विमला (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️ कांचन अकोलकर
कॅलिफोर्निया मधील नर्सिंग होम मध्ये विमला अंथरुणावर निपचित पडली होती. तिच्या तीन मुली दोन जावयी आणि दोन नातवंडे तिच्या भोवती जमा झाली होते. थोड्या वेळाने जावयी आणि नातवंडे घरी गेली. तिघी बहिणी गप्पा मारत होत्या. विमला च्या डोळ्यासमोर तिच्या जीवनाचा चित्रपट तरळत होता.
बडोद्याच्या घरा समोरील अंगणात पाच वर्षाची विमला तिचा दादा आणि दीदी खेळत होते. तिथे शेजारी नवीन राहायला आलेला केशव आणि त्याची बहीण आले आणि आम्हाला ही खेळायला घ्या असे म्हणाले. नंतर रोजच ते पाच जण लंगडी, लपंडाव, डबा ऐसपैस असे खेळ खेळू लागले. ते एकाच शाळेत जात असत. विमला चा दादा केशव च्या वर्गात होता. केशव विमला पेक्षा दोन वर्षांनी मोठा होता.
केशव नंतर दोन वर्षांनी विमला कॉलेज मध्ये गेली. उंच गोरा केशव कॉलेज मध्ये खूप प्रसिद्ध होता. त्याच्या रुपावर मुली भाळत असतं. त्यामुळे त्याला खूप मैत्रिणी होत्या. विमला ने केशव बरोबर लग्न करण्याचा निश्चय केला होता. दोघे सतत बरोबर असतं. केशव कॅनडा मध्ये शिकायला जाणार होता. त्यामुळे अवघ्या वीस वर्षाच्या विमला ने केशव बरोबर लग्न करण्याचा हट्ट धरला. केशव ने कॅनडा मध्ये मास्टर्स साठी एडमिशन घेतली आणि डिग्री मिळाल्यावर तो विमला बरोबर लग्न करणार होता. इतक्या सुंदर मुली त्याच्या मागे लागल्या असताना त्याने आपल्याशी लग्न करण्यास होकार दिला याचा तिला खूप अभिमान वाटत होता. त्याला डिग्री मिळाली आणि नोकरीही मिळाली. तो बडोद्या ला लग्नासाठी आला.
आणि
५०
वर्षा पूर्वी विमला चा लग्न सोहळा चालू होता. लाल शालू नेसून दागिन्यांनी मढवलेली विमला खूप सुंदर दिसत होती. केशव बरोबर तिचा विवाह साजरा होत होता. दोघांचे खूप प्रेम होते एकमेकांवर! घरातील मोठ्या भावाचा या प्रेम विवाहास विरोध होता. कारण त्याला केशवचा चंचल स्वभाव माहीत होता. तो विमला बरोबर प्रामाणिक राहील याची त्याला खात्री नव्हती. तशी विमला ही सुंदर होती. पण ती केशव वर इतकी भाळली होती की तिच्या हट्टापायी हा सोहळा संपन्न होत होता.
लग्न झाल्यावर आठ दिवसातच ते दोघे कॅनडा मध्ये आले. त्यांचा हनिमून तिथेच झाला. हनिमून साठी ते नायगरा फॉल आणि टोरांटो येथे गेले. त्यांच्या खोलीतून नायगरा दिसत असे. नयनरम्य वातावरणात २२ वर्षाची विमला खुलून गेली. जणूकाही हवेत तरंगत होती. इतका हँडसम आणि नोकरी मध्ये भरपूर कमावणारा केशव! आठ दिवस एकमेकांच्या मिठीत घालवून ते टोरांटो जवळील एका मोठ्या टॉवर मधील छोट्या अपार्टमेंट मध्ये रहायला आले. दुसऱ्या दिवशी केशव कामाला गेला आणि विमला ची खरी परीक्षा सुरू झाली.
तो गेल्यावर तिला घर खायला उठले. त्या काळी घरात एक फोन होता. मोबाईल फोन अस्तित्वातच नव्हते. बडोद्यात घरी फोंन ही नव्हता. केशव गेल्यावर तिला काय करावे हे समजेना. ब्रेड होता त्याचे सँडविच करून खाल्ले. इतर ग्रोसरी संध्याकाळी केशव आल्यावर आणणार होते. त्यामुळे स्वयंपाक करण्याचा प्रश्नच नव्हता. केशव चा ऑफिस मधून फोन आला. तो म्हणाला किल्ली घेऊन खाली फेर फटका मारून ये. तशी ती निघाली. खाली जाऊन बोर्ड वर तिथे राहणाऱ्यांची नावे बघितली. एक पटेल नाव बघून ती लिफ्ट ने त्या अपार्टमेंट पाशी गेली आणि बेल वाजवली पण कोणी दर उघडले नाही. निराश होऊन तशीच घरी गेली. संध्याकाळी केशव आला आणि ती रडतच त्याच्या मिठीत शिरली. पण तेही दिवस सरले. हळू हळू ओळखी झाल्या आणि तिला सवय होऊ लागली.
