कोंडी

 कोंडी......

✍️ योगेश साळवी

  अनंत चतुर्दशीचा दिवस. घरातून दहा दिवसांच्या गणपतीचं साग्रसंगीत विसर्जन करुन साबळे कुटुंबिय निवांत गप्पा मारत होते. संदेश, त्याची बायको रुपाली, संदेशचे आई बाबा, आणि झालंच तर दिर म्हणजे संदेशचा भाऊ अशी मोजकीच मंडळी होती घरात. 

     इतक्यात सहज बाबा बोलुन गेले..."मग सूनबाई.. कधी आणता आम्हाला नातवंडं?". रुपालीच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला गेला त्यांच्याही नकळत.

      संदेश- रुपालीच्या प्रेमविवाहाला म्हणता म्हणता सहा वर्ष झाली तरी घरात पाळणा हलला नव्हता. बाकी सर्व आलबेल म्हणावं असं होते. संदेशची रेल्वे मधील नोकरी, रुपाली पण कमावती, चांगलं प्रशस्त ऐसपैस घर, दारात चारचाकी... सुबत्ता होती. संदेशचे आईबाबासुध्दा दुसरीकडं त्यांच्या आधीच्या घरात स्वतंत्र राहायचे. संदेशपासुन अर्ध्या तासाच्या अंतरावर. राजाराणीचा संसार. पण दोघांना मूलबाळ नसल्यानं त्याची कमी जाणवायची.

     "बाबा... जावू द्या ना तो विषय.. आता बाकी सगळं व्यवस्थित झालंय. गणपती बाप्पा कधी ना कधी हेही सुख टाकेल पदरात." संदेशने बाबांची समजूत काढली.

      "अरे पण संदू.. आज नाही तर कधी बोलणार... आता उद्या आम्हीं निघणार... गेले दहा दिवस श्री गजाननाच्या स्वागतात कसे गेले कळलं नाही. एवढं मकर... सजावट केली गणपतीला. आता मला आवड आहे सजावट करायची. पण आता पूर्वीसारखा उत्साह नाही राहिला. रिटायर झाल्यापासून स्वतः ला सुतारकामात गुंतवले. तूझ्या घरच्या खुर्च्या, टेबल , सोफा सगळं मी केलं. एकदा हातात हत्यारे घेतली की वेळ कसा जायचा कळलं नाही. पण आता थकल्यासारखं वाटतंय. बाकी आमचं काही मागणं नाही तुम्हा दोघांकडून......" बाबांनी त्यांची बाजू मांडली.

     हो... बाबा एक कुशल कारागीर होते. फर्निचरच्या विविध वस्तू बनवणे, सजावट.. रंगरंगोटी ई. गोष्टीची त्यांना विशेष आवड होती. घरात, दिवाणखान्यात त्यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टी होत्या. आपण त्या कशा बनवल्या आणि कमी किंमतीत त्या कशा झाल्या ते पाहुण्यांना, शेजारी पाजारी यांना सांगण्यात ते रंगून जात. त्यांनी घडवलेल्या लाकडी खुर्च्या, टेबल.  सजावट सारे बघत राहवेसे वाटे. समोरच्याने त्या कामाची प्रशंसा केली की मग त्या वृद्ध जीवाला जणू हजार हत्तींचे बळ यायचं. तहानभूक हरपून मग एखाद्या तरुणाच्या उत्साहानं पुढील कामाला लागत. पण आता गेल्या काही दिवसापासून म्हाताऱ्याला मांडीत नातवंडं खेळवावसे वाटू लागलं होते. आणि कोणाला नाही वाटतं आपल्या घरी लहान मूल असावं? आपल्याला कोणी बोबड्या स्वरात आजोबा.. आज्जी . अशी हाक मारावी अशी इच्छा बहुतेक सर्व वृद्ध लोकांना होत असावीच.

