परकी

 परकी

✍️ सोनाली जाधव 

सीमा आणि तिचे कुटुंब खेड्यात राहणारे होतें.

सीमा ,आई वडिल, आजी , मोठा भाऊ ,भावाची बायको रखमा, एक लहान भाची. सुखी समाधानी कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह चालवणारे.

गाई गोठा, शेळ्या,कुत्रा मोती ,पक्षी,असा सगळा लवाजमा होता.

सीमाला तिची गाय , बकरीचे पिल्लू सगळे खूप प्रिय होते , त्यांच्याशी ती तासतास गप्पा मारत बसत.

जे कुणाला ही सांगता येत नाही ते सगळ इथे बोलता येत होते.

भाऊ कमी शिकलेला जवळ पास अडाणीच. वहिनी पण अशिक्षितच होती.पण सीमावर त्यांचा खूप जीव होता. पोटाच्या पोरीप्रमाणे ते तिची काळजी करायचे. सीमा पण तशीच होती, सालस, गोड, आणि प्रामाणिक.

भाऊ स्वतः जरी शिकला नसला तरी त्याने बहिणीने तरी शिकावं म्हणून फार कष्ट केले .

आता सीमा वयात आली होती , तिच्या लग्नासाठी योग्य मुलाची  शोधाशोध सुरू झाली होती.

लग्न विषय म्हणजे मुलीसाठी फार असमंजसचा टप्पा असतो. आयुष्यभराचा जोडीदार मिळणार म्हणून आनंद ही होत असतो आणि आपल्या परिवारास सोडून दूर जावं लागेल याच वाईट ही वाटत असत. या अवस्थेतून प्रत्येक मुलगी जाते . सीमाच पण असच होत होतं. क्षणात ती खूप खुश होऊन जायची तर क्षणात डोळ्यातून धारा वाहयला लागायच्या. आजीच्या खुशीत जाऊन पडून राहणं हा तिचा आवडता उपक्रम आजी तिची खास मैत्रीण होती.

एकदा तिने आजीला विचारले, "आजी अस लग्न बिग्न करून खरंच का ग माणूस सुखी होतो? मुलींनाच का अस घर सोडून जावं लागतं ग? मुलगा का येत नाही मुलीकडे ?" तिचे प्रश्न ऐकून आजी हसू लागली 

"येडी ग पोर माही,अस कधी व्हतं का पोरी , बापडा माणूस कसा काय येईल ग सासरी राहायला  आपल्यालाच बघ जावं  लागत. परंपराच हाय तशी, मुलगी काय शेवटी परक्याच धन असत बघ. शेवटी नदीले समुंनद्रामधी जावंच लागत पोरी. धनी बिगैर बाईच्या आयुष्याला काय बी किमंत नसते बघ,"
आजीच्या बोलण्याचा सीमाला  रागच आला. "हे काय आता धनी वैगरे , मी काही परक्याच धन नाही मी तुमची मुलगी आहे आणि राहणार मला माझं घर खूप प्रिय आहे. मला माझी माणसं खूप प्रिय आहे आजी. मला नाहीं जायचं कुठेच ,"अस म्हणत ती आजीला बिलगली.

आजीने पण तिच्या निरागस प्रश्र्नाना उत्तर दिलं नाही आणि पदराने डोळे पुसले.

आजी मनातल्या मनात, "काय करते पोरी बाईच आयुष्य उधारीच असत ग , तिचा स्वतः वर काही हक्क नसतो ग. हे देवा पांडुरंगा मह्या नातीला चांगला नवरा भेटू दे"

आणि तो दिवस पण उजाडला जेव्हा शहरातून एक शिकलेला,सुंदर ,सरकारी नोकरी असलेला मुलगा तिला बघायला आला.  सगळ अगदी मनासारखं झालं. सीमाच्या आई वडिलांनी त्यांच्या सगळ्या अटी मान्य केल्या आणि सुपारी फुटली.

सीमा पण शिकलेली होती सुंदर होती , तिला पण नोकरी करण्याची इच्छा होती . पण या सगळ्यात तिचे मत कुणी विचारलंच नाही. आई आजीने सीमाच्या डोक्यावरून हात फिरवत कडा कडा बोटं मोडली,

"लई नशीब काढल पोरी अगदी सोन्यासारखं स्थळ मिळालं ग बाय माझे "

आजीने लगेचच तिची मीठ मिरच्यांची नजर उतरवली.