दोन वर्षात त्यांना अमेरिकेचा विसा मिळाला आणि ते कॅलिफोर्निया मध्ये आले. आता तिथे रुळणे भाग पडले. पण तिला आई होण्याची चाहूल लागली. भारतात ही बातमी कळवली. त्याच सुमारास केशव आणि तिच्या घरी बडोद्यात फोन आले होते. दोन्ही घरून फोन येऊ लागले. तिचे आई वडील स्वतः खर्च करून तिच्या बाळंतपणासाठी सहा महिन्या करता आले आणि मग विमला चे खूप लाड होऊ लागले. राधिका झाली. तिचे आई वडील गेल्यावर केशव चे आई वडील आले. मग दोन वर्षाने दीपिका झाली आणि त्यानंतर पाच वर्षाने मोनिका झाली. कालांतराने मोठे घर घेतले. मुलगा हवा होता पण आता थांबायचे ठरवले. तिघी मुलींच्या बाळंतपणात मदत करण्यासाठी तिचे आणि केशव चे आईवडील आले होते. त्यामुळे विमला चे खूप लाड झाले.
तिघी ना सांभाळताना वेळ कसा भुरकन जात असे. विमला आता खूप जाड झाली होती. घरकाम आणि मुलींचे करण्यात केशव कडे तिचे दुर्लक्ष होत होते. रात्री ती इतकी दमत असे की केशव ला अनेक दिवसात ती जवळ येऊन देत नसे. पूर्वी एक रात्रही मिठीत आल्या शिवाय रहात नसे. केशव तिला वजन कमी कर म्हणून मागे लागे. पण तिला ते जमले नाही. तो मात्र अजूनही पूर्वी इतकाच सडसडीत आणि आकर्षक दिसत असे.
मुली मोठ्या झाल्या होत्या. विमला एक छोटी नोकरी करत होती. पण आता केशव चे आणि तिचे आई वडील निवर्तले त्यामुळे त्यांचा आधार तुटला होता. विमला ला एक मोठी बहीण आणि मोठा भाऊ होता. पण ते दोघे भारतात होते.
जाड विमला केशवला आता आवडेना! त्याला त्याच्या बरोबर काम करणारी मेरी आवडू लागली. बांधेसूद गोरी मेरी जुळ्या मुलांची आई होती. दोघांचे प्रेम संबंध जुळले आणि नकळत विमला आणि त्याच्यात खटके उडू लागले. काही वेळा मुलींच्या वागण्यावरून तर कधी भारतात ट्रीप करण्या वरून. काहीतरी बिनलंय असे विमला ला जाणवत होते. केशव शी पूर्वी सारखे प्रेमाचे संबंध राहिले नव्हते. तो तिच्याशी संबंध ठेवत नव्हता. त्याचे काहीतरी बाहेर लफडे आहे असे तिला जाणवत होते. पण पुरावा नव्हता.
लग्नाला आता बावीस वर्षे झाली होती. राधिका आणि दीपिका यांचे कॉलेज शिक्षण चालू होते. त्या येथील पद्धती प्रमाणे स्वतंत्र रहात होत्या. पार्ट टाईम नोकरी करत होत्या. मोनिका हायस्कूल मध्ये होती आणि ती घरीच रहात होती. आणि केशव घरात असूनही ती एकाकी होती.
एके दिवशी ती कामावरून घरी आली तर दारावर एक चिठ्ठी लावलेली दिसली. तिने ती उघडली.
" मोनिका ला घेऊन मी घर सोडून जात आहे. रोज भांडणाचा कंटाळा आला आहे". केशव.
विमला ला काहीच समजनासे झाले. हे काय घडते आहे? त्या काळी मोबाईल फोन नव्हते त्यामुळे केशव ला कुठे फोन करावा हे समजत नव्हते. तिने दोन्ही मोठ्या मुलींना फोन केला पण त्यांना काहीच कल्पना नव्हती. ती फार गोंधळून गेली होती. काही दिवसांनी केशव नक्की परत येईल असे तिला वाटत होते. तिचे अजूनही केशव वर प्रेम होते. तिला संसार करायचा होता.
दोन दिवस सुट्टी घेऊन तिने केशव आणि मोनिका ला शोधण्याचा प्रयत्न केला. पण हताश होऊन ती कामावर जाऊ लागली. येवढे मोठे घर तिला खायला उठतं असे. रोज ती केशव येण्याची वाट बघत असे.
एके दिवशी राधिका आणि दीपिका मोनिका ला घरी घेऊन आल्या. मोनिका म्हणाली की ड्याड एका बाई बरोबर रहात आहे. तिला दोन दहा वर्षाची जुळी मुले आहेत. मला त्यांना सांभाळावे लागते. आई मी तुझ्या जवळ राहू का? अर्थात विमला खूप प्रेमाने हो म्हणाली. तिचा एकटे पणा आता थोडा कमी होणार होता.