      या आधी दोन.. तीनदा हा विषय त्यांनी दोघां समोर काढण्याचा प्रयत्न केला होता... पण रुपाली.. संदेश यांनी तो फारसा गंभीरतेने घेतल्याचं त्यांना वाटलं नसावं. आज काय ते मनातलं बोलुन घेणार होते.. पण अशी ही मुलाबाळांची विचारणा कुठूनही झाली की रुपाली- संदेशला कानकोंडे झाल्यासारखं व्हायचं. कोणता उपाय दोघांनी केला नव्हता असं नव्हतं. वेगवेगळे स्पेशालिस्ट करुन झाले,  विविध तपासण्या केल्या... अनेकांचे सल्ले ( काहींचे अनाहुत सल्ले) पाळून झाले. रुपालीने तर एक असा देव किंवा देवी ठेवली नव्हती की ज्यांना संतती प्राप्तीसाठी आर्जव केलं नव्हतं का नवस बोलली नव्हती. आताही बाबांनी अचानकपणे हा विषय काढताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

     "बाबा... प्लीज हा विषय आता एकदम बंद करा. आई तू तरी सांग ना बाबांना..." संदेशने आईची मदत मागितली.

      "अरे...  ते तरी काय चुकीचं बोलले की हिने लगेच डोळ्यातून पाणी काढावं? तू रुपालीशी लग्न करायचं ठरवले तेंव्हां ह्यांनी लगेच हो म्हटलं... असं पुढं होईल हे नव्हतं ठावूक आम्हाला..." आईसुद्धा आज ऐकायला तयार नव्हती.

    "म्हणजे हा सगळा रुपालीचा दोष आहे असं तुलाही वाटतं आई?" 

     "ते आम्हांला माहित नाही... आम्हांला नातवंडं हवं बास.. तू नविन फ्लॅट घेतलास तेंव्हां मोठ्या उत्साहानं रंग काढून दिला... दिवाणखानाची सजावट केली.. इथल्या खुर्च्या, सोफे, टेबल स्वतःच्या हातांनी तयार केले. एक उमेद होती की तुमच्या मुलाला हया हातानं खेलवायला मिळेल." बाबा भावनाविवश होवून बोलत होते.

    रुपालीला हुंदके आता अनावर झाले. संदेशच्या डोक्यात तिडीक गेली एकदम. तोही हया नेहमीच्या प्रश्नाच्या सरबत्तीला उबगला होता. सर्व नातेवाईक, आजूबाजूचे, ऑफिस मधले सहकारी... एवढेच नव्हे तर स्वतःला त्याचे मित्र म्हणवणारे सुध्दा येवून जावून हाच प्रश्न विचारायचे..." काय मग आईबाबा कधी होणार?" संदेशच्या डोक्यात जणू या प्रश्नाचा स्फोट झाल्यासारखं झालं.

      रागाच्या भरात बाबांनी स्वतः तयार केलेली लाकडी खुर्ची त्यानं जोरात आपटली. एवढ्या सुंदर खुर्चीचा त्या अचानक फटका बसल्याने पाय निखळून पडला. लगोलग बाबांनी केलेल्या काचेच्या टिपॉय वर लाथ मारली. तो टीपॉय उलटसुलट गटांगळ्या खात आडवा झाला. टीपॉयच्या काचा हॉलमध्ये विखुरल्या.

     "सारखं आपलं मी यंव केलं नी त्यव केलं. नका करत जावू काही... आणि करायचं असेल तर स्वतःच्या घरात करा.  ईथे येवून काही ढवळाढवळ नका करु" ... रागाच्या भरात संदेशला काही कळत नव्हतं. साऱ्या जगाचा राग.. निराशा तो त्याच्या वडिलांवर काढू लागला. त्याच्या डोळ्यातून जणू अंगार बरसू लागले. रुपालीनच मग पुढं होवून नवऱ्याला आवरायचा प्रयत्न केला.

      "घेवुन जा हे सगळं... काही नकोय ईथे तुम्हीं केलेलं... आणि परत इथे येवून हे असले काही नाही बनवायचं..." 