वहिनी पण चेष्टा करायला लागली,  "काय मग वन्स आता काय मग तुम्ही तर आम्हला विचारायच्या पण नाही बाई 

लई भारी गडी हेरला तुम्ही ,"अस सगळ बोलून तिची सगळे चेष्टा करायला लागले.

ती पण वर वर खुश आहे अस दाखवत होती पण मनात विचारांचे युद्ध सुरू होते.

सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या भला मोठ्ठा हुंडा , आदर सत्कार , भेटी, आहेर अस सगळ करून झाल एकदाच  सीमाच लग्न.

 आता पाठवणीचा क्षण जवळ येत होता तसा सीमाला आज पहिल्यांदाच दुर होण्याचा साक्षात्कार होत होता.

 आई , आजी,वहिनी,भाची, आजू बाजूच्या बायका, मैत्रिणी,नातलग ढसा ढसा रडतं होते. सीमाच्या डोळ्यातून पण पाणी घळा घळा वाहत होते. दूर उभे तिचे बाबा आणि भाऊ लपून रडत होते.

 सगळा परिसर अगदी ओलाचिंब झाला होता.

  आजीने तिला जवळ घेतले तोंडावर हात फिरवत म्हणाली, "पोरी सासरच आता तुझ घर आहे , सुखाने नांद ग बाय माझी"

 आईने पण "पोरी आई बापाची सोबत इथ पर्यंतच होती आता सासू सासरे च तुझे माय बाप आहेत. त्यांच्या शब्दापुढे जाऊ नको , नवरा तुझा धनी आहे मालक आहे त्यांना कधी दुःखी करू नको."

 

 वहिनी,  "वन्स या गरीब भाऊ भावजयला विसरू नका , तुमची लई याद येईल बघा."

 

 लहान भाची तिला आत्या नको ना जाऊ मला सोडून म्हणून रडू लागली.

 भाऊ आणि बाबा 

  सीमा पोरी खानदानची इभरत तुझ्या हाती आहे , पोरी समद्यांची काळजी घे."

 सीमा गाईच्या गोठ्यात जाऊन मनसोक्त रडली, तिच्या गायी, बकऱ्या , जोर जोराने ओरडत होत्या जणू काही तिला जाऊ नको म्हणून विनवत होत्या , माणसाला ही लाजवतील अश्या अनमोल आणि असाधारण प्रेमाची प्रचिती या प्राण्याच्या निस्वार्थी प्रेमातून येत होती.

 

 सगळा कार्यक्रम आटपला , सीमा गाडीतून बसून निघाली होती तेव्हा तिच्या नजरा सैर भैर कुणाला तरी शोधत होत्या. दूर एका झाडाआडून तो तिला बघत होता, डोळे पुसत होता .

 

 सीमा सासरी पोहचली होती.

 नववधुच स्वागत झाले, थट्टा मस्करी झाली ,

 सीमा अनोळखी नजरेने सगळीकडे पाहत होती.

  सासरची सगळी मंडळी शिकलेली होती , घर पण फार मोठं होत होतं,पण घरात एक कुत्रा सोडला तर एकही प्राणी नव्हता.

 सगळ खूप वेगळं होत तिच्या घरापेक्षा, बसायला खाट नाही मोठे मऊ सोफे होते. प्रकाशासाठी दिवा नाही मोठी मोठी झूमर लावले होते. अंघोळीसाठी न्हाणीघर नाही तर आधुनिक पद्धतीचा सुसज्ज बाथरूम होता.

 जो तो आप आपल्या खोलीत झोपत होता , आईच्या मायेच्या उबदार घोधड्या नव्हत्या महाग अश्या गाद्या आणि चादरी होत्या.

 सीमा मनात,  "एवढं सगळ जर होते, तर माझ्या आबाकडून कश्याला हुंडा घेतला , बिचारा माझा आबा शेती गहाण ठेऊन लग्न लावलं माझं त्यानें, किती हावरट असतात ही श्रीमंत लोक."

