पुन्हा एक दिवस प्रेमाचा

 पुन्हा एक दिवस प्रेमाचा  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ कविता वायकर 

दारावरची बेल वाजली, "अरे देवा, आता आणि ह्यावेळी कोण आलं असेल? अनुराधा मनातच विचार करु लागली. 

"अनुरागचं कुरिअर आलं असेल बहुतेक. मला सांगायला विसरला असेल तो." विचारांतच मग तिने हातातील भांडी तशीच ठेवत साबणाचा हात धुतला. पदराने हात पुसतच ती दारापर्यंत आली आणि तिने दरवाजा उघडला. 

पाहते तर काय? समोर अनुराग. 

"अरे आज सुट्टी घेतली की काय? पण दुपार पण नाही झाली अजून. हाफ डे तरी करायचास ना रे. सगळं ठीक ना? काही दुखतंय का?"

अनुरागच्या कपाळावर हात ठेवत अनुराधा बोलली.  

"नाही, ताप तर नाहीये. तू पण ना. घाबरले ना मी. मग झालं तरी काय? का आलास असा ऑफिस अर्धवट सोडून मधेच? "

"अगं किती प्रश्न अनु, थोडा श्वास तरी घे. आणि मी माझी फाइल विसरलो होतो, तीच घ्यायला आलोय."

"मग फोन करायचासना. मी पोहोचवली असती फाईल कशीपण. नाहीतर मीच घेवून आले असते. मागच्या वेळी एकदा आलेच होते की."

"त्याची काही गरज नाही. मला वाटलं आज बायकोला भेटावं म्हणून आलो घरी. तुला काही प्रॉब्लेम?"

"आता मला काय प्रॉब्लेम असणार. उलट मला एक फोन केला असता तर तुझा विनाकारणचा हेलपाटा वाचला असता, म्हणून म्हटलं." 

"पण तरी असं अचानक बायकोला भेटण्याची इच्छा वगैरे..नक्की झालंय तरी काय हा? भुवाया उंचावत अनुराधाने त्याची खेचायला सुरुवात केली. 

 "तू पण ना एकदम माठ आहेस अनु. कधी समजणार ग तुला काही गोष्टी?"

एका हाताने तिचा गाल ओढत लाडिकपणे अनुराग बोलला. 

"आणि तसंही माझ्या बायकोला भेटण्यासाठी कोणाच्या परमिशनची गरज आहे का मला?"

अनुराग आज वेगळ्याच मुड मध्ये दिसत होता. दरवाजातून आत येताच त्याने दार ढकलले आणि अलगद कडी पुढे सरकवली. त्याची ती नजर मात्र अनुराधाला घायाळ करत होती. हळूहळू सारं ध्यानात येत होतं तिच्या.

"बरं जाणार नसशील ना पुन्हा तर कपडे चेंज करुन घे मी पाणी आणते तुझ्यासाठी." 

सारं काही कळूनही न कळल्याचा आव आणत नजर चोरतच अनुराधा बोलली. 

पाणी आणण्यासाठी म्हणून ती पाठमोरी फिरली, तोच अनुरागने तिचा हात घट्ट पकडला. तशी ती शहारली. पाठमोऱ्या अनुला आपल्या बाहुपाशात घेत काही क्षण तो तसाच उभा राहिला. त्याचा उबदार श्वास तिच्या मानेवर पडत होता. तीही मग त्याच्या श्वासात हळूहळू विरघळत होती. आजच्या त्याच्या त्या स्पर्शात काहीतरी वेगळीच जादू होती. कित्ती दिवसांनी असा एकांत मिळाला होता दोघांनाही. हा योग मात्र अनुरागने मुद्दामहून जुळवून आणला होता. प्रेमाची ती मिठी सुटता सुटेना दोघांनाही. 

"क्षणात भानावर येत अनु म्हणाली, अरे काय झालं अनुराग? काहीतरी बोल ना. असं कितीवेळ इथे उभं राहायचं?

"अनु प्लीज यार, काहीच बोलू नकोस ना थोड्या वेळासाठी. अगं ह्या मिठीसाठी मी किती तसरलो होतो, तू नाही समजू शकणार. तुला आजकाल मुलांशिवाय दुसरं काही दिसतं का? आणि मी तर अजिबातच नाही."