       विषय कुठला आणि कुठं येवून पोहोचला. शब्दाने शब्द वाढला आणि म्हातारे वडील मुलाच्या संतापाने घाबरलेच एकदम. घाबरले म्हणण्यापेक्षा अतीव दुःख झालं आपल्या पोटच्या पोराने असं निकराचे बोलावं याचं. एवढी टोकाची भूमिका घेतली जाईल असं कदाचित नसेल वाटलं त्यांना... कारण त्यांच्या दृष्टीनं काही जगावेगळी मागणी त्यांनी केलेली नव्हतीच. त्यांच्या डोळ्यांत रागाने आणि दुःखाने पाणी जमा झालं. डोळ्यातलं पाणी पुसत ते म्हणाले, "चल ग.. आता एक क्षणभर इथे थांबायचं नाही. पुन्हा या घराचं तोंड पहायचं नाही."

      रुपाली अचंबित होवून घडणारा प्रकार पहात राहिली. खरं तर पंधरा वीस मिनिटांपूर्वी ती पान घेण्याच्या आणि घरी सणानिमित्त केलेलं जेवण सर्वांना वाढण्याचा विचारात होती . पण सहज गप्पा मारताना त्या गप्पांनी गंभीर वळण घेतलं . कोणी कुणाला सावरायच्या आवरायच्या आधीच जणू मोठाले वादळ घोघांवत आलं आणि सर्वांच्या मनोविश्वावर आघात करुन गेलं.

     त्या वादावादीनंतर संदेशचे आणि बाबांचं आपापसातील बोलणं बंद झालं. तसही कामावर जाणाऱ्या माणसांचं आपल्या नातेवाईकांशी बोलणे जास्त होत नाहीच... पण आता दोघांचा नुसताच संवाद कमी झाला नव्हता तर विसंवाद वाढू लागला होता. दोघं सुट्टीच्या दिवशी... सणासुदीला... वाढदिवसाप्रसंगी एकमेकाची चौकशी करायचं बंद झालं. संदेश फक्तं आईशी बोलायचा तेही फोनवर. महिने झाले.. वर्ष झालं दोघांमधला अबोला वाढलाच. आई कधी न राहवून फोन करी तेंव्हां बाबा बाजूलाच बसलेले असत... आपला मुलगा काय म्हणतोय... त्याचा संसार कसा चाललाय हे कोणत्या बापाला जाणून घ्यावस वाटणार नाही? पण मग त्या दिवशी झालेला अपमान त्यांच्या डोळ्यासमोर येई. अहंकार,  स्वाभिमान... ताठपणा फणा काढणाऱ्या नागासारखा उभा होई. मग मनातलं बोलणं ते मनातच दाबुन टाकायचे.

      "हल्लीची ही पोरं ... बापाला बाप मानत नाहीत.. वैरी वाटतो त्यांना बाप म्हणजे..." मनातला तळतळाट ते बायको समोर व्यक्त करीत. मग ती त्यांना समजवायची. खरं तर असं व्हायला नको होते पण झालं होतें खरं. संदेशचा फोन येवून गेला की आपला नवरा तास दीड तास संदेशबद्दल बोलत रहाणार हे तिनंही गृहीत धरलं होते.

       खरं तर संदेशलाही बाबांबरोबर बोलणं चालु करायची उबळ यायची पण मग बाबा तोच विषय उकरून काढतील अशी भीती देखील वाटायची. त्यापेक्षा आहे तेच बरं असे तो मनाला समजवायचा. रुपालीने आणि संदेशच्या आईने मध्यंतरी दोघांतली ही कोंडी फोडायचा... बाप बेट्यामध्ये समेट घडवायचा दोन तीनदा प्रयत्न केला होता .. पण ते काही जमून आले नाही.

      त्या दिवशी दुपारच्या वेळीं फोन वाजला म्हणुन बाबांनी मोबाईल उचलला. चष्मा लावला नाही तर हल्ली समोरची अक्षरं धूसर दिसत . आवाज संदेशचा आहे कळताच लगबगीनं फोन बायको कडे दिला. आधी हाच फोन आला की मग.... हं ... बोला संदु साहेब.. आज आठवण बरी झाली आमची अशी सुरूवात करायचे बोलायला. पण तो प्रसंग घडल्यापासून संदेशचा आवाज ऐकायला आला की तोंड कडू कारले झाल्यासारखं करत आणि बायकोकडे फोन सोपवायची सवय लागली त्यांना. हा असा फोन त्यांनी दिला की आई ओळखायची की संदेश बोलतोय म्हणून.