 सासूच्या हाकेने तीची तंद्री तुटली.

  "अग सीमा काय विचार करते ग, ये आत मधे. "
सगळ तिच्यासाठी खूप नवीन आणि वेगळं होते.

 एक भीती मनात सतत होती कुणी काही बोलणार तर नाही ना , माझ्याने काही चूक तर होणार नाही ना ,अश्या भीती मधेच ती सतत वावरत असायची , घरात सासू सासरे,नवरा मोठे जेठ ,जाऊ , नणंद आजी सासू असे सगळे लोक होते.

 एक सासू बाई , आणि आजी सासूच फक्त तिच्याशी बोलायचे बाकी घरातले कुणी जास्त बोलत नसायचे. एक परकेपणा तिच्या मनाला नेहमी जाणवतच असायचा. नवरा चांगला होता, पण कामातच व्यस्त असायचा नेहमी. आज जवळपास महिना होत आला होता तिच्या लग्नाला. घरची खूप आठवण येत होती तिला तिने सासू बाई ना आणि नवऱ्याला विचारल , माहेरी जाण्यासाठी.

 एका ड्रायव्हरला सांगून तिला माहेरी सोडलं.

  जशी ती गाडीतून उतरली तसे सगळे गावचे लोक तिच्या आजूबाजूला जमले. तिला बघून आई , आजी सगळ्यांना खूप भरून आले. आजीने मीठ मिरचीने नजर काढली आणि तिला घरात घेतल. भावाला आणि बाबाला शेतात निरोप गेला. सीमा आली म्हणून. भाची लहान मूल तिच्या आजू बाजू फिरू लागली.वाहिनीने लगबगीने खाट टाकली आणि नवीन चादर त्यावर टाकली.नव्या ग्लासात पाणी दिलं.

 बायकाने फार गलका केला विचारून विचारून पार तिला .

 सगळ घर कसं भरलेलं भरलेलं दिसत होत. हेच ती कित्तेक दिवसा पासून मिस करत होती.

  सगळे लोक आपआपल्या घरी गेले   मग वहिनीने नव्या कप बशीचा सेट काढला आणि फक्त तिला च त्यात दूधाचा चहा दिला. हे सगळं वागणं तिला कुठे तरी खटकत होत .

 भाऊ आणि वडिल येताना तिच्यासाठी गोडधोड घेऊन आले. या सगळ्या गोंधळात तिला मात्र ती कशी आहे हे कुणी विचारलच नाहीं. रात्र झाली, जेवणाच ताट  समोर बघून तिला रडायला येत होत. सगळ्यांना काही कळेना काय झालं म्हणून. त्या ताटात आज सगळे चमचमित पदार्थ होते. तिला आवडणारे ठेचा भाकरी कुठेच नव्हती  तिला अस रडताना बघून आईने विचारल, "सीमा बेटा काय झालं अजून दुसरं काही हवं आहे का आमचं काही चुकल का बेटा", अस म्हणत तीने तिला जवळ घेतल.

 "नाही आई खूप दिवसांनी भेटले ना मी तुम्हा सगळ्यांना म्हणून रडायला आल ग."

 

  सगळ्यांची जेवणं आटोपली तशी तिने भांडी घासायला घेतली तर आई आणि वहिनीने तिला रागवल, "अहो वन्स हे काय करताय , उठा बघू , तुम्ही आता पाहुण्या आहात अस भांडी घासायला देईल का मी तुम्हांसनी, उठा बघू , तुमचे भाऊ रागवत्यला मला."

 पाहुणी शब्द ऐकून तिच्या मनाला चर्र झालं.

 

 रात्री झोपताना तिला गादी,नवीन चादर फक्त तिच्यासाठी पंखा अस सगळ आयोजन केलं गेलं. हे सगळ बघून तिचं मंन अधिकच व्यथित होत  होतं.

 रात्र भर झोप येईना. तिने उठून एकदा सगळ्या घराकडे नजर फिरवली. सगळे शांत निवांत झोपले होते. आज पहिल्यांदाच तिला हे घर परक असल्यासारखं  जाणवत होते.

 आजीची कुशी ,आईचे धोपटने सगळ काही कुठ तरी हरवलंय अस वाटत होते.