बोलता बोलता त्याने आपले ओठ तिच्या मानेवर टेकवले. तशी अनुराधा झटकन फिरली नि त्याच्या छातीशी घट्ट बिलगली. लाजेने ती गोरीमोरी झाली होती. प्रेमाचा गुलाबी रंग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.तिच्या हातातील बांगड्यांची किणकिण अनुरागला आणखीच वेड लावून गेली. 

दोघांच्याही लग्नाला आता दहा वर्षे उलटून गेली होती. पण अजूनही प्रेमाची ती जादू कायम होती बरं का. आणि त्याचे विशेष कारण म्हणजे दोघांनाही कधी एकांत मिळालाच नाही. ठरवूनही कधीच कोणता प्लॅन सक्सेस व्हायचा नाही. घरात मुले, आई बाबा, अधून मधून नणंदा यायच्या. त्यामुळे दोघांच्याही नात्याला आवश्यक असा पुरेसा एकांत मिळतच नव्हता. लग्नानंतर वर्षभरातच पाळणा हलला. आणि मग दोघांचाही पालकत्वाचा प्रवास सुरु झाला. मोठा रियांश तीन वर्षाचा होत नाही तोच छोट्या रिषभची चाहूल, दुसऱ्यांदा आनंदाच्या गावी दोघांनाही घेवून गेली. मग अनुराधा मात्र मुलांमधे आणि संसारात इतकी काही गुंतली की अनुरागसाठी तिच्याकडे वेळच नसायचा. पण त्यात तिची तरी काय चूक म्हणा. सासू सासरे, त्यांचे पथ्य पाणी, औषधं, मुलांचे बालपण, त्यांची आजारपणं,पुढे जावून त्यांच्या शाळा, अभ्यास या साऱ्यातून ती ठरवूनही नवऱ्याला वेळ देवूच शकत नव्हती. त्याच्या सुट्टीच्या दिवशीही मुले आणि आई-बाबा घरातच असायचे. कुठे बाहेर गेलं तरी मुलांकडे लक्ष देण्यातच सगळा वेळ निघून जायचा. आणि मुलांना आई बाबांजवळ सोडून दोघांनीच बाहेर जाणं, दोघांनाही पटायचं नाही.

त्यामुळे प्रेमाने कधी जवळ बसून गप्पा नाही की हातात हातात घेण्याचीदेखील सोय नाही. दिवसभर थकल्यानंतर रात्रीचा एकांत अनुभवायचे म्हटले तर झोप आडवी यायची अनुराधाला. अनुराग मात्र खूप समजून घ्यायचा तिला. आणि त्याच्या या समजूतदारपणामुळेच आजही लग्नाच्या दहा वर्षांनंतरदेखील दोघांचेही नाते आनंदाने बहरत होते. एकाच छताखाली, रोजच समोरासमोर असूनही म्हणावी तितकी प्रायव्हसी दोघांनाही मिळत नव्हती. नजरेची भाषा नजरेला समजायची पण दोघांचाही नाईलाज होता. रीयांश जरी आता थोडा मोठा झाला असला तरी रिषभ मात्र क्षणभरही आई बाबांना एकटं सोडायचा नाही. रात्रीदेखील तो अनुराधाला घट्ट बिलगून झोपायचा. त्यामुळे अनुराधा काही अनुरागच्या वाट्याला यायचीच नाही. मधल्या काळात एकत्र असूनही नात्यात खूपच दुरावा आला होता दोघांच्याही. 

आज मात्र त्याने ठरवून आजचा पूर्ण दिवस बायकोसोबत घालवायचा असे ठरवले होते. आणि अनुराधासाठी हे सरप्राइज होते. असा अचानक अनुराग घरी आलेला पाहून तिचाही आनंद गगनात मावत नव्हता. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. त्यात आज घरात आई बाबाही नाहीत म्हणजे एकंदरीतच 'सोने पे सुहागा.'

क्षणभर प्रेमाच्या त्या मिठीतून मागे होत अनुरागच्या डोळ्यांत पाहून ती म्हणाली, "तुझं हे सरप्राइज मी आयुष्यभर विसरणार नाही अनुराग. असेच माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा" म्हणत तिने अलगद आपले ओठ त्याच्या गालावर टेकवले. त्याच्या कानात "लव्ह यू" असे ती पुटपुटली आणि झटकन मागे सरकली. 

