंतर तिनं कबुल केले सर्वांसमक्ष, "मला खुप वाईट वाटले नंतर. जेव्हा मी तुझ्या जागी स्वतःला ठेवून विचार केला तेव्हा. तु लहान असुन बरोबर होता. लहानपणी अशा वेळी आपल्याला हक्काचं कमीत कमी एकतरी म्हणजे आई किंवा बाबा लागतात. पण मोठी माणसं विचार करतात की मुलांना आई आणली की आईची माया पण मिळेल. पण ९९ टक्के असं दिसुन नाही येत. तरी आपण तीच चूक करतो. सुयश मला तु माफ कर. मी सुद्धा तीच चूक करत होते."
आत्याचे डोळे भरून आले. सुयशने जवळ जाऊन आत्याला हग करत म्हटले, "आता, काही हरकत नाही. मी नाही राग मनात धरून बसलो. पण बरेच वर्ष धाकधूक होतीच."
बाबा, "चला जाऊ द्या. आता मागचं विसरा."
आत्या, "ए दादा, आज दुपारी शेखर आला की आम्हाला तुझी प्रेमकहाणी ऐकायची आहे. तो म्हणाला की साळ्याची कहाणी ऐकायची आहे, तु आधीच नको विचारू."
बाबा, "शेखरराव तुझ्या सोबतच का नाही आले ?"
आत्या, "अरे तो दोन दिवस पुर्वी आला आहे, सेमिनार आहे गोव्याला."
अपुर्वा जेवायची पानं वाढते आणि सगळ्यांना आवाज देते. जेवण करून सगळे दुपारी गप्पा मारत बसतात. चारच्या सुमारास आत्याचे यजमान शेखर पटवर्धन देखील येतात. मग रमाकाकी सगळ्यांसाठी चहा ठेवतात; त्या स्वभावाने सुद्धा प्रेमळ असतात. अपुर्वा लहानशा सोहम सांभाळत सगळं करतेय; याचं त्यांना कौतुक वाटले.
शेखरराव गंमतीने, "कर्नल, सांग मी ऐकायला अधीर झालोय. अशा कडक, शिस्तप्रिय व्यक्तीवर कशी मोहीनी घातली ?"
रमेशकाका, "हो नं ! कॉलेज मध्ये सुध्दा विश्वाच्या मागे पोरी लट्टू व्हायच्या; याची पर्सनालिटी पाहून. पण हे ध्यान देशप्रेमाने भारलेले; त्यामुळे सर्व लक्ष अभ्यासावर आणि मिल्ट्रीत जायचं त्यामुळे फिजीकल फिटनेसकडे."
आत्या, "मला तर वाटलं की माझं आणि शेखरचे अफेअर ऐकून दादा खूप ओरडेल. पण त्यानेच मला साथ दिली."
शेखरराव, "अशीच थोडी साथ दिली. पहीले माझी कडक परिक्षा झाली. मी पास झालो; म्हणून आपलं लग्न झालं. बरं का सौभाग्यवती."
सगळे खळखळून हसले. नंतर बाबांनी सांगायला सुरुवात केली.....
एका अशाच संध्याकाळी मी वृद्धाश्रमात बसलो होतो. आश्रमातील सदस्यांनी एका स्त्रीला आणले. दु:खी-कष्टी पण चांगल्या घरची दिसत होती. उपाशी असावी; त्यामुळे अतिशय थकलेली दिसत होती. रात्री जेवण आणि झोप झाल्यावर बहुतेक तिला बरं वाटेल; असा विचार करून मी घरी परतलो. मला वाटलं की ती गेली असणार. पण मी गेलो आणि पाहतो तर ती माझीच वाट पाहत केबीनमध्ये ओशाळून बसली होती. मला वाटलं की तिला आभार मानायचे असतील जाण्यापूर्वी.
मी, "बोला ? कशी आहे तुमची तब्येत ?"
ती हात जोडून, "धन्यवाद सर. तुम्ही माझी मदत केली. माझी एक विनंती आहे."
मी, "अहो विनंती कशाला करता. आमच्या कडील कोणीही तुम्हाला सुखरूप घरी सोडतील; तुम्ही फक्त पत्ता सांगा."
ती, "नाही सर; मी बेघर आहे. आधी नवरा घर सोडून गेला; मग मुलांनी मला घराबाहेर काढले."
मी, "अरेरे ! मी येतो तुमच्या मुलांना समजून सांगायला. असं कसं कोणी वागु शकतं !"
