गोलूमोलू

 #गोलूमोलू

✍️ बीना बाचल

अमू म्हणजे सर्वांची लाडकी अमिता, आज लग्न होऊन आपल्या सासरी निघाली होती. घरचेच काय अगदी कॉलनीमधले सगळे लोक तिला निरोप द्यायला आले होते. अमू होतीच तशी गोड. सर्वांना जीव लावणारी. सगळयांच्या मदतीला धावणारी,अगदी निरागस.. एक वजन सोडले तर नाव ठेवायला जागाच नव्हती तिच्यात.. कारण ही तसंच, अमू म्हणजे दिलं कोणी हातावर की तिथेच गट्टम करून टाकायची!! खाण्यावर प्रचंड प्रेम होतं तिचं. खाण्याच्या बाबतीत कोणाचेही मन मोडायची नाही. आई तर रागावून दमली होती, 'बये, अग ह्या वाढत्या वजनाने लग्न कसं ग जमणार तुझं, जरा तोंडावर आवर घाल.. पण नाही, अमूला कोपऱ्यावरच्या पाणी पुरीवाल्यापासून मार्केटमधल्या गोड मिट्ट जिलेबीपर्यंत, मधल्या आळीतल्या डेअरीमध्ये मिळणाऱ्या मलई श्रीखंडापासून ते वासू नानांच्या मुदपाकखान्यात तयार होणाऱ्या तोंडली भातापर्यंत अगदी कशाचं म्हणून वावडं नव्हतं!! अगदी  अस्सल खवय्यासारखी आडवा हात मारायची, प्रत्येक पदार्थावर!! पण त्यामुळे वजनाचा काटा कायम पुढे...बरं इतके वर्ष चालून गेलं.' अमू आपली अगदी खात्या पित्या घरची दिसते नाही'. ह्या बोलण्यामागचा टोमणा तिच्या आईच्या जिव्हारी लागायचा. मग पुढचे चार दिवस अमूचं डाएटिंग सुरू व्हायचे. आई तिला काही म्हणजे काही अबर चबर  खाऊ द्यायची नाही, पण दिवस अखेर तिचा सुकलेला चेहरा पाहून आईलाच वाईट वाटे मग तीच अमूच्या आवडीचं काहीबाही बनवायची की अमू अगदी खुलायची. अमूचे बाबाही मग अमूचीच बाजू घ्यायचे. 

"जाऊ दे ग, किती काळजी करशील ,असेल अमू च्या नशिबात तो मिळेलच की तिला.शेवटी शरीरापेक्षा मनाची सुंदरता महत्वाची!! आणि आपल्या अमूकडे ती भरभरून आहे तेव्हा काळजी नको." झालं...बाबा असं म्हणायचा अवकाश अमू मग सुटलीच समजा.


पण जशी अमू कॉलेजला जाऊ लागली, तेव्हा कॉलेजमधले सगळे मित्र-मैत्रिणी तिला तिच्या जाडीवरून चिडवायचे. वरवर अमू ते हसत हसत ऐकून घ्यायची पण खोलवर वाईट वाटायचं तिला की आपणच का बरं असे 'गोलुमोलू'! , पुढच्याच क्षणी अमू सगळं विसरून जायची आणि सगळ्यांसोबत कँटीनकडे वडा-पाव किंवा असंच काही अबर चबर खायला धावायची. 


       पण एक दिवस कॉलेज मध्ये एक new admission झालेला अमर दाखल झाला आणि कॉलेज कट्ट्याचा रंगच पालटला!! सगळ्या मुली अमरवर लट्टूच झाल्या, एकदम handsome hunk वगरे म्हणतात तसाच होता तो!!  अमूला देखील तो खूप आवडला होता. तिने तसे तिच्या मित्र मंडळीत सांगताच एकच हशा पिकला, अमर, अमूकडे चुकून तरी बघेल का, काहीही काय!!  अमू, तू आपली खाण्याकडे लक्ष दे, अमर वगैरे राहू देत ,तुला नाही जमणार ते.असल्या खोचक बोलण्याने अमूला खूप वाईट वाटत होतं, पण सांगेल कोणाला?


अशीच एकदा अमरची आणि तिची समोरा समोर गाठ पडली. त्याचे ऍडमिशन उशिरा झाल्यामुळे तो notes च्या शोधात होता. अमूने अर्थातच त्याला लगेच मदत केली, आपल्या नोट्स दिल्या. त्या देताना तिच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की त्याला ती ऐकू जाते की काय असे वाटले तिला. 


पुन्हा दोन दिवसांनी अमर त्या नोट्स परत करायला भेटला,तेव्हा त्याने अमूला नोट्स साठी thank you म्हटले, अमूला चुकून 'I love you ' म्हणाला की काय असे वाटले!! मग पुढे काही न काही कारणाने ते भेटत राहिले. अमू त्याच्या एवढ्याशा भेटीने दिवसभर तरंगत राहायची, इकडे अमरला मात्र त्याचा पत्ताच नव्हता.