अनुराग मात्र एक एक पाऊल तिच्या दिशेने पुढे येत होता. ओठांवर स्मित नि नजरेत प्रेमाची कातिलाना अदा होती त्याच्या. तो एक एक पाऊल पुढे येत होता नि अनुराधा एक एक पाऊल मागे सरकत होती. 

आता तर अनुराधा मात्र त्याच्या नजरेचा सामना करुच शकत नव्हती. एरव्ही तिला जवळ घेण्याचा त्याने प्रयत्न जरी केला तरी, "कुणी पाहील ना, आज नको ना,पुन्हा केव्हातरी, मुले उठतील, झोपूयात ना सकाळी उठायचे आहे लवकर" ही आणि अशी अनेक कारणे तयारच असायची तिची. पण आज यातील एकही कारण ती देवूच शकत नव्हती. कारण मुले तर शाळेत गेली होती आणि आई बाबा त्यांच्या लेकीकडे. म्हणजे दिवसभर तरी कोणीही येणार नाही याची खात्री होती दोघांनाही. 

तरीही पळवाट म्हणून ती बोललीच, 


"अरे बेसिन मध्ये घासलेली भांडी तशीच आहेत तेवढे धुवून येते ना पटकन्." उगीचच अनुरागला त्रास द्यायचा म्हणून, बाकी तीही खूपच आतुर झाली होती त्याच्या प्रेमाच्या त्या उबदार मिठीत वारंवार शिरण्यासाठी. 

ती बोलली तसा त्याने तिच्या कमरेचा खोचलेला पदर अलगद खेचला नि हाताची बोटे तिच्या पदराआडून डोकावणाऱ्या उघड्या पोटावरुन पुढे सरकवत कमरेची पकड अधिकच घट्ट करत तिला स्वत:च्या दिशेने त्याने खेचले.

तसे अनुराधाने डोळे घट्ट मिटले. तिच्या श्र्वासांची गती प्रचंड वाढली. अंगावर शहारे उमटले. अनुरागचा तो स्पर्श तिच्यासाठी काही नवीन नव्हता पण तरीही आज पुन्हा एकदा त्याच स्पर्शाची नव्याने तिला ओळख होत होती. हळूहळू तो तिच्या अधिकच जवळ येत होता. ती मात्र त्याच्यात एकरुप होण्यासाठी आतूर झाली होती. त्याचा तो प्रेमळ स्पर्श तिला स्वर्गसुखाचा आनंद देत होता.आज कितीतरी दिवसांनी तिने कोणताही बहाणा नाही की कुठलाही विरोध दर्शवला नाही. एरव्ही सतत आजूबाजूला कुणी ना कुणी असायचे त्यामुळे तिला कधीच मनापासून त्या सुखद क्षणांचा आनंद घेताच यायचा नाही. 

आज मात्र कोणाचीही लुडबुड नव्हती. फक्त ते दोघे आणि सोबतीला घरातील शांतता नि दोघांच्याही चेहऱ्यावर खुललेला प्रेमाचा तो गुलाबी रंग, बस~~ एवढेच पुरेसे होते त्या घडीला.

अनुराधाच्या मिटलेल्या पापण्यांवर अनुरागने अलगद आपले ओठ टेकवले. तिच्या कमरेभोवतीची हातांची पकड अधिकच घट्ट करत तिला आणखीच जवळ ओढले. तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्यालाही ती ऐकू येत होती. तिच्या श्वासांची गती देखील प्रचंड वाढली होती. श्वासात श्वास विरघळत होते. ओठांची अबोल भाषा ओठांना उलगडत होती. न राहवून अनुराधाही मग पुन्हा एकदा घट्ट बिलगली त्याला. आज कितीतरी दिवसांनी एकमेकांच्या बाहुपाशात अगदी शांतपणे विसावले दोघेही. लग्नानंतरच्या त्या पहिल्या रात्रीची दोघांनाही आठवण आली. अगदी त्याच रात्रीचा फील आला तत्क्षणी दोघांनाही. तोच स्पर्श, तोच अनुभव आज नव्याने अनुभवत होते दोघेही राजा राणी. इतक्या दिवसांची एकमेकांची ती ओढ आज खरा आनंद देत होती दोघांनाही. न बोलताही मनातील आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. प्रणयाचे खरे सुख काय असते? ते विरहात बुडालेली दोन मनेच उत्तमरीत्या जाणू शकतात. आणि सद्ध्या अनुराधा आणि अनुराग दोघांनीही त्या परमोच्च सुखाचा खरा आनंद उपभोगला होता.  