केशव असे कसे करू शकतो? माझ्यावर प्रेम केले आणि आता मला फसवतो आहे. दोन मुलं असलेल्या तिच्यावर प्रेम कसा करू शकतो? पण आता केशव परत येण्याची आशा संपली होती.
एक दिवस तिला घटस्फोट ची नोटीस आली. तेव्हा ती खूप रडली. तिने वकील शोधला. कोर्टाची तारीख पडत होती. विमला ने घर मागितले होते. तसेच पोटगी मागितली होती. एवढी मोठी प्रॉपर्टी तिला देऊन टाकायची नव्हती. कोर्टात सर्वच चव्हाट्यावर आले. आणि अनेक वर्षे झगडून शेवटी घटस्फोट झाला. विमला ला घर मिळाले पोटगी काही मिळाली नाही. त्या ऐवजी केशवने मोनिका चा सर्व खर्च आणि मोठ्या दोघी मुलींना लागेल ती मदत करायचे कबूल केले.
विमला मात्र पोटा साठी नोकरी करत होती. आणि तिला घराचे दर महिन्याचे हप्ते आणि इतर बिल या साठी पैसे पुरत नव्हते. मेडिकल इन्शुरन्स नव्हता. अनेक वर्षे कष्टात, काळजीत गेली. पैशा साठी ती घरात पेईंग गेस्ट ठेवत होती. मोठ्या दोघींची लग्न झाली. त्यांना एक मूल झाले. जमेल तशी विमला तिन्ही मुलींना मदत करत असे. केशव ने दुसरे लग्न केले जिच्यासाठी त्याने विमला ला सोडले होते.
आज वीस वर्ष झाली होती तिला असे एकटे राहून! प्रेम विवाह केल्याने भाऊ बहिणीचा फारसा सपोर्ट नव्हता. सतत झगडत राहावे लागत होते. नवरात्री चे नऊ दिवस ती व्रत धरत असे. ती उपास करत होती. देवळात जाऊन ध्यान साधना करत होती. तिथे तिला खूप मैत्रिणी मिळाल्या होत्या. त्यांचा तिला फार मोठा आधार मिळत होता. तिची नोकरी कधी चालू असे तर तिला कधी घरी बसावे लागे. अशा परिस्थितीत घर चालवणे फारच अवघड होत होते. पण देवाच्या दयेने सर्व निभावून जात होते. हल्ली तिच्या भारतातील भावास ती फसली आहे हे लक्षात आले आणि तो तिला आधार देऊ लागला. भारतात येऊन त्याच्या जवळ रहा असे म्हणू लागला. पण स्वाभिमानी विमला त्यासाठी तयार झाली नाही. सतत आनंदात राहत होती.
विमला चा ६६ वा वाढदिवस मुलींनी नेहमी प्रमाणे साजरा केला आणि तिला सरकार कडून पैसे मिळू लागले तसेच हेल्थ इन्शुरन्स मिळाला. मग थोडे सुखाचे दिवस आले. पण हे सुख देवाला मान्य नव्हते.
काही वर्ष लोटली.
शरीराच्या तक्रारी चालू झाल्या. गुढगे दुःखी सुरु झाली. वजन खूप वाढले होते. डॉक्टर ते कमी कर म्हणून सांगत. पण ते काही तिला जमत नव्हते. ती वॉकर घेऊन चालू लागली. हळू हळू ती कमरेत पूर्ण वाकली. तिला एक स्नायूंचा दुर्घम रोग झाला ज्यावर काही उपाय नव्हता. तश्या स्थितीत तिने दोन वर्षे काढली. अनेक वेळा मुलींनी मदत केली. इतर मैत्रिणी मदत करत. पण तब्येत खूप खालावत गेली. आता ती व्हील चेअर वापरत असे. स्वतः काही काम करू शकत नव्हती. मुलींनी तिला सांभाळायचा प्रयत्न केला पण त्यांची नोकरी, संसार यात ते जमेना! शेवटी तिचे घर विकले आणि तिला नर्सिंग होम मध्ये दाखल केले. इथे आता ती सहा महिने होती. जेवण अजिबात जात नसे खूपच बारीक आणि अशक्त झाली होती. शेवटच्या क्षणी केशव ला बघण्याची इच्छा होती. पण त्याला फोन करून ही तो आला नाही.
गप्पा मारताना मुलींनी एकदम विमला कडे पाहिले. आई आई म्हणून तिला त्या हलवत होत्या. आई अग कोण आले ते बघ. डोळे उघड!
विमला ने डोळे उघडले. तिला समोर केशव दिसला. तिने हात जोडून नमस्कार केला आणि डोळे मिटले ते कायमचे! तिच्या शेवटच्या इच्छे प्रमाणे केशव ने तिला अग्नी दिला.
कांचन अकोलकर
कॅलिफोर्निया