  सकाळी ती लवकर उठली , तर आईने तिला जबरदस्ती झोपायला सांगितल. एरवी तिला नेहमी उशिरा उठण्यावरून बोलणी भेटायची पण आई तिला आज झोप म्हणते आहे, का बरं अस सगळ होतय हेच तिला कळेनासे झाले होते. अंघोळीला गरम पाणी आयते, नवा साबण,  नवा रुमाल , शाम्पू अस सगळ ती पहिल्यांदाच इथे बघत होती. थंडगार पाणी ,बेसनच पीठ , शिकेकाई हे सगळ कुठे हरवलं. हे सगळ फक्त तिच्यासाठीच केलं जातं होत. हा विशेष अतिथीचा सन्मान तिला बोचत होता.  पाउलोपाऊली ती आता पाहुणी आहे, परकी आहे हेच भासवत होता.

 अंघोळ करून ती सरळ गाईच्या गोठ्यात शिरल.  तीची गाय , बकरी ,मांजरी, कुत्रा सगळे जणू तीचीच वाट बघत होते. त्यांना बघून तिचे डोळे भरून आले, आतापर्यंत दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला . गायीच्या गळ्यात पडून ती ढसा ढसा रडली. गाय पण तिला चाटू लागली. माऊली तु पण मला परक केले का ग? माझं लग्न झालं म्हणजे मी परकी झाली का ग? म्हणत तु गाईच्या गळ्यात पडुन रडु लागली. ह्याच प्रेमाला ती आसुसली होती. तिने गोठा साफ करायला घेतला तेवढ्यात भाऊ तिकडून आला. तिच्या हातून झाडू घेत बायकोला हाक मारू लागला ,"रखमा ये रखमा."

 रखमा तिकडून धावत आली, "काय झालं जी"?

  "काय? झाल काय ,?बघ माझी बहिण गोठा साफ करतेय आणि तू काय करतेय."
सीमा म्हणाली, "अरे दादा करू दे की. आधी पण ही सगळी कामं मीच करत होती की."

 "अग आधीची गोष्ट वेगळी होती , तू आता पावणी आहेस सोड बर तो झाडू". रखमाने झाडू हातात घेतला व तिला बोलायला लागली "काय वन्स तुम्ही बी बसा की जरा शांत. तुमचे भाऊ बरोबर म्हणता आहे .अस कुणी पावण्याला काम सांगत का? "

 सीमाला आता सगळ असहनिय होत होते. तिने तडक नदीचा रस्ता धरला. रस्त्यात बायका तिचा थाट बघून कौतुक करत होत्या.

 तिला हे सगळ नको होते. तिला आधी सारखीच वागणूक का दिली जात नाही हेच कळत नव्हत  सासर श्रीमंत होते पण सीमा तीच होती आधीची. तिच्या चेहऱ्यावर श्रीमंतीचा लवलेश ही नव्हता .

  त्या सगळ्या गोंधळातून निघून ती निवांत नदी काठी येऊन बसली होती. तेवढ्यात तो आला त्याला बघून खर तर तिला खूप आनंद झाला होता.

 "कशी आहेस ?त्याने विचारले.

 "ठीक आहे" सीमा बोलली.

 "ठीक ,तू तर खूप खुश दिसते आहेस ,हो म्हणा असणारच ना एवढे श्रीमंत सासर मिळाले म्हंटल्यावर खुश का नसनार तु "?

 त्याचा टोमणा पार मनाचे तुकडे तुकडे करून गेला .

 

  तसाच तिचा फोन वाजला तिच्या नवऱ्याचा तिकडून आवाज आला "काय मॅडम आमची आठवण वगैरे येते की नाही "?
त्याचा आवाज ऐकून तिला रडू कोसळले. पण स्वतःला सावरत तिने सांगितल, "मला घ्यायला या मला तुमची खूप आठवण येतेय,आजच या ."

 तिचे हे शब्द ऐकून तो निघून गेला .आणि ती रडत रडत नदीच्या प्रवाहाकडे एकटक बघत राहिली.

समाप्त

कथा कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा.

 ✍️ सोनाली जाधव

वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post