एकमेकांच्या सोबतीत वेळ कसा जात होता ते दोघांनाही समजत नव्हते. प्रेमाच्या मिठीतील तो ओलावा दोघांच्या नात्याची वीण अधिकच घट्ट करत होता. 

खरंच नवरा बायकोच्या या नात्याला पुरेसा वेळ नि एकांत मिळाला की नाते अजूनच बहरते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनुराधा आणि अनुरागचे हे प्रेमळ नाते होते. 

एकमेकांना समजून घेत एकमेकांची मने जपण्यात दोघेही नेहमी पुढेच असत. आणि नात्यातील बंध अधिक घट्ट होण्यासाठी ते गरजेचेच असते हे आता दोघांनाही चांगलेच ठावूक झाले होते. तो दिवस म्हणजे दोघांसाठीही अविस्मरणीय ठरला होता. एकमेकांच्या बाहुपाशात विरघळलेली ती दोन शरीरे विलग होण्यास जणू तयारच होत नव्हती. "काही काळ घड्याळानेही स्वत:ला थांब म्हणावं." असंच काही सुरु होतं दोघांच्याही मनात. पण वेळेचे बंधन दोघांच्याही त्या उबदार मिठीच्या आड येत होते. इतक्या दिवसाची प्रेमाची भूक काही काळासाठी तरी नक्कीच शमली होती. पण तरीही प्रेमाच्या त्या अथांग सागरातून बाहेर पडूच वाटेना दोघांनाही. अनुरागची ती घट्ट मिठी अनुराधाला जन्मभराचे सुख देत होती. स्वतःला खूपच भाग्यवान समजत होती ती. पण तसेच भावनांना आवरत नि मनाला सावरत अनुरागच्या मिठीतून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी तिची धडपड सुरु होती. 



"अनु थांब ना ग थोडा वेळ. अजून दिड दोन तास तरी आहेत ना मुलांना यायला. आई बाबाही रात्री उशिरा येतील. काय घाई आहे ग एवढी? एकतर कितीतरी दिवसांनी अशी संधी मिळालीये. एरव्ही देखील कोणीतरी पाहील नि कोणीतरी ऐकेल सुरुच असतं ना तुझं. मग आज बघ ना कोणीच नाहीये. फक्त तू आणि मी. तरी कसली ग घाई करतेस एवढी? "

"अरे यार, आंघोळ करता आवरता एक तास कसा निघून जाईल काही समजणार पण नाही रे. मग पुन्हा खूप धावपळ व्हायची."

अनुरागच्या डोक्यात अचानक काय आले माहित नाही. पण अचानक तोही उठला आणि लाडीकपणे तिच्या गळ्यात हात टाकून "चल दोघेही सोबतच शॉवर घेवूयात" म्हणत तोही तिच्यासोबत बाथरूममधे जायला निघाला. 

आता तर अनुराधाचे लाजेने पुन्हा पाणी पाणी झाले. 

"अरे, रोमँटिक असावं माणसाने पण इतकं?" थोडी नजर चोरतच आणि लाजतच अनुराधा म्हणाली. 


"काय करू रे मी तुझं? बायकोसाठी अचानक अशी सुट्टी काय घेतोस, रोमँटिक मुड मध्ये घरी काय येतोस, अखंड प्रेमाचा वर्षाव काय करतोस आणि हे काय कमी म्हणून की काय आता सोबत शॉवरच्या गोष्टी पण करतोस. अजून किती सरप्राइज बाकी आहेत मिस्टर अनुराग?"


लाडीकपणे अनुरागच्या गळ्यात दोन्ही हातांचा हार घालत अनुराधा बोलली. तसं त्यानेदेखील मग दोन्ही हातांनी तिच्या कमरेभोवती विळखा घातला नि तिला स्वतःकडे खेचले. 


"तुझ्यासाठी काय पण बायको..." अलगद तिच्या कानावर आलेली केसांची बट कानामागे सरकवत नि ओठ तिच्या कानाजवळ नेत तो तिच्या कानात पुटपुटला. 