अमू ही आता इतर मुलींसारखे छान राहू लागली होती, ती इतकी गोड दिसायची की सगळे येऊन तिचे गोबरे गाल ओढायचे. अस्सा राग यायचा तिला की बस्स' मला गोड नाही दिसायचं, मला इतर मुलींसारखं hot दिसायचंय , नाहीतरी गोड गोलुमोलू मुलींकडे कोण बघतय, सगळे अशा छान फिगर असणाऱ्या मुलींकडे च तर बघतात!!' अमूने अगदी पण केला आता ,बस्स आता मी वाट्टेल ते झालं तरी बारीक होणारच, अमरला मी आवडायलाच हवी. कित्ती छान आहे तो, मला तोच हवा दुसरं काही नको'. तिच्या ह्या खुळामुळे घरातली माणसं ही चक्रावुन गेली , अमू आणि चक्क तुपातला शिरा, ओली भेळ, सामोसे असल्या गोष्टींना नाही म्हणतेय म्हणजे अमूला नक्कीच बरं नाहीये, हिला डॉक्टरकडे न्यायला हवी. सर्वजण अगदी शेजारी पाजारी ही तिची चेष्टा करू लागले होते . अमूच्या आईने तर न राहवून तिची दृष्टच काढली, 'कोणी मेल्याने माझ्या गोड पोरीला नजर लावली कोण जाणे!!' सगळ्यांच्या तर्क वितर्काना उधाण आलं होतं.


अशातच एक दिवस कॉलेजमध्ये एक ब्युटी काँटेस्ट जाहीर झाली. बऱ्याच मुलींनी भाग घ्यायचे ठरविले. अमू ही फॉर्म भरायला गेली. तिथे जमलेल्यांची हसून पुरेवाट झाली. 'अमू ही ब्युटी काँटेस्ट आहे, लाडू खायची स्पर्धा नाही काही!' खूप काही ऐकवलं तिला सगळ्यांनी पण ती मागे हटली नाही. तिने भाग घेतलाच.


अमू खूप आत्मविश्वासाने वावरली स्पर्धेत, योगायोगाने तिला judges ने प्रश्न विचारला की खरं सौन्दर्य काय आहे? तिनं ही उत्तरं दिलं,  'की ज्या अर्थानं तुम्ही मला इथे पाहताय त्या अर्थी सौन्दर्य हे नक्कीच शारीरिक सौन्दर्यापेक्षा पुढचं काहीतरी आहे. तुम्ही इतरांशी कसे वागता, त्यांना कसे समजून घेता, इतरांना त्यांच्या अडचणीत कशी आणि किती मदत करता ह्या प्रत्येक गोष्टीत सौन्दर्य दडलेलं आहे. लहान सहान गोष्टीत, अगदी आपल्याला आवडणारा पदार्थ खाण्यातही एक सौन्दर्य आहे!! तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या उत्तराने तिला पहिले नाही पण किमान उत्तेजनार्थ बक्षीस मिळवून दिले. त्यातही ती इतकी खुश होती की तिला वाटलं आपण जगत सुंदरी वगरे झालो की काय!! ती छोटीशी ट्रॉफी नाचवत अमू घरी निघालीच होती तेवढयात अमर येताना दिसला तिला. मग काय 'दिल की धडकन' वगैरे म्हणतात ती वाढली तिची. त्याने तिचे अभिनंदन केले. तिला ते त्या ट्रॉफीपेक्षा ही भारी वाटले एकदम!! काही कळायच्या आतच अमरने तिच्या समोर एक टपोरा गुलाब धरला आणि म्हणाला, 'अमू अग गेले कित्येक दिवस तुझ्याही नकळत पाहतोय मी तुला, तू खरंच वेगळी आहेस, तुझं ह्या जगण्यावर भरभरून प्रेम आहे. हा खादाड आहेस थोडी पण चलता है, तू नाहीयेस इतर मुलींसारखी स्लिम ट्रिम ,पण मला ही त्या कचकड्याच्या बाहुल्यांपेक्षा तुझ्या सारखीच एखादी गोलुमोलू मैत्रीण हवी होती पूर्ण आयुष्य जगण्यासाठी, जी अगदी मनापासून प्रेम करणारी असेल मग ते माझ्यावर असो की बुंदीच्या लाडवावर!!'


अमूला तर चक्कर यायचीच बाकी राहिली होती, ती ऐकतेय ते खरंय की स्वप्न...


यथावकाश सगळ्या गोष्टी जुळून आल्या, आणि अमर-अमूचे लग्न छान पार पडलं, हा आता लग्नाच्या जेवणावळीत लाडू, श्रीखंड, गुलाबजाम, जिलेबी..........सगळं सगळं होतं हे वेगळं सांगायला नको!😊


✍️ सौ. बीना समीर बाचल


वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 


1 Comments

  1. हे असं दुसऱ्यासाठी, त्याचं प्रेम जिंकण्यासाठी आपल्यातले न्यूनगंड दूर करण्याचा फॉर्म्युला 50 वर्षांपूर्वीच मागे पडलाय. नवीन काहीतरी विषय शोधा. चांगले, वास्तव ....

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post