      "बाबांना नसेल बोलायचं तर राहू दे... पण खरं तर दोघांना सांगायला फोन केलाय आज. आम्हीं दोघांनी विचार करुन दत्तक मुलगी घेतली . पाच महिन्यांची आहे. नाव पण ठेवलंय चित्रा म्हणुन.. बाबांना सांग.. आम्हाला मूल होणार नाही... अशक्यच आहे... असं निर्वाणीच डॉक्टरांनी सांगितल्यावर आम्हीं मुलगी दत्तक घेतली म्हणुन." मग पुढं जास्तं बोलणं झालं नाही. फोन ठेवला गेला. आईने मग लगेचच नवऱ्याला कळवून टाकलं.

     त्याच दिवशी संध्याकाळी संदेश रुपाली दाम्पत्याच्या घराची बेल वाजली. दार उघडताच समोर आई बाबा दोघं उभे. "अभिनंदन. ... कुठं आहे आमची नात...?" दोघं उतावीळ झाले होते. संदेश आनंदला. शेवटी एकदाची कोंडी फुटली तर.... याची तोही वाट बघतच होता बिचारा. रुपालीन अगत्याने आपल्या सासू सासऱ्यांचे स्वागत केलं. आईने टेबलावर मिठाईचा बॉक्स ठेवला. बाबांनी काहीतरी मोठी वस्तू कागदात गुंडाळून आणली होती. त्यांनी कागद काढून रहस्य खुले केलं. तो होता त्यांनी स्वतः बनवलेला लाकडी घोडा. संदेश च्या लहानपणी त्यांनी बनवलेला अगदीं तस्सा. ... मागेपुढे  डोलणारा... होय...

 'मासूम' पिक्चर मध्ये जुगल हंसराज... आणि छोटी उर्मिला म्हणतात बघा ते गाणं..'लकडी की काठी... काठी का घोडा' अगदीं सेम. तो घोडा बघताच संदेशला अश्रू अनावर झाले. बाबांच्या पायावर त्यानं डोकं ठेवलं.

      "संदू... तुझ्याशी भांडलो त्या दिवशी घरी आलो आणि शरीराचा एक अवयव निकामी झाल्या सारखं झालं.... मी उगाचच आमची इच्छा तुझ्यावर लादत होतो... रुपालीला काय वाटेल... तुला किती त्रास होतोय.. आम्हीं विसरलोच बघ...."  बाबा गलबलून बोलले.

      "हा घोडा तयार केलाय मी माझ्या नातीसाठी. जेवढं आयुष्य बाकी आहे ते माझ्या नातीसोबत खेळत बसणार मी.." बाबा लहान झाले होते मनानं आता.

        "बाबा काहीतरीच काय बोलता... चित्राचे सगळे लाड आजी आजोबा शिवाय होतील तरी का?" रुपाली म्हणाली.

      "अग हो... पण बाईसाहेब आहेत कुठं?" बाबा मनापासून हसत म्हणाले.

        रुपालीने मग बाबांच्या हातात पाच महिन्याच्या चित्राला दिलं.

       "रुपाली... आम्हीं जुनी माणसं. आपली नातवंड आपल्या मुलांच्या  रक्तामासाचीच हवी अशा बुरसट विचारांची ... त्यामुळं काही भलेबुरे रागाच्या भरात काही बोलून गेलो असू तर आम्हाला माफ कर.. " बाबा बोलले.

      "बस् बाबा... आता बोलण्यात वेळ घालवू नका... चित्रा भराभर मोठी होत जाईल... तिच्यासाठी बरीच खेळणी तयार करायची आहेत तुम्हाला... तुम्हीं केलेल्या घोड्यावर बसायला वेळ लागेल तिला... त्या आधी हातात धरायची सुंदर बाळ खेळणी करायला हवी".... संदेश हसत म्हणाला आणि मग सारे घर हास्यात न्हावून गेलं.

✍️ योगेश साळवी

वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post