अनोखे नाते

 ॥अनोखे नाते॥  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ अनुराधा पाठक 


विशाल आणि वैखरी जोशी हे नवदांपत्य नुकतेच पुणे येथे इंद्रप्रस्थ अपार्टमेंट मध्ये रहायला आले होते.विशाल मल्टीनॅशनल कंपनीत अभियंता तर वैखरी नामांकित शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून नोकरी करीत होते.वैखरीची घर आणि नोकरी दोन्ही सांभाळत असल्यामुळे जरा ओढाताण होत असे हे विशाल  जाणून होता.पण दोघांच्याही समंजस वृतीमुळे त्यांचा संसार अतिशय प्रेमाने समाधानाने विश्वासाने फुलत होता.


      वैखरी आणि विशाल दोघेही आपापल्या कार्यक्षेत्रात कुशल होते.शिवाय लाघवी बोलणे वागणे कोणतेही सहकार्य करण्याचा स्वभाव यामुळे ते दोघेही लोकांची मने जिंकून घेत असत.लवकरच त्यांनी आपापल्या कुटुंबातील सर्वांना त्यांच्या संसारवेलीवर फुले उमलतात असल्याची सुखद आनंददायी बातमी दिली.


          सर्वत्र आनंदी वातावरण होते.दोघेही सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होते.पण विशालला काळ्जी होती की त्याचे आई वडील आणि सासुसासरे प्रकृतीकारणवशात त्यांच्या 


जवळ येऊन राहू शकत नव्हते. डॉक्टरांनी वैखरीचे सिझेरियन होणार हे सांगितले असल्याने एक छानसा मुहूर्त बघून वैखरीने मुलगा मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला.यावेळी काही दिवसांसाठी वैखरीची आई आली होती.दोघीमिळून बाळांचे छान संगोपन केले जात होते.काही दिवसांनी आई आपल्या गावी अपरिहार्य कारणास्तव निघून गेली.सहा महिन्याची सुट्टी संपल्यावर बाळांना पाळणाघरात ठेवून वैखरी देखील शाळेत रुजू झाली.


      मुलगा विक्रम आणि मुलगी विनीता हळूहळू मोठी होऊ लागली.त्यांच्या बाललीलांचा आस्वाद घेत घेत ती मुले कधी मोठी झाली आणि शाळा कॉलेज मध्ये गेली हे विशाल वैखरीला कळलेच नाही.दोघेही मुले उच्च शिक्षित झाले.विक्रम एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर तर मुलगी विनीता डॉक्टर म्हणून नावारूपास आलेल्या एका हॉस्पिटलमध्ये रुजू झालीत.या दोन्ही मुलांचे आपल्या आई वडीलांवर निरतिशय प्रेम होते.गुण आणि संस्कार तर हातात हात घालून रहात होते.


      काही दिवसांनी चांगले स्थळ सांगून आल्यामुळे विनीताचे थाटामाटात लग्न करण्यात आले. विक्रमचे देखील एवढ्यात लग्न करुया अशी बोलणी घरात होऊ लागली.तेव्हा विक्रमने माझे संपदा नावाच्या मुलीवर प्रेम आहे पण ती अनाथ असल्याचे आई-बाबांना सांगितले. कोणत्याही प्रकारची आडकाठी न घेता त्यांच्या आनंदासाठी त्यांनी विक्रम-संपदाचे थाटामाटात लग्न लावून दिले.


         एव्हाना सर्वांच्याच आयुष्यात आमुलाग्र पण हवाहवासा बदल झाला होता.विशाल वैखरी संपल्यावर मायेचा वर्षाव करत होते.सर्वजण आनंदसागरात न्हाऊन निघत होते.दिवसामागून दिवस सरत होते.संपदाने एका सुंदर मुलीला जन्म दिला.वैखरीने छोटीला स्विटीला सांभाळण्यासाठी म्हणून स्वेच्छानिवृती घेतली. "आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे " असे वातावरण होते. पण --" लागो ना दृष्ट माझी माझ्याच वैभवाला " असे सारखे वैखरीच्या मनात येत असे. " मन चिंती ते वैरी न चिंती " या न्यायाने नियतीने घाला घातलाच.विशाल वैखरी एका मोठ्या अपघातात देवाला प्रिय झाले.


        दोन्ही मुले आणि सुन यांचे मन मानायलाच तयार नव्हते पण अखेर सत्याला सामोरे जावेच लागते.आईवडिलांशिवाय जगायचे कसे?या भावनेने त्यांचे मन सैरभैर झाले." कोणी आई वडिल देता का आई वडिल!अशी त्यांची दशा झाली होती.शेवटी न राहवून संपल्याने विक्रमला प्रश्न केला आपण आई बाबा दत्तक घ्यायचे का?समाज काय म्हणेल?आपल्या लेकीला स्विटीला नातीसारखा जीव लावतील का? असे नानाविध प्रश्न विक्रमच्या डोक्यात थैमान घालू लागले.या विचारात त्यांनी अनेक रात्री जागून काढल्या.विचारान्ती त्या दोघांचेही मन सांगू लागले.आपण त्यांचा छान सांभाळ तर करुच! शिवाय एका असहाय्य जोडप्याला आधार प्रेम दिल्यामुळे आपले आई-वडील देखील जिथे कुठे असतील तिथे समाधानी राहतील.त्यांना आपला अभिमान वाटेल.


          झाले तिघांचेही एकमत झाले आणि तिघेही वेगवेगळ्या वृद्धाश्रमाच्या पायऱ्या चढू लागले.या दरम्यान त्यांना अनेक बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागले.काहींनी तर त्यांना वेड्यात काढले.समाज नातेवाईक वृद्धाश्रमातील कर्मचारी देखील त्यांना वेडी समजत होती.पण त्यांनी हार पत्करली नाही.


          अथक प्रयत्नांती सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून " ओलावा " नामक वृद्धाश्रमातील कुसुम मनोहर या जोडप्याला आई वडील म्हणून घरी आणण्याचे त्यांनी ठरविले. त्या दोघांना भेटताक्षणीच त्यांच्या हृदयात जणू मायेची विज चमकून गेली.तिघेही म्हणाले की हेच आपले देवाघरी गेलेले आई बाबा आहेत.पुढे एका रविवारी अतिशय थाटामाटात त्या दोघांना घरी आणण्यात आले.छानसा मुहूर्त पाहून त्यांचे विशाल वैखरी असे नामकरण करण्यात आले.


        ;आता हे चौकोनी कुटुंब एकमेकांवर मायेची पखरण करीत गुण्यागोविंदाने राहत आहेत.समाजाची वाहवा मिळवित आहेत.एक वेगळा आदर्श समाजापुढे प्रस्थापित केल्यामुळे संपूर्ण कुटुंब मायेची विश्वासाची आणि समाधानाची शाल अंगावर पांघरुन स्थिर आणि आनंदी जीवन जगतात आहे.


         


              सौ.अनुराधा पाठक


                   चिंचवड पुणे


Post a Comment (0)
Previous Post Next Post