ती हताशपणे, "समजदार असते तर मग मला घराबाहेर तरी का काढले असते."
या वाक्याने बरंच सांगुन गेली. नंतर मला तिने पुर्ण स्वतः बद्दल माहिती सांगितली....
ती, "सुनबाई आल्यानंतर आमच्या घराचे वासे फिरले. सुन मॉडर्न; तिच्या स्वैर वागण्याला आधी प्रेमाने समजून सांगितले. मग आम्हाला न सांगता मुल पाडले. आमच्यात खटके उडू लागले. मुलगा तिला समजवण्याजागी मलाच चुप करायचा. मी ऐकुन घ्यायला लागले. एकदा पार्टी करून घरी आली, तोल सुद्धा सांभाळता येत नव्हता दोघांना. मी दोघांना रागवले. आमच्यात खूप वाद झाला. माझे यजमान आधीच शिघ्रकोपी; संसाराची गाडी कधीच सुखाने नाही चालली. आत्ता पर्यंत यांचा राग झेलत आली. विचार केला की सुनबाई आल्यावर यांच्या रागावर नियंत्रण येईल आणि मला मुलगी हवी होती; ती सुनेच्या रूपात मिळेल. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. परिस्थिती अजून बिघडत गेली. लहान असेपर्यंत मुलाने यांचा राग सहन केला. मोठा झाल्यावर कशाला सहन करेल. फक्त आयुष्यभर माझीच फरफट झाली. लहानपण वडिलांच्या धाकात गेलं, नंतर नवऱ्याच्या दबावाखाली आणि मुलाने उरलेली कसर भरून काढली."
ती रडु लागली. मग हात जोडून म्हणाली, "माफ करा सर; मी तुम्हाला माझी व्यथा सांगत बसली. मी इथे राहू शकते का ? माझ्या जवळ पैसे नाहीत; पण मी पडेल ते काम करेल. तुम्हाला कधीच या निर्णयाचा पश्चात्ताप नाही होऊ देणार. मला फक्त माझं उर्वरित आयुष्य शांतपणे घालवायचे आहे."
तेव्हा पासून ती इथेच राहते. सगळा परिसर स्वच्छ ठेवते. आश्रम परिसरात सुंदर बाग बनविली, फळं झाडे लावली, कैऱ्या आल्या की ती कैऱ्यांची लोणची बनवते, उन्हाळ्यात सगळ्यांसाठी पन्हं, आवळ्याचे झाड आहे; त्याचे सरबत, आश्रमात विविध भाज्या पिकवल्या जातात. यामुळे आमच्यावर आता वृद्धाश्रमाचा खर्च सुद्धा कमी झाला आहे. तिने काही जणांना संस्कार शिबिर घेण्यासाठी इन्सपायर केले, त्याचं सुद्धा इन्कम येऊ लागले; कोणी गायन शिकवतो; अशा पद्धतीने एक उत्साह निर्माण झाला. ती छान रूळली. इथल्या वातावरणात जिवंतपणा आणला. हळूहळू आमची मैत्री झाली; मनं कशी आणि कधी गुंतली नाही कळलं.
जेव्हा सुयशने इथलं रॅप-अप करून त्याच्या सोबत चला म्हटलं. तेव्हा लक्षात आलं की आपण गायत्री शिवाय नाही जगू शकत. तिला जेव्हा सांगितले; तेव्हा ती खुप नाराज झाली. पण तिने मला म्हटलं की मी हे वृद्धाश्रम चालवेल; फक्त विकु नका. बस् येवढीच अपेक्षा केली तिने. मग मी ठरवले की इथेच राहायचं. नंतर सुनबाईंनी पुढाकार घेतला आणि या मैत्रीला लग्नगाठ बांधुन पक्की करायचं ठरवलं; माझ्या मुलाने सुद्धा या नवीन नात्याला आनंदाने स्विकारले.
सगळ्यांनी अप्पु आणि सुयशची भरभरून प्रशंसा केली.
आत्या, "पुत्र व्हावा ऐसा..."
आश्रमातील सगळे गायत्रीच्या बाजूने होते.
१० नोव्हेंबर १९९० ला अपुर्वा, सुयश, रमेश काका, रमा काकी, सुलभाआत्या, शेखर मामा, सोहम वरात घेऊन निघाले. चार दिवस आश्रमात यायची परवानगी नव्हती. लग्न रजिस्टर पद्धतीनेच होणार होतं. पण...