त्याच्या तोंडातील त्या उबदार वाफेने ती पुनःपुन्हा शहारली. पुन्हा एकदा स्वतःवरील कंट्रोल सुटण्याच्या आत नि त्याच्या स्वाधीन होण्याआधीच तिने स्वतःला सावरले नि त्याला मागे ढकलून धावतच मग तिने बाथरुम गाठले. तो तिच्यामागून तिथे पोचायच्या आत तिने बाथरुमची आतून कडी लावली.

"ए अनु प्लीज ना यार. येवू दे की ग मलाही आत. आठव की आपल्या लग्नानंतरचे ते सुंदर सोनेरी क्षण. महाबळेश्वरमध्ये सोबत घालवलेले ते अविस्मरणीय असे सात दिवस. पुन्हा एकदा अनुभवू दे ना ग मला. मी नाही तुला आता जास्त त्रास देणार. पण आज पुन्हा सगळ्याच आठवणी ताज्या झाल्यात तर मग याही होवू दे ना यार."

अनुरागच्या बोलण्याने अनुराधादेखील क्षणातच विरघळली. काही क्षण ती भूतकाळात हरवली. पुन्हा तेच क्षण अनुभवण्यासाठी मग तीही आतूर झाली. जास्त वेळ न घालवता तिने अलगद दार उघडले. शॉवरच्या त्या थंड पाण्याखाली पुन्हा एकदा ती दोन शरीरे काही काळासाठी एक झाली. पुन्हा एकदा लग्नानंतरचे ते सोनेरी क्षण दोघांनीही काही काळ सोबतीने अनुभवले नि हृदयाच्या कप्प्यात कायम स्वरुपी साऱ्या गोड आठवणी साठवून ठेवल्या. लग्नाच्या दहा वर्षानंतर देखील पुन्हा पुन्हा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडत होते ते दोन जीव. 

खरंच आयुष्य जगावं तर अनुराग आणि अनुराधासारखं. स्वत:चे सुख इतरत्र न शोधता पहिल्यांदा ते स्वतःच्याच जवळ शोधले तर आयुष्य किती सुंदर आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय मग राहणार नाही. 

तो एक दिवस..म्हणजे दोघांसाठीदेखील अखंड प्रेमवर्षावाचा दिवस होता. 


"कोण म्हणतं नव्याचे नऊ दिवस संपले की नवरा बायकोमधील प्रेम आटतं? उलट थोड्या विरहाने देखील ते दुपटीने फुलतं."

आंघोळ आटोपून दोघेही मग सोबतच बाहेर आले. ओल्या केसांतील अनुराधाचे ते सुंदर रूप किती डोळ्यांत साठवू नि किती नाही असेच अनुरागला झाले होते. बेडवर आडवा होवून आरशासमोर गुणगुणत टॉवेलने केस कोरडे करत असलेल्या अनुराधाकडे  एकटक अनुराग पाहत होता नि नजरेच्या कप्प्यात तिचे ते सुंदर रुप कायमस्वरुपी साठवत होता. त्याच्या चेहऱ्यावर आपसूकच मग हास्य फुलत होते. तितक्यात तिची नजर अनुरागकडे गेली. 

" बस ना यार, नको ना असा पाहूस. तुझी ती कातीलाना नजर वारंवार तुझ्याकडे खेचते मला."

"आणि तुझी कातीलाना अदा मला तुझ्याकडे खेचते त्याचे काय?"

"पण काहीही म्हण अनु, आजचा हा दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. हृदयाच्या कप्प्यात अगदी अलगद जपून ठेवेन मी आजचा प्रत्येक क्षण. आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदा तू इतकी फ्री आणि कंफर्टेबल वाटत होती माझ्यासोबत. यावरुन एक समजले की नात्याला एकांताची खरंच किती गरज असते ते. आणि आता मी ठरवलंय महिन्या दोन महिन्यातून असा एकांत हमखास शोधायचाच आणि असे सुंदर क्षण कायमस्वरुपी हृदयात साठवायचे आणि वारंवार जगायचे."