त्यांच्या कार आश्रमासमोर उभ्या राहताच. आश्रमातील सदस्यांनी त्यांचे हार-पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले; तेव्हा त्यांना सुखद धक्का बसला. आश्रम परिसर लग्नमंडपासारखा सजवला होता. सगळ्यांना बसण्यासाठी हॉलमध्ये चांगली अरेंजमेंट केली होती. चहा-नाश्ता देण्यात आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मध्यभागी लग्नवेदी मांडली होती. दुसरीकडे होम-सप्तपदी तयार होती.
अपुर्वा, रमाकाकी आणि आत्या आत गेल्या; लग्नाचा शालु आणि दागिने द्यायला. अपुर्वाने गायत्रीकाकींशी ओळख करून दिली आत्या आणि रमाकाकींची. अगदी साध्या तयार झाल्या होत्या त्या. संकोच होता मनात; ते त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं. पण आत्या आणि रमाकाकींनी त्यांना धीर दिल्याने; त्यांच्या मनावरील दडपण कमी झाले. नंतर नणंद या नात्याने आत्याची थट्टा मस्करी सुरू झाली; रमाकाकी पण होणाऱ्या जावेला थोडं छेडत होत्या. त्यांचे डोळे पाणावले.
आत्या डोक्यावर हात ठेवून, "गायत्री, काय झालं ? आमच्या चिडवण्याचे वाईट वाटले का गं ?"
रमाकाकी, "सॉरी गं. आम्हाला तुला दुखवायचा हेतू नव्हता. पण लग्नात थोडी थट्टा मस्करी केली की कुटूंबात नवीन येणाऱ्या सदस्याच्या मनावरील दडपण थोडं कमी होतं गं."
गायत्री, "सुलभाताई आणि रमाताई, हे अश्रु तुमच्या बोलण्याचे वाईट वाटले यासाठी नाही. तर मला आयुष्यात पहिल्यांदाच येवढं आपुलकीने, मायेने बोलणारे भेटले. त्यामुळे गहीवरून आले. तुम्ही अन्यथा घेऊ नका."
आत्या, "गायत्री, मला फक्त सुलभा म्हण. मी विश्वाची लहान बहीण आहे."
"आणि मला सुद्धा रमाच म्हण. आता आपण मैत्रीणी झाल्या आहोत.", रमाकाकी.
अपुर्वा, "बरं आत्या आणि रमाकाकी चला. आपण बाहेर बसुया."
नवरदेवाचे विधी संपन्न झाले. गुरुजींनी 'नवरीला आणा' म्हणून सांगितले. सगळ्यांच्या नजरा हॉलसमोरील दाराकडे होत्या. बाबा पण आतुरतेने वाट पाहत होते. अपुर्वाला सहज गंमत करायची सुचली बाबांची, "बाबा, गायत्रीकाकींनी अचानक विचार तर नाही बदलला नं ?"
बाबा हसुन, "तुम्ही तर आत गेल्या होत्या नं. मग तुम्हाला जास्त माहिती."
"तेव्हा तर तयार होत्या; पण इथे आल्यावर पुन्हा त्यांच्या मनात आलं की 'लोकं काय म्हणतील तर.", अपुर्वा चेष्टेने म्हणाली. तेवढ्यात हिरवा शालु, नथ, डोक्यावर पदर लेऊन; त्या चालत येऊ लागल्या. आश्रमातील दोघीजणी त्यांच्या सोबत होत्या. बाबांनी विजयी मुद्रेने अपुर्वाला खुणावले की बघ ती आली. त्या लाजत बाबांजवळ पाटावर बसल्या.
गुरुजींनी मंत्रोच्चार सुरू केले. त्या आवाजाने गायत्रीच्या मनात हलकल्लोळ माजला. हा परिचयाचा आवाज ऐकायला ईतके दिवस कान आतुरले होते. तिचा हात थरथरू लागला. अपुर्वाने त्यांच्या पाठीशी राहून धीर दिला. गायत्रीचे लक्ष गुरूजींच्या हाताकडे गेले; त्यांच्या सहा बोटं असणाऱ्या हाताकडे बघुन गायत्रीचे धैर्य खचले. ती चालु विधीतुन एकदम उठून उभी राहिली. अंग घामाने डबडबले, शरीर थरथरत होतं. सगळ्यांना आश्चर्य वाटले की अचानक हे काय झालं ? कुजबुज सुरु झाली. विधी थांबले...
गुरुजींनी सुद्धा आश्चर्याने गायत्रीकडे पाहीले आणि त्यांच्या तोंडून निघाले, "गायत्री तु ? मी जिवंत असताना तु लग्न...." पुढे स्तब्ध झाले.
सगळ्यांना समजलं की गुरूजी हे गायत्रीचे पहीले पती आहेत. चिंतातुर नजरा आता काय घडणार यावर होत्या. विश्वजीत सुद्धा उठून उभे राहिले. काय बोलावे कोणालाच काही कळेनासे झाले. गायत्री रडत रडत आत निघून गेली.
आत्याने पुढाकार घेतला. ती सर्वांना उद्देशून म्हणाली, "उपस्थित मान्यवर आम्ही क्षमापार्थी आहोत. या प्रसंगाला थोडा विलंब होईल. आम्हांला आपसात थोडी चर्चा करायची आहे; तर संयम बाळगा. आम्ही थोड्या वेळाने हजर राहू."
सगळे जण आतल्या खोलीत गेले.
आत्या, "अपुर्वा, गायत्रीला बोलवुन आण."
गायत्री आली. सगळे बसले होते.
आत्या, "माफ करा गुरूजी; लहान तोंडी मोठा घास घेतेय. तुम्ही लग्न हा पवित्र विधी या आधी सुद्धा इतर जणांचा पार पाडला असाल. त्यांच्या कडून सप्तपदीच्या वेळी सात वचन सुद्धा वदवून घेतली असणार. नाही का ?"
गुरुजींनी गायत्रीवर कडक कटाक्ष टाकत म्हटले, "ती पाळायची असतात; तरच कुटुंब संस्था टिकून राहते."
आत्या छद्मी हसुन, "पण तुम्ही चार वर्षांपूर्वी स्वतः त्या वचनांची पायमल्ली केलीत. आठवतंय का ?"
"हो.", ते नरमले.
आत्याने तोफ डागायला सुरुवात केली, "तुम्हाला चांगलेच माहिती होतं की तुमचा मुलगा-सुन कोणत्या थराला जाऊ शकतात आणि तरी सुद्धा तुम्ही गायत्रीचा साथ सोडून निघून गेले. आमच्या आश्रमबांधवांनी त्यांना वेळीच आणलं नसतं; तर तुम्ही कायमचे मुकले असता."
गुरूजी स्वतःचा राग शांत करत, "आठ दिवसांनी घरी परतलो; तेव्हा गायत्री सुद्धा घर सोडून गेली; असं कळलं. मी शोधत होतो, मिसींग कंप्लेंट सुद्धा नोंदवली. एकदा सुनेचं बोलणं कानावर पडलं "अहो, आता बाबांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवा." 'सुद्धा' हा शब्द सगळं सांगून गेला. मी हताशपणे बॅग भरली, महत्त्वाचे कागदपत्रं घेतली आणि घर सोडले. एका देवळात आश्रय मिळाला. सर्वप्रकारच्या पुजाविधी शिकुन; आपलं पोट भरेल येवढं ठेवतो; बाकी रोज येणाऱ्या भुकेलेल्यांना अन्नदान करतो. यामुळे माझ्या हातून नकळत जे पाप घडले; त्याचं प्रायश्चित्त."
गुरूजी उभे राहून, "गायत्री, मगाशी अचानक मी तुला पाहीले आणि संयम ढळला. माफ कर मला. मी तुझ्या लायक नाही. माझ्या रागीट स्वभावामुळे तुम्हाला सुख नाही दिले. मी तुझ्या सुखाच्या आड नाही येणार. तु निश्चिंत रहा.
गुरूजी, "विश्वजीत, चला हा विवाह-सोहळा लवकर संपन्न करूया."
गुरूजींच्या मागुन सर्व निघाले. विश्वजीतनी गायत्री जवळ येऊन हात पुढे केला; जाणुन घ्यायला की ती तयार आहे नं. तिने त्यांच्या हातात हात दिला आणि सोबत चालु लागली.
हॉलमधील सर्व उठून उभे राहिले. गुरुजींनी सर्वांना बसण्याची विनंती केली. लग्नविधी सुरू झाले....
तदेव लग्नं सुदिनं तदेव...
✍️ अनघा लिखिते
सदर कथा - "तदेव लग्नम्" माझी 'अनघा लिखिते' असून, मी माझ्या स्वतःच्या परवानगीने ती "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे हक्क लेखिकेकडे (माझ्या कडे) राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.