"हो रे, नात्यात हाच समजूतदारपणा गरजेचा असतो. नाहीतर मग एकमेकांसाठी वेळच नाही म्हणत कायमस्वरुपी एकमेकांपासून वेगळे होण्याचे धाडस करणारे लोक देखील या जगात काही कमी नाहीत. त्यामानाने आपण खूप सुखी आहोत. एकाच घरात, एकाच छताखाली राहून देखील विरहात देखील प्रेमाने जगतो आहोत. 


" बरं चल उठ आता. पुऱ्या झाल्या गप्पा. मुलं येतीलच इतक्यात. मी केस सुकवते पटकन्."


थोड्याच वेळात मुले घरी आली. आज त्यांच्या आधी त्यांचा बाबा घरी आलेला पाहून  मुले जाम खुश झाली.

"बाबा आज तुम्ही लवकर आलात ना घरी, मग आजतरी आईस्क्रिम खायला जावूयात ना ओ?" मुले बाबाकडे लाडिक हट्ट करु लागली.

"ओके डन," कुठलेही आढेवेढे न घेता अनुराग बोलला. तसे मुलांनी तर उड्याच मारायला सुरुवात केली. 

तेवढ्यात बाबांचा फोन आला अनुराधाच्या फोनवर,


"अगं अनु आम्ही आज येत नाही ग, उद्याच येतो. ही अनुजा ऐकतच नाहिये, काहीही झालं तरी आजच्या दिवस राहाच म्हणतीये."

" बरं बाबा चालेल, या मग उद्या." आणि अनुराधाने फोन ठेवला. 

"तेवढ्यात अनुराग बोलला, आणि मुलांनो आज फक्त आइस्क्रीम नाही बरं का तर जेवायलाच जावूयात आपण सगळे बाहेर." अनुरागच्या मनातील आनंद आज चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

"बरं अनु जावूयात ना मग बाहेर? मस्त तयार हो. एरव्ही आई बाबांच्या पथ्यामुळे जाणं टाळतो आपण. आज जावुयात. आज तरी नाही म्हणू नकोस." 

नजरेतूनच मग तिने इशारा केला, जावूयात म्हणून. आज तर अनुराधाला आभाळच ठेंगणे झाले होते. मुलांबरोबरच तिलाही मनापासून उड्या माराव्या वाटत होत्या.

छानपैकी आवरुन, अनुरागच्या आवडीची साडी नेसून ती तयार झाली. 


"आज फिर तुम पे प्यार आया हैं" अनुरागची नजर वारंवार जणू तिला म्हणत होती. 

आजचा दिवस मनासारखा एन्जॉय केल्याचे समाधान दोघांनाही मिळाले. लग्नानंतर खूप दिवसांनी नाही तर खूप वर्षांनी आजचा हा दिवस अविस्मरणीय ठरला दोघांसाठीही. मुलेही खूप खुश झाली बाहेरुन फिरुन आल्यावर.

रात्रभर मग एकमेकांच्या कुशीत शिरुन प्रेमाच्या त्या गोड गप्पांना उधाण आले. 

सख्या तूझ्या प्रेमाचा रंग,चढला रे माझ्या गाली..


तुझ्यासवे प्रीत गुलाबी,बहरली मग फुलांपरी..


तुझ्या प्रेम रंगात आज, न्हावून निघाले मी बावरी..


तुझ्या या मिठीची ऊब, राहू दे सदा माझ्यावरी..

जणू नजरेतून आणि स्पर्शातूनच दोघेही एकमेकांची मने अचूक ओळखत होते. अनुरागच्या प्रेमाच्या मिठीत अनुराधा स्वर्ग सुखाचा आनंद घेत होती. आज दहा वर्षानंतरही प्रेमाचा रंग कायम असल्याचे वेगळेच समाधान दोघांनाही स्वर्गसुखाची अनुभूती देवून गेला. 

अशाप्रकारे, पुन्हा एक दिवस सजला प्रेमाचा प्रेमासाठी. असे अजून अनेक दिवस दोघांनाही सोबतीने सजवायचे होते. आयुष्यातील मिळेल तो क्षण सोनेरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून एकमेकांच्या उबदार मिठीत शांत निजले मग ते दोन जीव.उद्याच्या वाटचालीसाठी नवीन ऊर्जा घेवून. 

समाप्त

©® कविता सुयोग वायकर

Post a Comment (0)
Previous Post Next Post